व्हीएस न्यूज – सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क धारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना देखील काही नागरीक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153 नागरिकांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे,
एमआयडीसी भोसरी (30), भोसरी (04), पिंपरी (17), चिंचवड (02), निगडी (01), आळंदी (06), चाकण (00), दिघी (01), सांगवी (05), वाकड (18), हिंजवडी (16), देहूरोड (09), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (16), चिखली (05), रावेत चौकी (05), शिरगाव चौकी (04), म्हाळुंगे चौकी (02)
व्हीएस न्यूज - इमारतीसमोर टेम्पो पार्क करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडे सुरक्षारक्षकाने हप्ता मागितला. मात्र, भाजी विक्रेत्यांनी हप्ता देण्यास नकार दिला. यावरून सुरक्षा रक्षकासह पाच जणांच्या टोळक्याने 13 टेम्पोची तोडफोड केली. तसेच या टोळक्याने एकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. याबाबत पाच जणांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि. 11) सकाळी म्हातोबानगर, वाकड येथे उघडकीस आला.
पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. सुरक्षारक्षक किरण प्रकाश घाडगे (वय 25), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय 22), मयूर संजय अडागळे (वय 26), सागर प्रकाश घाडगे (वय 27, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड), अविनाश नलावडे (रा. आदर्शनगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मारुती साहेबराव काळे (वय 30, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण घाडगे हा म्हातोबानगर येथील एका व्यावसायिक वापराच्या इमारतीचा सुरक्षारक्षक आहे. या इमारतीसमोर म्हातोबानगर परिसरातील भाजी विक्रेते त्यांचे टेम्पो पार्क करतात. मागील काही दिवसांपासून किरण घाडगे भाजी विक्रेत्यांकडे टेम्पो पार्क करण्यासाठी हप्ता मागत होता. मात्र, भाजी विक्रेत्यांनी किरण याला हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो चिडून होता.
दरम्यान, गुरुवारी रात्री फिर्यादी काळे टेम्पो पार्क करून रस्त्यावर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी घाडगे याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे ‘महिना दोन हजार रूपये हप्ता द्या. नसता तुम्हाला धंदा करू देणार नाही’, अशी मागणी केली. त्यावर काळे यांनी हप्ता देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी किरण घाडगे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तेरा टेंम्पोची तोडफोड केली.
तोडफोड करणाऱ्या टोळक्यावर जबरी चोरीचाही गुन्हा दाखल
आरोपींनी टेम्पोची तोडफोड केल्यानंतर सचिन अशोक शेलार (वय 26, रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शेलार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील 600 रुपये जबरदस्ती काढून घेतले. याबाबत शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा येथील संघटनेच्या शिबिरात घेतला निर्णय.
व्हीएस न्युज - कोरोना लॉकडाऊन मुळे मागील 14 महिने रिक्षा व्यवसाय बंद होता. यामुळे रिक्षाचे हफ्ते थकले आहेत. परंतु आता सरकारने लॉकडाऊन शिथील करताच फायनान्स कंपनीच्या वतीने रिक्षा कर्ज हफ्त्यासाठी तगादा लावण्यात येत आहे व रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड सह महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालक त्रस्त झाले असून फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभारा विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर शुक्रवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 11.00 मोर्चा आंदोलन करण्यात येणार असून महाराष्ट्रातले सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे यांनी केले आहे.
