व्हीएस न्यूज – जीवनसाथी डॉटकॉम या विवाल संकेतस्थळावरुन ओळख झालेल्या एका तरुणीने उपवराला दोन लाख रुपयांना गंडा घातला.
महेश विलास पाटील (वय 36, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी काव्या जयवंतराव असलकर या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉम व मराठी मॅट्रिमोनी या संकेतस्थळावर लग्नासाठी नोंदणी केली होती. या संकेतस्थळावरील नोंदणीच्या माध्यमातून सप्टेंबर 2017 मध्ये काव्या असलकर या महिलेशी त्यांची ओळख झाली. यातून त्यांचे पुढे फोनवरही बोलणे झाले. मात्र, पुढे महिलेने माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे व ऑपरेशन करायला माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले.
भावनिक होऊन पाटील यांनी तिने दिलेल्या युनियन बॅंकेच्या खात्यावर सुरुवातीला दीड लाख रुपये व नंतर 50 हजार महिलेच्या खात्यावर टाकले. मात्र, हे पैसे भरल्यानंतर महिलेने 23 ऑक्टोबरपासून पाटील यांचे फोन उचलणेच बंद केले. संबंधित महिलेचा पत्ता माहित नसल्याने तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याने फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज - भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाचे फलंदाजीचे स्थान हे नेहमीच अनिश्चित असते. भारताच्या फलंदाजीच्या फळीतील सहावे स्थान हे परिस्थितीनुरूप लवचीक असते, असे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४०हून अधिक सरासरी राखणाऱ्या आणि तीन कसोटी शतके झळकावणाऱ्या साहाने सांगितले.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन डावांत साहा अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. या क्रमांकाला न्याय देणे आव्हानात्मक ठरले का, या प्रश्नाला उत्तर देताना साहा म्हणाला, ‘‘सातव्या क्रमांकावर मी नेहमी फलंदाजी करीत नाही. मी सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या क्षमतेनुसार मी, अश्विन आणि जडेजा यांचे फलंदाजीचे स्थान बदलले जाते.’’
सलामीच्या स्थानावर मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्यापैकी दोघे जण फलंदाजी करतात. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आणि त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे असे पहिले पाच क्रमांक ठरतात. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या निवृत्तीनंतर त्याचे सहावे स्थान अद्याप रिक्त आहे. तळाच्या फलंदाजांसोबत दुसऱ्या नव्या चेंडूनिशी खेळणे आणि आघाडीची फळी कोसळली, तर डाव सावरणे हे आव्हान या स्थानाचे असते. ‘‘खेळपट्टीच्या स्वरूपानुसार ६, ७ आणि ८ हे स्थान ठरते. संघव्यवस्थापनाच्या रणनीतीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करायची माझी तयारी आहे,’’ असे साहाने स्पष्ट केले.
आणखी काही षटके मिळाली असती, तर पहिली कसोटी भारताला जिंकता आली असती, असे लोकेश राहुलप्रमाणेच मत साहाने प्रकट केले. २३१ धावांचे आव्हान पेलताना श्रीलंकेची ७ बाद ७६ अशी अवस्था झाली होती. परंतु अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आणि तो अनिर्णीत राहिला.
‘‘पहिल्या कसोटीत भारताची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या डावात आमची फलंदाजी चांगली झाली होती. शिखर, राहुल आणि विराट यांनी समाधानकारक धावा केल्या होत्या. कोणत्याही संघाचे ७ फलंदाज १०० धावांच्या आत तंबूत परततात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास खचणे स्वाभाविक असते,’’ असे साहाने सांगितले.
पहिल्या कसोटीबाबत साहा म्हणाला, ‘‘आम्ही पहिली कसोटी जिंकण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. पहिले काही निर्णय झटपट लागले असते, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. आम्ही सुरुवातीला कसोटी वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र नंतर ती जिंकू शकतो अशा आशा निर्माण झाल्या.’’
दुसऱ्या कसोटीतसुद्धा भारत पाच विशेषज्ञ गोलंदाजांसह उतरणार आहे. याबाबत साहा म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी मिळवणे, हे कसोटी सामना जिंकण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे गोलंदाज हे अधिक महत्त्वाचे असतात. याशिवाय माझ्यासहित जडेजा आणि अश्विनवर फलंदाजीचीही जबाबदारी असते.’’
