व्हीएस न्यूज - सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास असल्याने म्हाडाच्या घरासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्वास म्हाडाने जपावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या २७०३ नवीन सदनिका व ५८ व्यापारी संकुलासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात गरजूंना घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळाली. सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न आहे.
कोरोना संकट काळातदेखील म्हाडाने मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून दिली. म्हाडाच्या घरासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. म्हाडाच्या पारदर्शक कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास आहे. म्हाडाच्या घरामुळे गरजूंच्या घराची स्वप्नपूर्ती होते. सर्व सोयीसुविधायुक्त घरे देण्यासोबतच म्हाडाने पुणे शहराच्या विकासासाठी आणखी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुणे शहराची राज्यात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशी ओळख आहे. देशातही ही ओळख निर्माण करू, असेही अजित पवार म्हणाले.
व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्या वतीने (दि.२६) आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, शिक्षण समिती सदस्या अरूणा थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, नव्या युगाच्या आव्हानांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे. कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. पालकांचाही यामध्ये सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहेत. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवायला हवे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाइतकेच विज्ञान तंत्रज्ञान, कौशल्यांचा विकासही महत्वाचा आहे. कलाकौशल्यापासून संवाद कौशल्यापर्यंत प्रत्येक गोष्टी जमल्या पाहिजेत. समाजात यशस्वी झालेल्या व्यक्तींनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची सांगड घालून त्याचा उपयोग जीवनात केल्याने ते यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा कित्ता गिरवला पाहिजे. त्यांच्यासारखी विज्ञानाची कास धरली पाहिजे. असे कौशल्य विद्यार्थ्यांनी मिळवावे त्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. शिक्षणाच्या प्रभावी उपयोगासाठी, देशाच्या, समाजाच्या विकासासाठी ते आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले बदल केले आहेत, राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला पायाभूत सुविधा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे. दुर्गम, डोंगरी भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू.
महिलांना सन्मान मिळाला पाहीजे, यासाठी राज्य शासनाने चौथे महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला असल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
जि.प. अध्यक्षा श्रीमती पानसरे म्हणाल्या, कोरोना कालावधातीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे अत्यंत चांगले कार्य केले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरू राहीले. ग्रामीण भागातील अनेक शाळा आदर्श करण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. शिवतरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
व्हिएस न्यूज - पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिक्युअर आयटी सोलुशन कंपनीचा जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला, शहरातील अनधिकृत फ्लेक्स, मनपामध्ये जुन्या ठेकेदारांचे भाजपच्या पदाधिका-यांबरोबर संगनमत या विरोधात मी वेळोवेळी महानगरपालिके सभागृहात आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. याबाबत पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती आणि मला वेळोवेळी डावलण्याचे त्यांचे धोरण होते. त्याच्या निषेधार्थ मी गुरुवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे असे प्रतिपादन नगरसेवक तुषार कामठे यांनी केले.
शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुषार कामठे यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि मनपातील भ्रष्टाचारी अधिका-यांवर टिका केली. यावेळी ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या तिजोरीची लुट करण्याचे स्थानिक भाजपा आमदार आणि पदाधिका-यांचे धोरण सामाजिक जाणिवेचे संस्कार घेऊन मी समाजकारणात आलो आणि पहिल्याच निवडणुकीत मायबाप जनतेने मला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. जनतेच्या डोळ्यात आशा होती, बदल घडण्याची तीच आशा माझी प्रेरणा झाली, आणि मी अथकपणे कामाला सुरुवात केली, मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेचा पाईक आहे.
