व्हीएस न्युज - व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या पिंपरी-चिंचवड मधील आणखी एका अपहृताची सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्हॉट्सअॅपचा अतिसंवेदनशील गुन्ह्यामधील व्हायरलपणा दुसऱ्यांदा पोलिसांच्या बाजूचा ठरला आहे.
माही अवध जैन (वय 12) असे सुखरूप सुटका झालेल्या मुलीचे नाव आहे. तर पोलिसांनी नितीन सत्यवान गजरमल (वय २५, देवगाव, ता. परंडा, जी. उसमनाबाद, सध्या रा. नेरे) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय २१, रा. थेरगाव, वाकड) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माही चिंचवडमधील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये राहते. त्यांचा परिवार मूळ जयपूर मधील आहे. ते आधी निगडी येथे राहायचे. मागील तीन वर्षांपूर्वी जैन परिवार चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीत राहायला आले. तिचे वडील आयटी क्षेत्रात तर आई बँकेत काम करतात.
माही नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजता शाळेतून घरी आली. शाळेच्या स्कूलबस मधून सोसायटीच्या गेटवर उतरली. त्यानंतर पेन आणण्यासाठी ती सोसायटी जवळ असलेल्या माय मार्ट या दुकानात गेली. तिथे कार मध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. माहीने आरडाओरडा केला. हा आरडा ओरडा पाहून दुकानदार बाहेर आला. तोपर्यंत कार सुसाट गेली. दुकानदाराने मोपेड दुचाकीवरून कारचा पाठलाग केला परंतु थोडे अंतर गेल्यानंतर कार गायब झाली.
दुकानदाराने याबाबत माहीच्या घरी कळवले. घरचे बाहेर आले. त्यांनी पोलिसांना कळवले. आणि संपूर्ण पोलीस प्रशासन माहीच्या शोधासाठी अलर्ट झाले. मात्र, त्यापुर्वीच तिच्या अपहरणाची मॅसेज व्हॉट्सअॅपवर निम्म्या शहरात व्हायरल झालेला होता. अखेरकार पोलिसांना आव्हान करण्याची वेळ आली. अशा संवेदनशील गुन्ह्यामध्ये योग्य खबरदारी घेतली गेली नाही तर अपहृताच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
यानंतर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथके, इतर पोलीस ठाण्याची पथके तपासासाठी रवाना झाली. ठीक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, शहरातील लॉज तपासले गेले. याच सोबत वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू असताना पोलिसांना एक धागा सापडला. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांना आठ वाजता बोलावले आणि पैशांची (खंडणी) मागणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेऊन अतिशय हुशारीने त्या मुलीला ज्या ठिकाणी ठेवले होते ते ठिकाण शोधून काढले. संशयित आरोपीने तो राहत असलेल्या घरात तिला ठेवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे दीडच्या सुमारास नेरे गावातुन त्या मुलीची सुखरूप सुटका केली आणि दोघांना अटक केली. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यातील एक आरोपी सिनेमा गृहात काम करतो तर दुसरा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. अधिकची माहिती पोलीस घेत आहेत.
वर्षभरापुर्वीच अशीच एक घटना घडली होती
२३ सप्टेंबर २०१७ला निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुर्णानगर भागातून लघुउद्योजकाचा ९ वर्षांचा मुलगा ओम संदीप खरात याचे ६० लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले होते. अखेरकार हा मुलगा व्हॉट्सअॅपवरील व्हायरल पोस्टमुळे अपहरणकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराईपर्यंत घेऊन जाऊन पुन्हा निगडीत आणून सोडल्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्या अक्षय काशिनाथ जामदारे (वय २१, रा. हरगुडेवस्ती, गणेशनगर, तळवडे, पुणे) व रोशन नंदकुमार शिंदे (वय २०, रा. सप्तश्रृंगी सोसायटी, गणेशनगर, तळवडे, पुणे) यांना अटक केली होती.
