व्हीएस न्यूज - दारू पिताना झालेल्या भांडणामधून तरूणाला जीवे मारण्याची धमकी देत तीन मित्रांनी तरूणाकडील चौदाशे रूपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील झाडीमध्ये रात्री साडेअकरा वाजता घडला.
करण तुलसाणी (वय-18, रा. साई चौक, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जतिन बिपीन टाक (वय-22), लक्ष्मण मसरू गुंजाळ (वय-23), संतोष जमादार (वय-23, सर्व रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार अंतरकर यांनी माहिती दिली. करण व आरोपी मित्र आहेत. रविवारी रात्री साडे अकरा वाजता चौघेही पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील झाडीत दारू पित बसले होते. त्यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाला. करणला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्या खिशातील चौदाशे रूपये जबरदस्तीने काढून घेतले. पिंपरी पोलीस अधिक तुपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास के. एस. बी. चौकात घडला. संतोष मारूती मुंडे (वय-28, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंडे हा शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास चिंचवड येथील के. एस. बी. चौकातून दुचाकीवरून जात होता. समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला जोरात धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. फौजदार एस. के. गायकवाड अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - 'क्लीक इन पोर्टल'वरून कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोन भामट्यांनी अभियंता तरूणीला ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार थेरगांव येथे नुकताच उघडकीस आला. रेखा अर्जुन (वय-25, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजेद्र मोक्र व राजन मोक्र (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार घोळवे यांनी माहिती दिली. फिर्यादी तरूणी बी.ई अभियंता आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होती.'क्लीक इन पोर्टलवरून' आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून एक लाख 30 हजार रूपये भरण्यास सांगितले. नोकरी न मिळाल्याने घाबरलेल्या तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगी महत्वाच्या आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी आणि निधी हे दोन्हीही नसल्याचे सांगत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे तुर्तासतरी मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रोचे काम हे सध्या नाशिकफाटा ते खराळवाडी आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारण्यात आले आहेत. याबरोबर पीअर कँप शिवाय ११ खांब उभारले गेले आहेत. तर ४८ खांबांचा पाया रचण्यात आला आहे. हँरिस ब्रिज येथील काम हे ७ डिसेंबर पासून सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चरल पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून व्हायाडक्टचा पहिला स्पँन हा अंदाजे २६ डिसेंबर पर्यंत तयार असेल अशी माहिती डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी यावेळी दिली.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नांना यश
व्हीएस न्यूज - अल्पसंख्यांक अकादमीच्या धर्तीवर बामु विद्यापीठात 'पाली अकादमी'ची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी त्याबाबतची घोषणा केली.
पाली ही भारतीय उपखंडामधील एक प्राकृत भाषा होती. हा सांस्कृतीक ठेवा जतन करण्यासाठी अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी पाली अकादमी स्थापन करण्याची मागणी केली होती.
पाली अकादमी स्थापन करण्याबाबत राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी बडोले म्हणाले की, पाली भाषेत विपुल प्रमाणात साहित्य आहे. पाली साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी व ही पाली भाषा शिकता यावी याबाबत अकादमी कार्य करणार आहे. तसेच पालीमधील ग्रंथांचे भाषांतर करण्यात येणार आहे. पाली भाषेच्या विकासासाठी विविध कार्यक्रम आखण्यासाठी पाली अकादमीबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बडोले यांनी केल्या. पाली भाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. पाली भाषा सुरू करणाऱ्या शाळांना पाली अकादमीच्या माध्यमातुन अनुदान देण्याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. पाली भाषेच्या प्रसारामुळे जुन्या संस्कृतीची ओळख होणार असल्याने पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत आमदार व पाली भाषेचे प्राध्यापक चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव एस. एस. तागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पाली आणि बुद्धिझम विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पगारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचे डॉ. महेश देवकर, के. जी. सोमय्या फॉर बुद्धिस्ट स्टडीजच्या प्रभारी संचालक डॉ. सुप्रिया राय आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - 'रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी' यांनी सुरू केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या उपक्रमाला खासदार अमर साबळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून तब्बल ५ ट्रक जलपर्णी गोळा करण्यात आली.
