व्हिएस न्यूज -शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात आणखी ८१ कोटी ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने र्निबध घातल्यानंतरही २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ८१ कोटी ५० लाख रुपयांचे गैरव्यवहार उघड झाल्यानंतर फसवणूक प्रकरणाची व्याप्ती १५३ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात विधान परिषदेतील आमदार आणि बँकेचे अध्यक्ष अनिल शिवाजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क, एरंडवणे), मुख्य अधिकारी तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), बँकेचे मुख्य हिशेब तपासणीस शैलेश संपतराव भोसले (वय ४७, नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) यांना नुकतीच अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले,की या प्रकरणातील चौघा आरोपींचे बँक खाते, स्थावर जंगम मालमत्तेबाबत माहिती घेण्यात आली. चौकशीत बँकेच्या आणखी एका संचालकाचे नाव समोर आले आहे. बँकेत अनुत्पादित कर्जे (एनपीए) दिसू नयेत म्हणून बँकेने ८० कोटी रुपयांची रोखपत (कॅश क्रेडीट) दिली आहे. त्यासाठी २३ धनादेशांचा वापर करण्यात आला आहे.
बँकेतील आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर रिझव्र्ह बँकेने ६ मे २०१९ रोजी आदेश दिले होते. त्यानुसार बँकेवर आर्थिक र्निबध घालण्यात आले होते. त्यामुळे बँकेतील खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती.आर्थिक र्निबध असताना बँकेतून २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे.
लेखापरीक्षकांची चौकशी
शिवाजीराव भोसले बँकेत अनियमितता असताना लेखा परीक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली का नाही, त्यांनी याबाबत बँकेला काही इशारा किंवा सूचना दिल्या होत्या का, याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. लेखापरीक्षकांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज - केपीआयटी स्पार्कलचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना गोल्ड ॲवार्ड भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौध्दिक कुशलता आहे. त्याला अधिक चालना मिळण्यासाठी व त्या बौध्दिकतेचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी केला पाहिजे. या युवा अभियंत्यांच्या नाविण्यपुर्ण संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी व्यापक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे. यासाठी राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन केल्यास त्यातून रोजगारनिर्मितीस चालना मिळेल तसेच राष्ट्रीय जीडीपी वाढण्यास मदत होईल. असे प्रतिपादन भारतीय अणूऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचा’ बक्षिस वितरण समारंभ रविवारी (दि. 1 मार्च) डॉ. काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केपीआयटीचे रवि पंडीत, अनुप साबळे, अटल फाऊंडेशनचे उन्नत पंडीत, डॉ. अनिता गुप्ता, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेक विजेत्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले की, भारतामध्ये वैयक्तिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वायु प्रदूषण व पर्यावरणाची समस्या उग्ररुप धारण करीत आहे. यावर उपाय म्हणून अपारंपरिक ऊर्जास्त्रोत्रांचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व छोट्या मोठ्या वाहनांसाठी वाढला पाहिजे. तर प्रदूषणाच्या परिणामांपासून पुढच्या पिढीला थोडाफार दिलासा मिळेल. केपीआयटी स्पार्कल या स्पर्धेत प्रकल्प सादर करताना विद्यार्थ्यांनी भरपूर तयारी केल्याचे दिसले. सर्व सामान्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेतले तर त्यावर उपाय सापडेल असे डॉ. काकोडकर म्हणाले. उन्नत पंडीत म्हणाले की, विद्यार्थ्यांचा प्रत्येक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस विकसित होत आहे. ते प्रश्न सोडविण्यासाठी कमी खर्चातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. केंद्र सरकारच्या अटल स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आर्थिक मदत करण्यात येते. अनिता गुप्ता, अनुप साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. ही राष्ट्रीय स्पर्धा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून पीसीसीओई व केपीआयटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रवेश घेतला होता. यातून शंभर टिमने महाअंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना पाच लाखांचे गोल्ड अॅवार्ड, झिंक एअर व टीम व्हर्टेक्स यांना प्रत्येकी अडीच लाखांचे सिव्हर ॲवार्ड आणि मोस्ट पॉप्युलर ॲवार्ड बायो टिमला तसेच उत्तेजनार्थ बक्षिस टीम व्हिल, टीम युव्ही आणि ऊर्जा यांना देण्यात आले. एकूण एकवीस लाख रुपयांचे बक्षिसे देण्यात आली. स्वागत रवि पंडीत, सुत्रसंचालन डॉ. विनिला बेडेकर, आभार प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी मानले.
