व्हीएस न्यूज – कलकत्ता विद्यापीठाकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आल्यामुळे आता त्या डॉ. ममता बॅनर्जी झाल्या आहेत. डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) पदवी त्यांना देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्या हस्ते ही पदवी त्यांना देण्यात आली. विद्यापीठाने ममता यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे. याच विद्यापीठाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. ममता यांनी पदवी प्रदानाच्या भाषणात असहिष्णुतेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या,की देशात असहिष्णुता वाढत आहे. इतिहासाची विकृती केली जात आहे. विविधता हीच देशाची ओळख आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून खासदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकणारे विदर्भातील नेते नाना पटोले यांचा अखेर गुरुवारी काँग्रेस प्रवेश झाला. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर फोटोसह ही माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमधील छायाचित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना दिसत आहेत.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे, काँग्रेसच्या इशा-यावरच पटोले यांनी राजीनामा दिल्याचा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले होते. पटोले काँग्रेसमध्ये जातील, असे संकेत मिळत होते तरीही त्याबाबत ठोस काही समजून येत नव्हते. देवेंद्र फडणवीस जर भंडारा-गोंदियामधून लोकसभेसाठी लढणार असतील तर आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू, असे पटोले यांनी जाहीर केले होते.
पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशाला मुहूर्त केव्हा मिळतो याबाबत राजकीय वतुर्ळात उत्सुकता होती. अखेर गुरुवारी काँग्रेसने नाना पटोले आपल्या पक्षात आल्याचे जाहीर केले आहे. हा पक्षप्रवेश नक्की केव्हा झाला, याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. काँग्रेसने केलेल्या ट्वीटमध्ये दिलेल्या छायाचित्रात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम आदींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना दिसत आहेत.
काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आघाडी सरकारच्या उदासीन धोरणाविरुद्ध आवाज उठवून, डिसेंबर २००८ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, २००९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि पराभूत झाले. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. २०१४ मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा लोकसभा मतदारसंघात पराभव केला होता. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या धोरणांवर नाराजी दाखवत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करत होते. शिवाय, शेतक-यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करीत होते. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतक-यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते. भाजपामधील सर्वच नेते पंतप्रधान मोदींचे गोडवे गात असताना पटोले यांनी मात्र त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने भाजपामध्ये भूकंप झाला होता.
मे महिन्यात दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत पटोले यांनी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न उपस्थित केले. मात्र,मोदींनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना बसायला लावले. तेव्हापासून पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. पटोले यांची एक लढाऊ नेते अशी ओळख आहे. राजकीय परिणामाची चिंता न करता, आजवर त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर स्वपक्षावर टीका करताना मागेपुढे पाहिले नाही.
व्हीएस न्यूज - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप आता राहिलेला नाही. त्यावेळी या नेत्यांची सहज भेट होत होती. सध्याच्या पंतप्रधानांना १३ महिन्यांपूर्वी भेटीची वेळ मागून अद्यापही त्यांनी वेळ दिलेली नाही. त्यामुळे आता आपण जनतेसमोर जाऊन आपली भूमिका मांडणार आहोत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर नाराज आहेत. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आर्थिक धोरणांबरोबरच भाजपच्या कृषी धोरणांवरही कडाडून टीका केली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वारंवार डावलले जात असल्याची खंतही त्यांनी वारंवार बोलून दाखविली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा मोदी आणि शहा यांना लक्ष्य केले आहे.
