व्हिएस न्यूज -पुणे जिल्ह्य़ात विमानतळ होणारच आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील, त्या जागाबाधितांना रेडीरेकनरच्या चौपट दराने मोबदला दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मात्र विमानतळाची नियोजित जागा कोणती, याविषयी त्यांनी कोणतेच भाष्य केले नसल्याने याबाबतचे गूढ वाढले आहे. तसेच पुरंदर विमानतळाची प्रक्रिया सुरू झालेली असताना या नव्या घोषणेमुळे पुरंदर विमानतळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजगुरुनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत पुण्यासाठी विमानतळ होऊ शकले नाही. मात्र, नियोजित विमानतळ पुणे जिल्ह्य़ातच होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
यापूर्वीचे विरोधाचे राजकारण लक्षात घेता विमानतळाची नेमकी जागा कोणती आहे, हे आताच जाहीर करणार नाही, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. पुण्याच्या विमानतळासाठी ज्यांच्या जागा संपादित कराव्या लागणार आहेत, त्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या चारपट पैसे मोबदला म्हणून दिले जाणार आहेत. विमानतळ झालेच पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहोत. विमानतळासाठी योग्य जागेची पाहणी संबंधित यंत्रणेकडून केली जाईल. त्यानंतर, इतर महत्त्वाची कामे सरकार म्हणून आम्ही करू. त्यानंतर विमानतळ संदर्भातील कार्यवाही कृतीतून दिसून येईल, असे पवार यांनी या वेळी सांगितले.
आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेबाबत सर्व परवानग्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला केंद्राकडून प्राप्त झाल्या आहेत. आता प्रकल्पग्रस्तांना द्यायचा मोबदल्यासह उर्वरित सर्व विषय राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. विमानतळ उभारणीची निविदा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर काढली जाणार आहे. नियोजन करण्यासाठी प्राधिकरण म्हणून एमएडीसी असेल. प्रत्यक्ष विमानतळ आणि इतर पूरक बांधकामासाठी नेमकी किती जागा लागेल, विमानतळाच्या परिसरात इतर विविध सुविधांच्या निर्मितीसाठी किती जागा लागेल, याचा आढावा विकास आराखडा करताना घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाची जागा बदलल्यास प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता आहे.
‘गिरीश बापटांमुळे नुकसान’
भाजप सरकारमधील पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे मंत्रिमंडळात काहीच चालत नव्हते. त्यांच्या शब्दाला वजन नसल्याने कामे झाली नाहीत. परिणामी, पुणे जिल्ह्य़ाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळाल्या नाहीत, रस्तेविकासाची कामे खोळंबली, पाण्याचे नियोजन होऊ शकले नाही, जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध झाला नाही, अशी टीका अजित पवार यांनी बापट यांच्यावर केली.
व्हीएस न्यूज -ढोल -ताशांचा गजर आणि ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करत आनंदमयी वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर मंगळवारी श्री शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदीअभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात असून गड आणि परिसरातील विकास कामांसाठी तातडीने २३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केली.
प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी श्री शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
‘शिवनेरी आपले वैभव आहे. या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू,’ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. या दिशेने सरकारचे काम चालू आहे.
मराठा आरक्षणाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्य़ात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेऊ, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील या वेळी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज -प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती. इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रात काय म्हणाले इंदुरीकर महाराज ?
महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिलावर्ग.
आज गत आठ दिवसांपासून माझ्या किर्तणरूपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या २६ वर्षांच्या किर्तनरूपी सेवेत समाज प्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रूढी-परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरूपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धींगत व्यावे ही सदिच्छा! असं पत्रक इंदुरीकर महाराज यांनी काढलं आहे. त्याखाली महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर) असा शिक्काही आहे आणि त्यावर इंदुरीकर महाराजांची स्वाक्षरी आहे
व्हीएस न्यूज -यंदा राज्यातून १५लाख ५ हजार २७ विध्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात ८ लाख ४३ हजार ५५२ इतके विध्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५ विदयार्थिनी यांचा समावेश असणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (१८फेब्रुवारी)सुरुवात होत आहे. यंदा १८फेब्रुवारी ते १८मार्च २०२० या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.यंदा बारावीला १ फेब्रुवारी प्रॅक्टिकल परीक्षा सुरु झाली. ती आज म्हणजे १७फेब्रुवारीला संपणार आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विध्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात ८ लाख ४३ हजार ५५२ इतके विद्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५विद्यर्थिनी यांचा समावेश असणार आहे. राज्यभरात मिळून ९ हजार ९२३ केंद्रावर या परीक्षा पार पाडणार आहे. यंदा ऑनलाईन हॉल तिकिट उपलब्ध करून दिल्याचेही मंडळाने स्पष्ट केले. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाइन तयार करण्यात आल्या असून विध्यार्थ्यांना पालकांना येणाऱ्या अडचणीवर त्यावर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल. याही वर्षी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी आहेच तसेच शिक्षकांचे ही मोबाइल, केंद्रावर एका ठिकाणी ठेवले जाणार आहेत . यामुळे पेपर फुटी प्रकरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होऊ नये म्हणून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त असेल.