व्हिएस न्यूज -दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देण्यात आलेल्या घोषणांची आठवणं करून देणारं होर्डिंग पुण्यात झळकले आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंगळुरूमध्ये एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची रॅली झाली होती. या रॅलीत अमूल्या नावाच्या मुलीनं ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. तिचा घोषणा देतानाच्या फोटोसह ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान’ असा मजकूर असलेलं होर्डिंग पुण्यात लावण्यात आलं आहे.
बंगळुरूमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत अमूल्या लियोना नोरोन्हा हिने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, ती सध्या पोलीस कोठडीत आहे.
दरम्यान, अमूल्याचा घोषणा देतानाच्या फोटोसह पुण्यात होर्डिंग लावण्यात आलं आहे. ज्यावर जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान असं लिहिलेलं आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आलं आहे. निखिल पवार यांनी हे होर्डिंग ट्विट करून पुणे पोलिसांचं लक्ष वेधलं. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला.
पोलिसांकडून दखल-
होर्डिंग्जच्या ट्विटची पुणे पोलिसांनीही दखल घेतली आहे. त्यांनी निखिल पवार यांना उत्तर दिलं आहे. “तुमची तक्रार मिळाली आहे. आम्ही हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडं वर्ग करत आहोत. संबंधित पोलीस याची चौकशी करून आवश्यक कारवाई करतील,” असं पोलिसांनी म्हटलं आहे.
‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणारी अमूल्या कोण?
बंगळुरूच्या रॅलीत नेमकं काय घडलं होतं?
सीएए आणि एनआरसी विरोधात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी ओवेसी व्यासपीठावर बसले होते. अमूल्यानं व्यासपीठावर येऊन गोंधळ घातला. माईक हातात घेतला आणि बोलण्यास सुरूवात केली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिने तिचं बोलणं सुरूच ठेवलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तिच्या हातातील माईक हिसकावून घेतला. तसेच तिला बाजूला जाण्यास सांगितलं. मात्र, अमूल्यानं व्यासपीठावर समोर येत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते असं सांगत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तिने अशा घोषणा देण्यास सुरूवात केल्यानंतर ओवेसींनी तिला धावत जाऊन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शांत होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी तिला ओढत व्यासपीठावरून खाली नेलं होतं.
व्हिएस न्यूज - (भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाचा पिंपरीत क्रांती मोर्चा भटक्या विमुक्तांना इदाते कमिशनच्या शिफारशी लागू करा ... संजय कदम )
भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ (डि नोटिफाईट ट्राईब) या स्वतंत्र्य कॅटेगरीत स्थान मिळावे. केंद्रीय अर्थसंकल्पात या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतंत्र्य पंचवीस हजार कोटींच्या निधीची तरतूद करावी. तसेच ‘दादा भिकू इदाते कमिशन’च्या अहवालातील शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात अन्यथा आगामी अधिवेशन काळात मुंबईतील आझाद मैदानात हे मुदत धरणे आंदोलन करु असा इशारा भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मारुती कदम यांनी दिला. मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) ‘भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांतीमोर्चा’ या संस्थेच्या वतीने आकुर्डी खंडोबा माळ ते पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंत क्रांतीमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पांरपारिक वेष व वाद्य घेऊन नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मारुती शंकर कदम, रजनीताई पाचंगे, दिलीप भोरे, तुकाराम महाजन, धर्मा महाजन, संतोष थिटे, ॲड. कैलास भोसले, राम इंगळे, गोरख लगस, संतोष कदम, शामराव वाकोडे, विशाल जाधव, शाहिर श्रीकांत रेणके, बलराज भाटे, सोमनाथ इंगळे, मनाली भोसले, ज्ञानेश्वर साळवे, भारत भोसले, महादेव कांबळे शाहिर शिवाजी थिटे, चंदन अटक, संतोष वाघमारे, मिनाक्षी चव्हाण आदी उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हणाले की, भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजासाठी स्वतंत्र्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्राकडून शंभर एकर जमीन व अर्थसहाय्य मिळावे, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय नोक-यांमध्ये असणारे एनटीबीचे आरक्षण वाढवून मिळावे व त्या जागा ताबडतोब भराव्यात. ‘दादा भिकू इदाते कमिशन’ नेमले होते. या कमिशनने सादर केलेला अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यातील शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय नोक-यांमध्ये असणारे एनटीबीचे आरक्षण वाढवून मिळावे व देशभर सुरु असणा-या मेट्रो प्रकल्पातील कामगार भरतीमध्ये या समाजाला स्वतंत्र जागा मिळाव्यात व त्या जागा ताबडतोब भराव्यात. जनगणनेत एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, ओबीसी समाजाची स्वतंत्र जातवार जनगणना करावी. एनटी (बी) चे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवावे. भटक्या विमुक्त समाजाचा एकही खासदार व विधानसभेवर आमदार नाही व आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी नाही. हा समाज पारंपरिक पध्दतीने आपले जीवन व्यथित करीत असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, उद्योग, व्यापार यापासून या वंचित समाजाला न्याय मिळावा. राष्ट्रीय स्थरावर या समाजाला ‘DNT’ (डि नोटिफाईट ट्राईब) या स्वतंत्र्य कॅटेगरीत स्थान मिळावे. या सामाजाच्या 217 जाती आहेत. त्यांना शैक्षणिक, व्यवसायीक मार्गदर्शन मिळावे. महाराष्ट्रात ‘वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जनजाती महामंडळ’ अंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मागील सरकारने या महामंडळाला 300 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. परंतू त्याची अमंलबजावणी झाली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच महामंडळाचे नाव बदलून ‘बहुजन विकास कल्याण विभाग’ असे केले. हा एक प्रकारे भटक्या समाजावर अन्याय आहे. या समाजाला उद्योग, व्यवसायासाठी, नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण, वाढीव शैक्षणिक आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा आगामी अधिवेशन काळात मुंबईतील आझाद मैदानात हे मुदत धरणे आंदोलन करु असा इशारा भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मारुती कदम यांनी दिला. अशीही माहिती संजय कदम यांनी दिली .
व्हिएस न्यूज -प्रभागात विविध कामे करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी अंदाजपत्रकात असलेली तरतूद संपविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विरंगुळा केंद्रांची उभारणी, वाहिन्यांची दुरुस्ती, पदपथांचे सुशोभीकरण अशी कामे सर्रास सुरू झाली आहेत. अंदाजपत्रकातील निधी वाया जाईल, या भीतीपोटी कामांचा धडाका सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने शहरात सर्वत्र खोदाई सुरू असल्याचे चित्र दिसणार आहे.