कष्टकरी पंचायत वतीने लोणावळा येथे संघटना पदाधिकारी यांचे पावसाळी विचार मंथन शिबीर आयोजित केले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच पुण्यामधील मोफत रिक्षा रुग्ण वाहिका सेवा उपक्रमातील सहभागी रिक्षा चालक योद्ध्ये यांचा बाबा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी घर कामगार महिला सभा अध्यक्षा श्रीमती आशाताई कांबळे, कष्टकरी जनता आघाडीच्या महिला अध्यक्ष अनिता साळवे, उपाध्यक्ष जयश्री येडके, मधुरा डांगे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, कला आणि सांस्कृतिक आघाडी विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुराद काजी, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, विजय ढ़गारे, जाफर भाई शेख, संजय दौंडकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालक फेरीवाले घरकाम महिला बांधकाम मजूर व धारकांसाठी दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली सदर रक्कम लाभार्थींना मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु नुसती तुटपुंजी आर्थिक मदत करून चालणार नाही कोविड-19 मुळे कष्टकरी जनतेचे जग बदलले आहे आणि हातावर पोट असणाऱ्या या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कष्टकरी जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळीवर उपायोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी टास्क फोर्स स्थापन करावे अशी मागणी मी सरकारकडे केली आहे. रिक्षाचालकांचे, टेम्पो, ट्रक आणि सर्व वाहतूकदार यांचे हफ्ते थकल्यामुळे या गाड्या ओढून नेल्या जात आहेत. गुंडगिरी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली आहे, परंतु आयुक्त यात खोडा घालत आहेत या प्रश्नांची दखल घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक अठरा जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात यावे असे आवाहन यावेळी बाबा कांबळे यांनी केली आहे.
कष्टकरी जनता महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष पदी अनिता साळवे उपाध्यक्षपदी मधुरा डांगे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्षपदी शफिक भाई पटेल, कार्याध्यक्षपदी कुमार शेट्टी, उपाध्यक्षपदी अरशद अन्सारी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत कला व संस्कृती आघाडी महाराष्ट्र प्रमुख पदी मुराद काजी, लोणावळा शहराध्यक्षपदी आनंद सदावर्ते यांची निवड करण्यात आली, कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबू भाई शेख, टपरी हातगाडी पंचायत लोणावळा शहर अध्यक्ष गणेश चव्हाण, आनंद सदावर्ते, हाजी अब्बास खान, विनय बच्चे, भगवान धनवट, रवींद्र ताकतोडे, संजय डेंगळे, विलास केंद्रे, चंद्रकांत बालगुडे,सत्तार शेख यांनी परिश्रम घेतले आहेत.
व्हीएस न्यूज – नियमबाह्य कामे, कामचुकारपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
प्रत्येक कामाचे ऑडीट केले जाणार असून निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याची दक्षता सर्व अधिका-यांनी घ्यावी असेही ते म्हणाले. महापालिकेच्या निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालयास आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. 10 आणि 14 मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.
बैठकीस अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या मंगला कदम, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे, मीनल यादव, नगरसदस्य तुषार हिंगे, केशव घोळवे, प्रमोद कुटे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहशहर अभियंता प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सुनिल वाघुंडे,रामनाथ टकले, अनिल शिंदे, संदेश चव्हाण, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एस. शिंदे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. जीर्ण वृक्षांची छाटणी, विद्युत तारांवर तसेच धोकादायक ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी, हॉकर्सचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन, ट्रांझिट कॅम्प, पाणी पुरवठा नियोजन याबाबत नगरसदस्यांनी विविध मुद्दे मांडले. नाल्यांची कामे तातडीने करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून त्यावर तात्काळ कारवाई करावी, शाहूसृष्टी, सायन्स पार्क येथील तारांगण, विविध उद्यानांची कामे, रेंगाळलेली कामे, बर्ड व्हॅलीतील कामे, नालेसफाई, जलनि:सारणची कामे तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी मांडल्या.
बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. महसुली कामांचे नियोजन करुन ते वेळेत पार पाडावे. नालेसफाईचा साप्ताहिक अहवाल क्षेत्रीय अधिका-यांकडे नियमित सादर करावा, विविध विभागांशी संबंधित असलेल्या कामांबाबत एकत्रितपणे स्थळ पाहणी करुन कामाचे नियोजन करावे. तसेच विभागांतर्गत समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.
शहरातील हॉकर्सचे नियोजन करण्याचे काम सुरु असून प्रत्येक भागाचा विचार करुन याबाबत व्यवस्थापन केले जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात येत आहे असे आयुक्त पाटील म्हणाले. अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करुन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिले. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन सुरु असून कोविड दक्षता समिती स्थापन केली जात आहे. या समितीच्या कामकाजाबद्दल आयुक्त पाटील यांनी बैठकीत माहिती दिली.
कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले. अधिकारी कर्मचा-यांनी चांगले काम करावे, नागरिकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना वेळेत दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा असतो त्यामुळे आपण तात्काळ उपलब्धता दाखविली पाहिजे असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. साळवे यांनी बैठकीत माहिती दिली.
