व्हीएस न्युज - बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. आकर्षक परताव्याच्या आमिषातून कंपनीत १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र त्याचा परतावा किंवा समभाग न देता फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव रामदास गायकवाड (वय ४६, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २६ ते ३१ मार्च २०११ दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी गायकवाड यांना आरोपी जाधव दाम्पत्याने कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दिले. गुंतवणुकीस करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लॅबोरोटिज लिमिटेड, अनघा फार्मा प्रा. लि. या कंपन्यांमध्ये १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख ९५ हजार ३७४ रुपयांची सावा मेडिको लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात एक कोटी ५३ लाख ९५ हजार २३७ रुपयांचे समभाग दिले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता जाधव दाम्पत्याने फसवणूक केली.
अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
व्हीएस न्युज - पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८८ लाख रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे. शोलोडॉये सॅम्युअल जॉय (वय-४४ रा. उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.
कपड्यांचा व्यवसाय असल्याचे सांगून तो व्यावसायिक व्हिसावर फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतात आला होता. काही काळ तो मुंबईत राहिला होता. त्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यातील उंड्री परिसरातील रावत कॅप्सस्टोन सोसायटीत एका फ्लॅटमध्ये रहात होता. तो रहात असलेल्या फ्लॅटमध्ये कोकेनच्या छोट्या-छोट्या पुड्या तयार करून त्या उच्चभ्रू वस्तित राहणाऱ्या नशेखोरांना विकत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरक्षीक विजय टेकाळे यांनी पथक तयार करून जॉय याचा शोध घेतला.जॉय अतिशय शिताफीने अमली पदार्थांची तस्करी करत होता,त्यामुळे मागील २० दिवस पोलिस त्याच्या मागावर होते. जॉय रहात असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८७ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन, ३ लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाईल, तीन घड्याळ, वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ९१ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टेकाळे, पथकातील कर्मचारी अविनाश शिंदे, राहूल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री निवासस्थानी जाऊन पिंपरी येथील मातोश्री ग्रूप आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले.
या दरम्यान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन तुळशीहार,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी शिवसेना भंडारा गोदिंया जिल्हा संपर्कप्रमूख निलेश धूमाळ, मातोश्री ग्रूप संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, शिवसेना विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर, विभागप्रमूख प्रदिप दळवी,विभागसंघटक अंकुश कोळेकर, बाळासाहेब गायकवाड,जितू कुलकर्णी,मारुती म्हस्के, दत्ता गिरी,सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - फेसबुकवरुन झालेली मैत्री पुण्यातील एका महिलेला जिवावर बेतली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधा अगरवाल (वय-40) असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आनंद निकम (वय-31) याला अटक केली आहे. दोन लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी राधाची हत्या केल्याचे आनंदने कबूल केले आहे.
काय आहे हे प्रकरण?
पुण्यातील रेंज हिल्स भागात आनंद निकमचा चहाचा स्टॉल आहे. आनंदने चार महिन्यांपूर्वी राधा हिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. राधाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री वाढत गेल्याने दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. राधा ही श्रीमंत घरातील असल्याचे आनंदला माहीत होते. त्यात आनंदच्या डोक्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज होते. आनंदचा राधाच्या दागिन्यांवर डोळा होता. कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडून दागिने चोरावे, असा त्याचा प्लान होता.
वर्षा विहारासाठी आपण ताम्हिणी घाटात फिरायला जाऊ आणि फोटो सेशन करु, असे आनंदने राधाला सांगितले. विशेष म्हणजे फोटो चांगले यावेत यासाठी अंगावर भरपूर दागिणे घालून ये, असेही आनंदने तिला सांगितले होते. राधानेही आनंदवर विश्वास ठेवून 22 जूनला राधा हिच्या स्कूटरवरुन दोघे पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटात गेले. तिथे पोहोचल्यावर आनंदने राधाचे फोटो काढायला सुरुवात केली. वेगळे फोटो काढण्याच्या बहाण्याने राधाचे हात झाडाला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर त्याने चाकूने राधाचा गळा कापला. राधाच्या अंगावरील असलेले दागिणे घेऊन तो पसार झाला.
राधा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या 19 वर्षांच्या मुलाने मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी राधाचा कॉल रेकॉर्डची माहिती मिळवून तपास सुरू केला असता तिने शेवटचा फोन आनंद निकमला केल्याचे समोर आले. पोलिसांनी आनंदचा शोध घेतला. पोलिसांनी 11 जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले. आनंदच्या घरातून राधाचा मोबाइल आणि स्कूटर सापडली. आनंदने दिलेल्या माहितीनुसार ताम्हिणी घाटातून राधाचा मृतदेह 12 जुलैला पोलिसांनी ताब्यात घेतला.
