व्हीएस न्यूज - आर्थिक प्रगतीच्या बाबत भारत आणि चीनमध्ये चढाओढ असतानाच एका बाबतीत मात्र भारताने चीनवर मात केली आहे. नोकरदारांना देण्यात येणाऱ्या पगारवाढीच्या बाबतीत भारताची सरशी झाली असून यावर्षी भारतातील नोकरदारांना घसघशीत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
अॅव्हॉन इंडिया या कंपनीने आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील अनेक देशांमध्ये पगारवाढीच्या शक्यतेबाबत एक सर्वेक्षण केले. या अहवालानुसार, भारतातील पगारदारांना 2018 साली सरासरी 9.4टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, तर चीनमध्ये हा आकडा सरासरी 6.7 टक्के एवढा आहे.
वेगवेगळ्या 20 उद्योगांतील 1000 कंपन्यांमध्ये ही पाहणी करण्यात आली. भारतात गेल्या वर्षी सरासरी 9.3 टक्के एवढी पगारवाढ झाल्याचे त्यात दिसून आले. मात्र त्यापूर्वीच्या वर्षांमध्ये ही पगारवाढ दोन आकडी म्हणजे 10 टक्क्यांच्या वर होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पगारदारांना कमी पगारवाढ मिळणार आहे. यात आणखी एक विशेष म्हणजे आधीच लठ्ठ पगार मिळविणाऱ्या लोकांच्या पगारामध्ये फारशी वाढ झालेली नाही. उलट वरिष्ठ व व्यवस्थापनाच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांच्या पगारवाढीची पातळी खाली येत चालली आहे. या पगारवाढीच्या मागे कंपनीचा आकार व्यापार-व्यवसायात असे पद्धत व कामगिरी अशा अनेक घटक आहेत असे अॅव्हॉन इंडियाचे भागीदार आनंदरूप घोष यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - पाकिस्तानात एप्रिल मध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन्स कप साठी भारतीय क्रिकेट संघ पाठविण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे हे सामने पाकिस्तानात होणार का यावरच सवाल निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी या संदर्भात बोलताना म्हणाले की बीसीसीआयने कुठल्याही परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानात सामने खेळणार नाही असे कळविले आहे.
पाक क्रिकेट बोर्डाने या सामन्यांसाठी पूर्ण तयारी केली आहे. मात्र टीम इंडिया सहभागी होणार नसेल तर हे सामने श्रीलंका किंवा बांग्ला देशात खेळवावे लागतील. सर्व देश पाकिस्तानात त्यांच्या टीम पाठवितील अशी अपेक्षा होती. या संदर्भात कोलंबोत एक बैठक घेतली जात असून त्यात हे सामने तसेच आशिया कप सामने संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये भारतात आशिया कप खेळला जाणार आहे. त्यात पाकिस्तान सहभागी होणार का नाही याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर घेतला जाईल असेही सांगितले जात आहे. मुंबईवर २००८ साली दहशवादी हल्ला झाल्यानंतर पाक विरुद्ध कोणताही द्विपक्षी सिरीज खेनाल्यास भारताने नकार दिला होता.
व्हीएस न्यूज - लग्नाच्या जल्लोषातील अतिउत्साह नवरदेवाच्याच जीवावर बेतण्याची घटना नवी दिल्लीत घडली आहे. येथील एका लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या मित्राने जल्लोषात केलेल्या गोळीबारामध्ये त्या नवरदेवाचाच मृत्यू झाला आहे.
दीपक कुमार (वय 21 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव असून मंगळवारी रात्री सीमापुरी भागात ही घटना घडली. दीपक हा या वरातीच्या अग्रभागी होता आणि सर्वांच्या जल्लोषात तोही सामील होता. त्यावेळी एक गोळी घेऊन त्याच्या पाठीत लागली, असे पोलिस उपायुक्त प्रसाद यांनी एशियन एज वृत्तपत्राला सांगितले. ही वरात फरीदाबादकडे जात असताना नवरदेवाच्या एका मित्राने बंदुकीतून गोळी झाडली. ती अचानक दीपककुमारच्या पाठीत शिरली आणि तो घोड्यावरुन खाली पडला, असे प्रसाद यांनी सांगितले.
वऱ्हाडी मंडळी दिपकला जीटीबी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेतील आरोपी अद्याप फरार आहे. गोळी झाडणारा इसम हा दीपककुमारचा याचा दूरचा नातेवाईक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
व्हीएस न्यूज - पृथ्वीवर सर्वत्र 4जी नेटवर्क मिळत नसताना चंद्रावर हे नेटवर्क पुरविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2019 साली चंद्राच्या पृष्ठभागावरही 4जी नेटवर्क मिळेल, असे व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीने जाहीर केले आहे. त्यासाठी कंपनीने नोकिया कंपनीशी हात मिळवणी केली आहे.
