व्हीएस न्युज - रस्त्याने पायी चाललेल्या एका तरुणाला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना चिंचवड वाल्हेकरवाडी येथील मार्तड मल्हार हॉटेलच्या मागील बाजुस घडली. याप्रकरणी अमोल अजित विश्वास (वय २३, रा वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल हे चिंचवड वाल्हेकरवाडी येथील मार्तड मल्हार हॉटेलच्या मागील बाजुच्या रस्त्यावरुन पायी चालले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी अमोल यांना चाकुचा धाक दाखवून धमकावले. तसेच त्याच्याजवळील ९ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल आणि काही रोख रक्कम जबरदस्ती हिसकावून चोरुन नेली. चिंचवड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज – ठाणे येथील राज्य महामार्ग पोलीस उप अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गुरुवार गृह विभागाने प्रसिध्द केला.
गृह विभागाने एकूण १८ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्यातील विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. यामध्ये अपर पोलीस अधिक्षक, उप अधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त, विभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले श्रीकांत मोहिते यांनी पूर्वी ठाणे येथे राज्य महामार्ग उप अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे. यामुळे त्यांचा वाहतूक नियोजनात तगडा अनुभव असल्याचे बोलले जात आहे.
व्हीएस न्युज - देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह तरुणाला भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृह गेटच्या समोरुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केली.
रोहन सहदेव पाषणकर (वय २३, रा. नांदे म्हाळुंगे रोड, वाघजाई रोड, सर्व्हे नं.४९/१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अवैधरित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट १ मधील पोलीस शिपाई सचिन मोरे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एका तरुण भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृह गेटच्या समोर पिस्तुल घेऊन उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन रोहनला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - नगर रस्त्यावर येथील फिनिक्स मॉलजवळ पीएमपीच्या बसला शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
संबंधित बस चिखली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पासिंग करण्यासाठी नेण्यात आली होती. पण, बसमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने ही बस पासिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाली होती. तेथून येत असताना फिनिक्स मॉलजवळ बसने पेट घेतला. ही बस वाहतुकीमध्ये नसल्याने तिच्यामध्ये फक्त चालकच होता. या आगीत बस पूर्ण जळाली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
याबाबत विमाननगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले, "ही बस सीएनजीवर चालणारी होती. नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलजवळ आली असता बसच्या पुढील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. बसचा पुढचा भाग फायबरचा असल्याने आग वाढली. आणि त्यानंतर ती संपूर्ण बसला लागली.'' बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली आणि बाहेर उडी मारली.
अग्निशामक दलाने पंधरा मिनिटात आग अटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
व्हीएस न्युज - आपली नक्कल करतो अशा गैरसमजातून एका शिक्षकाने विद्यार्थाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या या शिक्षकाविरोधात विद्यार्थ्याच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील शाळेत ही घटना घडली.
सविस्तर माहिती अशी, शंकर महादेव खोचरे (वय १४) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नूतन प्रशालेत इयत्ता ८ वीत शिक्षण घेत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थीनीला आडनावाने हाक मारली, त्यानंतर पुन्हा तशीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. यावर चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचे समजून त्याला छडीने पाठीवर वळ उठेपर्यंत शिक्षा केली, यात शंकर गंभीर जखमी झाला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर शंकरला घरीही जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. घरी आल्यानंतर शंकरने आईला घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी शंकरची आई बबिता खोचरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मारहाण करणारे शिक्षक व्यंकटेश कळसाईत यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, वर्गात विद्यार्थांचा गोंधळ सुरू होता. एका विद्यार्थिनीला मी आडनावावरून शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी माझी बोबडी वळली तेच ऐकून वर्गातील विद्यार्थी संबंधित मुलीला चिडवत होते. ते पाहून मी काही विद्यार्थांना हाताने मारले. त्यानंतर शंकर हा उद्धटपणा करीत दुसऱ्या विद्यार्थांचे नाव घेत मुलीला चिडवत होता. याविषयी मी मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली होती.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - गेल्या वर्षभरात देहूरोड परिसरातून मोबाईल फोनची जबरीचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मयुर सुनिल महाजन (वय १९, रा. त्रिवेणीनगर तळवडे) व त्याचा अल्पवयीन साथीदार आणि अविनाश प्रकाश लोखंडे (वय २०, रा. विष्णु समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी देहूरोड व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना पोलीसांनी सापळा रचून देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय ३१ रा. सध्या साई मंदीरामागे, वेणूनगर वाकड) याला त्याच्या मुळ गावातून आंबेजोगाई, जिल्हा बिड येथून पोलीसांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून विविध कंपन्यांचे एकूण १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम न पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रविण दळे, फारूक मुल्ला, मयुर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांनी केली.
व्हीएस न्युज - ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.
महेश आनंद जातेगावकर (वय ४२, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रस्ता) असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. तक्रारदार जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिपाई जातेगावकर याने तक्रारदाराकडे ८०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारादाराने तडजोडीत ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
ससून रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेताना जातेगावकरला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - यूथ आयकॉन या ग्रुपने दिघी परिसरातील विश्वशांती सामाजिक प्रतिष्ठाण संचलित ज्ञानदीप बालकाश्रमातील अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांना वही ,पेन ,पेन्सील इ. शैक्षणिक साहित्याचे तसेच खाऊचे वाटप करून व केक कापून नववर्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आले.
नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे, काय-काय धमाल करायची याचे नियोजन एक महिना पूर्वीच करण्यात येते. हॉटेल, कॅफे, पब, डिस्को आणि अशा ब-याच ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्याचे वेड आजच्या तरुणाईला आहे. पण चकाकत्या दुनियेत अनाथ बांधवांसोबत नवीन वर्ष साजरा करणारे क्वचितच मिळतात.
अनाथ मुलांच्या मनात अनाथाची भावना न राहता आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशातून अशा अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले . डॉल्बी , फटाके, हॉटेल, पार्टी आणि इतर आरास करत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा ट्रेंड सुरु असताना अनाथ मुलांसोबत नव वर्ष साजरा करणे खरचं कौतुकास्पद कामगिरी आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
यूथ आयकॉन ग्रुप चे प्रसाद माने , विकास सुर्यवंशी, सुनिल कुरंदळे, छाया सुपेकर, रामकृष्ण जोशी , शुभम पिंगळे , मुकेश वाघमारे ,अक्षय कदम, शुभम लांडगे, पुजा दामले , मनिषा आघाव , निखिल जामदार , अंजली पोटे , सिद्धांत डोळस, देवयानी यादव, ओंकार शिंदे, श्रवण पाटील आदी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांसमोर नवीन आदर्श घालून दिला आहे.
सहभागी झालेले सर्व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे , कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
व्हीएस न्युज – 31 डिसेंबर म्हणजेच न्यू इयर पार्टी करण्यासाठी आलेल्या तरुणीशी हॉटेल मालकाने आणि त्याच्या मित्रांनी असभ्य वर्तन केले. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 1) पहाटे बाराच्या सुमारास सुसगाव येथे घडली.
वैभव मधुकर प्रभाकर (वय 23, रा. औंधरोड, स्नेहल अपार्ट, खडकी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कबीला हॉटेल चा मालक चांदेरे, त्याचा मित्र पप्पू व सौरभ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत 31 डिसेंबरला रात्री पार्टी करण्यासाठी सुसगाव येथील कबीला हॉटेलमध्ये आले होते. मध्यरात्री 12 च्या सुमारास काही अनोळखी इसमांनी वैभव यांचा मित्र इमाद यांच्या मैत्रिणीला जाणीवपूर्वक धक्का मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी वैभव गेले. त्यावेळी हॉटेल मालक चांदेरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून वैभव यांना बांबूने, कमरेच्या पट्ट्याने व लोखंडी पंचने मारले. यामध्ये वैभव जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे हे भ्रष्टाचारी यंत्रणांना पाठीशी घालीत असून, या भ्रष्टाचारी यंत्रणांचे मूळ हे संजय ताकसांडे आहेत. ताकसांडे यांनी सूडबुद्धीने शिवसेना नियुक्त विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांचे ‘न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना रद्द केलेला आहे.
तो त्वरित सौंदणकर यांना परत करावा, अन्यथा महावितरणाच्या प्रशासनास काळे फासण्यात येईल, असा इशारा तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिला होता.
याची दखल घेत गुरुवार (दि. २७) रोजी महावितरणाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधिक्षक अभियंता राजेश पवार व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषनस्थळी संतोष सौंदणकर यांची भेट घेतली. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी आपल्या मागण्यांची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल व न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना परत करण्याचे आश्वासन सौंदणकर यांना दिले आहे. आश्वासनाची दखल घेत सौंदणकर यांनी उपोषण सोडले आहे.
महावितरणाने तात्काळ सौंदणकर यांना परवाना परत करावा व यामागे खरे सूत्रधार यांना उजेडात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे युवराज दाखले यांनी महावितरण प्रशासनास दिला आहे.
व्हिएस न्युज – गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. 26) घडली.
राजेंद्र मोहन पाटेकर (वय 55, रा. वैजयंती निवास, संत तुकाराम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजेंद्र ने सोपा आणि भरमसाठ पैसा कमावण्यासाठी पोलीस निरीक्षक बनण्याची शक्कल का लढवली असेल? नेमकं काय आले असेल राजेंद्र च्या मनात आणि त्याने का मारली असेल तोत्या पोलीस निरीक्षक बनून वसुली करण्याची मजल? हॉटेल व्यावसायिक का आणि कशासाठी पोलिसांना फुकट जेवण देतात?पान टपरी वाला बेकायदेशीर गुटखा विक्री तर नसेल ना? खरेखुरे पोलीस तर अश्या प्रकारे वसुली तर करत नसतील ना? अनेक प्रश्नांना वाचा फोडणारी हि घटना आहे.
नागरिकांच्या मनातला पोलिस हा कसा आहे हे या घटनेतून निदर्शनात येते आणि पोलिसांची नागरिकांच्या मनात असलेल्या छावीचा गैरफायदा घेऊन राजेंद्र तोत्या पोलीस निरीक्षक झाला? .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, पान टपरी यांना आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. हॉटेलमध्ये फुकट खाणे, किराणा दुकानदार, पान टपरी चालक व इतर व्यावसायिकांकडून पैसे उकळत होता. आरोपीवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलिस कर्मचारी दीपक खरात, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - बावधान येथे पुणॆ मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.
मृतदेहांची ओळख पटली नाही. खून झालेल्या व्यक्ति व्यक्तीचे अंदाजे वय ४५-५० वर्षे आहे. चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पँन्ट असा पोषाख आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावधान येथे पुणॆ मुंबई महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर बुधवारी सकाळी एक व्यक्ति मृत अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांकडून माहीत मिळताच पोलीस पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. खून झालेली व्यक्ति कामगार असल्याची शक्यता वार्तावलि जात आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002