व्हीएस न्युज - केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान २०२०' अंतर्गत केल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घातला आहे. विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने जनजागृती करण्याचे काम सूरज अॅडव्हर्टायझिंग या खासगी एजन्सीला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. थेट पद्धतीने काम देण्याच्या पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे.
हे काम देताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता वैद्यकीय विभागामार्फत निश्चित केलेल्या दरानुसार हे काम थेट पद्धतीने सूरज अॅडव्हार्टायझिंग या खासगी एजन्सीकडून करून घेतले जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीला २५ लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या 'आरोग्य विषयक शासकीय योजनांची अंमलबजावणी व आरोग्य विषयक जनजागृती' या लेखाशीर्षावरील उपलब्ध तरतुदीतून हा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.
पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हा ठराव मान्य केल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. जनजागृतीसाठी नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करता सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील एजन्सीला हे काम देत सर्वसामान्य नागरिकांकडून कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून केला जात आहे. स्थायी समिती बहुमताच्या जोरावर कामे न करता नियमाप्रमाणे कामे करावी, अशी अपेक्षाही विरोधी पक्षाच्या सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. देशभरात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत असून 'स्वच्छ भारत अभियान २०२०' राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता जागृतीविषयीची घोषवाक्ये, चित्रे, भिंतीवर रंगवून घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फेत दर वर्षी आरोग्यविषयक योजना, वैद्यकीय, आरोग्य, पर्यावरणविषयक जागृती तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसासाठी महत्त्वाचे चौक, सरकारी इमारती, विविध गृहरचना संस्था यांच्या सीमाभिंतींवर यावर वॉल साइन बोर्डाचे (भिंत रंगविणे) कामकाज केले जाते. त्याच पद्धतीने या अभियानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. .
खर्चाला मान्यता देण्यात आलेली कामे -
विविध भागांत विकासकामे करणे - ८७ कोटी
पालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदी : ६ कोटी ४९ लाख
मोशी, देहू, आळंदीत पेव्हिंग ब्लॉक, गटारांचे काम : २९ लाख ४२ हजार
क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांचा भोजन खर्च : १८ लाख
भोसरी, इंद्रायणीनगरमधील स्केटिंग ट्रॅकची कामे : १ कोटी
३० लाख - पिंपळे निलखमधील लिनिअर गार्डन विकसन : १ कोटी
क्षेत्रीय कार्यालतून कचरा गोळा करणे : २५ लाख
शालेय खरेदी - १० कोटी ५० लाख
वैद्यकीय विभागातील फर्निचर खरेदी : ६२ लाख
क्रीडा शिष्यवृत्ती : ६ लाख
व्हीएस न्युज - दारु पिल्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या २५ ते ३० जणांच्या दोन गटात पोलिस चौकीसमोरच तुफान हाणामारी झाली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भिमशक्तीनगर साने चौक पोलीस चौकी समोर घडली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यु.बी.ओमासे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतिश किसन जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर आणि संदिप भारत डुकळे या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर कैलास गेणबा डुकळे (रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) हा आरोपी अद्याप फरार आहे. या सर्वांविरोधात भा.द.वि.क ३५३,३२३,१४३, १६०, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दारु पिण्याच्या कारणावरुन २५ ते ३० जणांच्या दोन गटात भांडण झाले होते. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास दोनही गटातील लोक हे साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिस चौकीच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर या गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्ती केली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच जमाव बंदीच्या आदेशाचा भंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी वरील दहा जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ई क्षेत्रीय कार्यालय शेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला तब्बल १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीच्या १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली.
अतिक युनूस शेख (वय २७, रा. दिल्ली नाका, मोगल टेकडी, ता. संगमनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर) पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील ई क्षेत्रीय कार्यालायशेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - शेळ्या चोरून स्वतःचे मटणाचे दुकान चालवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भोसरी पोलिसांनी दोन साथीदारांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक कार असा एकुण ६ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
अल्तमश कुरेशी (वय- १८) असे मुख्य आरोपीचे नाव असून, सोमेश तायड (वय-१९), रोहन रिठे (वय-२०) सर्व राहणार खडकी बाजार अशी दोन्ही साथीदारांची नावं आहेत. दोन्ही आरोपी महाविद्यालीयन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी अल्तमशचे कासारवाडी येथे मटणाचे दुकान आहे. तो अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. परंतु , तो एक सराईत गुन्हेगार असून त्याने मोटार आणि दुचाकी चोरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरी करताना तो मोटारीत शेळ्या चोरून आणत, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या पाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
दरम्यान, साथीदार सोमेश आणि रोहन यांच्यासह तो नाशिक फाटा इथे चोरीची मोटार विक्रीसाठी आल्याची माहिती समीर रासकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा मोटार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरलेल्या शेळ्या अल्तमशच्या मटणाच्या दुकानात नेऊन हलाल करत आणि तेच मटण ग्राहकांना विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कामगिरी भोसरी पोलिसांनी केली आहे.