महापालिकेचे नवे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. १ एप्रिलपासून नव्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या अंदाजपत्रकातील निधी खर्ची पाडण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. अंदाजपत्रकात नगरसेवकांना प्रभागात विविध प्रकारची कामे करण्यासाठी निधी दिला जातो. त्याला महापालिकेच्या परिभाषेत सभासद यादी (स यादी) असे म्हटले जाते. हा निधी आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी वापरला नाही तर तो वाया (लॅप्स) जाण्याची भीती असते. त्यामुळेच आता सर्वत्र विकासकामे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक महापालिकेच्या मुख्य खात्याबरोबरच क्षेत्रीय कार्यालयाकडूनही काही कामे केली जातात. नगरसेवकांना मिळालेला निधी खर्च करण्यासाठी केवळ सव्वा महिना शिल्लक आहे. त्यामुळे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, नव्याने वाहिन्या टाकणे, विरंगुळा केंद्र, वाचनालय उभारणे, समाजमंदिरांची उभारणी आणि त्यांची रंगरंगोटी, अंतर्गत रस्त्यांची दु्नॠस्ती, पदपथांचे सुशोभीकरण अशी कामे सध्या जागोजागी सुरू झाल्याचे चित्र आहे. याच प्रकारच्या कामांच्या निविदा काढण्यासाठीही नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कामे नव्या आर्थिक वर्षांतही करता येणे शक्य ठरणार आहे. मात्र त्यासाठी काही ठिकाणी उधळपट्टीही होणार आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरणावर सर्वाधिक खर्च होणार असून तसे प्रस्ताव स्थायी समितीला सादर होण्यास सुरुवात झाली आहे
.प्रभागासाठी कोटय़वधींचा निधी
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना दरवर्षी किमान पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी दिला जातो. तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना तीन ते चार कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीतून प्रभागात कामे केली जातात. सध्याची चार सदस्यीय प्रभाग पद्धती लक्षात घेता एका प्रभागासाठी किमान बारा कोटी रुपयांचा निधी दरवर्षी प्राप्त होतो. याशिवाय अंदाजपत्रकातील प्रकल्प, योजनांसाठीचा निधीही प्रभागातील कामांसाठी घेतला जातो. तशा काही प्रस्तावांना यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
व्हिएस न्यूज -पिंपरी-चिंचवडमधल्या एका भोंदूबाबाने गुप्त धन मिळवून देतो, पुत्रप्राप्ती होईल अशी आश्वासनं देत पाच बहिणींवर एका भोंदूबाबाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच मुलींवर या भोंदूबाबाने बलात्कार केला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय-३२ रा. खैरेवाडी जि. रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबा चे नाव आहे. त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ याने फिर्यादी यांचे कुटुंबास सांगितले की, तुमच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होवू नये म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर नात्यातील एका महिलेने करणी केलेली आहे. घराच्या एका खोलीत गुप्त धन असून त्यामध्ये सात पेटया धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असा खजिना आहे. तसेच तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी, गुप्तधन मिळविण्यासाठी आणि एका मुलीचा जीव वाचविण्यासाठी मला तुमच्या घरामध्ये तीन उतारे आणि नग्न पूजा करावी लागेल, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या सगळ्यासाठी ३ लाख रुपये खर्च आणि ११ हजार रुपये दक्षिणा दयावी लागेल. तीन उतारे तुम्ही १५ दिवसामध्ये सुरु केले नाही तर तुमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचा जीवाला धोका आहे. असं म्हणून या भोंदूबाबाने पैसे उकळले. कथित त्रास असलेली मुलगी आणि तिच्या बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने हा भोंदूबाबा खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने दार लावून घेतले. त्यानंतर एका मुलीवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास आई वडिलांना माझ्या देवी शक्तीने आणि काळया जादूने मारुन टाकेन अशी धमकी दिली. उतारा काढताना त्याने या मुलीसोबत तीनदा बलात्कार केला. तसंच इतर बहिणींवरही बलात्कार केला असे फिर्यादीने सांगितले आहे. आता याप्रकरणी या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
व्हिएस न्यूज -चालू बाजार मूल्यतक्ता (रेडीरेकनर) दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांची स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी रेडीरेकनरवर भाष्य केले. गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे यंदा हे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुण्यात मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्व भागातील आणि क्षेत्रातील व्यक्तींच्या आकर्षणाचे शहर पुणे आहे. पुण्यातील बांधकामांची संख्या वाढत असून दर्जेदार बांधकामे करण्याचे श्रेय बांधकाम व्यावसायिकांचे आहे. गौण खनिज उत्खनन, मुद्रांक शुल्क तसेच बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही थोरात यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज -पुणे शहरातील विविध भागात मागील सहा महिन्यांमध्ये 25 दुचाकी चोरणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका प्रोफेशनल डान्सरचाही समावेश असून या सर्व आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
संजय हरीष भोसले ऊर्फ सोन्या (वय 20 रा. शेवाळवाडी), हृषिकेश बाबासाहेब डोंगरे ऊर्फ बिटू (वय 19 रा. शेवाळवाडी), अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु (वय 19 रा. नऱ्हे आंबेगाव) आणि अजित कैलास कांबळे ऊर्फ विठ्ठल (वय 21 रा. शेवाळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगरपट्टा चौकात असलेल्या वाहन पार्किंगमध्ये चारजण संशयितपणे फिरत असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चौघेजण गाड्यांची पाहणी करताना दिसले. त्या चौघांकडे चौकशी केली असता, शहरात 25 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. या चोर्या मौजमजा करण्यासाठी केल्या असून यातील आरोपी अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु हा तरुण प्रोफेशनल डान्सर आहे. त्या आरोपीने अनेक स्टेज शो आणि काही माहितीपटांमध्येही काम केले आहे. आरोपींकडे अजून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली केली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करित आहेत.