व्हीएस न्युज - स्पा सेंटरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून एका महिलेची सुटका केली आहे.
ही कारवाई बुधवारी (दि. 9) दुपारी म्हळुंगे येथे करण्यात आली. सुनास रचन मसी (वय 34, र म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी पाच वाजता स्पा सेंटरवर छापा मारला. या मध्ये पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. या महिलेकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पिरगुंट येथील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत हकनाक बळी गेलेल्या १५ कर्त्यां महिलांचे कुटुंबीय सुन्न झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला कंपनीच्या पॅकिंग विभागात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. सोमवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेची वार्ता कळताच महिलांच्या कुटुंबीयांवर आघात झाला असून या दुर्घटनेने मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गीता भारत दिवारकर (वय ३८) मूळच्या मुंबईच्या होत्या. पती आणि मुलांसोबत त्या उरवडे परिसरात स्थायिक झाल्या होत्या. गीता यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहीण जयश्री मोरे यांना अश्रू अनावर झाले. जयश्री मोरे म्हणाल्या, ‘गीता खूप कष्टाळू होती. मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना मोठे करण्याचे तिचे स्वप्न होते. कष्ट करून तिने उरवडे परिसरात दोन खोल्यांचे घरबांधले. दहा महिन्यांपूर्वी गीता या कंपनीत नोकरीला लागली. तिच्या पतीला गुडघ्यांचा त्रास आहे. गीताने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. मुलं हाताशी येत असताना काळाने तिच्यावर घाला घातला.’
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या त्रिशला संभाजी जाधव (वय ३३) मूळच्या सोलापूरच्या होत्या. नोकरीच्या शोधात त्या मुळशीत स्थायिक झाल्या होत्या. मनमिळावू स्वभावाच्या असलेले जाधव दाम्पत्याचे सर्वाशी चांगले संबंध होते. त्यांना मुले आहेत. या दुर्घटनेमुळे आम्हाला धक्का बसला असून त्यांचे कुटुंबीय सोलापूरहून पुण्याकडे येत आहेत, असे जाधव दाम्पत्याचे शेजारी राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली आणि त्याला जबाबदार कोण यासाठी शासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सांगितले. उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची वळसे पाटील यांनी पाहणी केली. मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे या वेळी उपस्थित होते.
स्वप्नांची राखरांगोळी
रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व जण कष्टकरी वर्गातील होते. प्रत्येकाला मुलांना मोठे करायचे होते. नोकरीच्या शोधात त्यांनी मिळेल ते काम केले. एक नोकरी गेल्यानंतर पुन्हा दुसरी मिळवून सर्व जणी संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्वच महिलांच्या कुटुंबावर मोठा आघात झाल्याची भावना नातेवाईक व्यक्त करत होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.
व्हीएस न्युज - पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गाैड यांच्यासह आठ जणांना अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलित केले आहे.
अमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दोन दिवसापुर्वी दिले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याने खात्यात चर्चेला उधाण आले आहे.
नववर्षाच्या पार्श्वभुमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वे मार्गे महाराष्ट्र व इतर राज्यात विक्रीसाठी आलेला दोघांना लोहमार्ग पोलिसांनी मागील वर्षी (२०२०) अटक केली होती. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रूपयांचा ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केला होता. हा चरस मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर विक्रीसाठी वितरीत केला जाणार होता.
या चरसची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत १२० कोटी रुपये असल्याचे त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. व्हिलेज शमशी, भुंतर, जिल्हा कूलु) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, कुलु) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे होता.
त्यावेळी त्यांनी तपासात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यानंतर एटीएसकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एटीएसने संबंधीत कारवाईच्या आधारे पुढे देखील कारवाई केली होती. त्यानंतर आता याच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह आठ जणांना निलंबीत करण्यात आले आहे.
व्हीएस न्युज - तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर ही बातमी आवर्जून वाचा. नोकरदार तरुणाई सेक्सटॉर्शनची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येतेय. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करुन ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलिसांत या संदर्भात दोन गुन्हे तर 150 तक्रारी दाखल झाल्यानं खळबळ उडालीय.
पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊन काळात घरी असताना फेसबुकवरुन एका मुलीची त्याला फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. त्यांच्यानंतर थेट व्हॉटसअॅप नंबर शेअर झाले आणि हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ व्हॅट्सअॅपला येऊन धडकला आणि पैश्याची मागणी होऊ लागली. पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करेल असा दमही भरला. हे फक्त याच तरुणाच्या बाबत घडलं नाही तर पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबत घडलंय. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तीचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे हे पैसे देऊन मोकळे झालेय. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतलीय. दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहे.
काय काळजी घ्याल?
अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
परिचित नसल्यास व्हॅटसअॅप कॉलवर संवाद साधू नका
व्हिडीओ, छायाचित्र पाठवतांना विचार करा चुकीचं काही घडत असल्यास कुटुंबातील व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला किंवा पोलिसांशी संवाद साधा.
मनोरंजन किंवा कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर बघून सायबर गुन्हेगार तुमच्यावर पाळत ठेवतात. तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि सेक्सटॉर्शनचे शिकार बनतात. त्यामुळे काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करा.
व्हीएस न्युज - शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान शिवस्वराज्य दिन ते गांधी जयंती या दरम्यान राबविण्यात येणार आहे. अभियान गावागावात घराघरात पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले असून राज्यात आणि देशात या मोहिमेत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे. शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी सभागृह पुणे जिल्हा परिषद येथे करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे), जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज राज्यभर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनविण्यासाठी एकजूटीने व एकदिलाने काम करावे. कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान आपण सुरु केले आहे हे अभियान पुणे जिल्हयाच्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक विकासाला बळ देईल. छत्रपती शिवरायांनी, जिजाऊ मॉसाहेबांनी वसवलेल्या पुण्याचा गौरव वाढविण्याचा काम करेल, याची मला खात्री आहे.
सन 2016 मध्ये पुणे जिल्हा परिषदेने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याचा ठराव केला होता. आज तोच शिवराज्यभिषेक दिन राज्यस्तरावर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. ही जिल्हा परिषदेसाठी आनंदाची बाब आहे. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारत आहोत. ही गुढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पताका आहे. अभिमान, स्वाभिमानाची ही पताका आपल्याला कायम फडकवत ठेवायची आहे. राज्याला, देशाला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातून आपल्याला राज्याला, देशाला बाहेर काढायचे आहे. सध्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा राज्य शासनाने जाहीर केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून प्रत्येक गावात तीस तीस बेडची कोरोना सेंटर उभारत आहोत. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाप्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिवस्वराज्य सुंदरग्राम अभियान, महिलांना सन्मान देण्यासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिला धोरणांबाबत राज्य नेहमी अग्रेसर आहे. मुलींना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु केली आहे. माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जिल्हयाने विविध अभियानात चांगली कामगिरी केली आहे, त्याचप्रमाणे कचरामुक्त, गावस्वच्छता, नालेसफाई, एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमेमध्येही जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेजारील गावांची कचरा समस्याबाबत महापालिका आणि ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्हा परिषदेने चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन.
जिल्ह्याच्या आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी केंद्रातून निधी आणि विविध योजना आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहू. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य दिनी जिल्हा परिषदेने एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्य हे महत्वाचे असून त्यामुळे कचरामुक्त गाव, कचरामुक्त जिल्हा होणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कचरामुक्त पुणे जिल्हा अभियानाबाबत माहिती दिली. शोषखड्डे, उपयुक्तता व नियोजनाबाबत तालुका भोर येथील वाठार हिमा गावचे सरपंच संदीप खाटपे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत तालुका बारामती येथील जळगाव सुपेचे सरपंच श्रीमती कौशल्या खोमणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पंचायत समिती शिरुरच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन करुन गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पत्नीसह प्रियकर अटकेत
व्हीएस न्युज - प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या अभियंत्याचा दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीकडून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गाढ झोपेत असलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकरालाही अटक करण्यात आली.
मनोहर नामदेव हांडे (वय २७, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता), प्रियकर गौरव संतोष सुतार (वय १९, रा. उत्तमनगर, फुरसुंगी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. २४ मे रोजी मनोहर हांडेचा अकस्मात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या दरम्यान हांडेचा अश्विनीचे आरोपी गौरव याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती.