रोटरी क्लबच्या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवीत केलेले ७० वर्षांचे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्यासह वाल्हेकरवाडीतील तरुण आणि ग्रामस्थ सहकुटुंब या अभियानामध्ये सहभागी झाले होते. उगम ते संगम अभियानाचा हा तिसरा आठवडा आहे.
यावेळी बोलताना खासदार अमर साबळे यांनी, पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सुविधा आपण या उपक्रमाला मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच रोटरीच्या उपक्रमाला ११ हजार रुपयांची देणगीही खासदार अमर साबळे यांनी दिली. उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठेवलेल्या देणगी कलशामध्ये एकूण ५१ हजार १२० रुपयांची रक्कम जमा झाली.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महानगरपालिका समाजातील सर्व अपंग व दुर्बल घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या घटकांच्या कल्याणाचे काम निरंतर चालू ठेवण्यासाठी तसेच नवीन व अभिनव योजना हाती घेणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या अपंग व्यक्तींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, नगरसदस्य नामदेव ढाके, शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे, विलास मडीगेरी,नगरसदस्या प्रियांका बारसे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, अपंग कल्याण समिती सदस्य प्रहार अपंग क्रांती आंदोलन अध्यक्ष दत्तात्रय भोसले, पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम बसवा, अपंग जागृत संघटना अध्यक्ष मानव कांबळे, पिंपरी चिंचवड अपंग मित्र मंडळाचे संस्थापक विश्वनाथ वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते राजू वाघचौरे, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अपंग व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या पूर्वीच्या योजनांमधील उणीवा दूर करून त्या योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापालिकेच्या वतीने शहरातील अंध अपंग व्यक्तींना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. अपंगाना पेन्शन देणारी पिंपरी चिंचवड ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत भरीव वाढ करण्यात आली असून अपंग व्यक्तींसाठी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे अपंग भवनही बांधण्यात येणार आहे. तसेच मतीमंद व कृष्ठ्पिडीत अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या दरमहा अर्थसहाय्य रकमेत भरीव वाढ करण्यात आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अपंग व्यक्तींना आत्मसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रयत्नशील असून विविध योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा या घटकापर्यंत पोहचविण्याचा सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महापालिका हद्दीतील सर्व शासकीय व महापालिका मालकीच्या इमारतींना अपंगांसाठी रॅम्पची सोय करण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अपंगाना विविध सवलती देणारी व पेन्शन योजना सुरु करणारी पिंपरी चिंचवड ही एकमेव महापालिका आहे. यापुढेही अशा योजना राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. अपंग जागृत संघटना अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले, महापालिका परिसरातील अपंगांसाठी कुठल्याही जाचक अटी न लादता दरमहा २ हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अपंगांच्या बाबतीत संवेदनशील कृती महापालिका करीत आहे ही विशेष बाब आहे. अपंग कल्याण समिती स्थापन केली आहे. महापालिका हद्दीत राहणाऱ्या ३५ ते ४० हजार अपंग कुटुंबांच्या सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मनपाने प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे. स्वतःमध्ये क्षमता असेल तर ध्येय आपल्याला प्रामाणिकपणे साध्य करता येते. अपंगांनी नेहमी स्वाभिमान बाळगावा, याचना करणारा कधीही स्वाभिमानी होऊ शकत नाही. अपंगाना मदत केली तर पुण्य मिळते ही भावना चुकीची आहे. अपंगाना दयेची नव्हे तर मदतीची साथ हवी आहे. कष्ट करताना कोणाकडे लाचार न होता क्षमता ओळखून निर्धाराने काम केल्यास यश हमखास मिळते. जे अनुदान सहकार्य लाभ मिळेल