व्हीएस न्यूज – भारनियमन जाहीर करून राज्याला अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या महा-वितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीने शुक्रवारी कंदील मोर्चा काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महा-वितरणचे पिंपरी विभागीय कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांना कंदील-कोळसा भेट दिला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे व युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नगरसेविका संगीता ताम्हणे, अपर्णा डोके, पक्ष प्रवक्ते फजल शेख, मछिंद्र तापकीर, आनंदा यादव, कविता खराडे, गंगा धेंडे, विजया काटे, विश्रांती पाडाळे, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, प्रदीप गायकवाड, अभिषेक बोके, उत्तम आल्हाट, फिरोज शेख, यतीन पारेख, धैर्यशील धर्मे, महेश झपके, संदीप पाटील, विशाल काळभोर, विनोद कांबळे, ऋषिकेश वाघेरे, रवींद्र वाकडकर, अतुल वाकडकर, ऋषिकेश वाकडकर, निशांत वाकडकर, बाळासाहेब पिल्लेवार, विठ्ठल गुजर, संतोष वाघेरे, रशीद सय्यद, अलोक गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संजोग वाघेरे म्हणाले, दहा दिवसांपूर्वी राज्यात भारनियमन जाहीर केल्याने महा-वितरण विरोधात राज्यात असंतोष पसरला. अतिरिक्त वीज उपलब्ध असताना देखील भारनियमन करणे चुकीचे असल्याची टीकेची झोड उठल्यानंतर केवळ शहरी भागाला भारनियमनातून वगळल्याचे जाहीर केले. मात्र अद्याप ग्रामीण भागात भारनियमनाच्या नावाखाली बारा-बारा तास वीज नसते. शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता अतिरिक्त विजेचा सर्व भागांत पुरवठा करावा. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी दिला. नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विशाल वाकडकर यांनी देखील महा-वितरणच्या पक्षपाती धोरणावर टीका केली.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्यात कमतरता येत नाही. डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. डॉक्टरांना काही सवलती व भत्ते वाढवून आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सत्तारुढ पक्षनेते यांच्या उपस्थिती डॉक्टरांच्या संख्या वाढविण्यासाठी गुरुवारी (दि.12) बैठक घेण्यात आली. वायसीएमसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची आवश्यकता आहे. हे डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी काही पर्यायांचा विचार केला जात आहे. प्रामुख्याने डॉक्टरांसाठी असलेला व्यावसायरोध भत्ता (एनपीए) स्विकारणे ऐच्छिक केले जाणार आहे. त्यामुळे काही डॉक्टर खासगी क्षेत्रात सेवा बजावून देखील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करू शकतील,असेही पवार यांनी सांगितले.
त्याचबरोबर पालिकेच्या निवासी डॉक्टरांना त्यांच्या शिफ्टनुसार कमी-अधिक भत्ता देणे गरजेचे आहे. बंधपत्रित डॉक्टरांची संख्या कमी असल्याने ते वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, आरएमओ डॉक्टरांसाठी 1200 रुपयांचा भत्ता 194 पासून वाढविलेला नसल्याने तो वाढवावा. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी कर्मचारी वर्ग नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – नांदेड महापालिकेत कॉंग्रेस पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापर आणि भाजपच्या परतीच्या प्रवासाचे संकेत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने घवघवीत यश मिळविले. त्या निमित्ताने सचिन साठे आणि महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या हस्ते संत तुकारामनगर पिंपरी येथे नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी सचिन साठे बोलत होते.
यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवक अध्यक्ष मयुर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी, भाऊसाहेब मुगूटमल, हिरा जाधव, नंदा तुळसे,अर्जुन खंडागळे, विठ्ठल कळसे, सागर धावडे, इर्शाद शेख आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. अनिल रॉय यांच्या ऐवजी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे डॉ. पवन साळवे यांची नेमणूक करण्याचा ठराव विधी समितीने नुकताच पारित केला. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा आरोप डॉ. रॉय यांनी केला. या आरोपाने पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांना प्रशासकीय नोटीस बजावली आहे. यासंदर्भात24 तासाच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना हर्डीकर यांनी दिली आहेत. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदावर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने या पदावर सेवा ज्येष्ठता कार्यकाळाचा विचार करून डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती दिली. शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना डावलण्यात आले. मात्र, फेब्रुवारी 2017 रोजी पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ही पदोन्नती योग्य नसल्याचे सांगून सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने पदोन्नतीचा फेरप्रस्ताव विधी समितीसमोर आणला. त्याला विधीने मंजुरीही दिली. त्यामुळे डॉ. रॉय यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा प्रशासनाला साक्षात्कार कसा काय झाला?. प्रशासन राजकीय दबावाला बळी पडले असून यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचाही आरोप रॉय यांनी केला आहे. त्यांच्या आक्षेपार्ह आरोपामुळे पालिकेची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त हर्डीकर यांनी त्यांन नोटीस बजावली आहे.