केंद्रातील तसेच राज्यातील विविध नेत्यांचे विचार मला विकासाभिमुख वाटतात. म्हणूनच पाच वर्षात जे काही करायचं ते जनतेसाठी, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या लोकांसाठी हे मनाशी ठाम ठरवून मी शिकत गेलो, कामे करत गेलो, पण पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती, तरीही त्याकडे मी दुर्लक्ष करून सर्वांचा सन्मान करत होतो, सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये काम करण्याचेच संस्कार असल्यामुळे लोकांच्या प्रश्नांची व वेदनांची जाणीव मला होतीच. त्यातूनच पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न हाती घेऊन मी आवाज उठवला आंदोलन केले, उपोषणही केले आणि विश्वास बसणार नाही असा जनसमुदाय माझ्यासोबत उभा राहिला, कचऱ्याच्या समस्यासाठीचे आंदोलन असेल, दारूचे दुकान बंद करण्यासाठीचे आंदोलन, अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात आंदोलनात तर माझ्यावरच गुन्हा दाखल केला.
जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे असो, जे काही शक्य होत ते सर्व मी गेली पाच वर्षे करत होतो, पण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माझ्या भाजप पक्षाचे शहरातील नेते, पदाधिकारी किंवा आमदार यांचे कधीच सहकार्य लाभले नाही, उलट माझी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूकच करण्यात आली ही वेदना अनेक दिवसांपासून मनात सलत होती. पण तरीही मी जनसेवेचा वसा सोडला नाही, आणि सोडणारही नाही.
नुकताच जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सिक्युअर आयटी सोलुशन या ठेकेदाराबद्दल मी पुराव्यांसाहित आवाज उठवला, पण शहरातील भाजप नेत्यांनी या विषयातही मला सहकार्य केले नाही, नाईलाजाने ह्या भ्रष्टाचाराबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या विषयात कारवाईचे आदेश दिले, वेळप्रसंगी माझ्या पक्षातील नेत्यावर जरी गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर परंतु माझ्या पिंपरी चिंचवडकर जनतेला मी कधीच धोका देऊ शकत नाही आणि भ्रष्टाचार कधीच खपवून घेऊ शकत नाही असे अजित पवार यांनी सांगितले आणि त्यानंतरच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाला.
त्यावेळी खऱ्या अर्थाने मी शहरातील नेत्यांमध्ये शोधत असलेली राजकीय प्रगल्भता आणि धडाडी मला अजित पवार यांच्यामध्ये दिसली. काहीही झाले तरी जनतेवर अन्याय होऊ द्यायचा नाही या भूमिकेतून त्यांनी मी दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक असूनही तात्काळ माझ्या रास्त मागणीची दखल घेतली आणि मला सर्वोतोपरी मदत केली. भारतीय जनता पक्षाचा मूळ सर्वसमावेशक विचार मला त्यावेळी त्यांच्यामध्ये दिसला आणि अनेक दिवसांपासून माझ्या मनात सलत असलेल्या वेदनेला फुंकर मिळाली, अशा प्रगल्भ नेत्यांचे सहकार्य मिळाले तर भविष्यात जनतेच्या आयुष्यात नक्कीच आमूलाग्र बदल घडविण्याची ताकद आपल्याला मिळेल हे लक्षात घेऊन पूर्ण विचाराअंती मी तुषार गजानन कामठे अधिकृतरित्या माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.पण जनतेशी माझी असलेली बांधिलकी आजन्म कायम राहिल यात तिळमात्रही शंका नाही. मायबाप जनतेने आजवर माझ्यावर जे प्रेम केलं, विश्वास दाखविला तोच विश्वास पुढच्या काळातही मला नक्कीच मिळेल असा विश्वास नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केला.