व्हीएस न्यूज -इंदुरीकर महाराजांच्या महिलांच्या वक्तव्यावरून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अप्रत्यक्ष समाचार घेतला. आदिती तटकरे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे बोलत होत्या.
सध्या सर्वसामान्यांमध्ये इंदुरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे. आपण सर्वजण त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्ती असताना बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपले मत सामाजिक किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असताना निश्चितपणाने महिलांचा, समाजातील व्यक्तींचा सन्मान राखणं महत्वाचं आहे. व्यासपीठावर आपण एकटे म्हणून मत मांडत नसतो. आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे या गोष्टींची दक्षता एक सुजान व्यक्ती म्हणून बाळगायला हवी, असं मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.
व्हॅलेंटाईन डे निमित्त अमरावतीलगतच्या चांदूर येथे असलेल्या महाविद्यालयात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, “मुलींना अशी शपथ द्यायला लावणं ही दुर्दैवी बाब असल्याचं राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधून शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेम, प्रेम विवाह न करण्याची शपथ शुक्रवारी देण्यात आली होती. या शपथेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही मुलींनाच अशी शपथ का दिली गेली असा प्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “व्हॅलेंटाईन डे निमित्त विद्यार्थिनींनी शपथ घेतली. ही दुर्दैवी बाब आहे की, त्या मुलींच्या मनात भीतीचं किंवा संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची सुद्धा आहे. शिक्षकांची, आई -वडिलांची आणि समाजाची देखील ही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींना अशाप्रकारे शपथ दिली जाणं दुर्दैवी आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या.
व्हीएस न्यूज -भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील यांची पक्षाकडून फेरनिवड करण्यात आली आहे. तर, मुंबई भाजपा अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची देखील पुन्हा निवड केली गेली आहे. मंगलप्रभात लोढा हे जवळपास २५ वर्षे आमदार राहिलेले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका अगोदर या दोघांनाही पक्षाच्यावतीने ही जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड केली गेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळवून देऊ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रातील सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम भाजपा करेल. राज्यभरात ज्या मतदारसंघात भाजपाला यश आले नाही, त्या मतदारसंघात मी स्वतः जाऊन पराभवाची कारणं शोधून त्यावर काम करणार असल्याचही चंद्रकांत पाटील यांनी निवड झाल्यानंतर सांगितलं आहे.
व्हीएस न्यूज - गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल तेथील अन्न व औषध प्रशासनाच्या व पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश
गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर व या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसंच ज्या क्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल तेथील अन्न व औषध प्रशासनाच्या व पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
आघाडी शासनाच्या काळात राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली त्याची कडक अंमलबजावणीही झाली. त्यामुळे गुटखा कंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलिकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जाते. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते. परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही. गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मोक्का’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. ही अन्न व औषध प्रशासन, पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.
राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. गुटखाविक्रीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे आदी सूचनाही अजित पवार यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला निधी वाढवून देण्याचेही त्यांनी मान्य केले. गुटखाबंदी विरोधात जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सध्या राज्यात विक्री होत असलेल्या गुटखा व प्रतिबंधित सुपारी, मावा, खर्रा यांच्या ब्रँडची नावेही त्यांनी बैठकीत वाचून दाखवली व त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यापुढच्या काळात गुटखाविक्रीच्या अवैध व्यवसायात असलेल्या कंपन्यांच्या मालकांना व मुख्य सुत्रधारांना शोधून थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याने शालेय विद्यार्थी, व तरुण गुटख्यांच्या दुष्परिणामापासून वाचतील असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला
व्हिएस न्युज - प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली होती. या मुद्द्यावरुन वाद पेटण्याची शक्यता असतानाच या वादात शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी उडी घेतली आहे.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत या मागे राजकीय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? असा सवाल करत दाखले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?, असंही युवराज दाखले म्हणाले आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनासाठी संबंधित मंत्रालय राज्यांकडून प्रस्ताव मागवते. या प्रस्तावावर विचार होऊन प्रजासत्ताक दिनी काही राज्यांना संचलनात चित्ररथास परवानगी दिली जाते. 2005, 2008, 2013 या वर्षीही राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता.
