व्हीएस न्यूज – महापालिकेत भाजप गटनेता असूनही पक्षात शून्य किंमत असलेल्या एकनाथ पवार यांनी शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावर टीका करून पक्षात स्वतःचे थोडे तरी अस्तित्व निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून हे म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसलेल्या काजव्याने सूर्याला प्रकाश दाखविण्याचा हास्यास्पद प्रकार असल्याचा घणाघाती टोला पिंपरी चिंचवड शहर शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वतीने मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकासत्र सुरू आहे. नुकतेच महापालिका गटनेते एकनाथ पवार यांनीही बारणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, ज्यावेळी एकनाथ पवार हे भाजपचे शहराध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या 2012 च्या निवडणुकीत मोजून 4 नगरसेवकही त्यांना निवडून आणता आले नाहीत. जे 3 नगरसेवक निवडून आले होते ते देखील स्वकर्तुत्वावर निवडून आले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. आमदार महेश लांडगेंच्या पुण्याईवर ते किमान नगरसेवक म्हणून निवडून आले.
गटनेते पद असूनही पक्षात त्यांना कोणीच विचारत नसल्यामुळे उद्विग्न झालेल्या पवार यांनी राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या आमदारांच्या तुलनेत शहर भाजपात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी खासदार बारणे यांच्यावर टीका करण्याचा पोरकटपणा सुरू केला असल्याची बोचरी टीका दाखले यांनी केली आहे. यापुढे शिवसेना नेत्यांवर कोणीही टीका करण्याचा प्रयत्न केला तर पिंपरी-चिंचवड शहर शिव व्यापारी सेना त्याला रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही दाखले यांनी दिला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002