व्हीएस न्युज - रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी आज रोजी पुणे शहरातील सर्व संघटना एकत्र आल्या जवळपास २५ हजार रिक्षा चालक आणि मालकांनी पुणे आरटीओ वरती भव्य मोर्चा काढला आणि तीव्र आंदोलन करण्यात आले,
ट्रान्सपोर्ट कमिटीमध्ये ओला उबेर मधील टू व्हीलर बंद करण्याचा ठराव पारित करून या वरती ताबडतोब बंदी आणून ओला उबेर मधून टू व्हीलर बुकिंग केले जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल,पुणे सायबर क्राईम ब्रँच यांच्यासोबत विभागाची बैठक सुरू असून कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने टू व्हीलर वाहतुकीबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत तपास सुरू आहे, मुक्त परवाना बंद करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला असून लवकरच मुक्त परवाना बंद होईल,असे आश्वासन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी यावेळी दिले,
येत्या दोन दिवसात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन चक्काजाम करू असा इशारा देखील यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला
महाराष्ट्र रिक्षा पंचायत बाबासाहेब कांबळे ,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना किशोर चिंतामणी ,आम आदमी रिक्षा संघटना, श्रीकांत आचार्य सल्लागार ,संजय कवडे पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, अंकुश नवले भाजपा वाहतूक आघाडी, फारुख बागवाले आशीर्वाद रिक्षा संघटना,अजिंक्य रिक्षा संघटना नितीन भुजबळ आदी प्रमुख संघटनांनी यावेळी एकत्रित येऊन आंदोलन केले, याप्रमाणे अंदाजे 22 रिक्षा संघटनांचा पाठिंबा मिळाला व या संघटना देखील सहभागी झाल्या होत्या अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
व्हिएस न्यूज - दहशतवादी विरोधी पथकाकडील अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीच्या मुसक्या अवळून त्याच्या ताब्यातील १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा सह ३३,४१,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कैलास साहेबराव पवार (वय-३५, रा. गडदेवस्ती, डोंगर गाव, पेरणे, पुणे) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारीला अंमलीपदार्थ विरोधी पथक-१ च्या पोलिसांना सदर आरोपी हा लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाडेबोल्हाई रोडवरील, गडदेवस्ती, डोंगरगाव याठिकाणी त्याच्या राहत्या घरातून गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी आरोपी पवार याने त्याच्या घरात व घरासमोर लावलेल्या करोला टोयाटो या चारचाकी गाडीत २५,७५,३००/- रु. किमतीचा १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील २५,७५,३००/- रु. किमतीचा गांजा, ५०,६००/- रुपये रोख रक्कम, १५,०००/- रुपये किमतीचा एक मोबाईल फोन व ७,००,०००/- रु. किमतीची कार असा एकूण ३३,४९,९००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-१ चे सहा. पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी, मारुती पारधी, राहुल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील खराळवाडी परिसरातील खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आली. गणेश जयंती निम्मित खराळआई तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश जिनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. फुलांच्या आकर्षक रचना, रांगोळ्यांचे रेखीव गालिचे आणि रोषणाईने सजविलेल्या गणपती मंदिरांमध्ये शुक्रवारी सकाळपासून मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. अथर्वशीर्ष पठण, गणेश वंदन, गणेश यागासह धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून भक्तांनी गणेश जन्म उत्साहात साजरा केला. सायंकाळी गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सन्माननीयांची उपस्तीथी लाभली त्यात नगरसेवक समीर मासुळकर , माजी नगरसेवक सद्गुरू कदम ,शिवसेनेचे भोसरी विधानसभेचे समन्वयक दत्तात्रय भालेराव ,पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपअध्यक्ष रीमा रंजन , सामाजिक कार्यकर्ते आझम पानसरे,सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड आदी मान्यवरांनी बाप्पांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला व खराळआई तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश जिनवाल आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
गणेश जयंती साजरी करण्यासाठी मंडळाचे आधार स्तंभ व सल्लागार अॅड. जयवीर यादव , उद्योजक- सुनील सुतार,कामगार नेते- नरेश जिनवाल,संपादक - सागर सूर्यवंशी ,उद्योजक -शैलेश मंगळवेढेकर, उद्योजक प्रकाश तेलंगी,सामाजिक कार्यकर्ते -सुभाष जिनवाल यांचे सहकार्य लाभले, या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष मोहम्मद दिकसंगी ,सजावट प्रमुख किरण साळुंखे ,सचिव निलेश दूनघव,वर्गणी प्रमुख सागर जोजन , खजिनदार नितीन दूनघव , सह खजिनदार संतोष शिंगे, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्युज - रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. कीर्ती गायकवाड, डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण, उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे यांच्या मार्गदर्शनखाली या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तृतीयपंथीयांकडून काळेवाडी येथे वृक्षरोपण आणि रोपांचे वाटप करण्यात आले. यासाठी उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी व इतर कर्मचाऱ्यांचे साहाय्य लाभले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथीयांमार्फत नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच वाहतुकीचे व कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. नवीन थेरगाव रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात.
गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य अधिकारी बी.बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, मुकादम शिवपुत्र नंदर्गे, श्रीकांत कदम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे म्हणाले, की समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. तो बदलण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त तृतीयपंथीयांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. यापुढेही असे समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही उंडे यांनी केले.
डॉ. कीर्ती गायकवाड म्हणाल्या, की आज प्रजासत्ताक दिना निमित्त रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे समाजाच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडे समाजाने एक आदर्श म्हणून पाहावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण आणि इतर सर्व रुग्णालयातील स्टाफने संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि तृतीयपंथी यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव तृतीयपंथी सिद्धी कुंभार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या आणि सहभाग घेणाऱ्या नवीन थेरगाव हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी , उद्यान विभागाचे अधिकारी गोसावी साहेब आणि इतर कर्मचारी , वाहतूक विभाग पिंपरी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उंडे साहेब आणि इतर कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी, आणि पत्रकारांनी सर्वांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, सामाजिक कार्यास हातभार लावण्याचा निर्धार रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेने केला आहे या पुढे तृतीयपंथी लोकांसोबत समाजातील इतर घटकांची होईल तेवढी मदत करण्याचा निर्धार केला आहे. तृतीयपंथी सुद्धा ह्याच समाजाचा एक भाग आहे आणि त्यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा संविधानिक अधिकार आहेत याची जाणीव करून देण्यासाठी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था या पुढे काम करणार आहे .
व्हीएस न्यूज - चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आणि गुरुवारी (29 आणि 30 डिसेंबर) 'प्राचीन भारतीय संस्कृती' या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला आणि 'भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन' या विषयावरील कार्यशाळेचे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी चापेकर समितीचे अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे आणि कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी गिरीष प्रभुणे यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआर) अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
"भारतीय संस्कृतीचा उगम कधी आणि कसा झाला, भारतीयांचे मूळ भारतात आहे की भारताबाहेर याविषयीचे वास्तव समोर आणणारे वैज्ञानिक पुरावे गेल्या काही वर्षांत जगासमोर आले. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ वसंत शिंदे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गटाने राखीगढी या हरियाणातील पुरास्थळाचे उत्खनन करून तिथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण केले. त्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीनुसार राखीगढी येथे राहणारी माणसे आणि आजचे भारतीय यांच्या डीएनएमध्ये समानता असून, राखीगढी आणि आजचे भारतीय या दोघांचेही मूळ प्राचीन काळापासून भारतातच आहे. यापूर्वी सापडलेल्या पुरातत्वशास्त्रीय पुराव्यांना आता डीएनए अभ्यासाची जोड मिळाल्याने भारतीयांचे मूळ भारताबाहेर असल्याचा सिद्धांत आता कालबाह्य झाला असल्याचे वैज्ञानिक जगताने मान्य केले.
डॉ. वसंत शिंदे या संपूर्ण संशोधनाविषयी, तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून 29 आणि 30 डिसेंबर रोजी सचित्र सादरीकरण करतील." "जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक स्थळे, रचना, कलाकृती, लिखित- मौखिक साहित्य, पारंपरिक कौशल्ये देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्यःस्थिती नोंदविणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.
या प्रकल्पासाठीची ही पहिली कार्यशाळा होत आहे. यात डॉ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत गणवीर, गिरीश प्रभुणे, प्रदीप रावत, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुणचंद्र पाठक, रमेश पडवळ आणि मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत. त्याच प्रमाणे दोन्ही दिवस पारंपरिक कला आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी सहभागींना मिळणार आहे", असे गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.