व्हीएस न्युज - कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी तीन विद्यार्थ्यांनी शाळेतील कॉम्प्युटर चोरल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. बुधवारी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांनी शाळेतून दोन कॉम्प्युटर चोरले होते.
पिंपरी-चिंचवडच्या यशवंत चव्हाण विद्यालयात तीन आठवड्यांपूर्वी कॉम्प्युटर चोरीची घटना घडली होती. शाळेतील दोन माजी विद्यार्थी आणि सध्या इयत्ता ९ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लॅब मधून दोन कॉम्प्युटर चोरले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता शाळेतील विद्यार्थ्याने कॉम्प्युटर चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिघी टोल नाका परिसरातून या मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना कॉम्प्युटर गेमचे वेड होते आणि यातूनच ही चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. रात्री उशिरा कुलुप तोडून या तिघांनी शाळेच्या लॅबमध्ये प्रवेश केला होता.
चोरी केल्यानंतर यातील एक कॉम्प्युटर शाळेतील माजी विद्यार्थ्याच्या घरी होता. तर दुसरा कॉम्प्युटर नववीत शिकणाऱ्या मुलाच्या घरात होता. दोन हजारात कॉम्प्युटर खरेदी केल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांच्या टीमने केली.
व्हीएस न्युज - पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस या शाळेतील एका विद्यार्थ्यायाने चित्र काढली नाहीत म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. हा अर्धांगवायूचा झटका आहे. या प्रकरणाची शाळा प्रशासनाकडे पालकांनी तक्रार केल्यावर तात्काळ शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यास निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकाच्या मारहाणीत प्रसन्न पाटील याला दुखापत झाली.
एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्यांने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यानी प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर, पोटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा देखील झाला.
एवढा प्रकार घडून देखील शाळा प्रशासनाने माहिती प्रसन्नच्या घरी कळवली नाही. प्रसन्नला दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी घेऊन गेल्यावर पालकांना सविस्तर प्रकार समजला. त्यानंतर त्याला तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आज प्रसन्नच्या पालकांनी मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर संदीप गाडे याला तात्काळ निलंबित केले असून या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
व्हीएस न्युज - दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून ४ लाख रुपये किंमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आकाश राजाभाऊ शिंदे (वय-१९), अक्षय अनिल लोमटे (वय-१९, दोघे रा. खराबवाडी, चाकण) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत वाहनचोर आकाश शिंदे हा चाकण बाजारपेठ येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन उगले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सचिनला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ असणारी दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्याला अटक करून तपास केला असता त्याने साथीदार अक्षयच्या मदतीने वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
अक्षयला ताब्यात घेतले असता दोघांकडून चाकण पोलीस ठाण्यातील तीन, निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजू केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, आशिष बोटके, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
व्हीएस न्युज - हिंजवडी मधील एका २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीला एकतर्फी प्रेमप्रकरणातून गोळ्या घालण्याची धमकी तरुणाने दिली आहे. आरोपी तरुण देखील संगणक अभियंता असून ते एकाच कंपनीत काम करत होते. याप्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.
जितेंद्र सोलंकी (सध्या रा. शोनेष्ट टॉवर सोसायटी, वाकड, मूळ रा.जोधपूर राजस्थान) असे संगणक अभियंता आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर धमकावणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र सोलंकी हा २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. ते दोघेही हिंजवडी मधील कॉग्निझन्ट या कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांची एका प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली. त्या दरम्यान त्यांची मैत्री झाली. मात्र त्यापुढे जाण्यास तरुणीचा विरोध होता. परंतु जितेंद्र हा तरुणीला वारंवार त्रास देत होता.