साळवे यांच्या पदोन्नतीचा ठराव विधीने मंजूर केल्यानंतर रॉय यांनी आयुक्त हर्डीकर यांना स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला आहे. त्यामध्ये आयुक्तांसह प्रशासनावर आरोप केले आहेत. आरोपाच्या बातम्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेची बदनामी झाली असून रॉय यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नागरिकांनी निवेदने दिली आहेत. त्यामुळे रॉय यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवला आहे. कार्यालयीन शिस्तभंगाचा ठपका ठेवून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56 (2) मधील तरतुदींनुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? असे आयुक्त हर्डीकर यांनी नोटिसीत नमूद केले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून 24 तासाच्या आत याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत. असमाधानकारक खुलासा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणींत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेला ग्रामपंचायत ते महापालिका असा 35 वर्षाचा इतिहास आहे. महापालिकेच्या विकासामध्ये स्व.यशवंतराव चव्हाण व अण्णासाहेब मगर यांचा मोलाचा वाटा आहे. शहराच्या विकासात कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा, उद्योजकांचा, गुणवंत कामगारांचा तसेच महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्य कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) सत्कार करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य शैलेश मोरे, विलास मडिगेरी, उत्तम केंदळे, आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, मनपाच्या विकासासाठी महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व शहरवासियांनी योगदान दिले पाहिजे. आपला प्रामाणिकपणा आपल्या कर्तव्यातून दाखवून दिला पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिका कामगारांची नगरी आहे. सर्वांचा समन्वय साधून वातावरण चांगले राहण्यासाठी तसेच पुढील 30-40 वर्षांचा विचार करुन महापालिकेचा विकास होण्यासाठी पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी यांनी काम केले पाहिजे. शहरातील खेळाडूंना व उल्लेखनीय काम करणाऱ्यांना न्याय देण्याचे काम महापालिकेने करावे. पिंपरी-चिंचवडची ओळख अण्णासाहेब मगर यांच्यामुळे आशिया खंडात झाली आहे, पुढेही ती अशीच रहावी. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते यावेळी म्हणाले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अण्णासाहेब मगर यांनी शहराला दिशा दिली, पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी त्यांच्या स्वप्नातून साकार झाली. आज महापालिकेच्या विकासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. महापालिका विकासामध्ये आपण योगदान दिले पाहिजे, असे ध्येय सर्वांनी निश्चित केले पाहिजे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी काम करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - वाकड, ताथवडे आणि पुनावळे भागातील चार आरसीसी बांधकामे आणि पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केल्यानंतरही महापालिकेकडून अशा बांधकामांवर शास्ती कर आकारला जात आहेत. तर, बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून पाडापाडी केली जात आहे.
ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वाकड, ताथवडे, पुनावळे येथे चालू असलेल्या चार अनधिकृत आरसीसी बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तर, 3 हजार 777 चौरस फुटाच्या एका पत्राशेडवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे,कनिष्ट अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने कर्तव्य बजावले. त्यासाठी पंधरा पोलीस, दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर कॉम्प्रेसर, एक ट्रक व वीस मनपा कर्मचारी सहकार्यासाठी घेतले होते.
व्हीएस न्यूज – ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक निवडून आले नाहीत. तेथील जनतेला त्रास देण्याचे षडयंत्र सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रचले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तेथील नागरिकांना नियोजनपूर्वक पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
यासंदर्भात भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन समान पाणी वितरणाची मागणी केली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी दत्तवाडी विठ्ठलवाडी तुळजाईवस्ती महात्मा फुलेनगर आदी भागात महापालिका निवडणुकीपूर्वी पाणी पुरवठा सुरळीत होत होता. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या संकुचित राजकारणातून ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक निवडून आले नाहीत. त्या प्रभागात जाणीवपूर्वक सुडबुद्धीने पाणी पुरवठा कमी दाबाने केला जात आहे. यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रशासनावर दबाव टाकत आहेत.