त्यावर व्यवसाय धंदा करून जीवन जगले तर, हा जागतिक अपंग दिन साजरा झाला असे म्हणता येईल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विजय काणेकर म्हणाले, अपंग कायदा- २०१६ हा कायदा- डिसेंबर २०१६ मध्ये अंमलात येताच यापूर्वीचा १९९५ चा कायदा संपुष्टात आला. सर्व अपंग व्यक्तींनी अपंग कायदा- २०१६ वाचला पाहिजे. या कायद्याद्वारे अपंगाना बहाल केलेले हक्क व अधिकार अपंग व्यक्ती आपल्या विकासासाठी वापरू शकतात. यामध्ये अपंगांसाठी नोकरीतील आरक्षण ३ वरून ४ टक्क्यावर करण्यात आले आहे. महिला व बालकांना या कायद्यामध्ये सन्मानाचे स्थान दिले असून त्यांचे हक्क अबाधित ठेवले आहे. आपली स्वंयसिद्धता सादर करण्यासाठी या कायद्याने अपंगांना अभय दिले आहे. केंद्र व राज्य सरकारने तालुका व जिल्हा पातळीवर अपंगांचे हक्क अबाधित राहण्यासाठी समिती स्थापन करून या समितीद्वारे अपंगांना संरक्षण द्यावे. या कायद्याद्वारे अपंगाना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा अपंगांनी लाभ घ्यावा. राज्य शासनाने अपंगांसाठी स्वतंत्र्य रोजगार व स्वंयरोजगार कक्ष स्थापन करावा. तसेच जनजागृती व प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या अपंग व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मुरलीकांत पेटकर, संकल्प बोत्रे,जगन्नाथ मैत्राणी, भाऊसाहेब बोत्रे, प्रकाश मोरे, निलेश बागुल, विवेक मालशे, सतीश नायर, गिरीष मोरे, जसविरसिंह यांचा समावेश आहे. यावेळी नगरसदस्य प्रियांका बारसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ऐवले यांनी तर सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यामागे उभारण्यात आलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन पुढील आठ दिवसात करावे. तसेच या स्मारकात पिंपरी चिंचवड मनपा वतीने विविध कार्यालय थाटण्याचा घाट घालण्यात येत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. याबाबत अनेक वेळा मनपा अधिकारी व पदाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले आहेत. तरी देखील आयुक्तांच्या आदेशाने याठिकाणी फर्निचर व इतर कामे सुरु असल्याचे प्रत्यक्ष दिसत आहे. याबाबत देखील आणि मा. आयुक्त, मा. महापौर, मा. पक्षनेते यांना भेटून निषेध नोंदविला आहे व तसे पत्र देखील दिले आहे. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने स्मारकाचे उद्घाटन करण्यात येईल. यानंतर देखील येथे मनपाची कार्यालये थाटल्यास तीव्र आंदोलन करु. असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. सोमवारी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत नगरसेवक संतोष लोंढे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, विजय लोखंडे, हनुमंत माळी,ॲड. चंद्रशेखर भुजबळ, ईश्वर कुदळे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील, पी. के. महाजन, अजय जादव, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
तसेच या सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय स्मारकात थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट तैलचित्राव्दारे प्रदर्शित करावा. तसेच फुले दांपत्याने लिहिलेली पुस्तकांच्या समावेश असणारे भव्य अत्याधुनिक ग्रंथालय उभारावे. फुले दांपत्याच्या कार्याची सत्यशोधक समाजाची विस्तृत माहिती देणारे फलक उभारावेत. शहरातील गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षांना मार्गदर्शक ठरणारी अभ्यासिका उभारावी. थोर समाज सुधारकांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासाठी व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी मिटिंग हॉल उपलब्ध करुन द्यावा. तसेच शहरातील लघुउद्योजकांना विशेषता महिला लघु उद्योजकांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारावे. अशी मागणी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
व्हीएस न्यूज - शिवरायांनी प्रत्येक वेळी युद्धाचे नवीन तंत्र वापरले. तंत्राला अनुसरुन शिवाजी महाराज व्यक्ती निवड करत होते. म्हणून एकच सैनिक सर्वत्र सारखा सारखा शिवचरित्रात आढळत नाही. आज या रणनीतीचा अभ्यास सर्व क्षेत्रात उपयोगी पडू शकतो, असे प्रतिपादन चिखलीतील कॉन्क्वेस्ट कॉलेजचे प्रा. प्रदीप कदम यांनी केले.