व्हीएस न्यूज - ‘मुस्लिमांनी देशावर ८०० वर्षे राज्य केले तरीही ते आरक्षण मागत आहेत. मुस्लिम समाज मागासवर्गीय नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना स्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टाईम्स नाऊने या संदर्भात वृत्त दिले आहे. भारतावर ८०० वर्षे राज्य करुनही मुस्लिम समाज स्वत:ला मागास समजत असेल तर त्यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे. देशात ब्राह्मण, क्षत्रियदेखील गरीब आहेत. मात्र, ते कधी आरक्षणाची मागणी करत नाहीत, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
धार्मिक बाबीवरुन आपण कुठल्याही प्रकारे मागासपणा निश्चित करु शकत नाही. मात्र, ओवेसी जर खरोखर कोणत्या मागास व्यक्तीचे नाव सुचवत असतील, तर त्याला आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीला मदतदेखील करु शकतो, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी पुढे म्हणाले, ओवेसी यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्याप्रमाणे विचार करायला हवा. काशीराम यांनी अनुसुचित जातींना आरक्षणाचा विचार न करण्याऐवजी समाजाच्या ताकदीबद्दल विचार करण्याची शिकवण दिली होती.
असदुद्दीन ओवेसीयांनी ट्विटद्वारे मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहे. मात्र, त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांच्या आरक्षणासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशाराही ओवेसी यांनी दिला आहे.
व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब यांच्या पाठोपाठ आता गुजरातमध्येही पद्मावती प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही माहिती दिली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटावर राजपूत समाजाने आक्षेप घेतला आहे. पद्मावती चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा दावा करणी सेनेने केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.
‘पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच हा चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही,’ असे रुपाणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल यांनीही ‘पद्मावती’ला विरोध केला होता. ‘चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग हटवायला हवेत. अन्यथा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते,’ असे रुपाणी यांनी म्हटले.
पद्मावती चित्रपटातून ऐतिहासिक घटना तोडूनमोडून दाखवण्यात आल्याचा आरोप राजपूत समाजाने केला आहे. चित्रपटातील पद्मावती ही व्यक्तीरेखा चित्तौडगढची राणी पद्मिनीसारखी असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाबद्दल रुपाणी यांनी ट्विट केले आहे. ‘राजपूत समाजाच्या भावना लक्षात घेऊन गुजरात सरकार पद्मावती चित्रपट राज्यात प्रदर्शित करण्याची परवानगी देणार नाही. इतिहास तोडूनमोडून तो लोकांसमोर सादर करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही. आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. मात्र त्या नावाखाली आमच्या महान संस्कृतीशी तडजोड होऊ शकत नाही. हे कदापि सहन केले जाणार नाही,’ असे रुपाणी यांनी ट्विटमध्ये म्हटले.
व्हीएस न्यूज - मुले दत्तक घेऊन नंतर त्यांना वाईट वागणूक दिली जाण्याच्या काही घटना सामोऱ्या आल्यानंतर आता जे पालक मुले दत्तक घेतील त्यांना हिंदू दत्तक कायद्यानुसार बालक दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकार करण्यात येणार आहे.
संबंधित पालक हे बाल न्याय कायदा २०१५ अनुसार मुले दत्तक घेऊ शकतात. हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांना त्यांच्या दत्तक मूल प्रक्रियेस हिंदू दत्तक कायद्यानुसार अधिकृतता देऊ शकतात. बाल न्याय कायद्यात मुलाचा स्रोत व पालकांची पाश्र्वभूमी तपासण्याची तरतूद आहे पण हिंदू दत्तक कायद्यात ही तरतूद नाही त्यामुळे अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात असे दिसून आले आहे. त्यामुळे आता महिला व बालविकास मंत्रालयाने हिंदू दत्तक कायद्यात काही सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यासाठी तयार केली असून त्यात पालकांना मूल दत्तक घेताना त्याची नोंदणी मूल दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. सध्या या प्रस्तावाचा मसुदा विविध मंत्रालयांकडे अभिप्रायार्थ पाठवण्यात आला आहे.
दोन हिंदू एक करारपत्र सादर करून मूल दत्तक घेऊ शकतात इतकी सोपी प्रक्रिया हिंदू दत्तक कायद्यात आहे. त्यामुळे या कायद्यानुसार मुले दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक आहे पण नंतर यातील मुलांची तस्करी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. दत्तक प्रक्रियेत या कायद्यातील पळवाटा धोकादायक ठरत आहेत त्यामुळे त्यात प्रस्तावित सुधारणा केली तर ते फायद्याचे आहे.
