व्हीएस न्यूज - भारतीय चलनात असलेल्या एक रुपयाच्या नोटेला ३० नोव्हेंबर २०१७ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. चांदीचे नाणे ते कागदी नोट असा एक रुपयाच्या चलनाचा प्रवासही रंजक आहे.
भारतात ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आलेली एक रुपयाची नोट आजच्या चलनी नोटांच्या तुलनेत जरा साधीच वाटते. फिकट, पिवळसर रंगाच्या या नोटेचीही काही खास वैशिष्टय़े आहेत. इंग्लंडमध्ये छापण्यात आलेल्या या नोटांच्या दर्शनी बाजूला वर डाव्या कोप-यात इंग्लंडचे राजे जॉर्ज पंचम यांची प्रतिमा असलेल्या नाण्याचा छाप आहे. नोटेच्या याच बाजूला वरच्या उजव्या कोप-यात तसेच खालच्या डाव्या कोप-यात १ रुपी असे इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता आणि भारतात इंग्रजांची सत्ता होती. त्यावेळी भारतात एक रुपयाचे नाणे चलनात होते. हे नाणे चांदीपासून बनविले जात होते. मात्र युद्धादरम्यान चांदीचे नाणे बनवणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे १९१७ मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आणली गेली आणि या नोटेने चांदीच्या नाण्याची जागा घेतली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एक रुपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा १९२६ मध्ये बंद करण्यात आली होती. कारण नोट छापण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यानंतर १९४० मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली, जी १९९४ पर्यंत सुरू होती. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली.
गेल्या शंभर वर्षात एक रुपयाच्या १२५ वेगवेगळ्या नोटा चलनात आल्या. एकूण २८ वेळा या नोटांचे डिझाईन बदलले गेले. एक रुपयाचे मूल्य आज खूप जास्त नसले तरी रुपयाच्या नोटेचे महत्त्व मात्र कायम आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लंडच्या राजाऐवजी भारतीय राजमुद्रेला एक रुपयाच्या नोटेवर स्थान मिळाले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जारी करण्यात आलेली एक रुपयाची नोट काही काळ पाकिस्तानातही चलनात होती.
केवळ एक रुपयाची नोटच भारत सरकार थेट चलनात आणते, तर बाकीच्या नोटा रिझर्व्ह बँकेमार्फत चलनात आणल्या जातात. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर ‘भारत सरकार’ असा उल्लेख असतो आणि भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. कायद्याच्या आधारे एक रुपयाची नोट ही ख-या अर्थाने ‘मुद्रा नोट’ (करन्सी नोट) आहे. इतर नोटा या ‘प्रॉमिसरी नोट’ असतात. प्रॉमिसरी नोटांवरुन केवळ नमूद रक्कम देण्याचे वचन दिले जाते.
व्हीएस न्यूज - पोलिसांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने भारतीय प्रोद्योगिक संस्थानशी (आयआयटी) बुधवारी सामंजस्य करार केला आहे.
पोलीस गृहनिर्माण महामंडळाने राज्यात पोलिसांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या गृहप्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यासाठीच महामंडळाने मुंबई आयआयटीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी महामंडळ आणि आयआयटीत करार झाला. तांत्रिकदृष्ट्या मजबूत, दीर्घकाळ टिकणाऱ्या, कार्यपूरक व हरित इमारत संकल्पनेनुसार आकर्षक असे बांधकामाचे आराखडे‘आयआयटी’ तयार करणार असून तांत्रिक परीक्षण, कामाची तपासणी व समीक्षण करणे, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, याबाबत आयआयटीची मदत घेतली जाईल.
पोलिसांसाठी घरे, पोलीस दलासाठी प्रशासकीय इमारती, पोलीस ठाणे, कारागृहे ही कामे महामंडळाच्यावतीने केली जातात. सध्या राज्यात महामंडळामार्फत मोठे ३६ प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये ३ हजार ३४४ सदनिका, १ हजार ६५२ क्षमतेची ८ वसतिगृहे, ११ पोलिस ठाणी, ४० वर्गखोल्यांच्या ६ इमारती, ९ प्रशासकीय इमारती, १ समादेशक कार्यालय, ४ कौशल्य विकास केंद्रे आणि १ महासंचालनालयीन कर्मचाऱ्यांसाठी शिबीर कार्यालय इमारतीचा समावेश आहे. पोलिस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. मिश्रा यांनी या करारासाठी पुढाकार घेतला होता.
