व्हिएस न्यूज - येथील ओटास्कीममध्ये बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी 15 ते 17 जणांच्या टोळक्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत थोरात (वय 25, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज डंके, हैदर शेख, संदीप खैरनार, शमीम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यासह इतर दहा ते बारा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्कीमधील जिवलग सोसायटीसमोर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास 15 ते 17 जणांचे टोळके आले. हातात तलवारी, कोयता घेऊन या टोळक्याने थोरात याला शिवीगाळ केली. तसेच, मारहाणा करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सूर्यवंशी तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - भरधाव वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधान येथील ओंकार ब्रीजजवळ घडली.
निखील बबन आनेराव (वय 25, रा. गणपतीमंदिरा शेजारी, बालेवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील निखील आनेराव (वय 50) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधानच्या ओंकार ब्रीजजवळ निखीलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जमखी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
फौजदार एम. के. आबनावे तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - ‘आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने दिव्यांगास कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजता दिव्यांगास कृत्रिम अवयवयाचा आधार देण्यात आला.
जुनी सांगवी येथील प्रविण जाधव या तरूणास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. तसेच प्रविण यास संजय गांधी योजने अंतर्गत शासनाची पेंशन सुरू करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा दिव्यांगांचे हात-पाय याचे मोजमाप घेऊन कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात येणार आहे. कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस मदतीची आवश्यकता असेल तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार जगताप म्हणाले, सामान्य जीवन जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव हवेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात, पाय यासारखे महत्त्वपूर्ण अवयव गमवावे लागतात. मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर अख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. दिव्यांग व्यक्ती शरीराने अधू असल्या तरी त्या मनाने कुठेही खचलेल्या दिसत नसतात. समाजातील अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप ट्रस्ट समाजातील पिडितांना मोफत मदत करत आहे. यावेळी शहर प्रवक्ते अमोल थोरात, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास पाटिल, प्रमोद ताम्हणकर, अदिती निकम, आकाश वाघमारे आदि उपस्थित होते.
निगडीतील एकाच कुटूंबातील ५ जण ठार
व्हीएस न्यूज - पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. हे सर्वजण पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील एकाच कुटूंबातील रहिवासी आहेत.
सोलापूरहून पिंपरीला येत असलेली स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच. २० एजी ०९३९) या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे ही गाडी उलटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीने या स्कॉर्पिओला उडवले. या भीषण अपघातामुळे ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांना भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे असेही समजते आहे.
प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७), सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८), संदीप प्रकाश गायकवाड (वय ४०), शितल संदीप गायकवाड (वय ३२), आभिराज संदीप गायकवाड (वय ५) असे मृतांची नावे असून हे सगळे जण नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी येथील रहिवासी होते.
व्हीएस न्यूज - यंदा चांगले पाऊसमान होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता आणखी एक सांगावा आला आहे. मान्सून अंदमानमध्ये २३ मेपर्यंत, तर केरळ किनारपट्टीवर २९ मे रोजी धडकणार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात दोन दिवस आधी ५ जूनपर्यंत दाखल होण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्कायमेट संस्थेने मान्सून २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर, शुक्रवारी हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून दाखल होत असल्याचे जाहीर केले. मान्सून दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये मान्सूनचे २० मे रोजी होते. या वर्षी २३ मेपर्यंत मात्र अंदमान व दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागर या भागांत मान्सून
दाखल होईल. त्यानंतर, अपेक्षित स्थिती कायम राहिल्यास पुढील सहा दिवसांमध्ये केरळच्या किनारपट्टीवर सरी बरसतील. त्यानंतर, महाराष्ट्रात सुखसरींचा वर्षाव सुरू होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
केरळात साधारणपणे १ जून आणि महाराष्ट्रात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. यंदा केरळात २९ मे रोजी दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातही दोन दिवस आधी येऊ शकतो,असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
व्हिएस न्यूज - स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या चिंचवडगावातील 'स्पा ग्लो' या सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखेने छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. स्पा मालकाला गजाआड केले.