हिंदू दत्तक कायद्यात सुधारणा करून मूल दत्तक घेण्याची नोंद दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे करणे सक्तीचे केल्यास यातील पळवाटा बंद होतील व दत्तक मुले व त्यांचे पालक यांची सगळी माहिती प्राधिकरणाकडे संकलित स्वरूपात राहील, त्यामुळे या प्रस्तावाचे स्वागतच आहे.’
– लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, मूल दत्तक स्रोत प्राधिकरण
व्हीएस न्यूज - आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी कर्करोगाबाबत मुक्ताफळे उधळून नवा वाद निर्माण केला आहे. पूर्वी केलेल्या वाईट कृत्यांमुळेच लोकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. हा एक प्रकारचा दैवी न्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेमंत विश्व शर्मा यांच्या विधानावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
गुवाहाटीमध्ये शिक्षकांना नेमणूकपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हेमंतविश्व शर्मा यांनी कर्करोग का होतो याचे कारण सांगून उपस्थितांना धक्काच दिला. देव आपण केलेल्या पापांची शिक्षा देतो. तरुण मुलाला कर्करोग होतो किंवा त्याचा अपघात होतो. तुम्ही जर याची पार्श्वभूमी बघितली तर त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावते. हा दैवी न्याय आहे, असे शर्मा म्हणालेत.
कधी कधी त्या व्यक्तीची चुकही नसते. त्याच्या आई-वडिलांनी काही पाप केले असतील आणि याची शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. गीता, बायबलमध्येही याचा उल्लेख आहे. आपल्याला आपल्या कर्माचेच फळ मिळते. प्रत्येकाला या जन्मातच त्याच्या कर्माची फळे भोगायची आहेत, यापासून कोणाचीही सुटका नाही, असे त्यांनी नमूद केले.
हेमंत विश्व शर्मा यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरोग्यमंत्र्यांनी कर्करोगाबाबत केलेले विधान निंदनीय आहे. त्यांनी कर्करोग रुग्णांच्या भावना दुखावल्या, त्यांनी या विधानासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. तर ‘एयूडीएफ’ या पक्षाचे नेते अमिनूल इस्लाम म्हणाले, आरोग्यमंत्री राज्यात कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, म्हणून आता ते असे विधान करत आहे. कर्करोग रुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनीही या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम जन्मभूमीप्रश्नी रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपने याप्रकरणात राहुल गांधींना ओढल्याचे दिसते. अयोध्येतील राम जन्मभूमीप्रकरणी शिया वक्फ बोर्डचा प्रस्ताव चांगला असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली असून आता याप्रश्नी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मौन सोडून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डने सोमवारी राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद संपुष्टात आणण्यासाठी अयोध्येत वादग्रस्त जागेवर राम मंदिर तर लखनऊ येथे ‘मस्जिद ए अमन’ तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी याचा मसुदा दि. १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात सोपवण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी याप्रकरणी राहुल गांधींना राम जन्मभूमीबाबत त्यांचे मत विचारले आहे. शिया वक्फ बोर्डने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मशीद उभारण्याचा प्रस्ताव चांगला असल्याचे राव यांनी म्हटले. राजकोट येथे भाजप उमदेवाराच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
भाजपचे मत स्पष्ट आहे, अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बनावे. पण काँग्रेसला काय हवं आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी मौन सोडावी अशी आमची मागणी असून त्यांनी अयोध्येप्रश्नी आपले मत मांडावे, असे त्यांनी म्हटले. आम्ही शिया वक्फ बोर्डच्या प्रस्तावाचे समर्थन करतो पण काँग्रेसकडूनही त्यांचे उत्तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, राम मंदिरप्रश्नी पाकिस्तान अडथळा आणत असल्याचा आरोप शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष सईद वसिम रिझवी यांनी केला असून त्याचाच एक भाग म्हणून लष्कर ए तोएबाने २००५ मध्ये राम जन्मभूमीवर हल्ला केला होता,असा दावा त्यांनी केला.
