व्हीएस न्यूज - महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कर्जमाफीच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. छत्रपतींच्या नावाचा गैरवापर करून भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक करु नका, असे आवाहन कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभा ब्लॉक अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यानंतर या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर कर्जाऊ रक्कम जमा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दिवाळीत बॅंका बंद असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तांत्रिक कारणामुळे जमा होऊ शकली नाही. आता दिवाळी संपून आठवडा होत आला असला, तरीदेखील शेतकरी बॅंक खात्यावर रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी भाजप सकरकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करु नये, असे आवाहन केले आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 41 स्वयंरोजगार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना महानगर पालिकेकडून देण्यात येणारी कामे यापुढे बंद होतील. तसा आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.
त्या संस्था कायदा, नियम व उपविधीतील तरतुदीचे पालन करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने त्या संस्थाची 31 मार्च 2016 ते 31 मार्च 2017 अखेर नोंदणी रद्द केली. आता त्या स्वयंरोजगार संस्थांचे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात आले आहे. याबाबत उपनिबंधक प्रतिक पोखरकर यांनी सदर संस्थांचा अहवाल सादर केला. सदर संस्थांची यादी सर्व विभागांना पाठवण्यात आली आहे. परंतू, शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग व जल संपदा विभाग यांनी मजूर कामगार सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचेकडून काम करुन घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभागांनी नगर विकास विभागाचे परिपत्रक अवलोकन होवून मजूर कामगार सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना काम देण्यात यावे, असे आयुक्त हर्डिकर यांनी आदेशात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – दिवाळीची सुट्टी संपत आली असून आज म्हणजेच सोमवारपासून बहुतेक शाळा सुरू होत आहेत. सुट्टी एवढ्या लवकर कशी संपली अशी खंत बाळगत चिमुकल्यांनी पुन्हा शाळेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. 15 ते 20 दिवसांच्या सुट्टीनंतर आता सोमवारपासून पुन्हा शाळेची घंटा खणखणू लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमुळे आलेली थोडी मरगळ झटकायला आता शिक्षकांना आणि आई बाबांनाही वेळ लागणार. बऱ्याच जणांनी एसटीचा संप मिटल्यानंतर गावाकडचा रस्ता धरला होता. आता शाळा सुरू होत असल्याने परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बस स्थानकांवर गावाकडून परतणाऱ्या मुलांची आणि पालकांची गर्दी दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका व खासगी मिळून सुमारे 600 हून अधिक शाळा आहेत. तसेच नर्सरी व बालवाड्यांची संख्याही 300 हून अधिक आहे. शहरातील विद्यार्थी संख्या देखील खूप जास्त आहे. वर्गखोल्यांवर चढलेली धूळ साफ करून विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे. काही शाळांमध्ये दिवाळीनंतर विद्यार्थ्यांचे वेलकम करण्याची जोरात तयारी सुरू आहे. बऱ्याच शाळांचा झालेल्या प्रथमसत्र परीक्षेचा निकाल देखील दिवाळीनंतर लागणार आहे. त्यामुळे त्या निकालाची उत्सुकता आणि धाकधूक देखील विद्यार्थ्यांना लागली आहे. बरीच मंडळी शाळेच्या पहिल्या दिवशी दांडी मारणार असली तरी निकालाच्या उत्सुकतेपोटी हजेरी लावतात. तर बऱ्याच जणांनी अजून दोन दिवस उशिरा शाळेत जाण्याचे नियोजन केले आहे. दिवाळी मजा करण्यात, खेळण्यात आणि बागडण्यात गेली असल्याने काही मुलांचे गृहपाठ अजून बाकी आहेत. मुले गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचे पेपर तपासणीचे काम सुरू होते. त्यामुळे शिक्षकांना प्रथम सत्राचे पेपर तपासण्याचीही धास्ती होती. विद्यार्थी पहिल्याच दिवशी उत्सुकतेपोटी निकालाबद्दल विचारतात. गृहपाठाच्या वहीला देखील गुण असल्यामुळे त्यातही बाजी कोण मारणार, याची चढाओढ असते.
