व्हीएस न्यूज - प्लॅस्टिक बंदीनंतर अवघ्या १२ दिवसातच पहिला बदल करण्यात आला असून या बंदीतून पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली असून १ एप्रिलपासून राज्यभरात प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचाही समावेश होता. या बाटल्या पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असतात. यांचा उपयोग पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी होतो. अटींच्या आधारे राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली.
महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी महासंघाने बाटल्यांना बंदीतून मुक्त करण्यासंबंधी विषय उचलला होता. पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर शक्य असतो. खाद्यतेलासाठी या बाटल्यांचा मोठा उपयोग होतो. आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खाद्यतेल साठवणूक बंदीमुळे कठीण होईल, हे त्यांनाही पटले. त्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिली आहे. ती घेताना लावलेल्या अटींची पूर्तता तीन महिन्यांत करायची आहे. त्यासाठी आता प्रयत्न केला जाईल. ज्या प्लास्टिकवर राज्यात बंदी आणली आहे, त्याचा व्यवसाय वार्षिक ५ हजार कोटींचा आहे. त्यापैकी २२ ते २५ टक्के व्यावसाय हा पीईटी बाटल्यांचा आहे. या निर्णयामुळे आता १,००० ते १२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाला संजीवनी मिळाली.
व्हीएस न्यूज - भारताची ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच असून राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या अवघ्या १५ वर्षाच्या म्हणजेच नववी/दहावीत शिकणाऱ्या पोराने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले.
२५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात विक्रमी कामगिरी करत अनिश भानवालाने सुवर्णभेद केला. तब्बल ३० गुण मिळवत अनिशने विक्रम रचला. अनिश हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. अनिशच्या या कामगिरीने भारताच्या खात्यात १६ सुवर्णपदके जमा झाली आहेत. अनिशसमोर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा २० वर्षीय नेमबाज सर्जी वेग्लेव्स्की आणि इंग्लंडचा २८ वर्षीय सॅम गोविन यांचे आव्हान होते. १५ वर्षीय अनिशने हे आव्हान मोडित काढत जबरदस्त कामगिरी केली. अनिशला ३० तर, रौप्यपदक पटकावणाऱ्या सर्जी वेग्लेव्स्कीला २८ तर कांस्यपदक मिळवणाऱ्या सॅम गोविनला १७ गुण मिळाले.
व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत दाखल करून घेतलेली सुमोटो जनहित याचिका निकाली काढली असून यावेळी उच्च न्यायालयाने कोणत्याही शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तिथे चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत नोंदवले.
नागरिकांचा उत्तम दर्जाचे रस्ते वापरणे हा मुलभूत अधिकार असल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. लोकांच्या तक्रारींची संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच गंभीर दखल घेतली तर लोकांना याबाबत उच्च न्यायालयात येण्याची गरजच भासणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. १५ जूनपर्यंत रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात तक्रार निवारणासाठी स्वतंत्र एकछत्री यंत्रणा कार्यरत करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्याचबरोबर रस्ते निर्मिती आणि त्यांच्या देखभालीचं कंत्राट देताना रस्ते उत्तम दर्जाचे बनतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले. मान्सून दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरुन उच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्राचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी याचिकेत रूपांतर केले. यावर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
व्हीएस न्यूज - आपल्या विविध सोशल साईट्सवर असलेल्या अकाऊंटसचे पासवर्ड लक्षात ठेवणे हे आपल्या सर्वासाठीच कठीण काम असते. पण तुमचा चेहराच यापुढे तुमचा पासवर्ड असणार आहे. ई-मेल व इतर खाते लॅपटॉप किंवा संगणकासमोर चेहरा नेताच आपोआप उघडणार असल्यामुळे आता पासवर्ड ही संकल्पना इतिहासजमा होणार आहे.
आता संगणक आणि लॅपटॉपमध्ये आयफोनमध्ये असलेली फेसआयडी ऑथेंटिकेशनची सुविधा देण्यात येणार आहे. युजर्सना या तंत्रज्ञानामुळे पासवर्डशिवाय अकाऊंटमध्ये लॉग-इन करता येणार आहे. वेब ऑथेंटिकेशन स्टॅण्डर्ड इन्क्रिप्टेड हे नवीन तंत्रज्ञान फिडो अलायन्स आणि डब्ल्यू थ्रीसी या संकेतस्थळांनी आणले असल्यामुळे पासवर्ड, फिंगरप्रिंट सेंसर, कॅमेरा आणि यूटीबी बटनशिवाय केवळ चेहरा समोर नेताच अकाऊंट उघडता येणार आहे. या तंत्राचा मोझिला फायरफॉक्समध्ये समावेश करण्यात आला असून गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्टसुद्धा ही सुविधा युजर्सना देणार आहेत.