व्हीएस न्यूज - भारतीय महिला बॉक्सिंगपटूंनी एआयबीए जागतिक युवा्र अजिंक्यपद स्पध्रेचा मंगळवारचा दिवस गाजवला. अंकुशिता बोरोसह (६४ किलो), शशी चोप्रा (५७ किलो), नीतू (४८ किलो), साक्षी चौधरी (५४ किलो) आणि ज्योती गुलिया (५१ किलो) या भारतीय खेळाडूंनी विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बोरोने टर्कीच्या सॅग्ला अॅलूक कॅग्लाविरुद्ध आक्रमक खेळ करताना सहज विजय मिळवला. बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत रौप्यपदक विजेत्या बोरोसमोर प्रतिस्पर्धी खेळाडूला अधिक काळ तग धरता आला नाही. ‘कॅग्लाने तिच्या देशात मला पराभूत केले होते आणि स्वाभाविकच त्याची परतफेड माझ्याकडून होणे आवश्यक होते. ती मी मायदेशात केली,’ असे बोरो म्हणाली. गुलियाने युक्रेनच्या अनास्तासिया लिसिंस्कावर, तर चोप्राने दुसऱ्या मानांकित तैवानच्या लीन ली वेई-यीवर विजय मिळवला. बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या नीतूने ४८ किलो वजनी गटात बल्गेरियाच्या एमी-मेरी तोडोरोव्हावर मात केली. ती म्हणाली, ‘हा माझ्यासाठी सोपा सामना होता. बल्गेरियात मी यापूर्वी तोडोरोव्हावर विजय मिळवला होता आणि तिचा खेळ माझ्या ठाऊक होता.’
अखेरच्या लढतीत चौधरीने चौथ्या मानांकित रशियाच्या इंदिरा शुडाबाएव्हावर विजय मिळवत आगेकूच केली. नेहा यादव (८१ किलोवरील) आणि अनुपमा (८१ किलो) यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाल्याने भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत. या स्पध्रेत ३८ देशांतील १५०हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. पहिल्यांदाच भारतात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - त्रिपुरात आणखी एका पत्रकारची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. सुदीप दत्ता भौमिक असे मृत पत्रकाराचे नाव असून त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या (टीएसआर) जवानाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आगरतळा येथून २० किमी अंतरावर असलेल्या आरके नगर येथे ही घटना घडली.
भौमिक हे ज्येष्ठ पत्रकार असून एका वृत्तपत्रात ते काम करत. ते आरके नगर येथील सेकंड टीएसआर कमांडटची यांची वेळ घेऊन भेटायला गेले होते. त्यावेळी कमांडंटच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या जवानाबरोबर भौमिक यांचा वाद झाला. चिडलेल्या जवानाने अचानक त्यांच्यावर गोळी झाडली. भौमिक जागीच ठार झाले, अशी माहिती बंगाली वृत्तपत्र स्यानदान पत्रिकाचे संपादक सुबेल डे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
भौमिक यांचा मृतदेह आगरतळा येथे आणण्यात आला असून पोलिसांनी संशयित जवानाला अटक केली आहे. यापूर्वी २० सप्टेंबर रोजी दिन-रात या स्थानिक वृत्त वाहिनीचे पत्रकार शंतनु भौमिक यांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. कम्युनिस्ट आणि आयपीएफटी समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत ही घटना घडली होती.
विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी नवी समीकरणे
व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजप व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शह देण्याकरिता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याची योजना आखली आहे. हा उमेदवार अराजकीय व आर्थिकदृष्टय़ा सक्षम असेल, असे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले. नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्तअसलेल्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत असून, त्याची रणनीती तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात कोणती भूमिका घ्यायची हे ठरविण्याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही जागा काँग्रेसची असल्याने ती लढविण्याबाबत काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा, असे राष्ट्रवादीच्या वतीने सुचविण्यात आले. नारायण राणे हे रिंगणात उतरतील हे गृहीत धरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यूहरचना आखली आहे. राणे हे शिवसेना आणि काँग्रेसचे कट्टर विरोधक आहेत. यामुळेच राणे यांना शह देण्याकरिता शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून, शिवसेनेने तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर उमेदवारी अर्जासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्या काँग्रेसने घेतल्या आहेत.