व्हीएस न्यूज - गुजरातमधील सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मोदींनी बुधवारी गुजरातमध्ये चार प्रचारसभा घेतल्या. यामधील तीन सभा सौराष्ट्र आणि एक सभा दक्षिण गुजरातमध्ये झाली. दक्षिण गुजरात येथील नवसारीतील प्रचारसभेला मोदी संबोधित करत असताना जवळच्या एका मशिदीतून ‘अजान’चा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी दोन मिनिटांसाठी भाषण थांबवले.
पंतप्रधान मोदींनी नवसारीतील सभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींचे भाषण सुरु असताना जवळील मशिदीतून अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी त्यांचे भाषण दोन मिनिटांसाठी थांबवले. अजान संपवल्यावर मोदींनी त्यांचे भाषण पुन्हा सुरु केले. यावेळी त्यांनी जीएसटीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. जीएसटीचा उल्लेख ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर त्यांनी टीकास्त्र सोडले. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे‘ग्रँड स्टुपिड थॉट’ असल्याचे म्हटले.
काँग्रेसला अभिप्रेत असलेल्या जीएसटीची अंमलबजावणी झाली असती, तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही १८ टक्के इतका कर आकारला गेला असता. त्याचवेळी सिगारेट आणि मद्यावरही १८ टक्के कर लागला असता. त्यामुळे सिगारेट आणि मद्य स्वस्त झाले असते. जीवनावश्यक वस्तू आणि मद्यावर एकच कर लागणे, हे तर्काला धरून आहे का?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेला लुटले. त्यांनी आतापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे. अशा लूटमारांकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
यावेळी मोदींनी भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेला दिली. जलसंधारण आणि कृषी क्षेत्रात भाजप सरकारने भरीव कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस कूपनलिकेसारख्या लहान कामांचे श्रेय घेत आहे. मात्र भाजपने सत्ताकाळात मोठेमोठ्या जलवाहिन्यांची कामे केली, असे मोदींनी म्हटले. काँग्रेससाठी विकासाचा अर्थ फक्त हँडपंप (कूपनलिका) आहे. तर भाजपसाठी विकासाचा अर्थ जलवाहिन्यांची कामे पूर्ण करुन पाण्यासाठी होणारी लोकांची पायपीट थांबवणे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
व्हीएस न्यूज - ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझे मत मांडले. पण यामुळे राज यांचे काही नुकसान झाले नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं’, असे नाना पाटेकर यांनी म्हटले. आज पुण्यात झालेल्या‘एनडीए’च्या दीक्षांत समारंभाला नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत होते. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांविषयी त्यांची भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या विषयांची माहिती नाही, त्यात उगाच चोंबडेपणा करू नये, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, त्यांनी नानांची नक्कलही केली होती. ‘वेलकम चित्रपटात नाना पाटेकर यांनी फेरीवाल्याचा अभिनय केला होता. कांदे घ्या, बटाटे घ्या असं नाना त्या चित्रपटात म्हणत होता. म्हणूनच बहुधा नानाला फेरीवाल्यांचा पुळका आला असावा’ असे ठाकरेंनी म्हटले होते.
यावर आज राज ठाकरे यांचे वैयक्तिक काही नुकसान झाले नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत कमी झाल्याचे सांगत नानांनी राज ठाकरेंना टोला लगावला. नाना पाटेकर यांच्या या भूमिकेवर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हीएस न्यूज - भारतात नेस्लेला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. ‘मॅगी’त प्रमाणापेक्षा जास्त राख सापडल्याने उत्तर प्रदेशमधील न्यायालयाने ‘मॅगी’ला ४५ लाख, तर वितरकाला १५ लाख रुपये दंड ठोठावला. याशिवाय दोन विक्रेत्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
लखनौतील जिल्हा प्रशासनाने २०१५ मध्ये ‘मॅगी’चे ७ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. २०१६ मध्ये याबाबत अहवाल आला होता. या आधारे प्रशासनाने स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला होता. ‘मॅगी’मध्ये प्रमाणापेक्षा जास्त राख सापडल्याने न्यायालयाने नेस्लेला नुकताच दंड ठोठावला आहे. नेस्ले इंडियाच्या प्रवक्यांनी यावर प्रतिक्रीया दिली. आम्हाला अद्याप निकालाची प्रत मिळालेली नाही. २०१५ मधील हे प्रकरण असून आम्ही या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ, असे त्यांनी सांगितले. २०१५ नंतर नेस्लेने ‘मॅगी’त बदल केले असून सर्व निकषांचे पालन करूनच आम्ही उत्पादने तयार केली आहेत. दंडाच्या बातमीमुळे ग्राहकांनी गोंधळून जाऊ नये,असे त्यांनी आवर्जून सांगितले.