पुढच्या वर्षी चंद्राच्या पृष्ठभागावर मनुष्याने पाऊल ठेवण्याच्या ऐतिहासिक घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त ही कामगिरी करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर व्होडाफोन आणि नोकीया यांनी बर्लिन येथील पीटी सायंटिस्टस् या अंतराळ संशोधन कंपनीसोबत कामावर सुरुवात केली आहे. पीटी सायंटिस्ट्चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोबर्ट बोम यांनी ही माहिती दिली आहे.
केन कार्निव्हल येथील स्पेस एक्स फॅक्टर9 या रॉकेटमधून 2019 या वर्षी ही चांद्रमोहीम सुरू होईल. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवर हाय डेफिनेशन स्ट्रीमिंग शक्य होईल. यासाठी सुमारे एक किलो वजनाचा हार्डवेअर लागणार आहे, असे रोबर्ट बोम म्हणाले. तर दुसरीकडे 5जी सेवा पुरविण्याएवढी तयारी झालेली नाही, परंतु 5जी नेटवर्कचीही चाचणी सुरू केल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - होळीच्या पूर्वसंध्येला बिहारमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांसहीत चार आमदारांनी संयुक्त जनता दलात(जदयू) प्रवेश केला आहे. पक्षांतर करणारे सर्व आमदार विधान परिषदेचे सदस्य आहेत.
माजी प्रदेशाध्यक्ष डॉ अशोक चौधरी यांच्यासहीत दिलीप चौधरी, रामचंद्र भारती आणि तनवीर अख्तर या आमदारांनी जदयू प्रवेश केला आहे. अशोक चौधरी यांनी काल रात्री उशिरा आपल्या सरकारी निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. यावेळी अशोक चौधरी म्हणाले, “मी अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर बिहारमध्ये काँग्रेसला उभे केले. चार आमदार असलेल्या पक्षाला 27आमदारांपर्यंत आणले. विधान परिषदेत काँग्रेसचे सहा सदस्य झाले. परंतु मला कशी वागणूक दिली, हे सर्वांना माहीत आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यामुळे पक्ष सोडण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”
मी आणि अन्य तीन आमदार जदयूची सदस्यता घेणार आहोत. या संबंधात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. विधान परिषदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अर्ज दिला आहे,अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच आणखी अनेक जण काँग्रेस सोडण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे प्रभारी बिहार अध्यक्ष कादरी यांनी चौधरी व अन्य तीन नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली आहे.
व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँक आणि ओरिएंटल बँकेतील घोटाळे समोर आल्यानंतर आता कॅनरा बँकेत 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधात केंद्रीय अन्वेषण विभागाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती व्यक्तीवर खटला दाखल केला आहे.
कोलकत्यातील आरपी इन्फोसिस्टिम कॉम्प्युटर कंपनीच्या संचालकांवर सीबीआयने खटला दाखल केला आहे. शिवाजी पांजा, कौस्तुभ रे, विनय बाफना आणि उपाध्यक्ष देबनाथ पाल अशी या संचालकांची नावे आहेत. यातील पांजा हे बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कॅनरा बँकेने या प्रकरणी आरपी इन्फोसिस्टिमच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यात या कंपनीने 515.15 कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींनी कॅनरा बँकेसोबतच अन्य 10 बँकाही गुंतलेल्या आहेत. आरोपींनी पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, युनियन बँक ऑफ इंडिया,अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ पतियाळा आणि आणि फेडरल बँक यांच्याकडूनही कर्ज घेतले होते असा आरोप कॅनरा बँकेने केला आहे.
पांजा हे फेब्रुवारी 2015 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या सोबत बांगलादेश दौर्यावर गेले होते. त्यावेळी परत येताना कोलकाता येथे त्यांना अटक करण्यात आली होती. जून 2015 मध्येही पांजा व अन्य संचालकांविरुद्ध खटला खटला दाखल झाला होता. त्यावेळचे प्रकरण आयडीबीआय बँकेशी संबंधित 180 कोटी रुपयांच्या कर्जाचे होते.
व्हीएस न्यूज – जीएसटी कायदा अमलात आल्यानंतर पहिल्यांदाच या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून मुंबईतील २ व्यापाऱ्यांना या कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’च्या घोटाळा प्रकरणातील आरोपाखाली ही कारवाई जीएसटी अधिकाऱ्यांनी केली आहे.
शाह ब्रदर्स इस्पात प्रा.लिमिटेडचे संचालक संजीव मेहता आणि व्ही.एन. इंडस्ट्रीचे संचालक विनयकुमार आर्या या दोघांचा जीएसटी कायद्यान्वये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत मुंबई जीएसटीचे आयुक्त डॉ. के. एन. राघवन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठल्याही मालाचा पुरवठा न करता फक्त कागदावरच व्यवहार दाखवून इनपुट टॅक्स क्रेडिट जमा करण्याचा आरोप या दोन्ही आरोपींवर आहे.
