व्हीएस न्युज - नगर रस्त्यावर येथील फिनिक्स मॉलजवळ पीएमपीच्या बसला शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
संबंधित बस चिखली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पासिंग करण्यासाठी नेण्यात आली होती. पण, बसमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने ही बस पासिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाली होती. तेथून येत असताना फिनिक्स मॉलजवळ बसने पेट घेतला. ही बस वाहतुकीमध्ये नसल्याने तिच्यामध्ये फक्त चालकच होता. या आगीत बस पूर्ण जळाली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
याबाबत विमाननगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले, "ही बस सीएनजीवर चालणारी होती. नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलजवळ आली असता बसच्या पुढील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. बसचा पुढचा भाग फायबरचा असल्याने आग वाढली. आणि त्यानंतर ती संपूर्ण बसला लागली.'' बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली आणि बाहेर उडी मारली.
अग्निशामक दलाने पंधरा मिनिटात आग अटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002