एका कार्यक्रमात शहा मोदींना लाडू भरवतानाचे छायाचित्र प्रसिध्द झाले आहे. या छायाचित्रात त्यांच्या आजुबाजूला सुषमा स्वराज , राजनाथ सिंह, अनंत कुमार आदी नेतेमंडळी दिसत आहेत. त्याचा संदर्भ घेत सिन्हा यांनी आता अडवाणी हे मोदी आणि शहा यांच्यादृष्टीने ‘सामान्य’कार्यकर्ते झाल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना वारंवार भेट मागूनही आपल्याला ते भेट देऊ शकले नाहीत. वाजपेयी, अडवाणी यांच्या काळात असे कधी घडले नव्हते. मोदी आपली भेट टाळत असल्याने आपण जनतेत जाऊन आता आपली भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट करतानाच सिन्हा यांनी आता मोदी आणि शहा यांच्या विरोधात आघाडी उघणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज - चारा घोटाळ्यातील आरोपी आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांनी सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांना दूरध्वनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची गंभीर दखल घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लालूप्रसाद यादव यांना अनुकूल असलेला निकाल देण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी लॉबिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आले असून त्यासंदर्भात झाशी परिमंडळाच्या आयुक्तांना चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ट्वीट करण्यात आले आहे. चारा घोटाळ्याबाबत लालूप्रसाद यादव यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मन्नन अख्तर आणि उपविभागीय दंडाधिकारी भैरपाल सिंह यांनी सीबीआयचे विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांना दूरध्वनी केल्याचा आरोप माध्यमातील वृत्तांत करण्यात आला आहे.
रांचीमध्ये खटल्याची प्रक्रिया सुरू असताना शिवपाल सिंह यांनीही आपल्याला अनेक दूरध्वनी आल्याचे सांगितले, मात्र त्यांनी दूरध्वनी कोणी केले त्यांच्या नावांचा उल्लेख केला नाही. लालूप्रसाद यांना त्यानंतर साडेतीन वर्षांच्या कारावासाची आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हादंडाधिकारी मन्नन अख्तर यांनी सदर आरोप फेटाळला आहे. आपण शिवपाल सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून कधीही संभाषण केलेले नाही,गेल्या केवळ चार महिन्यांपासून आपण येथे आहोत, एका जमिनीच्या वादाबाबत ते आम्हाला भेटावयास येथे आले होते आणि तेव्हा अन्य कोणतीही चर्चा झाली नाही, असे अख्तर म्हणाले.
व्हीएस न्यूज - जगातील अव्वल (टॉप) तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. Gallup International या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. आगामी दावोस परिषदेसाठी स्विर्त्झलंड दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यामुळे छाप पडणार आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, सर्वेक्षणात मोदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील ५० देशांतील नेत्यांचा यासाठी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जगातील तीन अव्वल नेते निवडण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर्मनच्या चांसलर अंजेला मार्केल, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन तर तिसऱ्या स्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमांक लागला आहे.
चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना मागे टाकून मोदींनी हे स्थान राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ आणि २३ जानेवारीला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओस परिषदेसाठी दोन दिवसांसाठी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
व्हीएस न्यूज – चितेगावच्या व्हिडिओकॉन कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना ८ जानेवारीपासून १२ दिवसांच्या सक्तीच्या सुटीवर पाठवण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुट्या नेमक्या कशासाठी दिल्या याची अधिकृत माहिती दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फ्रिज तसेच वॉशिंग मशीन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची चितेगावातील व्हॅल्यू रेफ-१ व सोकेश-२ या युनिटमध्ये निर्मिती केली जाते. ६ हजार ४५९ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. नवीन वर्षाच्या आगमनाचे कारण सांगून २८ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१८ पर्यंत दोन आठवड्यांपूर्वीच सुट्या देण्यात आल्या होत्या. प्रत्येक युनिटमध्ये ७ जानेवारी रोजी नोटीस लावून ८ ते १८ जानेवारीपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली. एवढी प्रदीर्घ सुटी सर्वांना देण्यामागचे नेमके कारण काय, याचा कोणताही उल्लेख नोटिसमध्ये नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
