व्हिएस न्यूज - एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर 30 वर्षीय युवकाने भर दिवसा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडला. याप्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
गोविंद भगवान अडसूळ (वय-30, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडसूळ याने सोमवारी 8 वर्षीय पीडित मुलीला धमकी देऊन बोलावले. तिच्यावर बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजली तेंव्हा घरच्यांनी तात्काळ पिंपरी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
महिला फौजदार रत्ना सावंत अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुक्सानाला वाईट अनुभव आला आहे. तिच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना पत्नी व दोन मुलांना एकटे सोडून पतीने पळ काढला आहे. सध्या रुक्साना वायसीएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून मुलगा अरमान आणि मुलगी अंजूमला शिवाजीनगरच्या अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली आहे.
वैजापुर (औरंगाबाद) मधील रुक्सानाची सिध्दार्थनगरच्या (उत्तरप्रदेश) चा असलेला सलीम शेख यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचे रुपातंर प्रेमात झाले. त्या दोघांनी लग्नही केले. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकून सलीम व रुक्साना मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत होते. त्यावरच तब्बल दहा ते बारा वर्षे संसाराचा गाडा दोघेही हाकत होते. त्या दोघांच्या सुखी संसारात अरमान, अंजूम अशी एक मुलगा व मुलगीही त्यांना झाली. त्या मुलांना घेवून गावोगावी भटकत ते उदरनिर्वाह करीत होते.
मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत ते दोघे पुण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीत वास्तव्य करु लागले. दररोज सकाळी लवकर उठून शहरातील चौकाचौकात मदारीच्या करमणुकीचे खेळ करुन नागरिकांकडून मिळणा-या तुंटपुज्या पैशावर चैाघांच्या पोटांची भूक भागवित होते. चौघे अगदी आनंदात राहत होते. मात्र, त्यांच्या सुखी संसारात अचानक विरजन पडले होते. रुक्साना सतत आजारी पडू लागली. सलीमकडे तिच्यावर उपचार करण्याइतपत पैसे उपलब्ध नव्हते.
त्यामुळे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मती रुग्णालय (वायसीएम) सलीमने रुक्सानाला उपचारासाठी २८ एप्रिलला दाखल केले. तेव्हा तिला कॅन्सर झाल्याचे सलीमला समजताच, त्याने रुक्सानासह दोन्ही मुलांना सोडून पळ काढला आहे. तो अद्याप रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. सध्या रुक्साना वायसीएमच्या आयसीयू दोनमध्ये मरण यातना भोगत आहे. तर रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेकडून रुक्सानाची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, रुक्साना व सलीम या दांपत्यला अरमान (वय ७) तर अंजुम (वय ५) एक मुलगा व एक मुलगी आहे. त्या दोघांनाही पुण्याच्या महिला व बालकल्याण समितीकडे अर्ज करुन अनाथ आश्रमात ठेवण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - प्रेयसी बोलत नाही म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पिंपरी चिंचवडच्या भोसरी मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शाहरुख शेख (२२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून अल्पवयीन मुलगी आणि शाहरुख शेख यांच्यात प्रेम संबंध होते. शाहरुख त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीला जबरदस्तीने लॉजवर घेऊन गेला व तिथे जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा तो तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करत होता.
