व्हीएस न्यूज - बांधकाम व्यवसायासाठी जमीन खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख, 87 हजार रुपये घेतले. खरेदीखत न करता फसवणूक केली. याप्रकरणी लहानु यशवंत नरोटे (रा. लक्ष्मी तारा अपार्टमेंट, काळेवाडी) यांनी चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर आणि पवार नावाच्या एका वकीलाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानू नरोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना बांधकामासाठी जागा हवी होती. आरोपी नार्वेकर आणि पवार यांनी त्यांना चिखली येथील एका जागेची कागदपत्रे दाखवून नरोटे यांच्याकडून चार लाख, 87 हजार रुपये घेतले. लाखोंची रक्कम घेऊन जमिनीचे खरेदीखत केले नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांधकाम व्यावसायिक लहानू नरोटे यांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे करीत आहेत.
व्हीएस न्यूज - आनंदी जीवन जगण्यासाठी संपत्तीची नाही, तर संत विचारांच्या आचरणाची गरज आहे. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी अहिंसेचे तत्वज्ञान जगाला दिले. जगाने आता महावीरांचे तत्वज्ञान स्विकारायचे कि, महाविनाश स्विकारायचा याचा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
भगवान महावीर जयंती निमित्त आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील ‘श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या’वतीने गुरुवारी (दि.29 मार्च) आकुर्डी येथे शिंदे यांचे ‘भगवान महावीरांचे तत्वज्ञान व सद्यपरिस्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष संतोष कर्नावट, महामंत्री मनोज सोळंकी, राजेंद्र खिंवसरा, प्रकाश मुनोत, जयकुमार चोरडीया, सुभाष ललवाणी, राजेंद्र मुनोत, पुनम कर्नावट, अनिता सोळंकी आदींसह बहुसंख्य जैन समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, गौतम बुध्द आणि भगवान महावीर यांनी आपल्या एैश्वर्याचा त्याग करुन बुध्दीप्रामाण्यवाद स्विकारुन सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सम्यकदर्शकन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य शिकविले. सुख हे भौतिक गाष्टींशी संबंधित नसून तें आत्म्याशी संबंधित आहे. संपत्ती संचय करणारे झोपण्यासाठी लाखो रुपयांचे फर्निचर, बेड करतात. फकीराचे जीवन जगणा-या साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुगूट, सिंहासन अर्पण झोप येण्यासाठी नवस करतात. परंतू त्यांचे स्वास्थ बिघडल्यामुळे डॉक्टरांच्या सल्याने चटईवर झोपावे लागते. आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली व्हॉटसअप, फेसबुकच्या आभासी दुनियेत रमणारे ‘मम्मी - पप्पा’ पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार. उद्याच्या चिंतेपायी माणूस संपत्ती संचयाच्या मागे धावत आहे. या धावण्यामुळे माणुस म्हणून जीवन जगण्याचा खरा आनंद केंव्हा गमावून बसला हे कळलेच नाही. आता मानसांतील संवेदनशीलता जोपर्यंत जागी होत नाही. तोपर्यंत जगण्याचा खरा आनंद मिळणार नाही. असेही शिंदे म्हणाले. दुपारी औंध जिल्हा रक्तपेढी समवेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी जैन बंधू भगिनींनी उर्त्स्फुतपणे सहभाग घेतला.
व्हीएस न्यूज - आधुनिक संशोधनाचा व विज्ञानाचा उपयोग सर्व घटकांतील मानवीजीवन अल्प खर्चात समृध्द करण्यासाठी करता आला पाहिजे. पर्यावरणाचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करीत संशोधन विकसित केले पाहिजे. त्या संशोधनाचा उपयोग दिर्घकाळ समाजाला करता आला पाहिजे. यातून वेळ, ऊर्जा व पैशाची बचत होणे देखील महत्वाचे असल्याचे प्रतिपादन भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि. ए. हिंगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे आयोजित केलेल्या ‘टेक्नोवेट 2018’ या तांत्रिक स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ न-हे येथील भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि.ए.हिंगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रकल्प समन्वयक प्रा. दिपक बिरादार, प्रा. संतोष रणदिवे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य हिंगे यांनी पीसीसीओईआर मध्ये होत असलेल्या आधुनिक संशोधनाबाबत कौतुक केले. रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेल अंतर्गत या महाविद्यालयात मागील दोन वर्षात 90 पेक्षा अधिक पेटंटची, नोंदणी 25हुन जास्त संशोधन पेपर आणि 250 कॉपीराईटची एकाच वेळी नोंदणी करण्यात आली हे अभिनंदनीय असल्याचे हिंगे म्हणाले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले,विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, एस. डी. मराठे, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सुत्रसंचालन प्रा. दिपक बिरादार आणि आभार प्रा.संतोष रणदिवे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा शास्तीकर जाचक असल्याने मिळकतधारकांना तो भरणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्तीकर कपात करण्याबाबत नव्याने अध्यादेश काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच हा नवा अध्यादेश जारी करणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले असल्याची माहिती भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.