५ कोटी २० लाख आरोपी संजीव मेहता यांच्यावर आणि २ कोटी ३ लाख विनयकुमार आर्या यांच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट जमा न करण्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी विनय कुमार आर्या याने जीएसटी नियमान्वये रक्कम भरल्यानंतर त्याला जीएसटी कार्यालयातून जामीन मिळाला. तर संजीव मेहता यास न्यायालयात हजर करून त्या ठिकाणी रक्कम भरल्यानंतर जामीन मिळाला आहे.
जीएसटी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कागदावरच बनावट व्यवहार दाखवून टॅक्स इनपुट क्रेडिट दोन्ही व्यापाऱ्यांनी वाढवले होते. जेणेकरून त्यांच्याजवळ जमा होणाऱ्या पैशांच्या आधारावर लेटर ऑफ क्रेडिट दाखवून हे दोघे बँकांना फसविण्याच्या प्रयत्नात होते. जीएसटी अधिकाऱ्यांना संशय आहे, की अशाच प्रकारे अनेक व्यापारी अशा प्रकारची फसवणूक करत आहेत.
व्हीएस न्यूज - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी घेतलेल्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. भाजपतर्फे नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशाही चर्चा झाल्या. पण नारायण राणे ही ऑफर यांना अमान्य असल्याचे दिसते आहे. कारण नुकतेच एक ट्विट नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, नारायण राणेंच्या हितचिंतकांना असे वाटते आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळासाठी रहावे आणि नारायण राणेंसारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांना आम्हाला विधानसभेत बघायचे आहे राज्यसभेत नाही. नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याची चर्चा नितेश राणे यांच्या या ट्विटनंतर रंगली आहे.
नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना मंत्रीपद देण्यासाठी उशीर का होतो आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा असे सांगितले होते. तसेच राज्यसभेची ऑफर भाजपकडून असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. पण नितेश राणे यांच्या सूचक ट्विटनंतर नारायण राणे यांना ही ऑफर मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे.
व्हीएस न्यूज - पालिकेच्या ११ अधिकाऱ्यांची नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरु केली असून ३ अधिकारी या चौकशीत दोषीही आढळले आहे. तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच आपला कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे.
चौकशीत दोषी आढळलेल्या ३ कामचुकार अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यासाठी वेळही देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
मुंढेंनी नाशिककरांना नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केले जाईल, असा विश्वास दिला. कोणताही नागरिक,पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे, त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंढेंनी पदभार स्वीकारताना दिला होता.
व्हीएस न्यूज – नारायण राणे यांची भाजप पक्षाकडून फसवणूक केली जात असल्याचे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच जे दबावाचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. दरम्यान, शिवसेनेचा विरोध म्हणजे फक्त दिखावा असून सरकारमध्ये शिवसेनेला किंमत नसल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
पाटील म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचे हे सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत असून इंदिरा गांधी यांनी देखील काही वर्षांपूर्वी असेच केले होते. सत्ता परिवर्तन झाल्याचे चित्र त्यावेळी पाहायला मिळाले होते. आता राज्य आणि केंद्र सरकारदेखील दबावाचे राजकारण करत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांनी अभिनय केलेल्या एका गाण्याची खिल्ली उडवली जात आहे. जयंत पाटील यांना याबाबत विचारले असता, राज्यातील जनता सुज्ञ असून यावर निर्णय जनताच घेईल,अशी सावध प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. येत्या १० तारखेला शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ मोर्चाचा समारोप होणार असल्याचीही माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
व्हीएस न्यूज – एक रुपयांच्या नाण्यांचे काही वेळासाठी का होईना पण वाराणसीत अच्छे दिन आले. फक्त १ रुपयात साडी खरेदी करण्याची स्कीम शहरातील महमूरगंज येथे एका दुकानमालकाने काढली अन् बघता-बघता तरुणींच्या व महिलांच्या लोंढेच्यालोंढे साडी घेण्यासाठी दुकानात अवतरले. साड्या खरेदी करण्यासाठी महिला अक्षरश: तुटून पडल्या.
दुकानात झुंबड उडाल्यामुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. शेवटी साडी खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहाण्याची वेळ महिलांवर आली. पाहता-पाहता रांग थेट रस्त्यावर जाऊन पोहोचली अन् वाहतुकीची कोंडी झाली. अखेर पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन गर्दी पांगवावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दुकानदाराला नाईलाजाने स्कीम बंद करावी लागली. स्कीम बंद केल्यामुळे तासन्-तास रांगेत उभे असलेल्या महिलांचा पारा भडकला. अनेक महिलांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अगोदर पाचशे रुपयांची खरेदी केल्यानंतर मग एका रुपयात एक साडी खरेदी करता येणार, अशी ही स्कीम होती. पण दुकानदाराने जाहिरात करताना ‘अवघ्या एका रुपयात साडी’ अशी जाहिरात केली अन् प्रंचड गोंधळ उडाला.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002