परंतु अल्पवयीन मुलीला हे मान्य नव्हते म्हणून तिने प्रियकराचा फोन उचलला नाही, त्याच्याशी बोलणे टाळले. शाहरुख तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता. पण ती मुलगी शाहरुखबरोबर बोलायला टाळाटाळ करत होती. याचा राग मनात धरून शाहरुख मंगळवारी रात्री तिच्या घरी गेला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यावेळी घरात आई-वडील होते परंतु शाहरुखच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रकरणी आरोपी शाहरुखला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
व्हीएस न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा वर्षांपासून बंगाली युवती सोबत एकाच खोलीत एकत्र राहून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक करून शिवीगाळ व दमदाटी करून पीडित महिलेस एकटी सोडून फरार झालेल्या आरोपीला चाकण पोलिसांनी बारामतीहून अटक केली असून न्यायालयाने आरोपीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात अली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवार दि. १ मार्च २०१८ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली. सन २००७ ते दि. ४ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपी अमोल सिद्दप्पा परिट ( वय ३२, रा. महाळुंगे इंगळे, मूळ रा. निंबर्गी, ता.दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ) हा १ मार्चला गुन्हा दाखल झाल्यापासून मुळगावाहूनही फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस नाईक वीरसेन गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बारामतीहून ताब्यात घेतले व अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, सन २००६ मध्ये आरोपी अमोल परीट व फिर्यादी महिलेची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सन २००७ मध्ये आरोपीने पीडित युवतीस ‘आपण दोघे लग्न करून चाकण येथे कंपनीत काम करून एकत्र राहू’ असे म्हणून लग्न करण्याचे अमिष दाखवून महाळुंगे येथे खोली भाड्याने घेऊन एकत्र राहू लागले. सदर कालावधीत आरोपीने पीडित युवतीवर शरीर संबंध ठेवले व पीडितेस लग्न करतो, असे सांगून युवतीची फसवणूक केली. दहा वर्षे एकत्र राहूनही पीडितेने त्यास लग्नाबाबत विचारल्यावर आरोपीने पीडितेस वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. व दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी पीडितेस सोडून त्याचे मूळगावी निघून गेला. पीडितेने वेळोवेळी फोन केले असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०१८ भादंवि कलम ३७६, ४१६, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप हे पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात त्यांनी २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांनी हे दोषारोपपत्र चार गाड्यांमधून आणले असून, ते अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. याबाबत सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घोटाळ्या प्रकरणी फायनान्स विभाग प्रमुख विनयकुमार बडगंडी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गेले काही दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडून डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील आरोपपत्राची तयारी सुरु होती. अखेर पूर्ण छाननी केल्यावर आज(दि. १७ मे) त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
व्हीएस न्यूज – शाळा प्रवेशासाठी दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रणव विजय चौधरी (वय २१, रा़ सावित्री अपार्टमेंट, सोमवार पेठ) याला अटक केली आहे तसेच दोघा मुलांच्या पालकावर गुन्हा दाखल केला आहे़.
याबाबत बिशप्स कोएड स्कुलच्या वतीने शेन मेकफरसन ऊर्फ रसल फिलीप (वय ३९, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. बिशप्स कोएड या शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी व दुसरा विद्यार्थी ज्युनिअर के़ जी़ चे प्रवेशासाठी त्यांच्या पालकांनी प्रणव चौधरी यांच्याशी संगनमत करुन बिशप्स स्कुलमध्ये २३ मार्च पूर्वी भिकू इदाते अध्यक्ष मिनिस्टर स्टेटस हायकोर्ट पॉवर ज्युरिसडिक्शन मेंबर ऑफ डिफेन्स अँड हायर प्लॅनिंग कमिटी गव्हरमेंट ऑफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले पत्र तसेच देवर्षी मुखर्जी सहसचिव प्रधानमंत्री कार्यालय, न्यू दिल्ली यांचे नावाचे राजमुद्रा असलेले पत्र असे दोन्ही बनावट लेटरहेड तयार करुन ते खरे असल्याचे भासवले़ प्रणव चौधरी याने ते पालकांना दिले़. त्यांनी ते बिशप्स शाळेत दाखल करुन शाळेची फसवणूक केली़. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी अधिक तपास करत आहेत़.
व्हिएस न्यूज - स्वस्तात परदेश दौरा घडवून आणण्याचे आमिष दाखवून 10 जणांना 9 लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे.
या प्रकरणी महेश बळीराम हळंदे (वय 36, रा. चिखली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संकेत शेखर गोपाळे, विजय शिवाजी कांबळे या कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान रहाटणी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिस्टीजा सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी चालवितात. रहाटणीतील कोकणे चौकात कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीकडून फसवणूक झालेल्या दहाजणांना पन्नास टक्के सवलतीत देशविदेशात पर्यटनासाठी पाठविण्याचे तसेच तिकडे थ्री व फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आमिष दाखविण्यात आले.
