व्हिएस न्युज - किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण काटकर (वय 28 वर्ष) याची मंगळवारी (5 फेब्रुवारी) पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली.
नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील हे दोघेही दारूच्या नशेत होते. यावेळेस दोघांमध्ये भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले पण आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज - वाकड-पिंपळे निलख परिसरातील कावेरी चौक, सबवे ते पिंक सिटी कॉर्नर आणि काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक येथील सिमेंट काँक्रिट रोडच्या विकासकामास आज स्थायी समिती सभेत स्थायी समिती सभापती ममताताई विनायक गायकवाड यांनी मंजुरी देत हा विषय मंजूर केला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक दिवस वाकड-पिंपळे निलख परिसरातील रोड सिमेंट काँक्रिटचे होण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड पाठपुरावा करीत होते. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड म्हणाल्या की “वाकड-पिंपळे निलख मधील हे सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे मॉडेल रोडच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, वाहनांना पार्किंगसाठी पार्किंग व्यवस्था, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट, नागरिकांना व ज्येष्ठांना बसण्यासाठी आरामदायी व आकर्षक बेंचेस, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट्स, डस्टबीन, बोलार्ड बसविणे, विविध ठिकाणी फुटपाथ लागत हरितपट्टा तयार करणेत येणार आहेत, विविध सेवावाहिन्यांनसाठी डक्टची व्यवस्था असणार आहे. असे हे स्मार्ट काँक्रीट रस्ते वाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना लवकरच पाहायला व अनुभवायला मिळतील.”
आजच्या स्थायी समितीच्या सभेत या रस्त्यांच्या विषयास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी तात्काळ मंजुरी देत ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात संबंधित विभागास निर्देश दिले.
व्हीएस न्युज - पिंपरी- चिंचवड येथे मानसिक आजाराने ग्रासलेल्या तन्मय दास गुप्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या अकाली निधनाने त्याच्या आईलाही धक्का बसला… मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याने गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या तन्मय दास गुप्ता (वय ३६) याच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होते. त्याने गेल्या दोन महिन्यापासून गोळ्या घेतलेल्या नव्हत्या. सोमवारी रात्री आई शुक्ला दास गुप्ता या तन्मयला घेऊन डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास तो घरी आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतः च्या पोटच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून शुक्ला यांना हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शुक्ला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा दुसरा मुलगा बेंगळुरू येथे राहतो. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्मयने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
व्हीएस न्युज - पुण्याच्या प्रसिद्ध जहांगिर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी आलेल्या एका महिलेचा कपडे बदलताना व्हीडिओ चित्रित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लाकेश लहु उत्तेकर (वय २५)(रा. धानोरी) याला बेड्या ठोकल्या आहेत.
शनिवार रात्रीच्या सुमारास पोट दुखत असल्याने संबंधित महिला एमआरआय काढण्यासाठी रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिथल्या वॉर्डबॉयने महिलेला एका रुममध्ये कपडे बदलायला पाठवले. तेव्हा वॉर्डबॉयने तिचा व्हीडिओ चित्रित केला.