सुट्यांसाठी गेलेल्या बालचमूचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दिवाळीची सुट्टी संपल्याची खंत तर असते पण त्याहून अधिक मित्रांना बऱ्याच दिवसांनी पुन्हा भेटण्याचा आनंद ही असतो. दिवाळीच्या सुट्टीत घेतलेले नवीन कपडे, भेटवस्तू याबद्दल मित्रांना सांगायचे असते. फराळ आणि फटाक्यांचे वर्णन ही करायचे असते तर काही जण सहलीला तर काही कला शिबिरांना जातात त्याबद्दल आपल्या मित्रांना भरभरुन माहिती देण्यासाठी चिमुकले उत्सुक आहेत. दिवाळीनंतर शाळांमध्ये गॅदरिंग आणि खेळ स्पर्धा होतात. बच्चे कंपनी याची तयारी करण्यासाठी आणि त्याबाबत आपल्या मित्रांसोबत चर्चा करण्यासाठी देखील उत्सुक असते.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक 7 आणि 10 मध्ये उद्योगांना भूखंड दिले आहेत. त्यामध्ये लघु उद्योगांनी प्राधिकरण प्रशासनाच्या नियमाप्रमाणे कमीतकमी 10 टक्के बांधकाम करून आपले उद्योग चालू केले आहेत. प्राधिकरणाने भूखंडाच्या कमीत-कमी 20 टक्के बांधकामाचा ठराव केला आहे. काही उद्योग अशा प्रकारचे आहेत की, त्यांना मोकळ्या जागेतच काम करावे लागते. त्यांना जादा बांधकामाची आवश्यकता नाही त्यांनाही 20 टक्के बांधकामाच्या नोटिसा काढल्या आहेत त्या रद्द कराव्यात. तसेच, काही उद्योगांनी पूर्वी 10 टक्के बांधकाम परवाना घेऊन रितसर बांधकाम पूर्ण केले आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही घेतला आहे. त्यांना वाढीव बांधकाम करायचे असल्यास त्यांना ज्यादा शुल्क (ए.पी.) भरायच्या नोटिसा आल्या आहेत, त्या रद्द कराव्यात. शुल्काच्या नावाखाली लघुउद्योजकांकडून वाढीव भुर्दंड आकारला जात आहे, असे गाऱ्हाणे लघुउद्योजक संघटनेच्या वतीने मांडण्यात आले.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या वतीने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, शिवाजी साखरे, स्वीकृत संचालक प्रमोद राणे उपस्थित होते. याप्रसंगी पेठ क्रमांक 7 आणि 10 या औद्योगिक परिसरातील समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. संघटनेतर्फे खडके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
औद्योगिक भूखंड हस्तांतरणासाठी प्राधिकरणाने “रेडीरेकनर’चा दर महाराष्ट्र शासनाच्या दरानुसार घेतला आहे. प्राधिकरणाचा सध्याचा नवीन दर 33 हजार 5 रुपये प्रति चौ.मि. असून, एम.आय.डी.सी.चा दर 17 हजार रुपये प्रति चौ.मि. आहे. त्यामुळे उद्योजकांना “स्टॅम्प ड्युटी’ व हस्तांतरण शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागतो. भूखंड हस्तांतरण शुल्क एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आकारण्यात यावे.
तसेच, पेठ क्रमांक 10 मधील अग्नीशमन केंद्रासाठी राखीव जागेवर अग्नीशमन केंद्र सुरु करावे, अथवा ते सुरु करण्यासाठी भूखंड पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावा. सध्या या भूखंडावर महापालिकेने अनधिकृतपणे कचरा विलगीकरण केंद्र सुरू केले असून,विलगीकरण केल्यानंतर उरलेला कचरा जाळला जातो त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. येथे साठवलेल्या कचरामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून या परिसरात कामगारांना काम करणे अशक्य झाले आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डास तयार होत असून डेंगू, मलेरिया सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, तरी महानगर पालिकेला कचरा विलगीकरण केंद्र तातडीने बंद करण्याची सूचना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
व्हीएस न्यूज – श्वान घरात असलं की, संरक्षणाची हमी वाटते. त्याला माणसं देखील ओळखता येतात. मालकाची सेवाही तो चोख बजावतो. श्वानांचे आणि मालकांचे विशेष नाते असते, श्वास विशेष प्रशिक्षित असतात. हे सर्व काही पहायला मिळाले चिंचवडमध्ये आयोजित डॉग शोमध्ये. श्वानप्रेमी मोठ्या हिरीरीने डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. देशभरातून आलेल्या श्वानप्रेमींनी डॉग चॅम्पिअनशिपसाठी कसरत केली. श्वानांची अनोखी दुनिया पाहून पिंपरी-चिंचवडकरही थक्क झाले.
चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे रविवारी (दि. 29) 108 व 109 वा आंतरराष्ट्रीय ऑल ब्रीड चॅम्पियन डॉग शो आयोजित केला होता. या शोमध्ये शहरवासियांनी जवळपास 36 प्रजातीचे श्वान जवळून पहावयास मिळाले. भारतीय श्वानाबरोबर परदेशी प्रजातीचे श्वान देखील यात सहभागी झाले होते. पिपंरी-चिंचवडमधील हा दूसरा डॉग शो होता. सर्वजण वेगवेगळे श्वान पाहण्यात दंग झाले होते. बालचमू तर श्वानांना पाहून खुश झाले. जवळपास 125 वर्षापासून महाराष्ट्रात डॉग शो चे आयोजन केले जात आहे. ही परंपरा पूना केनल फेडरेशनने शहरात जपली आहे.
डॉग शोमध्ये जवळपास 284 पैकी 270 डॉग सहभागी झाले होते. पाच महिन्यांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या श्वानांचा यामध्ये समावेश होता. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लोणावळा, अहमदाबाद, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी जिल्हा व राज्यस्तरातून श्वानप्रेमींनी श्वानासोबत प्रदर्शनास हजेरी लावली होती. काही घरगुती श्वान पाळणाऱ्या श्वानप्रेमींनी देखील मोठ्या हौसेने आपल्या श्वानाला सजवून या शोमध्ये आणले होते. जवळपास 100 किलो वजन असलेले श्वान देखील या स्पर्धेत सहभागी होते. खासकरून महाराष्ट्रात आढळून न येणाऱ्या जातींना पाहण्यासाठी जास्त गर्दी जमली होती. यामधील काही श्वान हे चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशातील होते. यावेळी श्वानाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या शोमध्ये बॉंम्ब शोधणे, रुमाल किंवा वस्तूच्या वासावरून माणसाला गर्दीत शोधणे, बॉडीगार्ड म्हणून काम करणे, चक्रातून उडी मारणे अशा कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बर्फाळ प्रदेशात आढळणारा सायबर हशमी हा डॉग या शोचे विशेष आकर्षण ठरला. श्वानांच्या देहबोलीपासून ते हावभाव आणि शरीराची ठेवण सर्व बाबींचे निरीक्षण करून गुणांकन करण्यात आले, अशी माहिती प्रशिक्षक अंजली वैद्य यांनी दिली. यावेळी पूना केनल कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष संजय देसाई, सचिव एन. एस. पटवर्धन, संजीवनी पांडे उपस्थित होत्या. डॉग शोच्या परीक्षणासाठी डॉ. ओरलीनो होसाका (फिलीपीन्स), शरत शर्मा (गुडगाव), अंजली वैद (नवी दिल्ली) यांची नेमणूक करण्यात आली होती.