तरुणीने यासंबंधी कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर देखील जितेंद्र हा तरुणीला त्रास देत होता. त्याने तरुणीला प्रेम असल्याचे सांगितले. परंतु संबंधित तरुणीने त्याला नकार दिला. याचा राग जितेंद्रला अनावर झाला आणि फोनवरून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यानंतर स्वतःच जितेंद्रने कंपनी सोडली. परंतु, तरुणीला फोन आणि व्हाट्सऍपवर धमक्याचे मेसेज येत असल्याने तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज - स्वारगेट-पिंपरी या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम शहरात सुरू आहे. दापोडी ते पिंपरी ग्रेड सेपरेटरमधील एक्स्प्रेस लेनवरील खराळवाडी ते वल्लभनगर येथील मेट्रोचे सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूने बंद असलेली एक लेन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टळणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोच्या वतीने काम वेगाने सुरू आहे. दापोडीच्या हॅरिस पूल ते मोरवाडीतील मदर तेरेसा उड्डाण पूल या मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. खराळवाडीतून कामास सुरुवात झाली होती. वर्षापासून हे काम सुरू होते. खराळवाडी, एचए कंपनी, हाफकिन इन्स्टिट्यूट मार्गासह वल्लभनगर एसटी आगारापर्यंत सेगमेंटचे काम पूर्णत्वास येत आहे. सुमारे दीड किलोमीटर काम आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरच्या एक्स्प्रेस मार्गावरील दोन्ही बाजूने बंद केलेली प्रत्येकी एक लेन वाहतुकीस खुली केली जाणार आहे. त्यासाठी सर्व खांबावर दक्षतेच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. काँक्रिटीकरणाचेही काम सुरू आहे.
मेट्रो स्टेशनचे काम सुरू
वल्लभनगर एसटी आगारासमोर संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. स्टेशनचे खांब वगळून गर्डर लाँचर पुढील खांबांवर बसविला जाणार आहे. त्यासाठी प्रथम दोन खांबांवर क्रेनने सेगमेंटची जुळवणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी गर्डर लाँचर बसविला जाणार आहे. या लाँचरद्वारे नाशिक फाटा चौकापर्यंत सेगमेंटची जुळवणीचे काम केले जाणार आहे. शंकरवाडीतील पेट्रोल पंपाच्या येथून मेट्रो मार्गिका वळण घेऊन भारतरत्न जे. आर. डी़ टाटा उड्डाणपुलाच्या दिशेने जाणार आहे.
व्हिएस न्युज - चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून आगरी समाजाच्या भावना दुखावल्यानंतर भाऊ कदम यांनी सबंध आगरी समाजाची माफी मागितली आहे. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती.आगरी समाजाच्या शिष्टमंडळाने भाऊ कदम यांची भेट घेतली, तेव्हा भाऊ कदम यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला.तसेच कार्यक्रम यादीतून हे दोन एपिसोड वगळण्यात आल्याची माहितीही भाऊने दिली आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात आगरी समाजाच्या बांधवाच्या भावना दुखावणारे संवाद करण्यात आले होते. यावर आगरी समाजाच्यावतीने आक्षेप नोंदविण्यात आला होता. आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सात दिवसांत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा या संघटनेने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना दिला आहे.
तसेच, झी वाहिनीचे कोणतेच चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा पवित्रा आगरी समाजाने घेतला होता, यानंतर, चला हवा येऊ द्या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत असलेल्या भाऊ कदम याने माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेही भाऊने यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच, ५ व ६ नोव्हेंबर रोजीचा कार्यक्रम यादीतून वगळण्यात आला असल्याची माहिती भाऊनी यावेळी देत वादावर पडदा टाकला आहे.
व्हीएस न्युज - डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि यात लहान भावाचे लग्न अशा परिस्थितीत सापडलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना वाकड येथे घडली. पोलिसांनी चार दिवसांमध्ये दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी मुलाच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मुलाला आईकडे सोपवताच त्या मातेला रडू आवरता आले नाही.