या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि वारसाप्रेमी यांनी नोंदणी केली आहे. डॉ. वसंत शिंदे यांची जाहीर व्याख्याने, तसेच कार्यशाळेतील काही व्याख्याने सोशल मीडियावर फेसबुक लाइव्हव्दारे ऑनलाइनही प्रसारित करण्यात येतील," असे प्रभुणे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - काळेवाडी फाटा येथील पीर बाबा मंदिराजवळ एका अज्ञात व्यक्तीने वाहनाने सात वर्षाच्या मुलाला त्याच्या आई आणि वडिलांना धडक देऊन पळून गेल्याची घटना पहाटे ०४.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या अपघातात आई आणि वडील जखमी झाले पण सात वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला.
संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले.
पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तिघांना एका वाहनाने धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सात वर्षांचा मुलगा संघर्ष याचा जागीच मृत्यू झाला होता तर त्याचे आई आणि वडील जखमी झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मूगळीकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि संतोष पाटील आणि सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सह पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, पोलीस नाईक अतिक शेख, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी काळेवाडी फाटा परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अज्ञात वाहन आणि वाहन चालकाचा सुगाव लागला आणि त्याला अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक आरसा आढळला होता. तो वाहनाच्या डाव्या बाजूचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरून देखील तपास करण्यात आला. हा अपघात एका अशोक लेलँड टेम्पोने केला असून तो टेम्पो थेरगाव येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. त्यावरील चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी हा टेम्पो त्याचा मित्र तेजस शशिकांत बारसकर याच्याकडे होता. पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी तेजस घटनास्थळावरून घाबरून पळून गेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जितेंद्र गिरनार करीत आहेत.
व्हीएस न्यूज - तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईतील इंदू मिल येथे होणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या जागेबाबत इतिहासीक निर्णय घेतला. देशातील सर्व आंबेडकरी अनुयायांना कॉंग्रेस नेहमीच न्याय देण्याची भुमिका घेत असते. भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभासाठी देखील महाविकास आघाडी सरकारने भरघोस निधी जाहिर केला आहे. हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. म्हणून शहर कॉंग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत. यासाठी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले यांनी पाठपुरावा केला त्यांचाही उचित गौरव शहर कॉंग्रेसच्या वतीने करताना मला अभिमान वाटत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळातील कॉंग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचेही अभिनंदन करीत आहोत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि परिसर विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील तीस कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवासूविधांसाठी उपलब्ध करुन दिला. यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी पाठपूरावा केला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने डंबाळे यांचा शुक्रवारी पिंपरीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगूच्छ देऊन आणि पेढे वाटून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डंबाळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मानित केले.
राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे तसेच बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे, नितीन धोत्रे, गोपाळ मोरे, गंगाताई धेंडे, कविता खराडे, मनिषा गटकळ, सारीका पवार, आशा शिंदे, विमल गायकवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले.
यावेळी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले सांगितले की, पुणे- भिमाकोरेगांव शौर्य दिन कार्यक्रम 1 जानेवारी 2022 रोजी मोठया संख्येने साजरा होणार असून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे. यंदाच्या वर्षी भिमाकोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करणेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समन्वय समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितिन राऊत, माजी मंत्री प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या तयारीसाठी भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या होत्या.
