आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नांना यश
व्हीएस न्यूज - अल्पसंख्यांक अकादमीच्या धर्तीवर बामु विद्यापीठात 'पाली अकादमी'ची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी त्याबाबतची घोषणा केली.
पाली ही भारतीय उपखंडामधील एक प्राकृत भाषा होती. हा सांस्कृतीक ठेवा जतन करण्यासाठी अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी पाली अकादमी स्थापन करण्याची मागणी केली होती.
पाली अकादमी स्थापन करण्याबाबत राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी बडोले म्हणाले की, पाली भाषेत विपुल प्रमाणात साहित्य आहे. पाली साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी व ही पाली भाषा शिकता यावी याबाबत अकादमी कार्य करणार आहे. तसेच पालीमधील ग्रंथांचे भाषांतर करण्यात येणार आहे. पाली भाषेच्या विकासासाठी विविध कार्यक्रम आखण्यासाठी पाली अकादमीबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बडोले यांनी केल्या. पाली भाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. पाली भाषा सुरू करणाऱ्या शाळांना पाली अकादमीच्या माध्यमातुन अनुदान देण्याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. पाली भाषेच्या प्रसारामुळे जुन्या संस्कृतीची ओळख होणार असल्याने पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत आमदार व पाली भाषेचे प्राध्यापक चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव एस. एस. तागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पाली आणि बुद्धिझम विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पगारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचे डॉ. महेश देवकर, के. जी. सोमय्या फॉर बुद्धिस्ट स्टडीजच्या प्रभारी संचालक डॉ. सुप्रिया राय आदी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002