रुममध्ये कपडे बदलत असताना आपला कोणीतरी व्हीडिओ काढत असल्याचा प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात आला. तिने लगेचच ही बाब आपल्या पतीला सांगितली. पतीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच पतीने रुग्णालय प्रशासनाकडेही या घटनेची तक्रार केली. पण रुग्णालय प्रशासनाकडून याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधीत आरोपीला अटक केली आहे. तसेच कोरेगाव पार्क पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
जहांगीर रुग्णालयाचे स्पष्टीकरण
जहांगीर रुग्णालयाने एक पत्र काढून यामध्ये आरोपी लंकेश ऊतेकर हा जहांगीर रुग्णालयाचा कर्मचारी नाही. तो साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या एंजसीचा कर्मचारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. एमआरआय रुममध्ये मोबाईल बाळगण्याची परवानगी नसतानाही त्याने मोबाईल नेला होता. याप्रकरणी आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. तसेच संबंधित एजन्सीसोबत असलेला करारही रद्द करणार आहोत. जहांगीर हॉस्पिटलची 73 वर्षाची विश्वासाची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेऊ. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सर्व रुग्णांची माफी मागण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांना आम्ही संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे जहांगीर रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
व्हीएस न्युज - समाजात राहताना सामाजिक भावना असणे गरजेचे आहे याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ बडोदा च्या पिंपरी चिंचवड परिसरातील शाखांच्या कर्मचाऱ्यांनी आकुर्डी मध्ये असणाऱ्या संत बाबा मौनी साहेब वृद्ध आश्रमाला दिलेली भेट. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी आश्रमाचे काम बघितले आणि आश्रमाच्या कार्य पद्धती जाणून घेतल्या, आश्रमात राहत असलेल्या वृद्ध स्त्रिया व पुरुषांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
आश्रमाचे मुख्य संचालक व प्रसिद्ध गायक अशोक खोसला यांनी आश्रमसंबंधी माहिती सांगितली व आश्रमाच्या गरजां संबंधित माहिती दिली. बँक ऑफ बडोदाच्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी चिंचवड, पीसीएमसी, चाफेकर चौक व आकुर्डी शाखांतर्फे संत बाबा मौनी साहेब वृद्ध आनंद आश्रमाला मदत म्हणून रुपये एक लाख रकमेचा धनादेश अशोक खोसला यांच्याकडे देण्यात आला.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शाखेचे सहायक महाप्रबंधक श्री विनय कदम, पीसीएमसी शाखेचे मुख्य प्रबंधक श्री संजय बर्वे, चाफेकर चौक शाखेच्या प्रबंधक नम्रता व आकुर्डी शाखे प्रबंधक तसेच चारही शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - बावधन येथील एका बंगल्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला घातक हत्यारांसह हिंजवडी पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बावधन येथील रामनगर कॉलनीमध्ये करण्यात आली.
समीर उर्फ पप्पु बबन गुजर (वय २८, रा. मुळशी), किरण कुमार पिल्ले (वय २१), अजितेश राजाराम चव्हाण (वय १९), विनायक उर्फ सुनील राऊत (वय २६) आणि रितेश सुभाष शिंदे (वय २०, चौघे रा. पिरंगुट) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बावधन परिसरात हिंजवडी पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना बावधन येथील रामनगर कॉलनीमध्ये पाच तरुण संशयितरित्या उभे असलेले दिसले. यावेळी पोलीसांनी स्टाफसह सापळा रचून पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, स्प्रे हे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता ते रामनगर कॉलनीमधील एका बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी पप्पु गुजर याच्यावर पौड पोलीस ठाण्यातील मारहाण आणि कोल्हापूर येथील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, उपनिरीक्षक अशोक गवारी, वरुडे, वलटे, पोलीस कर्मचारी किरण पवार, प्रमोद पवार, अतिक शेख, कुणाल शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुभाष गुरव, झनकसिंग गुमलाडु, अमर राणे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - पतीने पत्नीच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवल्याने ३५ वर्षीय पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पिंपरीतील कामगारनगर येथे घडली.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी ३८ वर्षीय पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पत्नीच्या मोबाइलवर ३८ वर्षीय पती गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. अखेर याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