रूबाबदार डोळे, करारीबाणा, झुपकेदार केस, लपलप करणारे शरीर, हाताएवढी जीभ आणि माणसाच्या खांद्यापेक्षाही वर झेप घेणारे श्वान डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये विविध जातीचे श्वान होते. बिगल, ग्रेट डेन, हस्की, ब्रस्ट हौंड, बुलडॉग, जर्मन शेफल,राटविलर, बॉस्टन, फ्रेंच बुलडॉग, सायबेरिअर आस्की, च्यावच्याव, डॉबरमॅन, ग्रेडडॉन, अफगान ओन, नेपोलियन मास्टिफ, बुल मास्टिफ असे विविध प्रकारचे श्वान डॉग शोमध्ये लक्षवेधक ठरले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कोणा एकालाही मंत्रिपद मिळाले तरी चालेल, असे उसने अवसान आणणारे भाजपचे दोन्ही आमदार वास्तवात मात्र मंत्रिमंडळ विस्तारात खुर्ची पक्की करण्यासाठी प्रदेश पातळीवर आपापले वजन वापरू लागले आहेत. दुसरीकडे, पक्षात आले आणि मंत्री झाले असे होणार असेल, तर मंत्रिपदाचा निकष काय असा सवाल जिल्ह्यातील अन्य आमदार विचारू लागल्याचे समजते. या सर्व बाबींचा विचार करता पिंपरी चिंचवडला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार की केवळ ‘गाजर’च अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे पुन्हा एकदा बोलले जात असून, या चर्चेने पिंपरी चिंचवडमधील भाजप गोटात नव्याने चाचपणी सुरू झाली आहे. नेमके कोणाचे नाव निश्चित होणार हे स्पष्ट होत नसल्याने, या वेळेस तर आमदारांच्या पहिल्या फळीतील काही पदाधिकाऱ्यांनी यंदाची दिवाळी मुंबईतच साजरी केल्याचेही बोलले जाते. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणा एकालाही मंत्रिपद दिले तरी चालेल, असे भाजपच्या शहरातील दोन्ही आमदारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सांगितले जात आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी राज्यसभेच्या शहरतील खासदाराला केंद्रात मंत्रिपद द्या, असा सूर स्थानिक नेत्यांनी आवळला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिका निवडणुकीत पराभव करणाऱ्या या दोन आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जाणार असल्याच्या वावड्या गेल्या सहा महिन्यांपासून उठल्या आहेत. परंतु, विस्ताराबाबत प्रदेश पातळीवर कोणताच निर्णय होत नसल्याने या केवळ चर्चाच ठरत आहेत. पूर्वी तीन नगरसेवक संख्या असणाऱ्या शहर भाजपला निर्विवाद सत्ताधारी करण्यात या दोन्ही आमदारांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रदेश पातळीवरील नेते शहरात आले की बोलून दाखवितात. पण मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघाला की कॅबिनेटसाठी वेटिंग लिस्ट मोठी आहे, पिंपरी चिंचवडसाठी एक राज्यमंत्री किंवा राज्यमंत्री दर्जा देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगून स्थानिक नेत्यांची बोळवण केली जाते.
दर पंधरा दिवसांनी उठणाऱ्या या चर्चांच्या काहुराने शहर भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जो तो आपल्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार का, याची चाचपणी करीत आहेत. आमचे एवढे समर्थक नगरसेवक आहेत त्यामुळे भंडारा आम्हीच उधळणार, अशा पोरकट पोस्ट काही जण सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांकडून मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी बरोबरची ताकद लावली जात असल्याचे उघड होत आहे.
व्हीएस न्यूज - सचिन साठेंनी माझ्या विरोधात केलेली तक्रार खोटी आहे. मी कोणतीही शैक्षणिक खोटी माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. माझी शैक्षणिक कागदपत्रे निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेली आहेत. सलग ३ वेळा सचिन साठे यांना मतदारांनी नाकारले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा सहा हजाराहून अधिक फरकाने पराभव झाला. त्या नैराश्यातूनच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असल्याची प्रतिक्रिया भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरोधात सांगवी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे. महापालिका निवडणुकीत खोटी शैक्षणिक माहिती कामठे यांनी प्रतिज्ञापत्रात सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केली असल्याची तक्रार साठे यांनी केली आहे. या तक्रारीबाबत बोलताना तुषार कामठेंनी माझ्यावर केलेले आरोप निव्वळ खोटे असल्याचे म्हटले. महापालिका निवडणुकीत सचिन साठे यांचा माझ्याकडून मोठ्या फरकाने पराभव झाला. तो धक्का त्यांना सहन झाला नसावा, सगल तीन वेळा मतदारांनी त्यांना नाकारल्याने नैराश्य आले असल्याची टीका त्यांनी केली. सचिन साठेंच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहर 'काँग्रेस मुक्त' झाले. त्यामुळेच ते आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. साठे यांना काय तक्रार करायची आहे ती त्यांनी करावी मी त्यासाठी कायदेशीर लढा द्यायला तयार आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून न्यायालयीन लढाईत जो निर्णय होईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रीया तुषार कामठे यांनी दिली.