अमोल थोरात यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, शहरातील मिळकतधारकांना शास्तीकर जाचक होता. त्यामुळे तो कमी करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. शहर भाजपतर्फे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर कमी करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांनी त्यांची भेट घेतली. जुन्या शास्तीकरातील जाचक अटी शिथिल करून शास्तीकराबाबत लवकरच नवा अध्यादेश जारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नव्या अध्यादेशामुळे शास्तीकराची जाचकता कमी होणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व सामान्य मिळकतधारकांना कर भरणे शक्य होणार आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - ‘चाळिशीनंतरच्या वेश्यांचे जीवन एक चिंतन’ या विषयावर व ‘आफ्टर ४०’ या वेश्यांच्या जीवनावरील शॉर्ट फिल्मचा विशेष शो येत्या शनिवारी ( दि.३१) रोजी पिंपरीत होणार आहे. पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार कै. भा.वि. कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पिंपरीतील अॅटो क्लस्टर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लांडगे यांनी दिली.
या परिसंवादामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अनिल अवचट, पुण्याच्या पोलीस उपायुक्त व लेडी सिंघम अशी प्रतिमा असलेल्या ज्योती प्रिया सिंग, सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी कवियत्री दिशा पिंकी शेख आणि वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन केंद्र चालविणार्या ज्योती पठानिया यांचा सहभाग असणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवडमधील नवोदित कलाकारांनी एकत्र येऊन वेश्यांच्या जीवनावर बनविलेली ‘आफ्टर ४०’ ही शॉर्टफिल्मही यावेळी दाखविण्यात येणार आहे. या फिल्मचे लेखन व दिग्दर्शक विजय जगताप यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्रसृष्टीचा प्रारंभ करणारे कै. भा.वि. कांबळे यांच्या अष्टपैलू कार्याला समोर ठेऊन व उपेक्षित वर्गाविषयीची त्यांची जीवनभरातील धडपड विचारात घेऊन त्यांच्या समाजरूपी कार्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती पत्रकार अरूण कांबळे यांनी दिली.
समाजाने दुर्लक्षिलेला हा विषय व ही वेदना शहरात प्रथमच फिल्म व परिसंवाद अशा दुहेरी माध्यमातून प्रकट होणार आहे. डॉ. अनिल अवचट हे संवेदशील लेखक म्हणून परिचित आहेत. आपल्या विविध पुस्तकांमधून वेश्यांचे जीवन, त्यांच्या समस्या व प्रश्नांची त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यांची मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्र ही पुण्यातील देश विदेशात नावाजलेली संस्था व्यसनमुक्ती कार्यासाठीचे ‘आयडॉल’ म्हटले जाते. तर धाडसी,बंडखोर अशी प्रतिमा असलेल्या पुण्यातील आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंग या पोलीस उपायुक्त म्हणुन शहरात काम करीत आहेत. आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाच्या पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश करणार्या व गरजू व गरीब महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणार्या दलालांना पळता भूई थोडी करणार्या ज्योती प्रिया सिंग या आपले अनुभव यावेळी उलगडणार आहेत.
याचबरोबर वेश्यांना वृद्धावस्थेत आधार देणार्या व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोशी येथे केंद्र स्थापन करून दोन दशकांहून अधिक काळ कार्य करीत असलेल्या ज्योती पठानिया यांचाही या परिसंवादात विशेष सहभाग असणार आहे.
तर आपली तृतीयपंथी ओळख अभिमानाने मिरवणारी व परखड व स्पष्ट विचारांची कवियत्री अशी महाराष्ट्रभर ओळख असलेली दिशा पिंकी शेख या परिसंवादाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. वेश्यांचा चांगला व वाईट काळ अशा दोन्ही काळांची सखोल माहिती असलेली दिशा आपल्या अनुभवांचे विविध पदर यावेळी उलगडून सांगणार आहेत.
