व्हीएस न्यूज - गरजू नागरिकांनाच शासनाच्या स्वस्त धान्य योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी आणि काळ्या बाजारात जाणारे धान्य रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकेला आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी शहरासह जिल्ह्य़ात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के एवढी आधार जोडणी झाली आहे.
योग्य आणि गरजू व्यक्तींनाच स्वस्त धान्य वितरणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाऱ्या नागरिकांना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. धान्य वाटपातील भ्रष्टाचार आणि काळा बाजार रोखण्यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात पॉइंट ऑफ सेल (पॉस) यंत्रे बसविण्यात आली आहेत. केंद्र सरकारकडून अन्नधान्याच्या अनुदानापोटी सुमारे एक लाख ४० हजार कोटी रुपये प्रतिवर्षी खर्च करण्यात येतात. हे अनुदान योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी आधार क्रमांकाची मदत घेण्यात येत आहे. यापूर्वी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. शहरात १२ हजार ५७७ अंत्योदय कार्डधारकांपैकी सात हजार ५३३ म्हणजे ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तीन लाख ३८ हजार २२२ कार्डधारकांपैकी दोन लाख ८४ हजार ३४९ म्हणजे ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे.
आधारशिवाय वितरित न केलेले धान्य परत न पाठवता गरजूंना विकत देण्यात येणार आहे. कारण शासनाकडे धान्य परत पाठविल्यानंतर हे अतिरिक्त धान्य असल्याचा शेरा शासनस्तरावर देण्यात येतो. त्यामुळे पुढील वर्षी विभागस्तरावर धान्य वितरित करताना मागील वर्षीचा विचार करून धान्य वितरित केले जाते. त्यामुळे आधारजोडणी केल्यानंतर नागरिकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळण्यासाठी शिल्लक राहिलेले धान्य गरजूंना विकत देण्यात येणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002