व्हिएस न्युज - मीत्र-मैत्रीणीमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती केल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर धारदार कोयत्याने वार केले तर इतर दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.३१) सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटीजवळ घडली.
मुवाज शफीक मुजावर (वय १८, रा. बिल्डींग नं.२, रुम नं.५१५, विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) असे डोक्यात कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचे मित्र अयान सय्यद (वय १८) आणि प्रकाश गाडवे (वय २०) या दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विरेंद्र (वय २०, अजमेरा, पिंपरी), सोहेल इनामदार (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी), फैज इनामदार (वय २०, रा. नेहरुनगर, पिंपरी), नॉडी (वय २०, अजमेरा, पिंपरी) आणि इतर तीन-चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुवाज आणि आरोपी विरेंद्र हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटीजवळ विरेंद्र आणि त्याच्या मैत्रीणीमध्ये वाद सुरु होता. यावेळी मुवाज, अयान आणि प्रकाश तेथे उपस्थित होता. त्यांनी मध्यस्ती करुन विरेंद्र आणि त्याच्या मैत्रीणीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटवण्यास मध्यस्ती केल्याचा राग विरेंद्र याला आला आणि त्याने आणि त्याचे साथीदार सोहेल, फैज, नॉडी आणि इतर तीन ते चार अनोळखी इसमांनी मिळून मुवाज याच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याचे मित्र अयान आणि प्रकाश यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002