व्हीएस न्युज - महाडाच्या बांधकाम साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करताना क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने एका कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवर घडली. राजकुमार अशोक घोसले (वय २४, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राजकुमार हे क्रेनवर उभे राहून प्लास्टरचे काम करत होते. यावेळी क्रेनचे अचानक ब्रेक फेल होवून ती खाली कोसळली. याबरोबरच राजकुमार ही खाली कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर दोन कामगार देखील जखमी झाले आहेत. सध्या त्यांनी प्रकृती स्थीर आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - पुण्यातील नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरात मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी पात्रात उतरू नका. अशा स्वरुपाची सुचना नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून काढण्यात आली आहे. नदीपात्रत मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शहराला वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार ही धरणात पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्याने पुणेकर नागरिकाची काही प्रमाणात पाणी संकटातून मुक्तता झाली असताना. ही धरण 100 टक्के भरल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नसताना. धरण क्षेत्रापासून काही किलोमीटर अंतर असलेल्या नांदेड, शिवणे ग्रामपंचायत भागातून जाणार्या मुठा नदी पात्रात मगर आढळल्याची घटना घडली आहे.
यावर खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील धरण क्षेत्रात मगर आढळल्याची बाब समोर आली होती. आता यावर प्रशासन नेमकी काय उपाययोजना करते हे पाहावे लागणार आहे.
व्हीएस न्युज - दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने चक्क आरोपीने कानाला चावा घेत तुकडा पाडल्याची गंभीर घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी जखमी कौतुभ गोळे यांनी निगडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादींची इमारतीतमध्ये पार्क केलेल्या दुचाकीला अभिजीतने लाथ मारली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चावा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौतुभ यांनी त्यांची दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेव्हा, आरोपी अभिजित हा दुचाकीला काहीतरी खोडसाळपणा करत असल्याचे फिर्यादीच्या पत्नीने पाहिले आणि पतीला माहिती दिली. त्यांनी तातडीने येऊन पाहिले असता तो खोडसाळपणा करत असल्याचे दिसले. तसेच आरोपी अभिजितने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडली. याचा जाब जेव्हा कौतुभ यांनी विचारला तेव्हा त्याने चक्क कानाला चावा घेत तुकडा पाडला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अभिजीतने कौतुभ आणि त्यांच्या पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.
व्हीएस न्यूज – काळेवाडी चौक येथील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या पाचही गुन्हेगारांवर ल चोरी, घरफोडी, मारामारी, बेकायदेेशीर हत्यार बाळगणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांच्या या कारवाईमुळे वाकड, कोथरूड, श्रीरामपूर आणि भूम पोलिस ठाण्यातील एकूण सोळा गुन्हे उघडकीस आले आहेत.
दुर्गेश बापू शिंदे (वय 32, रा. वाकड, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवणे (वय 29, रा. अष्टविनायक कॉलनी, वाकड), भैया ऊर्फ सचिन बबन जानकर (वय 26, रा. अण्णाभाऊ साठे नगर, वाकड), नाना ऊर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय 32, रा. क्षितिज कॉलनी, वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय 30, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड. मूळ रा. रामेश्वर वस्ती, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.
अटक केलेल्या आरोपींपैकी दुर्गेश शिंदे हा श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याच्यावर 2011 पासून जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. भैया जानकर याच्यावर 2015 पासून वाकड पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा यांसाखरे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त माहितनुसार, पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना माहिती मिळाली की, काहीजण काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे कार आणि घातक हत्यारे आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, स्टील रॉड, पाच मोबाईल फोन आणि एक स्विफ्ट कार (एमएच 14 / सी के 1161) असा ऐवज मिळाला. यावरून पाच जणांना अटक करण्यात आली.
नाना शिंदे याच्यावर कोथरूड आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. रामकृष्ण सानप याच्यावर भूम आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन आणि प्रमोद सवने याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाकड, कोथरूड, भूम आणि श्रीरामपूर या चार पोलीस ठाण्यातील 16 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दीपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002