गुरुवारी या संदर्भामध्ये जिल्हा परिषद पुणे येथे तहसिलदार व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे समवेत इतर सर्व विभागाच्या अधिका-यांशी व आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांशी संयुक्त बैठक झाली. यात जिल्हा प्रशासनाने सदर ठिकाणी संरक्षण, पिण्याचे पाणी, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादी प्रकारच्या पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. दरम्यान यंदाच्यावर्षी सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचा देखील कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान भिमाकोरेगांव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याबाबतची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली असुन त्यासाठी तब्बल १०० कोटींचा बृहत आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरु असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या बद्दल आम्ही राज्य सरकार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार मानत आहोत. या उत्सवात नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - विविध मागण्यांसाठी 8 नोव्हेंबर पासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप सुरु आहे. या कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळ आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे. एस. टी. महामंडळाचे संचालक, भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि दलाल यांचा महामंडळाच्या राज्यभर असणा-या लाखो कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता आणि पाच हजार एकरांहून जास्त असणा-या जमिनींवर डोळा आहे. एस. टी. महामंडळ कायम तोट्यात असल्याचे व्यवस्थापन सांगते.
महामंडळातील भ्रष्ट अधिकारी, व्यवस्थापन हे एस. टी. चे खासगीकरण करुन कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी अनुकूल आहे. परंतू एस. टी. च्या पुरवठादारांवर कारवाईचे धाडस दाखवत नाहीत. अधिकारी व पुढारी संगनमताने फायद्यात चालणारे मार्ग शिवशाही, शिवनेरीच्या पुरवठादारांना आंदण म्हणून देत आहे. एस. टी. ने सरासरी रोज 65 लाख प्रवाशी प्रवास करतात. तर मागील सात वर्षांपासून प्रत्येक प्रवाशी तिकीटामागे एक रुपया अधिभार लावण्यात आला आहे.
1992 सालापासून प्रत्येक कर्मचा-यांच्या वेतनातून दरमहा 45 रुपये मृत्यू फंड म्हणून कपात केली जाते. एस. टी. ला लागणा-या डिझेलवर राज्य सरकार प्रतिलिटर 35 रुपये कर आकारते. व्यवस्थापन आणि पुढारी संगणमताने करत असलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील एस. टी. चा तिकीट दर गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील दरांपेक्षा 25 टक्क्यांहून जास्त आहे. तसेच प्रत्येक प्रवाशांच्या तिकीटावर 17.5 टक्के प्रवाशी कर आकारला जातो. या व्यतीरीक्त प्रत्येक वाहनांमागे दरवर्षी व्यावयायिक वाहनकर आकारला जातो. या विविध करातून जमा होणा-या लाखो कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा अशीही मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी यावेळी केली.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ, एस. टी. कामगार कृती समिती पिंपरी चिंचवड आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. 15 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चव्हाण बोलत होत्या. यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे, उपाध्यक्ष राज अहिरराव, एस. टी. कामगार प्रतिनिधी सुदर्शन पजई, ओमप्रकाश गिरी, भरत नाईक, राजाभाऊ गिते, अश्विनी गायकवाड, अनुराधा नाईकवडे, मानिनी फाऊंडेशनच्या शोभा देशपांडे, सुहासिनी भोसले, अर्चना जिलेवार, सविता मोरे तसेच भरत शिंदे, संजय गोळे, आण्णा जोगदंड, गोरक्ष वाघमारे, कल्पना भाईंगडे, महादेव धर्मे, बशीर मुलाणी, प्रकाश शिंदे, प्रविण मोहिते, योगेश शिंदे, अविनाश शेंडगे, बापू जाधव, विजय साबळे आदी उपस्थित होते. व्यवस्थापन राज्यातील प्रवासांना सेवा देण्याऐवजी ठेकेदार आणि पुढा-यांच्या बगलबच्यांना पोसण्याची सेवा करीत आहे.
कोणाचीही मागणी नसताना एस. टी. मध्ये 150 कोटी रुपये खर्च करुन वायफाय सुविधा बसवली त्याची आता काय अवस्था आहे ? निकृष्ठ दर्जाचे गणवेश कर्मचा-यांना देण्यासाठी 100 कोटी रुपयांहुन जास्त दरवर्षी खर्च केला जातो. 24 हजार रुपयांना मिळणारी ट्रायमॅक्स मशिन टेंडर बेसिसवर भाड्याने घेतली आहे यासाठी प्रत्येक तिकीटामागे पुर्वी 20 पैसे प्रती तिकीट आकारले जायचे ते आता 1 रुपया 21 पैसे आकारले जातात. हे मशिन घेण्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या मशिनची मोडतोड झाल्यास वाहकाकडून 24 हजार रुपये वसूल केले जातात.