महावीर एज्युकेशन सोसायटी व शाहु शिक्षण संस्था भोसरी आयोजित प्रकाश व्याख्यानमालेत प्रा. प्रदीप कदम यांनी 'शिवरायांची रणनिती' या विषयावर तृतीय पुष्प गुंफले. यावेळी भगवान महावीर संस्थेचे, डॉ. अशोक पगारिया, विजय पारेख, शाहू शिक्षण संस्थेचे अजय साळुंखेे, विश्वस्त कोमल साळुंखेे, प्रा. राहुल खामकर, प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. पांडुरंग भास्कर, विलास पगारिया, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. पांडुरंग भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. प्रदीप कदम म्हणाले, आपल्याला अनुकुल असणाऱ्या व प्रतिकूल रणक्षेत्रात आणण्यासाठी शत्रूला भाग पाडले की अर्धा विजय अगोदरच होतो आणि मग हवी तशी चाल टाकून विजय मिळवता येतो. हिच शिवरायाची रणनिती होती. शत्रू बलाढ्य असेल, तर उघड्या मैदानात लढणे शक्य नाही, म्हणून अकस्मात हल्ला करणे, अत्यंत वेगाने आक्रमण करणे, शत्रूचे मानसिक दृष्टीने खच्चीकरण करणे, हातावर तुरी देणे, एकाच वेळी अनेक बाजूंनी आक्रमण करणे, आपले सैन्य संख्येने खुप आहे हे शत्रूला भासवणे, ऐनवेळी तहदेखील करणे व मुख्य म्हणजे गनिमी कावा, अशी शिवरायांची रणनीतीची अनेक तंत्रे प्रा. कदम यांनी श्रोत्यांना आपल्या अस्खलित आणि आक्रमक भाषेत उलगडून दाखवली.
छत्रपती शिवाजी महाराज परिस्थितीचा व भौगोलिक स्थितीचा अभ्यास, मानसशास्त्र, व्यक्ती आणि तंत्रांचा अभ्यास सखोल करत होते. स्वतः युद्धात सहभागी होत असल्याने सैनिकांमध्ये वीरश्री संचारत असायची, उच्च प्रतीचे आरमार, जागरूक व दक्ष हेर खाते, सैन्य दलासाठी अधिक खर्च, वेगवान अश्व निर्मिती, सैन्य व रयत यांची नुकसान तथा हानी टाळणे अशा बारीक सारिक गोष्टींचा रणनीतित समावेश होता, म्हणून किल्ले जिंकून यश मिळाले व हिंदवी स्वराज्य स्थापन झाले, असेही कदम यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - पंख संस्था आणि क्विकहील फाऊंडेशन व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय येथे शाळांगण प्रकल्पा अंतर्गत मुलांना मुलांसाठी जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत आणि पवन पाटील उपस्थित होते. त्यांच्याबरोबर पंख संस्थेच्या अध्यक्षा स्मिता आपटे,क्विकहील फाऊंडेशनचे सीएसआर प्रमुख अजय शिर्के, पंखच्या विश्वस्त सीमा ननवरे व नवमहाराष्ट्र विद्यालय (मुलांची)चे मुख्याध्यापक उत्तमराव पाटील आणि नवमहाराष्ट्र विद्यालय (मुलींची)च्या मुख्याध्यापिका शारदा जाधव उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत आणि पवन पाटील यांनी मुलांना छेडछाड, विनयभंग यासंबधीचे कायद्यांबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच भारतातील मुली सक्षम असून त्यांनी याप्रकरणी कशी पावले उचलली पाहिजेत यासंदर्भात मुलींना आणि छेडछाड, रॅगिंग, विनयभंग अशा गोष्टी केल्यास कोणते गुन्हे दाखल होऊन कशी शिक्षा होऊ शकते व कोणत्या मित्रांपासून लांब राहणे योग्य आहे. यासंदर्भात योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
व्हीएस न्यूज - पुण्यावरुन लोणावळाकडे जाणाऱ्या सकाळी सहा वाजताच्या लोकलमध्ये सोमवारी खडकी येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे सुमारे चार तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल चांगलेच झाले.