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या शाहरुख मिराज खान (वय २६) या तरुणाचे झम झम केटरर्स आणि बिर्याणी हाऊस आहे. शाहरुखच्या दुकानाच्या बाजूला एका महिलेचे ब्यूटी पार्लरचे दुकान आहे. या महिलेला पाच वर्षांचा मुलगा असून सुफियान असे त्याचे नाव आहे. सुफियानही आईसोबत ब्यूटी पुार्लरमध्ये येत असल्याने त्याची शाहरुखशी ओळख झाली होती. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुफियान त्याच्या आईवडिलांसह राहत होता. सुफियानच्या आईने वेळोवेळी शाहरुखला आर्थिक मदत केली होती. पण आता मदत करणार नाही, असे तिने शाहरुखला सांगितले होते. शाहरुखच्या लहान भावाचे लग्न ठरले होते.
आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात लहान भावाच्या लग्नासाठी पैशांची गरज अशा संकटात शाहरुख सापडला होता. यातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने सुफियानच्या अपहरणाचा कट रचला. त्याने मुंबईतून मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२) या मित्राला बोलावून घेतले. रविवारी दुपारी सुफियान हा कुणाल सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत होता.
यादरम्यान शाहरुख दुचाकीवरुन तिथे पोहोचला. त्याने सुफियानला सोबत यायला सांगितले. शाहरुख ओळखीचा असल्याने सुफियान त्याच्यासोबत फिरायला गेला. तर मोहम्मद हा दुकानात थांबला होता. सुफियानचे आई- वडील काय करतात यावर लक्ष ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. दोन दिवसांनी शाहरुखने सुफियानच्या आईला फोन करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. ७ नोव्हेंबर रोजी पैसे घेऊन चिंचवडमधील बस स्थानकात या, असे त्याने सुफियानच्या आईला सांगितले होते. यानुसार पोलिसांनी सापळा रचून शाहरुखला अटक केली.
वाकडमधील नऊ पोलीस अधिकारी आणि जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी सुफियानची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी अथक मेहनत घेतली. या कामगिरीसाठी खान कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
व्हीएस न्युज - वाकड येथील चौधरी पार्क येथे स्वराज्य रक्षक छञपती संभाजी राजे प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या नामफलकाचे रिबीन कापून आणि श्रीफळ फोडून नगरसेवक मयुर कलाटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बुधवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या उद्घाटन प्रसंगी बश्वराज रेडडी ,संदिप माने, शेळके, भरगुडे,रामभाऊ , सैंदाणे ,शेडगे , आदि मान्यवर उपस्थित होते. यायावे मोठ्याप्रमाणात महिला, पुरूष आणि तरुण मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजीक कार्यक्रते बि. जी. सुर्यवंशी व प्रेरणा शाळेचे शिक्षक पुरूषोतम पाटील ,प्रकाश कांबळे यांनी केले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचा मुळ उद्धेश बि.जी.सुर्यवंशी यांनी सांगितला ते म्हणाले कि,"छत्रपती शिवाजी राजे , छत्रपती संभाजी राजे, लोकराजे शाहुमहाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले ,भारतीय राज्यघटनेचे निर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा खरा इतिहास भारतीय जनतेसोर मांडणे आणि येणा-या पिढीमध्ये महामानवांचे देशभक्तीपर विचार रुजावेत आणि जाती धर्माच्या पलिकडे जावुन राष्ट्रभक्ती वाढावी, ज्यामुळे भारतीय जनतेत प्रेम व एकोपा राहील व देश प्रगतीपथावर जाईल या उद्धेशाने या प्रतिषठानची स्थापना करण्यात आली आहे."
कार्यक्रमाच्या आयोजकांना शुभेच्छा देत व आभार व्यक्त करत मयुर कलाटे म्हणाले कि" डाँ आबेडकरांनी जगातील सर्वोत्क्रुष्ट लोकशाही लिहुन देशावर फार मोठे उपकार केले आहेत.तेव्हा मुलानी महापुरूषांचे विचार आत्मसात करावे." "जगावे शिवबांसारखे आणि मरावे तर संभाजीराज्यांन सारखे" असेही यावेळी ते म्हणाले.