खासगी शिवशाही बसला 59 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल दिले जाते. डिझेलचा बाजारभावाचा दर वजा 59 रुपये यातील तुट एस. टी. महामंडळाला सहन करावी लागते. म्हणजेच खासगी शिवशाही चालविणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. अहोरात्र रस्त्यावर धावणा-या एस. टी. चे लोकेशन कळण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करुन व्हि.टी.एस. यंत्रणा खरेदी केली आहे. आज काल प्रत्येक चालक वाहकांकडे मोबाईल असताना हा 100 कोटी रुपयांचा खर्च कोणासाठी केला ? खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर मुक्कामी जाणा-या चालक, वाहकांना तेथे कोणतीही सुविधा मिळत नाही. तेथिल शाळा किंवा मंदीराच्या ओसरीवर मच्छर मारत रात्र जागून काढावी लागते. एस. टी. च्या अंतर्गत स्वच्छतेबाबत आणि एस. टी. स्टॅंड, डेपो, कार्यशाळा येथील स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतू प्रत्यक्षात या स्वच्छतेबाबत काय अवस्था आहे ? या प्रश्नांची उत्तरे आणि जमा खर्चाचा खरा हिशोब नागरीकांना आता मिळाला पाहिजे. एस. टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे हि आता कर्मचा-यांबरोबरच, प्रवाशांची आणि सर्व सामान्य नागरीकांचीही मागणी आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले की, 8 नोंव्हेबर पासून सुरु असणा-या या संपामध्ये एस. टी. च्या 93 हजारांहून जास्त कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. मागील दोन वर्षात 53 हुन जास्त कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कर्मचा-यांप्रती सांत्वन करण्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब हे ‘मेस्मा’ लागू करण्याची धमकी देत आहेत. या धमकीला घाबरुन आजपर्यंत पाच टक्केही कामावर रुजू झाले नाहीत. 10 हजारांहून जास्त कामगारांवर व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. औरंगाबादसह अनेक विभाग अधिका-यांनी या कामगारांना चौकशीच्या नोटीसा बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. या कामगारांवर मानसिक दडपण वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. आता सरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि राज्यातील जनतेला देखिल वेठीस धरु नये अशीही मागणी डॉ. भारती चव्हाण यांनी केली.
1960 साली पुणे - अहमदनगर पहिली एस. टी.ची सेवा सुरु झाली. तेंव्हापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत एस. टी. कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. या महामंडळाचे राज्य सरकारी कर्मचा-यांमध्ये विलिनीकरण करावे आणि इतर मागण्या सकृतदर्शनी योग्य असल्याचे आमचे मत आहे. एस. टी. कर्मचा-यांच्या व्यथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. 35 ते 40 वर्ष सेवा करुनही या कर्मचा-यांना अवघे दोन ते तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. चालक - वाहक यांची स्टेअरींग ड्युटी विचारात घेतली जाते. परंतू रस्त्यातील अपघात, वाहतूक खोळंबा, गाडी बंद पडणे हे विचारात न घेता वेळेचे बंधन दाखवून वेतन कपात केली जाते. या महामंडळात रुजू होणारा प्रत्येक कर्मचारी निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत ‘तात्पुरत्या समय वेतन श्रेणी’ वर असतो. काही कर्मचा-यांना तर निवृत्तीच्या शेवटच्या आठवड्यात ‘ कायम समय वेतन श्रेणी’ चे पत्र दिले जाते. हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा उद्या गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. याबाबतचा आदेश महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे, दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.
राज्य सरकारने १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची मान्यता दिली होती. परंतु, कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आला. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. कोरोना नियमांबाबत उपाययोजना शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित कराव्यात. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता करावी लागणार आहे.
ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवावे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002