घटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट .....डॉ. रत्नाकर महाजन
पिंपरी चिंचवड
2018-01-27
पिंपरी चिंचवड कॉंग्रेसच्या वतीने संविधान बचाव मुकमार्चाचे आयोजन
व्हीएस न्युज - भारताच्या तिरंगा झेंड्यास आरएसएसचा प्रथम पासूनच विरोध होता. भारताचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा ही आरएसएसची इच्छा होती. परंतु घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आरएसएसचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावे ही आरएसएसची इच्छा धुळीस मिळाली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच बहुमताने भाजपच्या नावाखाली आरएसएस सत्तेवर आली आहे. त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा संविधानात बदल केल्याशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या भारतातील सज्ञान जनता हे कदापी होऊ देणार नाही. भाजपाने संविधानात बदलण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस त्याला तीव्र विरोध करेल. आरएसएसचा व भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा भारतात कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी शुक्रवारी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजप सरकारच्या विरोधात ‘संविधान बचाव लोकतंत्र बचाव’ या मुकमोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. महाजन बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला प्रदेश कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, माजी अध्यक्ष भाऊसाहेब मुगूटमल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष तारीक रिझवी, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. महाजन पुढे म्हणाले की, कॉंग्रेसने राज्यात संविधान बचाव रॅली काढली आहे. जो भाजप तिरंग्यास विरोध करतो तेच ‘तिरंगा बचाव’ यात्रा काढत आहेत. ही मोठी हास्यासस्पद गोष्ट आहे. सरकार असे उद्योग करुन समाजामध्ये फुट पाडण्याचे काम करीत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना देखील फसवी आहे. शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसून जनतेच्या कष्टाचा पैसा उद्योगपतींना कर्जमाफी देऊन जनतेची क्रुर थट्टा केली आहे. निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी फसव्या घोषणा केल्या. त्यातील एकही घोषणा अद्यापही पूर्ण झाली नाही. कॉंग्रेसने आग्रह धरला म्हणूनच शेतक-यांना एवढी तरी कर्ज माफी मिळाली, असे डॉ. महाजन यांनी ठासून सांगितले, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.
प्रास्ताविकात शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर जोरदार टिका केली. सत्ताधारी पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेत आहे. भाजप दरोडेखोर आहे आणि त्यांना साथ देणारी शिवसेना वॉचमनचे काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रारंभी चिंचवड येथील चापेकर चौकात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चास सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता होऊन तेथे सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र बनसोडे यांनी केले. कार्यक्रमास कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.