व्हीएस न्यूज - ज्ञानाच्या भांडवल निर्मितीवरच भारत देश जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. संस्कृती व बौध्दिकता जपत भारताने जगाला शांततामय सहजीवनाचा आर्दश घालून दिला आहे. ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि कलेचा हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महोत्सव म्हणजे भारताच्या बहुसंस्कृतीचा सुरेख अविष्कार आहे. सर्व धर्माचे सार, विचार, मुल्य, तत्व मानवतेसाठी जगा आणि जगू द्या अशी मार्गदर्शक आहेत. असे मार्गदर्शन बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आझम कॅम्पस, कॅम्प पुणे येथे महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन मराठी ॲकेडमीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीईचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार, अकादमीच्या संचालिका नुरजहॉ शेख, मानद सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या प्राचार्या शैला बुटवाला, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग उपसचिव अर्पणा गावडे, डॉ. केतकी भोसले, प्रा. अर्चना देसाई, दिलशाद सैय्यद आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, अखिल भारतीय मराठी संमेलन देखील तीन दिवसाचे असते. मात्र, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पंधरा दिवस एवढ्या भव्य प्रमाणात पुण्यात साजरा केला जात आहे. ही अभिमानाचीबाब आहे. ज्ञान,साहित्य, संस्कृती, कलेचा हा महोत्सव प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी अक्षरांशी, पुस्तकांशी, ज्ञानाशी मैत्री करावी यातूनच आपले जीवन संपन्न होईल. मानवी जीवनात पुस्तकांचे आणि वाचनाचे स्थान अनमोल आहे. पुस्तके ज्ञानाचे वाहक आहेत. 21 वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. बुध्दी हेच भांडवल आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचे एकत्रित शिक्षण एकाच कॅम्पस मध्ये एवढ्या बहुसंख्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. बेगलूरु येथील आयआयएम पेक्षा ही पाचपट जास्त येथे संगणीकरण झाले आहे. हे अभिमानास्पद व गौरवास्पद आहे अशा शब्दात देशमुख यांनी एमसीई सोसायटीचा गौरव केला. ज्या भाषेतून ज्ञानाची, विज्ञानाची व रोजगारांची निर्मिती होते. ती भाषा संपन्न होते. आपली मातृ भाषा आपण गमावून बसत आहोत. शासकीय मराठी शाळा बंद पडत आहेत ही चिंतेची बाब आहे. जगात फक्त चार टक्के व्यवहार इंटरनेट वरुन इंग्रजीत होतात. भारतात याचे प्रमाण दहा टक्के आहे. गुगल ट्रान्सलेटमुळे आता आपल्या मातृभाषेतून देखील व्यवहार वाढतील असा आशावाद देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागत प्रास्ताविक नुरजहॉ शेख, प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. केतकी भोसले, सूत्रसंचालन दिलशाद सैय्यद आणि आभार प्रा. अर्चना देसाई यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002