व्हीएस न्यूज – पिंपळेगुरवमधील राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनींची अनधिकृत व्यवहाराद्वारे विक्री केली आहे. त्याच जागांवर आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यांना अभय मिळत आहे. ही अनधिकृत बांधकामे करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून लाखो रुपयांचा हफ्ता गोळा केला गेला आहे. तसेच या माजी नगरसेवकाने महार वतनाच्या जमिनींचीही परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना भाजपकडून अभय मिळत असल्याचे या माजी नगरसेवकाने सांगणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील जमीन विक्रीतून नागरिकांच्या झालेली आर्थिक फसवणूक आणि महार वतनाच्या जमिनींची परस्पर विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी केली आहे.
यासंदर्भात स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “पिंपळेगुरवमधील एका माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांकडून सर्रासपणे हफ्ते गोळा केले आहेत. त्यांची प्रभागात दहशत असल्यामुळे नागरिकांनाही आपले बांधकाम करण्यासाठी हफ्ते देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे असंख्य गोरगरीब नागरिकांकडून अनधिकृत बांधकामांसाठी हफ्ते या माजी नगरसेवकाने लाखोंची माया गोळा केली आहे. या माजी नगरसेवकाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविलेल्या या माजी नगरसेवकाला मतदारांनी घरी बसविले.
भाजपची लाट असतानाही मतदारांनी या माजी नगरसेवकाला नाकारले. या माजी नगरसेवकाने पिंपळेगुरव आणि सांगवी भागातील पूररेषेतील अनेक जमिनींची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. त्यातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नागरिकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर संबंधित जागा ही पूररेषेत असल्याचे लक्षात आले. परंतु, या माजी नगरसेवकाची प्रभागात दहशत असल्यामुळे एकाही नागरिकाने त्याबाबत कोणाकडे तक्रार केलेली नाही. परंतु, निवडणुकीत पराभव करून नागरिकांनी या माजी नगरसेवकावर असलेला रोष व्यक्त केला.
या माजी नगरसेवकाने बेकायदेशीरपणे विकलेल्या पूररेषेतील जागांवरच शेकडो अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि आजही काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांना आता अभय मिळत आहे. असे असताना या माजी नगरसेवकाने अनधिकृत बांधकामांवर बोलणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील बांधकामांवर महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. याच महाशयाने महार वतनांच्या जमिनींची परस्पर विक्री करून मागासवर्गातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सांगवी व पिंपळेगुरवर भागातील पूररेषेतील जमिनींची विक्री, नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक तसेच महार वतनांच्या जमिनींची परस्पर झालेल्या विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002