चार ते पाच वर्षांपासून पती पत्नीनेचे पटत नव्हते, दोघांमध्ये सतत वाद होत असत. अखेर दोघांनी वेगळ राहण्याचा निर्णय घेतला आणि पाच महिन्यांपासून ते वेगळे राहात होते. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलांचा सांभाळ पती करत असून ते नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करतात. तर पत्नी भावाकडे राहते, गेल्या काही महिन्यांपासून पती सतत पत्नीला अश्लील मेसेज करत होता. पत्नीने अनेक मेसेज डिलीट करत दुर्लक्ष केले. परंतु, मेसेजचा अतिरेक होत असल्याने अखेर पत्नीने पिंपरी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे. ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत, त्या परिसरातील महिलांना घराबाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे, त्यामुळे शहर उपनगरांतील अवैध धंद्यांना आळा घालावा. अन्यथा प्रजासत्ताक दिनानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी पोलीस आयुक्तांना शहर व उपनगरांतील अवैध धंदे बंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, डीजीपी पडलसगीकर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात रामभाऊ जाधव यांनी म्हटले आहे, की पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. पोलीस आयुक्तांनी सुरुवातीला अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे नागरीकांमधून आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही दिवसात ही कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारी आटोक्यात राहावी, अवैध धंदे चालू नयेत, हा स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीमागील उद्देश होता. मात्र, सद्यस्थितीला या उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार शहर परिसरात सुरु आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. किराणा मालाची दुकाने थाटल्याप्रमाणे जुगाराचे आणि मटक्याचे अड्डे सुरु झाले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसूलदार म्हणून नेमलेले पोलीस या अवैध धंद्यांना परवानगी देत सुटले आहेत. प्रत्येक अधिकार्याचा हिस्सा ठरविल्याचे सांगून लाखोंची वसुली चालू आहे, असा आरोपही रामभाऊ जाधव यांनी निवेदनात केला आहे.
निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात पानटपरीवाल्यांकडून शिवीगाळ व मारहाण करून वसुली करीत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. शहर परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करून नागरीकांना दिलासा द्यावा व तरुण पिढीला बिघडण्यापासून रोखावे. अवैध धंद्यांवर येत्या 25 जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनानंतर रस्त्यावर उतरून छावा संघटनेच्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करण्यात येईल. यावेळी होणार्या नुकसानीला आपण जबाबदार असाल, असेही रामभाऊ जाधव यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगितले आहे.
व्हीएस न्युज - दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र, त्यांनी कर्तव्यपालनात कसूर केल्याचे या प्रकरणात स्पष्ट दिसते. गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश पारित केले, असे ताशेरे हायकोर्टाने ओढले आहेत.
बीडमधील मुरंबी गावात राहणारे साहेबराव वाघमारे यांनी बिभीषण माने यांच्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. माने यांचे स्वस्त धान्य दुकान असून ते शिधापत्रिकाधारकांना स्वस्त माल देत नाही व हा माल काळ्या बाजारात विकतात, असा आरोप त्यांनी केला होता. अंबाजोगाईच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.
यात दुकानदार माने दोषी आढळल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतही तो दोषी आढळल्याने हे प्रकरण शेवटी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पोहोचले. बापट यांनी दुकानदार माने याला आणखी एक संधी देत परवाना बहाल केला. ही संपूर्ण घटना २०१६ सालची होती. बापट यांच्या निर्णयाविरोधात साहेबराव वाघमारे यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याचिकेत बापट यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने या याचिकेवर गुरुवारी निकाल दिला. हायकोर्टाने गिरीश बापट यांचा आदेश रद्द करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