व्हीएस न्यूज – पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ही घटना उघड झाल्यानंतर डीएनए तपासणीसाठी सीआयडीच्या ताब्यात होता. पण सीआयडीकडून तब्बल दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अनिकेत कोथळे याचा ७ नोव्हेंबर २०१७ रोजी सांगलीच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या पोलीस साथीदारांनी यानंतर अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग येथील आंबोली घाटात जाळून टाकला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. राज्यभर या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले होते. तर, जाळण्यात आलेला अर्धवट मृतदेह डीएनएच्या वैद्यकीय कारणास्तव सीआयडीच्या ताब्यात होता. सीआयडीने डीएनए चाचणी पूर्ण झाल्यावर मृतदेह देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार अनिकेतचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. सकाळी ११ वाजता अनिकेतचे कुटुंबीय सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर विधिवत सर्व प्रक्रिया करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
व्हीएस न्यूज – एकनाथ खडसे भोसरी एमआयडीसी जमीनप्रकरणी राजीनाम्यानंतर भाजप श्रेष्ठींवर नाराज असून राष्ट्रवादीत नाराज खडसे प्रवेश करणार असल्याच्या वावड्या देखील उठवल्या जात आहेत. त्यांनी यापूर्वीच अजित पवारांची भेट घेतली असताना आता पुन्हा एकदा खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांसह अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
खडसे म्हणाले, आजही आपण कृषीमंत्री असताना शरद पवारांनी केलेल्या कामाबद्दल प्रभावित आहोत. त्याचबरोबर आपल्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या कामाचा ठसाही असल्याचे खडसे म्हणाले. बारामतीत आपल्याला काही दिवस जाऊन थांबावेसे वाटते. आपल्याला पवार हे नवीन नाहीत. पण उद्याचे काहीही सांगता येणार नाही, अशी गुगली टाकत आपण सगळे काही स्वतःच्या ताकदीवर उभे केले आहे. त्यामुळे आपले काहीही झाकून राहत नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आपले सरकार असले तरी आपण सरकारच्या कामावर अजिबात समाधानी नसल्याची टीका माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. शेतीची अवस्था अतिशय खराब असून आपल्यालाही त्याचा फटका बसत आहे. ज्या वेगाने शेतीचा विकास व्हायला हवा होता, तो या सरकारकडून होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या विश्वासावर विसंबून राहू नका, असे सांगत खडसेंनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. मी मंत्रीमंडळात असलो काय आणि नसलो तरी, त्यात काय वेगळे नाही. परंतु निर्णयक्षमता असलेली माणसे मंत्रीमंडळात नाहीत, असाही टोला खडसे यांनी लगावला. दरम्यान, अजित पवार हे निर्णय क्षमता असणारे नेते असल्याचीही कडी खडसे यांनी भाजप नेत्यांवर यावेळी केली.
व्हीएस न्यूज – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एका वयोवृद्ध दाम्पत्याने इच्छामरणाला परवानगी देण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पती-पत्नीची नारायण लवाटे आणि इरावती लवाटे अशी नावे आहेत.
नारायण लवाटे यांचे वय ८६ वर्षे असून १९८९ मध्ये ते एसटी महामंडळाच्या अकाऊंट विभागातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पत्नी इरावती या गिरगावातील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. लवाटे दाम्पत्याला मूलबाळ नसून त्यांनी आतापर्यंत सुखाने संसार केला. त्या दोघांनाही सोबत मृत्यू मिळावा, यासाठी त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाच्या परवानगीसाठी पत्र लिहिले आहे.
लवाटे दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी लावून धरली आहे. ते गेली ३० वर्षे इच्छामरणाचा कायदा व्हावा, यासाठी धडपडत आहेत. पण त्यांना पाठपुरावा करुनही काही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. आता आम्हाला सध्या कोणता आजार किंवा व्यंग नाही. एकटे जगण्यापेक्षा किंवा आमचा दुसऱ्यांना त्रास होण्यापेक्षा मरण बरे. आमच्या कुटुंबात कुणी नाही, असे नारायण लवाटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मी शिक्षिका होते. माझ्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता माझ्या जगण्याला काही अर्थ उरला नाही अशी प्रतिक्रिया इरावती लवाटे यांनी दिली आहे.
व्हीएस न्यूज - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश बापट यांच्या वक्तव्यावर गिरीश बापट अस्सल पुणेकर आहेत. त्यांच्या जे पोटात होते, तेच ओठांवर आले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वर्षानंतर सरकार बदलणार, असे एका कार्यक्रमात म्हटले होते.
