व्हीएस न्युज - सारसबागेकडून दांडेकरपुलाच्या दिशेने जाताना पर्वती पुलाजवळ जनता वसाहत जवळून जाणारा मुळा कालवा आज सकाळी अचानक फुटला. कालव्यातून लाखो लिटर पाणी जवळ असलेल्या आंबिल ओढा वसाहतीमध्ये शिरून येथील रहिवाशांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले तर अनेक दुचाक्या वाहून गेल्या.
येथील रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले.
याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आंबील ओढा वसाहतीमधील घरात पाणी शिरले असून घरातील गॅस सिलेंडर, अनेक वस्तू, भांडी पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहून गेल्या आहेत. अनेक वस्तू, गॅस सिलिंडर डेक्कन जवळील नदीपात्रात वाहून आल्या. डोळ्यासमोर स्वतःच्या घरातील पैसे, साहित्य वाहून जाताना पाहून महिलांना अश्रू आवरणे अवघड झाले.
या घटनेमुळे अलका चौक, स्वारगेट टिळकरस्ता, बाजीराव रस्तावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पाण्याचा प्रवाह वाढत असून वरून पाणी बंद केले असले तरीही अंतर खूप असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होण्यास वेळ जाणार आहे.
घटनास्थळी महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली असून बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बाधित नागरिकांची जवळच्या शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे असे त्या म्हणाल्या.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002