त्यामुळे या दुकानदाराचा परवाना रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निकाल देताना हायकोर्टाने बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मंत्रीमहोदयांनी कर्तव्यात कसूर केली असून त्यांनी परवाना बहाल का केला, असा प्रश्न हायकोर्टाने विचारला.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध राज्यातुन तसेच जिल्ह्यातून नागरीक आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी वास्तव्यास आलेले आहेत. त्यात समाजातील वंचित व गोर-गरीब नागरिकांचा समावेश आहे. जे अंत्यविधीचा खर्चही भागवू शकत नाहीत. त्यांचासाठी महापालिकेने मोफत अंत्यविधीचा मागे ठराव केला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियमानुसार राज्यातील नाशिक, अहमदनगर, मुंबई तसेच कोल्हापूर या ठिकाणच्या नागरीकांच्या अंत्यविधीचा खर्च महानगरपालिकेच्या वतीने केला जातो. याच धर्तीवर नागरीकांच्या अत्यंविधीचा खर्च करण्याचा ठराव आपल्या महानगरपालिकेत मंजुर केला आहे. माञ, या ठरावाची अंमलबजावणी आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडुन केली जात नाही. त्यामुळे गोर-गरीब व सर्वसामान्य जनतेला अंत्यविधीच्या वेळी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याची आपण स्वत: गांभीर्याने दखल घेऊन, येत्या २१ दिवसांच्या आत सदरील ठराव अमलात आणण्याच्या सुचनावजा आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन, प्राथमिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेच्या गेटवर अंत्यविधीचा कार्यक्रम केला जाईल. याकामी उद्भवणाऱ्या गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील, असे या निवेदनात दाखले यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्युज - तारा मोबाईल क्रेशेस संस्थेच्या २०१९ चा वार्षिक सांस्कृतिक समारंभ सिम्बायोसिस कॉलेज, विमान नगर येथील सभागृहात रविवार (दि. ६) जानेवारी रोजी संपन्न झाला. संस्थेच्या या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे हे तिसरे पर्व आहे. दरवर्षी संस्थेच्या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संस्था वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत आली आहे.
बांधकाम साईट वरील पुणे शहरातील संस्थेच्या १५ साईटस वरील ११५ मुलांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास मुलांचे भरभरून कौतुक करण्यास प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश श्रॉफ कुशल लेबर वेल्फेअर क्रेडाई-पुणे मेट्रो चे अध्यक्ष , कमांडर रुबीक बेरी, सी. ई. ओ. कुशल, समीर पारखी, लेबर वेल्फेअर क्रेडाई यांनी उपस्थिती लावली. त्याच बरोबर योगेश भोंगळे, सदस्य लेबर वेल्फेअर समिती, तंत्रज्ञान व्यवस्थापक पल्लवी कोठारी , विपणन व्यवस्थापक विनीत मुतालिक याही मान्यवरांनी मुलांची पाठ थोपटली. मुलांचा कार्यक्रम पाहून प्रमुख पाहुणे यांनी "तारे जमीन पर उतर आये है!" असे तारा मोबाईल क्रेशेस च्या मुलांबद्दल कौतुकाचे बोल उद्गारले. समीर पारखी आणि कमांडर बेरी यांनी कार्यक्रमाच्या आखणी आणि नियोजनाबाबत कौतुक केले तसेच समीर पारखी यांनी क्रेडाई पुणे मेट्रो च्या वतीने विशेष अभिनंदन केले. संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्य अध्यक्षा मधुरा गोखले , डॉ निशा मुन्शी, शीतल पटवर्धन आणि संस्थेच्या अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्यभार सांभाळलेल्या फ्रेनी तारापोर यांनीही मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थिती लावली.
संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर आणि त्यांची एकूण ५० जणांची टीम यांचे अविरत परिश्रम आणि संस्थेने नियुक्त केलेल्या नृत्य निर्देशक प्रसाद धावडे यांचाही इथे विशेष उल्लेख आणि कौतुक होणे अपरिहार्य आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. संस्थेच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे संस्थेच्या सर्वच टीम ने स्थलांतरित होणाऱ्या या मुलांच्या मदतीने महाराष्ट्राची लोकधारा यावर आधारित महाराष्ट्रची संस्कृती, ग्रामीण भागातील चित्र त्यांच्या नृत्यामधून सादर केली. तसेच स्थलांतरामुळे आणि आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांबाबत आणि बालविवाहासारख्या अजूनही दिसून येणाऱ्या नाजूक विषयाची मांडणी सर्व प्रेक्षकांसमोर केले. वय, भाषा, संस्कृती या सर्वांचा अडसर दूर करून या मुलांनी नृत्य, नाटुकली सादर केली. मुलांच्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हि मुलांनीच केले.
