...तर चक्क चावा घेत पाडला कानाचा तुकडा; निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
निगडी
2019-07-10
व्हीएसन्युज - दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने चक्क आरोपीने कानाला चावा घेत तुकडा पाडल्याची गंभीर घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी जखमी कौतुभ गोळे यांनी निगडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादींची इमारतीतमध्ये पार्क केलेल्या दुचाकीला अभिजीतने लाथ मारली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चावा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौतुभ यांनी त्यांची दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेव्हा, आरोपी अभिजित हा दुचाकीला काहीतरी खोडसाळपणा करत असल्याचे फिर्यादीच्या पत्नीने पाहिले आणि पतीला माहिती दिली. त्यांनी तातडीने येऊन पाहिले असता तो खोडसाळपणा करत असल्याचे दिसले. तसेच आरोपी अभिजितने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडली. याचा जाब जेव्हा कौतुभ यांनी विचारला तेव्हा त्याने चक्क कानाला चावा घेत तुकडा पाडला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अभिजीतने कौतुभ आणि त्यांच्या पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.