त्यासाठी कंपनीत सुरुवातीला पैसे गुंतवणे आवश्यक असल्याचे सांगितल्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरात दहा नागरिकांनी आठ लाख 60 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. ठरलेल्या कालावधीत सभासदांना कोणत्याही प्रकारे देशविदेशात पर्यटनासाठी पाठविण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - पिंपरी मार्केटमध्ये एका दुकानदाराने उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एका टोळक्याने रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुकानदार आणि त्याच्या मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
अनिल हसाकराम मोहनदासानी (वय 59 रा. ओमसाई कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार राजेश रामगोपाल यादव (वय 19 रा. मिलींदनगर, पिंपरी) याच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यांचे पिंपरी मार्केटमध्ये सुनील होजिअरी हे दुकान आहे. रविवारी अनिल आणि त्यांचा मुलगा प्रतिक दोघेजण काम करत होते. रात्री सव्वासातच्या सुमारास राजेश दुकानात आला. राजेश आणि अनिल हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. राजेशने अनिल यांना अडीच हजार रुपयांची मागणी केली. अनिल यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून राजेश याने आपल्या अन्य पाच साथीदारांना बोलावून अनिल आणि त्यांचा मुलगा प्रतिक यांना हातोडी, लोखंडी रॉड, आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. दुकानातील सामानाची तोडफोड केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात महापालिकेने घाई केल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाचे संयोजक अशोक मंगल यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे लोकार्पण सोमवारी झाले. परंतु लोकार्पण करताना महापालिकेने अतिघाई केली आहे. असे मंगल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले असून अनेक ठिकाणी अर्धवट कामे व राडारोडा पडला आहे असेही म्हटले आहे. व याच्या पुष्टयर्थ त्यांनी काही फोटो देखील पाठविले आहेत.
त्यांनी असे म्हटले आहे की, नव्याने सुरु झालेला हा उड्डाणपूल पाहण्यासाठी आम्ही गेलो. मात्र बऱ्याच ठिकाणी नवीन पुलाचे काम अपुरे असून राडारोडा पडलेला दिसून आला. त्यामुळे या वास्तूच्या उद्घाटनामुळे निर्माण झालेला आमचा उत्साह मावळला. ही कामे महापालिकेने तातडीने पूर्ण करुन स्वच्छ व सुंदर उड्डाणपूल नागरिकांना द्यावा.
त्याचबरोबर काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता यामार्गावर या महत्वाच्या उड्डाणपुलाचे काम ऑटो क्लस्टरजवळ काही कंपन्याच्या इमारतीमुळे रखडले आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण तयार आहेत. परंतु कंपनीच्या जागेबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हा बीआरटी मार्ग कसा सुरु होणार, असा प्रश्न देखील अशोक मंगल यांनी उपस्थित केला आहे.
व्हिएस न्यूज - शहरात वाहनांच्या काचा तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. नेहरुनगरमध्ये आठ जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून परिसरातील 10 ते 12 वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास नेहरूननगर येथील टाकळे इमारतीजवळ घडली.
गणेश रामदास नेहरकर (वय-39, रा. नेहरू टॉवर, नेहरूनगर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश गायकवाड, रिंकू ऊर्फ करण पिटेकर, नारायण शिंदे यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरकर व त्यांची बहिण मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घऱी जात होते. यावेळी आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने आरडा-ओरड करत नेहरकर यांना शिवीगाळ केली. नेहरकर यांच्या पाठीत उजव्या बाजुला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच परिसरातील 10 ते 12 मोटारींची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, भोसरी चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी, फौजदार बाळासाहेब अंतरकर, मधुसूदन घुगे, विठ्ठल बडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - एका 17 वर्षीय मुलगी दुकानात दूध आणण्यासाठी गेली असता तरूणाने 'माझ्यासोबत लग्न कर' असे म्हणत तिचा विनयभंग केला. ही घटना निगडी परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निगडी येथे घडली.
पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय जगताप (रा. चिंचवड गाव, चिंचवड) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी मंगळवारी दुपारच्या वेळी दूध आणण्यासाठी दुकानात गेली होती. दूध घेऊन ती घरी परतत असताना, अक्षय याने तिला अडवले. तिचे कपडे ओढून तिच्याशी छेडछाड केली. 'माझ्यासोबत लग्न कर' असे म्हणत तिला मारहाण देखील केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - भोसरीतील टेल्को रस्त्यावर थरमॅक्स कंपनीसमोर जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची नासाडी सुरू आहे. जलवाहिनी त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. टेल्को रस्त्यालगत मागील दोन महिन्यांपासून या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. लाखो लिटर पाणी रात्रंदिवस वाया जाते. थरमॅक्स कंपनीतील कर्मचारी दशरथ शितोळे यांनी याबाबत महापालिका व एमआयडीसीकडे तक्रार केली. परंतु, दोन्ही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. नंतर मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लाहीवाल व पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली. महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गळतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. परंतु, जवळत विद्यूत खांब असल्याने दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. त्याप्रमाणे विद्यूत विभागाला खांब काढण्याबाबत पत्र देण्यात आले. मात्र, तो खांब निघाल्याशिवाय गळती थांबू शकत नसल्याने मोठ्या प्रमाणे पाण्याची नासाडी होत आहे. याकडे महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही नासाडी होत असल्याचे जोगदंड, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, ऍड. सचिन काळे यांनी म्हटले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002