व्हीएस न्यूज- खासगी क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक कंपन्यांकडून “सीएसआर’अंतर्गंत (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) निधी उभारून समाजोपयोगी कामे करावीत, या केंद्राच्या धोरणाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही हा निधी मिळविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी मानधनावर सल्लागार नियुक्तीस स्थायी समितीने मंगळवारी (दि.10) मान्यता दिली. त्या सल्लागाराला दरमहा 70 हजार रुपये इतके मानधन पालिका अदा करणार आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे महापालिकेत “सीएसआर’अंतर्गंत उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या महापालिकेकडे येत नाहीत. “सीएसआर’मधून निधी मिळाल्यास लोकांच्या हितांची अनेक कामे शहरात साकारता येतील. हा पालिकेचा उद्देश असून त्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांना आकर्षित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. म्हणून, “सीएसआर’ निधी मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे.
याकरिता सल्लागार नेमण्यासाठी महापालिकेने पात्रता निश्चित करून इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार आलेल्या अर्जापैकी पात्र उमेदवारांची मुलाखत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत घेण्यात आली. त्यातून चार जणांची निवड करण्यात आली होती. या चौघांची अंतिम मुलाखत पुन्हा घेण्यात आली. या मुलाखतीत चौघांमधून विजय वावरे यांची सीएसआर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. वावरे यांना सीएसआर सल्लागार म्हणून नेमण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मान्यता दिली. त्यांना प्रतिमहा 70 हजार रुपये मानधना मिळणार असून त्यांची सहा महिन्यांसाठी नेमणूक केली आहे. या सल्लागाराला शहरातील “सीएसआर’अंतर्गंत मदत करणाऱ्या कंपन्यांचे सर्वेक्षण करावे लागेल. तीन महिन्यात या कंपन्यांची माहिती व मदतीबाबतचा अहवाल सल्लागाराला द्यावा लागेल. तसेच प्रत्येक महिन्यात विशिष्ट निधी विविध कामांसाठी “सीएसआर’अंतर्गंत उपलब्ध करून देणे ही सल्लागाराची जबाबदारी राहणार आहे. असे नियुक्तींच्या अर्टी व शर्तीत नमूद आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002