व्हीएस न्यूज - एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांची तुलना जादूगार पी.सी. सरकार यांच्याशी केली आहे. पी. सी. सरकार हे देशातले आणि जगातले प्रसिद्ध जादूगार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये आठवड्याभरात ८.५ लाख सार्वजनिक टॉयलेट्स उभारल्याची घोषणा म्हणजे या जादूचाच एक भाग आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जादूगार पी. सी. सरकार यांच्या जादूच्या प्रयोगांशी स्पर्धा करत आहेत असेच देशात चित्र आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या टोपीतून ससा बाहेर काढून दाखवण्याची जादू दाखवली तर मुळीच आश्चर्य वाटायला नको, असा टोमणाही ओवेसी यांनी मारला आहे. त्यांच्या जादूच्या प्रयोगांना टीव्हीवर चांगला टीआरपीही मिळतो हे सांगायलाही ओवेसी विसरलेले नाहीत. आपल्या वक्तव्यात त्यांनी कठुआ या ठिकाणी झालेल्या ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा आणि बलात्कार व हत्येच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. या घटनेमुळे सगळा देश हादरल्याचे त्यांनी म्हटले आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
एकीकडे पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी घोषणा करतात. स्त्री शक्ती, महिला सबलीकरणाचे नारे देतात आणि दुसरीकडे अशा घटनांवर साधे भाष्यही करत नाहीत. ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे? जम्मू काश्मीरमध्ये काय चालले आहे याकडे त्यांचे लक्ष आहे का? उत्तर प्रदेशात तर भाजपाचे मुख्यमंत्री निष्पाप लोकांना एन्काऊंटरच्या नावाखाली ठार करत आहेत आणि त्याची शेखी मिरवत आहेत असाही आरोप ओवेसी यांनी केला.
व्हीएस न्यूज – केवळ आशियातच नाही तर, जगात श्रीलंकेची आरोग्य सेवा अव्वल असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिली असून ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेर्डोस अधनॉम घेब्रेयेसस श्रीलंकेत आले होते.
श्रीलंकेतील आरोग्य सेवा मोफत उपलब्ध असल्यामुळे तसेच त्याला राजकीय नेतृत्वाचे योग्य मार्गदर्शन असल्यामुळे येथे चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत असल्याचे टेर्डोस म्हणाले. श्रीलंकेची याआधी कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये गणना होत होती. पण आता श्रीलंकेचा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये समावेश झाला असल्यामुळेच श्रीलंकेने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे टेर्डोस म्हणाले. तसेच, हे उच्च उत्पन्न असलेल्या राष्ट्रांसाठी उत्तम उदाहरण असल्याचेही ते म्हणाले
व्हीएस न्यूज – केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना हज यात्रेसाठी परवानगी न देण्याच्या नितीला योग्य ठरवले असून हजला जाणारे दिव्यांग तेथे जाऊन भीक मागतात आणि भीक मागण्यावर सौदी अरेबियात बंदी असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.
मंत्रालयाच्या निदर्शनास अशाप्रकारच्या अनेक घटना आल्या आहेत. हज यात्रा केवळ शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम असलेल्यांसाठी जबाबदारी मानण्यात आली असून हज यात्रेत प्रत्येकाला जायलाच हवे असे कुठेही कुराणामध्ये म्हटले नसल्याचे सरकारकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
एका दिव्यांग व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारने अपंगत्वामुळे हज यात्रेला जाण्याची परवानगी दिली नाही, हे नियमांच्या विरोधात आहे. मुलभूत अधिकारांच्या बाबतीत देशाचे संविधानही दिव्यांगांसोबत भेदभाव करत नाही, तर सरकार हजला जाणा-या दिव्यांगांसोबत भेदभाव कसे काय करू शकते, असे या याचिकेत म्हटले होते.
व्हीएस न्यूज - सध्या उन्नाव बलात्कार प्रकरण चांगलेच चर्चेत असून भाजप आमदाराचे नाव बलात्कार प्रकरणात आल्यामुळे भाजप आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार बॅकफूटवर गेले आहे. दरम्यान, बलात्काराचा आरोप असलेल्या आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचा बचाव करताना भाजपच्या एका आमदाराने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. तीन मुलांच्या आईवर बलात्कार केला जाऊ शकत नाही असा अजब तर्क भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी लावला आहे. असे होण अशक्य असून, कुलदीप सेंगर यांना फसवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुलदीप सेंगर यांच्यावर एकीकडे कारवाई करण्याची मागणी होत असताना त्यांना सुरेंद्र सिंह यांनी मात्र निर्दोष जाहीर करुन टाकले आहे. मनोवैज्ञानिक पद्धतीने मी सांगत आहे की,तीन मुलांच्या आईवर बलात्कार केला जाऊ शकत नाही. हे अशक्य असून कुलदीप सेंगर यांच्याविरोधात कट रचला जात आहे. कोणीतरी पीडितेच्या वडिलांना मारहाण केली असेल, पण बलात्काराचा आरोप मी निराधार मानतो, असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे
व्हीएस न्यूज - दलित संघटना गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार विरोधात बोलत असून २ एप्रिलला भारत बंद दरम्यान दलितांचे आंदोलन असो की मग भाजपमधील दलित नेत्यांनी दर्शलवलेली नाराजी असो. याचा फटका मोदी सरकारला बसण्याची चिन्ह असताना मोदी सरकार आता ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजप आणि आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांनी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाबाहेर देखील भाजप ही जयंती साजरी करणार असून आंबेडकर जयंती लंडनमध्ये साजरी होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमधील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले की, १० ते २० एप्रिल दरम्यान पंतप्रधान मोदी लंडनमध्ये राहणार आहेत. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये जयंतीनिमित्त या दरम्यान कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होतील.