व्हीएस न्यूज - भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. विविध धर्म, जात, पंथ असूनही संविधानाने हा देश एकसंध बांधलेला आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीतील पहिले ‘संविधान भवन’ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक पाच व आठमधील मोकळ्या भुखंडावर उभारावे, अशी मागणी भाजपचे भोसरीचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (बुधवारी) भेट घेऊन आमदार महेश लांडगे यांनी मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे, आमदार लांडगे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुलदिप परांडे आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीतील पहिले ‘संविधान भवन’ उभारावे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक पाच व आठमधील मोकळ्या भुखंडावर हे ‘संविधान भवन’ उभारण्यात यावे. संविधान साक्षरता म्हणजे सृजनशिल व सुसंस्कृत समाज व सृजनशील व सुसंस्कृत समाज म्हणजे सशक्त भारत, त्यामुळे हे भवन झाल्यास हे भारतातील पहिले संविधान भवन असेल. त्याचा मान हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळेल. याचा सकारात्मक दृष्टीने विचार करुन देशातील पहिले संविधान उभारण्यात यावे. याबाबत पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाला योग्य ते आदेश द्यावेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागात संविधान भवनाची उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. या संविधान भवनाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येईल. संविधान अभ्यास केंद्र असावे. त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असतील. ‘ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आदर्श संविधान दिले आहे. संविधानामुळे आपला भारत देश एकसंध आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करण्याची आवश्यकता आहे. भारतात कोठेही ‘संविधान भवन’ नाही. त्यासाठी संविधान भवन बांधण्यात यावे. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाकडे मोठ्या प्रमाणात मोकळे भुखंड आहेत. प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक पाच व आठमधील मोकळ्या भुखंडावर देशातील पहिले संविधान भवन उभारण्यात यावे. महाराष्ट्राला आणि पिंपरी-चिंचवड शहराला त्याचा मान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भुमिका घेतली आहे. त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासान मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही”, लांडगे यांनी सांगितले.
”संविधानाने आपल्याला जेवढे अधिकार दिले आहेत. तेवढ्याच जबाबदा-या देखील दिल्या आहेत. त्याचे पालन केले पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहरात संविधान भवन झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल. जबाबदार नागरिक घडतील. मुख्यमंत्र्यांनी याला हिरवा कंदिल दिल्यास देशातील पहिले आणि जगातील दुसरे संविधान भवन होईल”, असेही ते म्हणाले.
नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”संविधान भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संविधान भवनसारखी वास्तू जर संपूर्ण संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात उभा राहत असेल. तर, हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय एकतेचा सन्मान आहे. संविधानातील नैतिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग आला आहे”.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीला पिंपरी-चिंचवड पॅकींग असोसिएशनच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला आहे. प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय मिळेपर्यंत बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे.
दिवसें-दिवस उन्हाचा पारा चढत असताना तळपत्या उन्हात रिव्हर रोड येथे 25 मार्चपासून संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. संघटनेचे अध्यक्ष सावल तोतानी,उपाध्यक्ष धीरज ठक्कर, राकेश लखोटीया, महेश दोलवानी, लालचंद गेलरानी, मोहन कुकरेजा, गोपी पावलानी, दीपक अगरवाल, शशी बजाज, इंदू वासवानी, रमेश कुकरेजा, आकाश गेलरानी, गौरव तोतानी, मनोज सत्करतार आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
अधिक माहिती देताना सावल तोतानी म्हणाले की, राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. त्याचा फटका सुमारे 20 लाखाहून उत्पादक,व्यापारी, कामगार वर्गाला बसला आहे. पिंपरी-चिंचवडसह पुणे, मुंबई, उल्हासनगर, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांमधील पॅकींग उद्योजक आपला उद्योग बंद करुन आंदोलनात उतरले आहेत. आजची बाजारपेठ प्लाटिकच्या वस्तुंवर अवलंबून आहे. मात्र बंदीमुळे अनंत अडचणींचा सामना प्लास्टिक उद्योगाला करावा लागत आहे.
प्लास्टिक बंदीमुळे उत्पादक, कामगार तसेच त्यावर अवलंबून असलेले व्यापारी यांच्यावर बेरोजगारी ओढावली आहे. प्लास्टिक बंदीमुळे किराणा दुकाने, मिठाई दुकाने,रेस्टॉरंटस्, खाद्य अन्नावर होणारी प्रक्रिया, शॉपिंग मॉल, स्टेशनरी अशा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. प्लास्टिक वस्तू विक्री करणारे व्यापारी सुद्धा या व्यवसायावर अवलंबून असून त्यांचाही रोजगार हिरावला गेला आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक उत्पादक, व्यापारी कटीबध्द आहेत. पर्यावरणाची हानी होणार नाही. याची दक्षता आम्ही घेतच असतो. मात्र, ठोस पर्याय अथवा कोणालाही विश्वासात न देता प्लास्टिक बंदी जाहीर करण्याची सरकारची घाई अन्यायकारक आहे. लाखो उत्पादन, व्यापारी, कामगारांवर बेकारी ओढावली असून प्लास्टिक उत्पादन ठप्प झाले आहे. सरकारने प्लास्टिकला सरसकट बंदी लावण्याबद्दल फेरविचार करावा. अन्यथा 1 एप्रिलपासून आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा पिंपरी-चिंचवड पॅकींग असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार नसताना डॉ. अनिल रॉय यांनी कोट्यावधी रूपयांची औषधे, साहित्य खरेदी केली. त्यांच्या सर्व निर्णयाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.