मोहननगर व आकुर्डी परिसरात गेल्या चार-पाच महिन्यापासून कमी दाबाने व विस्कळीत पाणी पुरवठा होतो. या गंभीर तक्रारीबाबत आठ ते दहा वेळा स्थानिक नगरसेविकांनी लेखी तक्रार केली आहे. तरीही, या प्रश्नाचे निराकरण झाले नाही. याविरोधात स्थानिक नगरसेवकांसह प्रभागातील महिलांनी आंदोलन देखील केले. मात्र, पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महापालिका आयुक्तांनी नागरिकांना राजकीय पदाधिकाऱ्यांकडून जाणुनबुजून दिला जाणारा त्रास थांबवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.
व्हीएस न्यूज – पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान न देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे ठाम आहेत. मात्र, पिंपरीचे महापौर नितीन काळजे व स्थायी सभापती सीमा सावळे हे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी आग्रही आहेत. याबाबत पीएमपीएमएल संचालक मंडळाची येत्या शुक्रवारी (दि. 13) बैठक होणार असून त्यात कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदान वाटपावरुन वादंग उठण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (पीएमपीएमएल) शेकडो चालक, वाहक आणि डेपोत कर्मचारी काम करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीत बोनस व सानुग्रह अनुदान न देण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. या निर्णयाला पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच बोनस व सानुग्रह अनुदान न दिल्यास अघोषित संप पुकारणार असल्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएल संचालक मंडळाचा कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, अशी मागणी आहे. दिवाळीच्या तोडांवर कर्मचाऱ्यांना अडचणीत आणू नये, अशी भूमिका संचालक मंडळानी घेतली आहे.
दरम्यान, पीएमपीएमएल बस सेवा तोट्यात आणि कर्जबाजारी असून कर्मचाऱ्यांना यंदा सानुग्रह अनुदान व बोनस देण्यात येणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर महामंडळातील कर्मचारी संघटनांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. कामगार न्यायालयाचे सभासद एस. व्ही. सूर्यवंशी यांनी पीएमपी मधील सर्व कर्मचाऱ्यांना8.33 टक्के सानुग्रह अनुदान व 12 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. मात्र, कामगार न्यायालयाच्या या निर्णयानंतरही बोनस न देण्याच्या भुमिकेवर मुंढे ठाम आहेत. कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत महापौर नितीन काळजे व स्थायी सभापती सीमा सावळे यांनी पीएमपीएमएल संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पत्र दिले आहे. त्यांनी अल्पकालावधीतील खास सभेची सुचना देवून पीएमपीएमएल संचालक मंडळाची सभा शुक्रवारी (दि. 13) सकाळी अकरा वाजता आयोजित केलेली आहे. त्यामुळे या सभेत कर्मचाऱ्यांचा बोनस व सानुग्रह अनुदान देण्याबाबत खल होणार आहे. याप्रसंगी तुकाराम मुंढे संचालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
व्हीएस न्यूज- खासगी क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक कंपन्यांकडून “सीएसआर’अंतर्गंत (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) निधी उभारून समाजोपयोगी कामे करावीत, या केंद्राच्या धोरणाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही हा निधी मिळविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी मानधनावर सल्लागार नियुक्तीस स्थायी समितीने मंगळवारी (दि.10) मान्यता दिली. त्या सल्लागाराला दरमहा 70 हजार रुपये इतके मानधन पालिका अदा करणार आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे महापालिकेत “सीएसआर’अंतर्गंत उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या महापालिकेकडे येत नाहीत. “सीएसआर’मधून निधी मिळाल्यास लोकांच्या हितांची अनेक कामे शहरात साकारता येतील. हा पालिकेचा उद्देश असून त्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांना आकर्षित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. म्हणून, “सीएसआर’ निधी मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे.