सकाळी 6 वाजुन 1 मिनीटाने पुण्यावरुण लोणावळाकडे जाणारी लोकल रेंजहिल्स रेल्वे बोगद्याजवळ आली. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड निर्मांण झाला. लोकलमधील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्मांण झाले. खडकी लोहमार्ग पोलिस व आरपीएफचे पथक तातडीने घटनास्थळी आले. घटनेची माहिती घेत त्यांनी पुणे रेल्वे विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन मदत यंत्रणा बोलावुन घेतली.
संबधीत रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रमानंतर बिघाड निर्माण झालेली लोकल खडकी रेल्वे स्थानकातील प्लॅंटफॉंर्मवर आणली. त्यानंतर लोकलमधील प्रवाशी प्लॅंटफॉंर्मवर थांबले. 45 मि.उशिराने पुण्यावरुण मुंबईकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेस रेल्वे स्थानकात आल्यावर लोकल मधिल सर्व प्रवाशांनी सिंहगडद्वारे आपला पुढील प्रवास केला. रेल्वेच्या वतिने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणुन सिंहगड सहीत नांदेड पनवेल एक्सप्रेस इंटरसिटी व प्रगती एक्सप्रेस सर्व स्थानकावर थांबवुन प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लोकल बिघाडामुळे पुण्यावरुण लोणावळा व तळेगांवकडे जाणाऱ्या लोकल 40 ते 45 मिनीटे ऊशिराने धावु लागल्या. लांबपल्ल्याच्या रेल्वे ही उशिराने धावत होत्या. मुंबईवरुण पुण्याकडे जाणाऱ्या इंद्रायणी इंटरसिटी व डेक्कन एक्सप्रेस ही 30 ते 40 मिनीट उशिराने धावु लागल्या. लोणावळा पुणे लोकल दिड तास उशिराने धावली. सकाळी कामावर जाणारे चाकरमानवर्ग व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थीयांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र मुंबईवरुण पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी व इंटसिटी एक्सप्रेस या सर्व रेल्वे स्थानकावर थांबवुन लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा रेल्वेच्या वतिने उपलब्ध करुन दिल्याने रेल्वे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला. सकाळी 10 वाजता विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पुर्वपदावर आणण्याकामी रेल्वे प्रशासनाला अखेर यश आले. तब्बल चार तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
रेल्वे सुत्राने दिलेल्या माहितीनुसार लोकलमधील ब्रेकमध्ये काही बिघाड झाल्यामुळे लोकल काही वेळ थांबली गेली. नंतर लोकल खडकी रेल्वे स्थानक येथिल प्लॅंटफॉंर्मवर तीन तास थाबवुन ती दुरुस्त झाल्या नंतर पुढे रवाना करण्यात आली. दरम्यान खडकी रेल्वे स्थानकातील प्लॅंटफॉंर्म नंबर दोनवर दुरुस्तीकामी लोकल थांबविल्याने मागुन आलेली सिंहगड एक्सप्रेस ही मधल्या रेल्वे रुळावर थांबवण्यात आली. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढण्या करिता प्लॅंटफॉंर्म नसल्याने प्रवाशांना चांगलीच तारेवराची कसरत करावी लागली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002