व्हीएस न्युज - बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपाजवळील एका लाकडाच्या वखारीला पहाटे ५ वाजता भीषण आग लागली असून त्यात संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. वखारीत लाकडाच्या फळ्या एकावर एक रचून ठेवल्या असल्याने त्यावर पाणी मारुन आग विझवली तरी काही वेळाने खालच्या फळ्यामध्ये आग धुमसत असल्याने ती पुन्हा पेट घेत आहे. त्यामुळे आता संपूर्ण वखारीतील लाकडे जे सीबीच्या सहाय्याने बाजूला करुन आग विझविण्याचे काम सुरु असून ते आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे.
भाऊ महाराज रोडवर ही वखार असून तिला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. लाकडे असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला व आग वेगाने भडकत गेली. आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाचे ४ बंब व २ टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शटर बंद होते. तेव्हा शटरला दोरी बांधून गाडीच्या सहाय्याने त्यांनी ते शटर तोडली व चारही बाजूने पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.
वखारीच्या स्लॅबवर लाकडाच्या फळ्या ठेवल्या आहेत. त्यांचे वजन व त्यावर पाणी मारल्याने त्याचे वजन वाढल्याने स्लॅब वाकला आहे. वखारीमध्ये सर्वत्र फळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे बांबु असल्याने आग चांगलीच भडकली होती. सतत पाणी मारुन अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.
बांबु बाहेर काढून आग विझविली. मात्र, फळ्या एकावर एक रचून ठेवल्याने त्याची आग पूर्णपणे विझली जात नव्हती. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडली व त्यामुळे जागा मिळल्यावर या फळ्या बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे. जवळपास तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली असून आता तेथील जागा थंड करण्याचे काम सुरु आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी पुणे शहरात १७ किरकोळ आगी लागल्या होत्या.
व्हिएस न्युज - मीत्र-मैत्रीणीमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती केल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर धारदार कोयत्याने वार केले तर इतर दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.३१) सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटीजवळ घडली.
मुवाज शफीक मुजावर (वय १८, रा. बिल्डींग नं.२, रुम नं.५१५, विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) असे डोक्यात कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचे मित्र अयान सय्यद (वय १८) आणि प्रकाश गाडवे (वय २०) या दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विरेंद्र (वय २०, अजमेरा, पिंपरी), सोहेल इनामदार (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी), फैज इनामदार (वय २०, रा. नेहरुनगर, पिंपरी), नॉडी (वय २०, अजमेरा, पिंपरी) आणि इतर तीन-चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुवाज आणि आरोपी विरेंद्र हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटीजवळ विरेंद्र आणि त्याच्या मैत्रीणीमध्ये वाद सुरु होता. यावेळी मुवाज, अयान आणि प्रकाश तेथे उपस्थित होता. त्यांनी मध्यस्ती करुन विरेंद्र आणि त्याच्या मैत्रीणीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटवण्यास मध्यस्ती केल्याचा राग विरेंद्र याला आला आणि त्याने आणि त्याचे साथीदार सोहेल, फैज, नॉडी आणि इतर तीन ते चार अनोळखी इसमांनी मिळून मुवाज याच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याचे मित्र अयान आणि प्रकाश यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - येथील लंडन ब्रिजजवळील वॉशिंग सेंटरच्या मोकळ्या आवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांना अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (दि. 31) रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई केली.
अरविंद रामनरेश कुस्वाहा (वय 29, रा. उत्तमनगर, रावेत), जालिंदर मच्छिन्द्र शिवशरने (वय 34) राजेश धनसार दाहिरे (वय 25, दोघे रा. कोयतेवस्ती, पुनावळे), राकेश राजू पल्ले (वय 23, रा. भोईरनगर, चिंचवड ), बीमलेश रामनरेश कुस्वाह (वय 19, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. तर जुगारअड्डा चालवणारा शंकर मिसाळ (रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड ) हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील लंडन ब्रिजजवळील वॉशिंग सेंटरच्या मोकळ्या आवारात जुगार अड्डा सुरु असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता आरोपी मटका खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य आणि चार हजार 500 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002