अविनाश देवीदास जोगदंड असे अटक केलेल्या मसाज चालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचडगावातील स. नं. 799/6 येथील गावडे बिल्डींगमध्ये आरोपी जोगदंड हा 'स्पा ग्लो' नावाने मसाज सेंटर चालवत होता. या पार्लरमध्ये ठेवलेल्या थेरपीस्ट मुलींकडून आरोपी जोगदंड वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. याची खात्री करून पोलीसांनी शुक्रवारी मसाज सेंटरवर छापा टाकला. छाप्यात एक नेपाळी व दोन पुणे शहरातील अशा तीन मुलींची सुटका केली. तसेच मसाज सेंटरमधून 5500 रूपयांची रोकड, 2 मोबाईल, लिव्ह ऍड लायसन्स करारनामा, बॅकेचे धनादेश आदी साहित्य जप्त केले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रमोद म्हेत्रे, नितीन तरटे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन लोंढे, कविता नलावडे, ननिता येळे, सुप्रिया शेवाळे, रूपाली चांदगुडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदींच्या पथकाने केली.
व्हिएस न्यूज - निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ, प्रचंड घाणिचे साम्राज्य अशा इतर अनेक कारणास्तव खडकी येथिल सागर बेकरीस खडकी कॅंन्टोन्मेंट बोर्डाच्या वतिने बुधवारी नोटीस बजावण्यात आली. वैद्यकीय अधिकारी कर्नल कुशवाह व कॅंन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरिक्षक कलावंत पवार, मुकादम नासिर व त्यांच्या पथकाने बुधवारी महात्मा गांधी रोड येथिल सागर बेकरीची पुनश्च पाहणी केली असता बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व घाणीचे साम्राज्य आढळुण आले. या व्यतिरीक्त उंदीर घुशींचा वावर ही निदर्शनास आला. कामगार ही अस्वच्छ स्वरुपात कामे करताना आढळुण आले. बेकरीतील माल व वस्तुंवर माल बनविलेली तारीखेचा उल्लेख ही निदर्शनास आले नाही. अशा प्रकारे बेकरी मालकाकडुन आवश्यक त्यासर्व नियमांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जात असल्याने कॅंन्टोन्मेंटच्या वतिने बेकरीचे मालक अब्दुल सलाम अन्सारी यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली.
यावेळी निकृष्ठ दर्ज्याच्या खाद्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. सात दिवसात बेकरीत आढळुण आलेल्या अस्वच्छता घाण तसेच इतर त्रुटीबाबत कायदे व नियमांचे पालन न केल्यास बोर्ड प्रशासनाच्या कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बोर्ड प्रशासनाने या नोटीसी अंतर्गत बेकरी मालक अन्सारी यांना देण्यात आला आहे. बेकरी मालक अन्सारी यांना यापुर्वी ऑक्टोबर 2016 व दि. 28 नोव्हेंबर 2017 रोजी याप्रकरणी दोनदा नोटीस बजावण्यात आली होती.
व्हिएस न्यूज - एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर 30 वर्षीय युवकाने भर दिवसा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडला. याप्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
गोविंद भगवान अडसूळ (वय-30, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडसूळ याने सोमवारी 8 वर्षीय पीडित मुलीला धमकी देऊन बोलावले. तिच्यावर बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजली तेंव्हा घरच्यांनी तात्काळ पिंपरी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
महिला फौजदार रत्ना सावंत अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुक्सानाला वाईट अनुभव आला आहे. तिच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना पत्नी व दोन मुलांना एकटे सोडून पतीने पळ काढला आहे. सध्या रुक्साना वायसीएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून मुलगा अरमान आणि मुलगी अंजूमला शिवाजीनगरच्या अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली आहे.
वैजापुर (औरंगाबाद) मधील रुक्सानाची सिध्दार्थनगरच्या (उत्तरप्रदेश) चा असलेला सलीम शेख यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचे रुपातंर प्रेमात झाले. त्या दोघांनी लग्नही केले. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकून सलीम व रुक्साना मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत होते. त्यावरच तब्बल दहा ते बारा वर्षे संसाराचा गाडा दोघेही हाकत होते. त्या दोघांच्या सुखी संसारात अरमान, अंजूम अशी एक मुलगा व मुलगीही त्यांना झाली. त्या मुलांना घेवून गावोगावी भटकत ते उदरनिर्वाह करीत होते.
मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत ते दोघे पुण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीत वास्तव्य करु लागले. दररोज सकाळी लवकर उठून शहरातील चौकाचौकात मदारीच्या करमणुकीचे खेळ करुन नागरिकांकडून मिळणा-या तुंटपुज्या पैशावर चैाघांच्या पोटांची भूक भागवित होते. चौघे अगदी आनंदात राहत होते. मात्र, त्यांच्या सुखी संसारात अचानक विरजन पडले होते. रुक्साना सतत आजारी पडू लागली. सलीमकडे तिच्यावर उपचार करण्याइतपत पैसे उपलब्ध नव्हते.
त्यामुळे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मती रुग्णालय (वायसीएम) सलीमने रुक्सानाला उपचारासाठी २८ एप्रिलला दाखल केले. तेव्हा तिला कॅन्सर झाल्याचे सलीमला समजताच, त्याने रुक्सानासह दोन्ही मुलांना सोडून पळ काढला आहे. तो अद्याप रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. सध्या रुक्साना वायसीएमच्या आयसीयू दोनमध्ये मरण यातना भोगत आहे. तर रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेकडून रुक्सानाची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, रुक्साना व सलीम या दांपत्यला अरमान (वय ७) तर अंजुम (वय ५) एक मुलगा व एक मुलगी आहे. त्या दोघांनाही पुण्याच्या महिला व बालकल्याण समितीकडे अर्ज करुन अनाथ आश्रमात ठेवण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - प्रेयसी बोलत नाही म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पिंपरी चिंचवडच्या भोसरी मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शाहरुख शेख (२२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून अल्पवयीन मुलगी आणि शाहरुख शेख यांच्यात प्रेम संबंध होते. शाहरुख त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीला जबरदस्तीने लॉजवर घेऊन गेला व तिथे जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा तो तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करत होता.
परंतु अल्पवयीन मुलीला हे मान्य नव्हते म्हणून तिने प्रियकराचा फोन उचलला नाही, त्याच्याशी बोलणे टाळले. शाहरुख तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता. पण ती मुलगी शाहरुखबरोबर बोलायला टाळाटाळ करत होती. याचा राग मनात धरून शाहरुख मंगळवारी रात्री तिच्या घरी गेला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यावेळी घरात आई-वडील होते परंतु शाहरुखच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रकरणी आरोपी शाहरुखला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
व्हीएस न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा वर्षांपासून बंगाली युवती सोबत एकाच खोलीत एकत्र राहून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक करून शिवीगाळ व दमदाटी करून पीडित महिलेस एकटी सोडून फरार झालेल्या आरोपीला चाकण पोलिसांनी बारामतीहून अटक केली असून न्यायालयाने आरोपीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात अली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवार दि. १ मार्च २०१८ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली. सन २००७ ते दि. ४ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपी अमोल सिद्दप्पा परिट ( वय ३२, रा. महाळुंगे इंगळे, मूळ रा. निंबर्गी, ता.दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ) हा १ मार्चला गुन्हा दाखल झाल्यापासून मुळगावाहूनही फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस नाईक वीरसेन गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बारामतीहून ताब्यात घेतले व अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, सन २००६ मध्ये आरोपी अमोल परीट व फिर्यादी महिलेची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सन २००७ मध्ये आरोपीने पीडित युवतीस ‘आपण दोघे लग्न करून चाकण येथे कंपनीत काम करून एकत्र राहू’ असे म्हणून लग्न करण्याचे अमिष दाखवून महाळुंगे येथे खोली भाड्याने घेऊन एकत्र राहू लागले. सदर कालावधीत आरोपीने पीडित युवतीवर शरीर संबंध ठेवले व पीडितेस लग्न करतो, असे सांगून युवतीची फसवणूक केली. दहा वर्षे एकत्र राहूनही पीडितेने त्यास लग्नाबाबत विचारल्यावर आरोपीने पीडितेस वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. व दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी पीडितेस सोडून त्याचे मूळगावी निघून गेला. पीडितेने वेळोवेळी फोन केले असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०१८ भादंवि कलम ३७६, ४१६, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप हे पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात त्यांनी २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांनी हे दोषारोपपत्र चार गाड्यांमधून आणले असून, ते अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. याबाबत सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घोटाळ्या प्रकरणी फायनान्स विभाग प्रमुख विनयकुमार बडगंडी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गेले काही दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडून डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील आरोपपत्राची तयारी सुरु होती. अखेर पूर्ण छाननी केल्यावर आज(दि. १७ मे) त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002