नोव्हेंबर २०१५ मध्ये सरकारने डॉ. आंबेडकर यांचं लंडनमधील १०, किंग हेनरी रोड येथील घर खरेदी केले होते. डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये अध्ययानादरम्यान १९२१-१९२२ मध्ये याच घरात राहिले होते. हे घर सरकारने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विकत घेतले होते. या घरासाठी महाराष्ट्राच्या भाजप सरकारने निधी दिला होता. त्यानंतर २०५० फुटाचे हे घर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असून याला शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्राच्या रूपात विकसित केले जात आहे.
व्हीएस न्यूज - लग्न व्हावे यासाठी लोक नवससायास करतात, काही जण खोटे बोलतात पण या सर्वांवर कडी करणारा एक बहाद्दर उत्तर प्रदेशात निघाला आहे. त्याने लग्नासाठी तोडगा म्हणून मांत्रिकाच्या सल्ल्यावरून चक्क मोबाईल गिळल्याची घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे मोबाईल, बॅटरी वायर चाव्या आणि ग्लास अशा वस्तूही गिळल्याचे समोर आले आहे.
अजय द्विवेदी असे या व्यक्तीचे नाव असून तो 42 वर्षांचा आहे त्याची प्रकृती नीट राहात नसल्यामुळे आणि आपल्यावर कोणीतरी भानामती केली आहे, या संशयाने त्याने मांत्रिकाचा सल्ला घेतला होता. लग्न व्हावे यासाठी त्याने तोडगा विचारला होता. त्यानंतर मांत्रिकाच्या सल्ल्यावरून त्याने गिळलेल्या वस्तूंमुळे त्याच्या पोटात दुखायला लागले आणि त्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.
डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे फोटो काढल्यानंतर त्यांना पोटाच्या आत या धातूच्या वस्तू दिसल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून या वस्तू बाहेर काढल्या, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. द्विवेदी हा कुठल्यातरी आजाराने ग्रस्त दिसत असून आत्महत्येची प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती अशा वस्तू मिळतात, असे द्विवेदी यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे सर्जन एस. के. सिंग यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - भारतीय राजकारणात अशक्य वाटणारी एक युती पश्चिम बंगालमध्ये आकारास येत आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि डावे पक्ष हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र येत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात पंचायत निवडणुका होणार आहेत. राज्यात पंचायत पातळीवरील एकूण 42000 जागा असून भाजप, काँग्रेस आणि डावे पक्ष त्यासाठी युती करण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते सायंतन बसु यांनी मार्क्सवादी पक्षाचे नेते बसुदेब आचार्य यांची नुकतीच भेट घेतली. बसुदेव आचार्य हे सध्या पुरुलिया येथील रुग्णालयात आईसीयूमध्ये उपचार घेत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर माकपच्या एका नेत्याने पायोनियर वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, की ‘पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येतील की नाही, हे मला माहीत परंतु लोक एकत्र होत असतील तर आपल्याला ही त्यांची मर्जी समजून चालावे लागेल.’
काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी 2016 साली विधानसभा निवडणुकीसाठी युती केली होती. मात्र सध्या ही युती अनौपचारिक पातळीवरच आहे, ती अधिकृत नाही. ममता बनर्जी यांनी नुकतेच नवी दिल्लीत विरोधकांच्या एकतेसाठी जो फॉर्म्युला दिला होता त्याच नुसार ही युती होण्याची शक्यता आहे.
व्हीएस न्यूज - मागील तीन वर्षांत भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आले असून पक्षाच्या उत्पन्नात 81.18 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1034.27 कोटींवर पोहोचली आहे. याच दरम्यान काँग्रेसची कमाई मात्र 14 टक्क्यांनी घसरून ती 225.36 कोटी रुपयांवर आली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीवर हा अहवाल आधारित आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादी (सीपीएम), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) आणि तृणमूल काँग्रेस या सात पक्षांनी एकूण 1,595 कोटी रुपयांचा खर्च आणि 1,228.26 कोटी रुपये खर्च केले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.
भाजपने वर्ष 2016-17 या कालावधीत 710.057 कोटी रुपये खर्च केले असून काँग्रेसने एकूण 321.66 कोटी रुपये खर्च केले आहेत. पक्षाच्या उत्पन्नाच्या तुलनेत हा खर्च 92.30 कोटी रुपये जास्त आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. या दोन्ही पक्षांनी आपल्या उत्पन्नाच्या तीन प्रमुख स्रोतांपैकी एक म्हणून “देणग्या / योगदान” घोषित केले आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपने लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यास विलंब केला आहे, अशी माहितीही त्यात देण्यात आली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002