याबाबत वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. रॉय यांच्याकडे 29 एप्रिल 2016 नंतर मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार नव्हता. त्यानंतरही त्यांनी 2 वर्षांत कोट्यावधी रूपयांची औषधे व रूग्णालय संबंधी साहित्य, मशीनची खरेदी केली. ही खरेदी त्यांनी कोणत्या अधिकारात केली, याची चौकशी करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - आर्ट ऑफ लिव्हिंग, वेदिका धर्म संस्थानतर्फे चैत्र नवरात्री अष्टमीनिमित्त पिंपरीत कुंकूमार्चन व लक्ष्मी होमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1800 नागरिक उपस्थित होते.
संत तुकाराम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल मैदानात या होम व कुंकूमार्चनचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, समृध्दीसाठी हे होम व कुंकूमार्चन केले. यावेळी स्वामी प्रविण शर्मा, संतोष व अभय पंडीत यांनी हवन केले. कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्ंिहगचे सचिन नाईक, सौंदर्या मुलगे, अतुल तातर, उमा देशमुख, रूषिकेश जोशी, सुमित जाधव, संगमेश मनट्टी, धनराज सोळुखे, तेजश्री कपोते, प्रतिमा नाईक, नंदिनी सिंग, पुजा गराडे, अपुर्वा मुलगे, दिनानाथ जोशी आदींनी केले.
व्हीएस न्यूज - कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश जवळकर यांची पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जवळकर यांना याबाबतचे पत्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अनुप मोरे आणि शहराध्यक्ष रवी लांडगे यांनी दिले आहे.
व्हीएस न्यूज - भारतात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अत्याचार सार्वजनिक ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, घरात होतात. शुन्य ते 18वयोगटातील लैंगिक अत्याचारग्रस्त मुले व मुलींसाठी 'चाईल्ड हेल्पलाईन' तर्फे मदत केली जाते. परंतू, मुलांवर किंवा मुलींवर लैंगिक अत्याचार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या चाईल्ड हेल्पलाईनच्या सविता दिवटे यांनी केले.
बोपोडी येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिंनी दिपज्योती यादव हिने बचत गटांच्या महिलांसाठी 'बाल लैंगिक अत्याचार' संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी दिवटे बोलत होत्या. याप्रसंगी चाईल्ड हेल्पलाईनच्या सुमित्रा बनसोड, जयश्री पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभागाचे विद्यार्थी अनिकेत कळंबे, वैभव माळी यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
धकाधकीच्या जीवनात पालकांनी आपल्या मुलाशी वेळोवेळी संवाद साधूवा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. तसेच चाईल्ड हेल्पलाईन कशाप्रकारे काम करते, याची सविस्तर माहिती महिलांना दिवटे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपज्योती यादव हिने तर अनिकेत कळंबे याने आभार मानले.
व्हीएस न्यूज - रिलायबल हेल्थ फॉंडेशनकडून आपत्कालीन रुग्णासाठी विनामुल्य रुग्णवाहिकेच्या सेवेचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
लेक शावर रेसिडेन्सी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले, लोकमान्य रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य, पोलीस निरीक्षक अरुण मोरे, संभाजीराव पाटील, डॉ.दिनेश मांजरेकर, डॉ.नम्रता मांजरेकर, दिनेश पाटील, सुधीर आगरवाल, सुनील काळे, आयुषी श्रीखंडे, रुपाली शिनगारे, राहुल खळदे, काशिनाथ येवले, आशिष सूर्यवंशी, श्रीकृष्ण जोशी, सारिका घोलप यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
भोसले म्हणाले की, अत्यंत अडचणीच्या प्रसंगी रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक असते. त्यावेळी रिलायबल हेल्थ फॉंडेशनकडून आपत्कालीन रुग्णासाठी विनामुल्य रुग्णवाहिकेच्या सेवेची तरतूद केली जाईल. जगनाडे म्हणाल्या डॉक्टर म्हणचे रुग्णाचा देव असतो. पण त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग या हेल्थ फॉंडेशनने विनामुल्य निर्माण केला आहे. अश्या प्रकारची लोकहिताची कामे संस्थाच्या माध्यमातून केली गेलीतर याचा फायदा निश्चितच सर्वांना होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मांजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन नितीन फाकटकर यांनी तर डॉ. आयुषी श्रीखंडे यांनी आभार मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002