व्हिएस न्यूज -वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याच त्याचा चांगला परिणाम होणार नाही,” असे सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी पठाण यांना दिले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त व्क्तव्य केलं होतं. या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे.
काय म्हणाले होते वारिस पठाण?
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू,” असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
विश्व हिंदू परिषदेचे उत्तर
पठाण यांच्यावर चहूबाजूने टिका होत असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनेही याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदुना धमकावून परिणाम होणार नाही. इतिहास काळापासून जे काही हिंदू समाजावर संकट आली आहेत. त्याची हिंदू समाज चिंता करायला सक्षम आहे,” असा थेट इशाराच परांडे यांनी वारीस पठाण यांना दिला.
व्हिएस न्यूज - लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून ११ वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० फेब्रुवारी ला ओम ला हरिपाठ आला नाही म्हणून आरोपी भगवान पोव्हणे याने त्याला काठी ने बेदम मारहाण केली. यात फुफ्फुस आणि हृदयाच्या मधोमध मार लागला. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथे कीर्तन असल्याने आरोपी पोव्हणे याने ओमसह सर्व मुलांना घेऊन त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर ओम ची तब्बेत बिघडली. महाराजांनी ओम ची आई कविता यांना फोन वरून मुलाची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले.
तेव्हा, आई तातडीने त्या ठिकाणी गेली आणि मुलाला घेऊन आली. परंतु, प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याच्यावर कविता काम करत असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू केले. तो कोमात गेला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याच्या छातीचा एक्सरे काढण्यात आला त्यात त्याच्या छातीत पाणी झाल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा त्याला पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय. पाटील रुग्णालयात हलवले, त्याच्या छातीतून दोनशे मि.ली पाणी काढण्यात आले आहे. दरम्यान, तो अतिदक्षता विभागात असून ओम कोमात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भगवान महाराज पोव्हणे याच्यांवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला एका सप्ताह मधून अटक करण्यात आली आहे. ओमची प्रकृती बरी व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
व्हिएस न्यूज - जुन्नर परिसरातील हडसर किल्ल्यावर श्री शिवजयंतीनिमित्त दुर्ग स्वच्छता मोहिमेसाठी मुंबईतील एका गटाबरोबर आलेल्या युवतीचा दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. सिद्धी सुनील कामठे (वय २०, सध्या रा. चिंचपोकळी, मुंबई, मूळ रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.
जुन्नरहून तेरा किलोमीटर अंतरावर हडसर किल्ला आहे. हडसर किल्ल्यावर ठाण्यातील सह्य़ाद्री ट्रेकर्स फाऊं डेशनकडून श्री शिवजयंती निमित्त दुर्ग स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. या मोहिमेत गिर्यारोहण संस्थेतील ३५ सदस्य सहभागी झाले होते. गिर्यारोहकांच्या गटात सिद्धी होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गिर्यारोहकांचा गट अवघड अशा पायवाटेवरून किल्ल्यावर जात होता. त्यावेळी गवतावरून सिद्धीचा पाय घसरला आणि काही कळण्याच्या आत ती दरीत पडली.
या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सिद्धीला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.,
व्हीएस न्यूज -पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात भरधाव वेगात असलेली मोटार (व्हॅन) चहाच्या दुकानात शिरली. ही घटना(२०फेब्रु )आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भरधाव वेगातील व्हॅन चालक हा दुचाकीला वाचवताना त्याचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन थेट चहाच्या दुकानात शिरली.
चहा प्यायला थांबलेल्या व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी नाही, परंतु, घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002