लखनौतील विविध दुकानांमधून प्रशासनाने ‘मॅगी’चे नमुने घेतले होते. यात ‘मॅगी’ मसाला नुडल्स, ‘मॅगी’ आटा नुडल्समध्ये राखेचे मर्यादेपेक्षा जास्त प्रमाण असल्याचे समोर आले होते. खाद्यपदार्थांमध्ये राखेचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे.
व्हीएस न्यूज - गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे नाव हिंदू नसणा-या व्यक्तींच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे. या कारणामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नवा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ मंदिरात अहिंदू भाविकांना दर्शन घेण्यापूर्वी याच रजिस्टरमध्ये आपले नाव नोंदवावे लागते.
सोमनाथ हे एक हिंदू मंदिर असून हिंदू नसलेल्या व्यक्तीला या मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल, अशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे. मंदिराच्या नियमानुसार हिंदू नसणा-या व्यक्तीला प्रवेशासाठी प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव आणि माहिती भरावी लागते. या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी सोमनाथ मंदिराच्या प्रवेश रजिस्टरमध्ये राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचे नाव अहिंदूंसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये नोंदवले. त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अहिंदू म्हणून आपले नाव का नोंदवावे लागले यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या मंदिरात हिंदू नसणा-या व्यक्तींना प्रवेशबंदी नाही. मात्र त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. अहिंदू व्यक्तींसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये राहुल गांधी यांचे नाव नंतर जोडले गेले असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.
मोदींचा नेहरू-गांधी कुटुंबावर हल्ला…
सोमनाथ मंदिरात प्रवेश करणा-या राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. आज सोमनाथ मंदिराची आठवण करणारे आपला इतिहास विसरले आहेत का? असा प्रश्न मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उपस्थित केला आहे. मोदी म्हणाले की, तुमच्याच (राहुल गांधी) कुटुंबातील सदस्य आणि आमचे पहिले पंतप्रधान इथे सोमनाथ मंदिर उभारणीबाबत मात्र उदासीन होते.
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सभांचा झपाटा लावला आहे. राहुल गांधी हे सोशल मीडियावरदेखील केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारत म्हटले, ‘५० लाख नवी घरे देणार असे आश्वासन २०१२मध्ये दिले. ५ वर्षांत ४.७२ लाख घरे बनवली. पंतप्रधान, हे आश्वासन पूर्ण व्हायला आणखी ४५ वर्षे लागतील का ते सांगा?’
व्हीएस न्यूज - शेतक-यांना कर्जमाफी जाहीर करूनही ऑनलाईन घोळामुळे अद्यापही त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या ऑनलाईन घोळाला जबाबदार असणारे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य दहा सनदी अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.
कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ आयटी विभागाच्या प्रधान सचिवांना अखेर भोवला. या विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ समोर येताच गेल्याच आठवडय़ात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिका-यांच्या बदलीचे आदेश जारी केले. विजयकुमार गौतम यांच्या जागी धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष सेवा अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नेमणूक करण्यात आली आहे. विजयकुमार गौतम यांची वित्त विभागात (लेखा व कोषागारे) प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागात (लेखा व कोषागारे) कार्यरत असलेल्या वंदना कृष्णा यांची वित्त विभागात वित्तीय सुधारणा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले आर. ए. राजीव यांची वित्त विभागात (व्यय) प्रधान सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. देसाई यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय येथे तर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसाळ यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी विभागाचे आयुक्त म्हणून तर मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव सूरज मांढरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. रोहयोचे आयुक्त एस. जी. कोलते यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक राजीव निवतकर यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणा-या १ लाख १६ हजार लोकांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करून त्यानंतर आयकर न भरल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय,मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम बँकेत जमा करून आयकर भरणारेही आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
नोटाबंदीनंतर २५ लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा करणा-या लोकांची संख्या १८ लाख इतकी होती. या १८ लाखांचे वर्गीकरण दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणारे आणि १० ते १५ लाख रुपये जमा करणारे, असे दोन गट तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणा-या १ लाख १६ हजार लोकांनी आतापर्यंत आयकर भरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
२५ लाखांहून अधिकची रक्कम बँकेत भरणा-या १ लाख १६ हजार लोकांनी अद्याप आयकर भरलेला नाही. त्यांना पुढील ३० दिवसांमध्ये आयकर भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे, असे चंद्रा यांना सांगितले. नोटाबंदीनंतर १० ते २५ लाख रुपये बँकेत जमा करून अद्याप आयकर न भरलेल्यांची संख्या २.४ लाख इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. या २.४ लाख लोकांना दुस-या टप्प्यात नोटीस बजावली जाणार आहे. आयकर कायद्यांतर्गत दाखल होणा-या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही आकडेवारीवरुन समोर आले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आयकर कायद्याखाली २८८ गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी याच कालावधीत हा आकडा दुपटीने वाढून ६०९ वर जाऊन पोहोचला. यंदाच्या वर्षात आयकर विभागाकडे एकूण १०४६ तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षी हे प्रमाण ६५२ इतके होते. आयकर कायद्यांतर्गत दोषी ठरणा-यांची संख्यादेखील यंदा वाढली आहे. गेल्या वर्षी आयकर कायद्याखाली १३ जण दोषी ठरले होते. यंदा हा आकडा ४३ वर जाऊन पोहोचला आहे.