याकरिता सल्लागार नेमण्यासाठी महापालिकेने पात्रता निश्चित करून इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार आलेल्या अर्जापैकी पात्र उमेदवारांची मुलाखत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत घेण्यात आली. त्यातून चार जणांची निवड करण्यात आली होती. या चौघांची अंतिम मुलाखत पुन्हा घेण्यात आली. या मुलाखतीत चौघांमधून विजय वावरे यांची सीएसआर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. वावरे यांना सीएसआर सल्लागार म्हणून नेमण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मान्यता दिली. त्यांना प्रतिमहा 70 हजार रुपये मानधना मिळणार असून त्यांची सहा महिन्यांसाठी नेमणूक केली आहे. या सल्लागाराला शहरातील “सीएसआर’अंतर्गंत मदत करणाऱ्या कंपन्यांचे सर्वेक्षण करावे लागेल. तीन महिन्यात या कंपन्यांची माहिती व मदतीबाबतचा अहवाल सल्लागाराला द्यावा लागेल. तसेच प्रत्येक महिन्यात विशिष्ट निधी विविध कामांसाठी “सीएसआर’अंतर्गंत उपलब्ध करून देणे ही सल्लागाराची जबाबदारी राहणार आहे. असे नियुक्तींच्या अर्टी व शर्तीत नमूद आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग आठ मधील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी पालिका आयुक्ता श्रावण हर्डीकर यांच्याकडे एक निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
वाबळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने एमआयडीसी जे ब्लॉक आरक्षण क्रमांक 45वर अंदाजे 15 एकर जमीनीवर उभारण्यात येत असलेल्या बालनगरीचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच इंद्रायणीनगर पेठ क्रमांक 2 मध्ये मनपा दवाखान्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची ही मागणी केली आहे.
याशिवाय प्रलंबित पडलेल्या विकासकामांमध्ये इंद्रायणीनगर येथील जलतरण तलाव, भाजी मंडई, क्रीडांगण, ग्रंथालय व संगीत विद्यालये, रस्ते डांबरीकरण, स्थापत्यविषयक कामे, झोपडपट्टी निर्मुलन विभागाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यापैकी बहुतेक कामांना मंजूरी मिळाली असून वेगवेगळ्या टप्प्यांवर ही कामे प्रलंबित आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्यावेत असे या निवेदनात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेत भाजप गटनेता असूनही पक्षात शून्य किंमत असलेल्या एकनाथ पवार यांनी शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावर टीका करून पक्षात स्वतःचे थोडे तरी अस्तित्व निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून हे म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसलेल्या काजव्याने सूर्याला प्रकाश दाखविण्याचा हास्यास्पद प्रकार असल्याचा घणाघाती टोला पिंपरी चिंचवड शहर शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वतीने मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकासत्र सुरू आहे. नुकतेच महापालिका गटनेते एकनाथ पवार यांनीही बारणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, ज्यावेळी एकनाथ पवार हे भाजपचे शहराध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या 2012 च्या निवडणुकीत मोजून 4 नगरसेवकही त्यांना निवडून आणता आले नाहीत. जे 3 नगरसेवक निवडून आले होते ते देखील स्वकर्तुत्वावर निवडून आले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. आमदार महेश लांडगेंच्या पुण्याईवर ते किमान नगरसेवक म्हणून निवडून आले.
गटनेते पद असूनही पक्षात त्यांना कोणीच विचारत नसल्यामुळे उद्विग्न झालेल्या पवार यांनी राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या आमदारांच्या तुलनेत शहर भाजपात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी खासदार बारणे यांच्यावर टीका करण्याचा पोरकटपणा सुरू केला असल्याची बोचरी टीका दाखले यांनी केली आहे. यापुढे शिवसेना नेत्यांवर कोणीही टीका करण्याचा प्रयत्न केला तर पिंपरी-चिंचवड शहर शिव व्यापारी सेना त्याला रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही दाखले यांनी दिला आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील व पुणे जिल्हा परिसरातील माथाडी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. 12.33 टक्के या दराने कामगारांना बोनस देण्यासाठी पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने आठ कोटीपेंक्षा जास्त रक्कम दिली आहे. याचा पाच हजारहून अधिक माथाडी कामगारांना लाभ होणार आहे. यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्हा परिसरात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार काम करत आहेत. विविध औद्योगिक क्षेत्र, बाजारपेठा, रस्ते वाहतूक, उद्योग अशा विविध ठिकाणी कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना दिवाळी या मोठा सनानिमित्त वेळेत बोनस मिळावा, यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद मोठे प्रयत्न करत होते.
पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने माथाडी कामगारांना सन 2016-17 आर्थिक वर्षात 12.33 टक्के या दराने बोनस देण्यासाठी आठ कोटीपेंक्षा जास्त रक्कम दिली आहे. याचा पाच हजारहून अथिक माथाडी कामगारांना लाभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची तुलना करता यावर्षी मिळालेला बोनस जास्त आहे. यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, कष्टाचे काम करणाऱ्या माथाडी कामगारांची दिवाळी गोड व्हावी. त्यांना वेळेत बोनस मिळावा आणि त्यांची दिवाळी समाधानाने, आनंदी साजरी व्हावी, यासाठी मी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने कामगारांना बोनस देण्यासाठी आठ कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. यामुळे संघटनेच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे, असे सय्यद यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002