शवविच्छेदन अहवालात मनोहरचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन तसेच त्याचा गळा दाबण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीत अश्विनीचे गौरवबरोबर विवाहबाह्य़ संबंध असल्याचे उघड झाले होते. पती मनोहर प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकराबरोबर संगनमत केले. २३ मे रोजी गौरवने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्यानंतर पतीला दुधातून तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. गाढ झोपेत असलेल्या मनोहरचा दोघांनी गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
करोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव
मनोहर करोनाबाधित असल्याने तो अलगीकरणात राहून घरीच उपचार घेत होता. त्याचा खून केल्यानंतर आरोपी गौरव पसार झाला. दुसऱ्या दिवशी मनोहर झोपेतून उठला नाही. अश्विनीने पतीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक केतन निंबाळकर, नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.
व्हीएस न्युज - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद, तुतारीचा गजर आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा वातावरणात शिवराज्याभिषेक दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह ३१ फूट उंचीची शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. नितीन बानगुडे पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. आहुजा, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत मधुरिमा राजे मालोजीराजे छत्रपती, समितीचे संस्थापक अमित गायकवाड यांच्यासह स्वराज्यघराण्याचे वंशज सहभागी झाले होते. राज्यातील ५१ गड-किल्लय़ांवर स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींनी स्वराज्यगुढी उभारली.
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिन हा प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून मोठय़ा स्वरूपात साजरा करण्याच्या संकल्पनेला सुरुवात झाली आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पुढील वर्षी उत्कृष्ट शिवज्योत रॅलीचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला राज्य शासनाकडून पारितोषिक दिले जाणार आहे. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे. शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबरोबरच शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.
व्हीएस न्युज - पुणे शहराबरोबरच पिंपरी -चिंचवड शहरातील अनेक निर्बंध सोमवारपासून (७ जून) शिथिल करण्यात आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. सर्व प्रकारची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. उपाहारगृहे, बार, फूडकोर्ट सोमवार ते शुक्रवापर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहणार असून व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी चारवाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच जणांपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असून पाचनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवांमध्ये नमूद केलेल्या सेवा, दुकाने आठवडय़ातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत खुली राहतील. या कालावधीत व्यायामासाठी चालणे व सायकल चालवण्याची मुभा राहील. मॉल, सिनेमाघर, नाटय़गृह बंदच राहतील. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच राहील. पीएमपी बस अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. मालवाहतूक करणाऱ्यांना तीन व्यक्तींसह प्रवास करण्याची मुभा असेल. आंतरजिल्हा प्रवासास सशर्त परवानगी राहील. खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत काम सुरू ठेवता येईल. अत्यावश्यक सेवा आणि कोविडशी संबंधित शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. निवासाची व्यवस्था असल्यास चित्रीकरणास परवानगी असेल. कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असल्यास बांधकामांना परवानगी असेल. ५० जणांच्या उपस्थितीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील.
लग्नसमारंभासाठी ५० जणांची तर अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी २० जणांच्या उपस्थितीची परवानगी राहील. बैठका, सभा, निवडणुका ५० जणांच्या उपस्थितीत घेता येईल. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग ३० जूनपर्यंत बंदच राहतील. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पालकांसोबत संचारबंदी काळातही प्रवास करण्याची मुभा असेल. कृषी संबंधित सर्व दुकाने आठवडाभर दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यास सुधारित आदेश काढण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील
निर्यातपूर्वक उद्योगांमधील उत्पादन नियमितपणे सुरू राहील. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना आवश्यक कच्चा माल पुरवणारी संपूर्ण साखळी तसेच सतत प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना परवानगी असेल. इतर उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था संबंधित उद्योगांना करावी लागणार आहे.
दिवसाआड सम-विषम पध्दतीने मुभा
शहरातील बाजारपेठांमध्ये सम-विषम पध्दतीने दिवसाआड ५० टक्के दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मालकासह दुकानातील कर्मचाऱ्यांना दर १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकारी वैद्यकीय विभागाच्या मदतीने करणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध वाढवण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002