व्हीएस न्युज - मुंबई येथे 22 वर्षीय तरुणावर चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . शिवाय, पीडित तरुणाच्या क्रेडिट कार्डद्वारे गाडीत पेट्रोल भरलं आणि पैसेही काढले. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे . पियुष चौहान, मेहुल परमार आणि असिफुल्लाह अन्सारी या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चौथा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे . आरोपींवर कलम 377 (अनैसर्गिक शारीरिक संबंध), कलम 399 (दरोडा) आणि इतर चार कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण इन्स्टाग्रामचा युजर होता. घटनेच्या दिवशी पीडित तरुणानं मुंबईत कुर्ल्यातील रेस्टॉरंटमधील स्वत:चा सेल्फी इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्याद्वारे आरोपींनी पीडित तरुणावर पाळत ठेवली. चाहते असल्याचे सांगत पीडित तरुणासोबत बाईक राईडची इच्छा व्यक्त केली.
जवळपास 20 मिनिटं बाईक राईडनंतर आरोपींनी तरुणाला थांबण्यास सांगितलं आणि जबरदस्ती करून कारमध्ये नेलं. चालत्या कारमध्येच त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पीडित तरुणाला रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. पीडित तरुणानं ही सगळी माहिती कुटुंबीयांना सांगितल्यावर प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून 24 तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. ज्या कारमध्ये हा प्रकार घडला, ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
व्हिएस न्युज - शुक्रवारी सकाळी हैदराबादमध्ये झालेल्या एन्काउंटरमुळे आरोपींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या चार आरोपींपैकी एका आरोपीच्या पत्नीने आता पोलिसांनी आपल्याला पण मारून टाकावं, अशी मागणी केली आहे. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं.
"माझ्या नवऱ्याला काहीही होणार नाही, तो लवकरच परत येईल असं सांगण्यात आलं होतं. आता मला काय करायचं माहिती नाही. आता माझा नवरा जिथं गेलाय तिथं मलाही पाठवण्यात यावं. पोलिसांनी मलाही मारून टाकावं," अशी मागणी तिने केली आहे.
दोनदिवसांपूर्वी आणखी एका आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलानं गुन्हा केला असेल तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. आज त्यांची पत्नी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच दुःखात बुडून गेली आहे.
आणखी एका आरोपीच्या वडिलांनी आजच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "माझ्या मुलाने कदाचित गुन्हा केलाही असेल परंतु त्याला अशारीतीनं संपवणं आजिबातच योग्य नव्हतं. अनेक लोक हत्या, बलात्कार करतात, पण त्यांना असं मारलं जात नाही. या मुलांनाच का अशी वागणूक दिली गेली," असा प्रश्नच त्यांनी विचारला आहे.
ही सर्व कुटुंबं अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास होती, परंतु ते चांगल्या राहणीमानासाठी भरपूर खर्च करायचे, असं गावकऱ्यांनी सांगितलं.
अशी घडली होती घटना
मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात होती. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करायची. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कूटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.
मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं समोर आलं होतं.
व्हिएस न्युज - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायलयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी गुरूवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले आहे.राज्यात एकीकडे महाविकासआघाडीचे सरकार येत असताना, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी हे समन्स पोहचले होते.
दंडाधिकारी न्यायालयाकडे १ नोव्हेंबर रोजी, याप्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता. वकील सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती.
त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी हा खटला सारांश फौजदारी खटला म्हणून ठेवला जाईल असे सांगत नोटीस बजावली. वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्य़ांची माहिती लपवण्यात आली. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
व्हिएस न्युज - कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. हा आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होत आहे. या नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढू शकतात, असं मानलं जात आहे.
कुलाबामध्ये मोक्याच्या जागेवर उभारलेल्या ३१ मजली टॉवरमध्ये नोकरशहा, राजकीय नेते आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. या गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर फ्लॅटधारकांनाही आरोपी करण्यात आले. या प्रकरणी सीबीआयनं अशोक चव्हाण यांनी आरोपी केले. त्यांना या प्रकरणामुळं मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. अन्य राजकीय नेत्यांचीही चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी मोजणीचं साहित्य आणि उपकरणं घेऊन या गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी अनेक मजल्यांवरील फ्लॅटमध्ये मोजणीही केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या पंधरवड्यात दुसऱ्यांदा चौकशी केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी परिसरात येण्याच्या १५ दिवस आधी पूर्वसूचना द्यावी, असे पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे ईडीला सांगितलं होतं
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002