गिरीश बापट यांनी पुण्यातील डाळींब महासंघाच्या कार्यक्रमात सगळी कामे पुढील वर्षभरात करुन घेईन. कारण, त्यानंतर आमची सत्ता नसेल. काही घ्यायचे असेल तर आत्ताच आमच्या मागे लागा. पुढे काय होणार आहे ते मला माहीत आहे. त्याची चर्चा मी येथे करणार नाही, असे म्हटले होते. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, गिरीश बापट पुण्याचे आहेत, जुने नेते आहेत. ते कधीही खोट बोलत नाहीत. त्यांच्या पोटात होते तेच ओठावर आले. राऊत कोरेगाव भीमा प्रकरणी बोलताना म्हणाले, उमर खालिदला पुण्यातील एल्गार सभेत का बोलविण्यात आले याची चौकशी व्हायला हवी. हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र जातीपातीत फाटला जात आहे हे धोकादायक असून हे प्रकरण हाताळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत पंतप्रधानांनी यावर भाष्य करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
व्हीएस न्यूज – देशातील एक लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे बेस्ट परफॉर्मिंग स्टेट ठरले आहे. राज्यात १२ हजाराहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडण्यात आल्या आहेत.
भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामपंचायतीना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील १२ हजार ३७८ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे, तर १४ हजार ८७८ ग्रामपंचायतींमध्ये भारत नेटच्या कामास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश (पश्चिम) मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आणि झारखंड ही राज्येसुद्धा भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत.
देशात ३१ डिसेंबर २०१७ अखेर २ लाख ५४ हजार ८९५ किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण केले गेले याद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड सेवेने देशातील १ लाख १ हजार ३७० ग्राम पंचायतीना भारत नेट च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेने जोडण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - आपल्यापैकी बहुसंख्य जणांनी आजपर्यंत आपले राष्ट्रपतीभवन फक्त चित्रातूनच पाहिले असेल. मात्र आता राष्ट्रपतीभवन सर्वसामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहे. आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय जनतेला राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी आमंत्रित केले असून लोकशाहीच्या या प्रतीकात सर्वांचे स्वागत आहे ते पाहायला जरूर या कारण ते सर्व देशवासियांचे आहे असे ट्विट केले आहे.
राष्ट्रपतीभवन हे सरकारी निवासस्थान असून जगात ते तीन नंबरचे मोठे सरकारी निवासस्थान आहे. १९५० पर्यंत ते व्हॉईसरॉय हाऊस नावाने ओळखले जात असे. या भवनात ३४० खोल्या आहेत मात्र आपले राष्ट्रपती व्हॉईसरॉय जेथे राहात असत तेथे राहात नाहीत तर ते अतिथी कक्षामध्ये राहतात. या इमारतीच्या बांधकामासाठी ७० कोटींहून अधिक विटा व ३५ लाख घनफूट दगड वापरला गेला असून या बांधकामात लोखंडाचा वापर अगदी कमी आहे. २९ हजारांहून अधिक मजूर या इमारतीच्या उभारणीसाठी १७ वर्षे सतत काम करत होते. येथून ३०० कुटुंबांचे स्थलांतर करून ही इमारत उभारली गेली.
ब्रिटीश वास्तूरचनाकार सर एडविन लँडसिएर लुटियन्स यांच्याकडे या इमारतीच्या उभारणीची जबाबदारी सोपविली गेली होती. राष्ट्रपतीभवनासमोर ब्रिटीश व मुगल शैलीच्या संयोगातून सुंदर मुघल गार्डनची उभारणी केली गेली आहे.१३ एकर जागेतील या उद्यानात जगातील बहुतेक सर्व प्रकारची फुलझाडे आहेत. फेब्रुवारी मार्चमध्ये हे गार्डन सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले केले जाते.
राष्ट्रपतीभवन आतून पाहायचे असेल तर त्यासाठी ५० रूपये भरून ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला वेळ ईमेल अथवा एसएमएस करून कळविली जाते. आता प्रवेश करताना अधिकृत ओळखपत्र लागते. आठ वर्षाखालील मुलांना तिकीट नाही तसेच ग्रुप बुकींग केल्यास २० टक्के सवलत मिळते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002