व्हीएस न्यूज - नवी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याबरोबर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विमान निघून गेल्यामुळे चिडलेल्या महिलेने कर्मचाऱ्याबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली. वाद इतका विकोपाला गेला की त्या महिलेने रागाच्या भरात त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा रक्षक तिथे आले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.
दरम्यान, या महिलेविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. एअर इंडियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही हरियाणातील पंचकुला शहरात राहणारी आहे. ही घटना मंगळवारी घडली. अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार एका महिला प्रवासीला दिल्लीतून अहमदाबादला जायचे होते. ती उशिराने विमानतळावर पोहोचली होती. त्यामुळे या महिलेचे विमान चुकले. ही गोष्ट त्या महिलेला समजताच ती काऊंटरवरील व्यवस्थापकाशी वाद घालू लागली. सुरूवातीला कर्मचाऱ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्यास तयारच नव्हती. प्रकरण हातघाईवर आले आणि याच दरम्यान त्या महिलेने त्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर एअर इंडियाच्या इतर अधिकाऱ्यांना याबाबत समजले. घटनास्थळी त्वरीत सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करून महिलेला समजावले आणि वाद संपवला. ही महिला उशिराने विमानतळावर पोहोचली होती, असे एअर इंडियाचे म्हणणे आहे. ही महिला विमान गेल्यामुळे काऊंटरवर गोंधळ घालत होती. त्यानंतर हे प्रकरण चिघळले होते. परंतु, हे प्रकरण आता संपवण्यात आल्याचेही एअर इंडियाने म्हटले आहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनीही एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. संसदेत याप्रकरणी गोंधळ झाला होता. त्यानंतर गायकवाड यांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास मज्जावही करण्यात आला होता.
व्हीएस न्यूज - वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.
रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती. बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी सरकारने कर्नाटक कॅडरच्या प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली. एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
व्हीएस न्यूज - काँग्रेसकडून ६० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे. ‘२२ वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या,’ असे ट्विट करत काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला आहे. भाजप गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्तेत आहे. त्याचाच संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींकडे २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे.
‘२२ सालों का हिसाब, जनता मांगे जवाब,’ असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून राहुल यांनी पंतप्रधान मोदींना एक प्रश्नदेखील विचारला आहे. ‘२०१२ मध्ये ५० लाख घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ५ वर्षांमध्ये ४.७२ घरांची उभारणी करण्यात आली. मग घरांचे आश्वासन पूर्ण करायला ४५ वर्षे लागणार का?,’ असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. मोदींनी ५ वर्षांमध्ये ५० लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ५ वर्षांमध्ये ५ लाख घरेदेखील बांधली गेली नसल्याने आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आणखी ४५ वर्षे लागणार का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘पंतप्रधानांसाठी पहिला प्रश्न’ असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींकडून मोदींना दररोज प्रश्न विचारले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राहुल गांधींनी याआधीही ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. ‘साहेब घाबरल्या घाबरल्यासारखे वाटतात. शाह-जादा, राफेलच्या प्रश्नांवर ते गप्प का असतात?,’ असे प्रश्न विचारत राहुल यांनी मोदींवर थेट टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हाफिज सईदच्या सुटकेवरुनही मोदींना टोला लगावला होता. ‘गळाभेट कामी आली नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना चिमटा काढला होता. मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीचा संदर्भ देत राहुल यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. ‘आणखी काही गळाभेटींची गरज आहे,’ असा चिमटादेखील त्यांनी काढला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘हाफिज सईदच्या सुटकेमुळे काँग्रेसचा आनंद गगनात मावेनासा झाला होता,’ असा मोदींनी म्हटले होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002