१२ डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त मोर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने विधान भवनावर संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. बैठकीला अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने १ ते ११ डिसेंबर या काळात दिंडी आयोजित केली आहे. तर काँग्रेसचा मोर्चा १३ तारखेला पोहचणार होता. पण दोन्ही काँग्रेसने एकत्र मोर्चा काढण्याकरिता आपापल्या नियोजित तारखांमध्ये बदल केला. दोन्ही काँग्रेसचे मोर्चे टी चौकात एकत्र येतील. तेथून पुढे संयुक्त मोर्चा काढण्यात येईल.
माहिती तंत्रज्ञान विभागात काय चालले आहे ?...
शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे फसली असून, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांना बळीचा बकरा बनविले जाण्याची शक्यता आहे. पण खरे सूत्रधार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू कौस्तुभ धवसे यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
भाजप नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच राणे यांचा निर्णय…
नारायण राणे यांची विधान परिषदेची पोटनिवडणूक लढण्याची तयारी झाली आहे. पण भाजपने आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. भाजप नेत्यांशी चर्चा करूनच राणे हे निर्णय घेणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन उमेदवार उभा केला तरीही राणे यांना निवडणूक जड जाणार नाही. उलट विरोधकांची काही मते राणे यांना मिळण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने राणे यांच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात हे लक्षात घेऊन राणे यांनी ही पोटनिवडणूक लढवू नये, असा प्रयत्न होऊ शकतो.
डॉ. सावंत, पोटे, तटकरे, ठाकरे यांचा समावेश
व्हीएस न्यूज - पुढील वर्षांत राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदारांची मुदत संपत असून, निवडणुकांना अद्याप काही कालावधी असला तरी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांतील इच्छुकांनी नगरसेवकांना ‘वश’ करण्यावर भर दिला आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये समावेश आहे. राज्यसभेच्या सहा खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येत आहे. विधान परिषदेचे विधानसभा सदस्यांमधून निवडून येणारे ११ सदस्य, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सहा सदस्य निवृत्त होत आहेत.
सहा खासदार होणार निवृत्त…
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
११ जागांसाठी चुरस…
विधानसभेतून निवडून येणाऱ्या ११ सदस्यांसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १२२ आमदार असून, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने पाचवी जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेचे दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. पाचवी जागा निवडून आणण्याकरिता भाजपला १३५ मतांची आवश्यकता भासेल. पाचव्या जागेकरिता भाजपकडून आर्थिकदृष्टय़ा तगडय़ा उमेदवाराला उतरविले जाईल, अशी शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी आघाडीत राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. यंदा काँग्रेसच्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, असे ठरले आहे. हे आश्वासन कसे पाळले जाते यावर आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.
स्थानिक प्राधिकारीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी…
नाशिक, लातूर-उस्मानाबाद-बीड, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये राजकीय संदर्भ बदलले आहेत. भाजपचे संख्याबळ वाढल्याने या निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळू शकतात. अर्थात या मतदारसंघांच्या निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात.
हे आमदार निवृत्त होणार…
सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, निरंजन डावखरे, जयंत जाधव, बाबाजानी दुर्राणी, अनिल तटकरे (राष्ट्रवादी), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, दिलीप देशमुख (काँग्रेस), भाई गिरकर,महादेव जानकर, प्रवीण पोटे, मितेश भांगडिया (भाजप), अनिल परब आणि डॉ. दीपक सावंत (शिवसेना), कपिल पाटील (लोकभारती), जयंत पाटील (शेकाप), अपूर्व हिरे (अपक्ष) असे २१ आमदार निवृत्त होत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य…
निवृत्त होणाऱ्या २१ सदस्यांमध्ये सर्वाधिक आठ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवृत्त होत आहेत. शिवसेना (दोन), शेकाप, लोकभारती आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वालचंद गिते (३४) असे या तरुणाचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
धंतोलीत राहणाऱ्या वालचंद फुलचंद गितेने (वय ३४) १५ नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जगदीश पंचबुद्धे आणि राहुल कामळे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० आणि ५०९ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ कलमातर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी गितेला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. वालचंद गितेने कृषी विषयात बीएससी केले असून तो विवाहित आहे. त्याला दोन लहान मुलंही आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्त्री ही कोणाची तरी आई, बहीण, मुलगी असते याचे भान ठेवा. स्त्रीयांबद्दल आदर राखायला तरी शिका, असे आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे. कायदा हातात घेऊन तुला धडा शिकवू असा इशाराच आव्हाड यांनी गितेला दिला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002