या सर्व कलागुणांना वाव देताना संस्था मुलांना या संधी लहानपणापासूनच उपलब्ध करून देते. मुलांच्या सर्वांगिण विकासामध्ये संस्था स्वतः मुले, पालक, बांधकाम व्यावसायिक, प्रत्येक व्यक्ती आणि इतर व्यावसायिक समाज यांचा सहभाग आहे असे मानते. संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मुलास आयुष्यात हि दुर्मिळ संधी मिळवून देण्यासाठी संस्था मुलांच्या बांधकाम साईट वरील डे केअर सेंटर मध्ये सर्वांगिण विकासास पोषक असा कार्यक्रम राबविते. संस्थेच्या आरोग्य, आहार, शिक्षण, खेळ आणि मनोरंजन या चार क्षेत्रातील कार्यक्रम हा मुलांच्या सर्वागीण विकासास पोषक ठरतो.
बांधकाम साईटवरील सतत भटकंती करणाऱ्या आणि अनेक दृष्टीने असुरक्षित असणाऱ्या या मुलांच्या सर्वागीण विकासाचे कार्य संस्था २००७ सालापासून अव्याहतपणे करीत आहे. संस्थेच्या या कामामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी सकस आहार, वैद्यकीय तपासणी आणि त्यावरील उपचार, खेळ, पालकांसाठी सल्ला व मार्गदर्शन, शिक्षणासाठी शाळाप्रवेश, निरंतर शिक्षणासाठी सपोर्ट क्लासेस, वैयक्तिक मार्गदर्शन व सल्ला, कलागुणांची तोंडओळख होण्यासाठी संधी, क्रीडा व कला याना विशेष प्रोत्साहन, संगणक युगातील कौशल्य इत्यादी उपक्रमांचा समावेश होतो. संस्थेच्या या कार्यक्रमाची सुरवात जन्मापूर्वी पासून आवश्यक असणाऱ्या गर्भ संस्कारापासून ते मुलांच्या स्वावलंबन आणि सुजाण नागरिकत्वा पर्यंत आशा प्रवासाच्या स्वरूपात आहे.
संस्थेच्या या प्रवासात समाजातील हितचिंतक आणि सुजाण वाचक वर्ग यांना विविध उपक्रमांना आधार आणि त्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक वर्गाने संस्थेच्या फेसबुक पेज ला आणि वेबसाईट ला भेट द्यावी .
संपर्कासाठी तारा मोबाईल क्रेशेस
पुणे:Taramobilechrechespune@gmail.com, 8380088833, 7722010794, 7722010795 www.taramobilecrechespune.org
वव्हीए न्युज - पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील येरवडा परिसरात कुटुंबासमवेत राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी घडली असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विवेक मनोज जाधव (वय-१३ रा. जयप्रकाशनगर येरवडा) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवेक हा येरवडा परिसरातील मोझे विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. काल सकाळी त्याची आई कामाला गेली होती तर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. दरम्यान विवेक याने वरच्या खोलीत जाऊन ओढणीच्या सहाय्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांना झोपेतून उठल्यावर वरच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. अखेर वडीलांनी नागरिकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. खोलीत प्रवेश केला त्यावेळी विवेक याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने खाली उतरवून रुग्णालायात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
विवेक हा आई वडील व लहान भावासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जयप्रकाशनगर येथे भाड्याने राहत होता. आई वडील दोघेही सिक्युरिटीचे काम करतात. ११ डिसेंबर २०१८ पासून तो शाळेत आलेला नव्हता. त्याचा लहान भाऊ त्याच शाळेत शिकतो.
तो आजारी असल्यामुळे शाळेत येत नव्हता अशी माहिती त्याच्या भावाने शिक्षकांना दिली होती. विवेक हा वर्गात हुशार होता. त्याने अचानक आत्महत्या कां केली याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002