व्हीएस न्यूज - वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. त्याची पहिली सुरुवात पर्यायी दोन रस्त्याने करण्यात येणार आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे १२ आणि १८ मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत,अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'वाकड आणि हिंजवडी भागातील वाहतूक कोंडीचा विचार केल्यास प्रमुख रस्त्यांना जोडणारे पर्यायी मार्ग तयार करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर अनेकदा चर्चा केल्यानंतर विकास आराखड्यात अनेक पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. अशा सर्व रस्त्यांची माहिती घेतल्यानंतर ते विकसित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रयत्नातून हिंजवडीकडे जाण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यासोबत अनेकदा बैठका घेऊन आणि चर्चेतून हे दोन रस्ते तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पुर्तता करण्यात आली आहे.'
हिंजवडीकडे जाण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. हे दोन्ही रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आसपासच्या परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आगामी काळात या भागातील प्रमुख रस्त्यांना पर्यायी रस्ते विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - शिक्षणाची रचना करताना शहरी व ग्रामिण भागाचा स्वतंत्र विचार व्हावा. आगामी शंभर वर्षांनी समाज कसा असेल? त्याला सामोरे जाण्यासाठी आजचे ‘हे’ विद्यार्थी सक्षम असावेत अशी शिक्षण पध्दती असावी. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच भारतात मुलभूत ते अत्याधुनिक अशा सर्वच क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. तंत्रज्ञान चांगले का वाईट हे वापरणाराच्या बुध्दीवर अवलंबून असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग सतत वाढत आहे. त्याचा प्रभाव देखील माणसांवर वेगाने वाढत आहे. पध्दतीत बदल होण्याचा काळ कमी कमी होत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या रचनेत म्हणजेच ज्ञानरचनेत दूरगामी टिकेल अशी शिक्षण पध्दती शोधून काढावी लागेल. असे मार्गदर्शन जेष्ठ शास्त्रज्ञ राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) झाला. यावेळी समारोप सत्राच्या कार्यक्रमात अनिक काकोडकर, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक प्रा. रमेश पानसे आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
काकोडकर म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही खात्यात ‘बालशिक्षण’ येत नाही. त्या दुर्लक्षित परंतू अत्यंत आवश्यक असणा-या क्षेत्रात महाराष्ट्र बालशिक्षण परिषद अनेक वर्षांपासून काम करते हे कौतुकास्पद आहे. पाश्चिमात्य देशात शिक्षण, मेंदू, तंत्र, तंत्रज्ञान या विषयी अधिक संशोधन झाले आहे. मात्र भारतात मेंदू या विषयावर संशोधन करणारे विद्यार्थी देखिल मिळत नाही हि चिंतेची बाब आहे. मेंदूचा विकास आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो. असेही मागदर्शन अनिल काकोडकर यांनी केले.
एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, मानवी बुध्दीमत्ता विचारांची निर्मिती करु शकते, तर तंत्रज्ञान उत्पादनांची निर्मिती करु शकते. प्रज्ञा आणि प्रतिभेची निर्मिती करणे म्हणजे ज्ञान होय. तंत्रज्ञानाने माणसाला यंत्र करता आले. परंतू माणसामध्ये असणारी सर्जनशिलता, विवेक, भावना, निर्णयक्षमता यंत्रामध्ये आणता आली नाही. आपल्याला अजून मानवी मेंदूचे, बुध्दीमत्तेचेच पुर्ण आकलन झालेले नाही. मानवी बुध्दीमत्तेचा कृत्रिम अविष्कार अद्याप शक्य नाही. मानवी बुध्दीमत्ता आणि संगणची न मानवी बुध्दीमत्ता एकमेकाच्या विरुध्द टोकाला आहे. मानवी मेंदू जे करु शकतो ते तंत्रज्ञान, संगणक, गुगल करु शकत नाही. परंतू जे काम अनेक माणसांना, संस्थांना, सरकारला एकत्र येऊन देखिल करणे शक्य नाही ते काम संगणक त्याच्या आज्ञावली, प्रणाली नूसार क्षणार्धात करु शकते. मेंदूचे आकलन आणि संगणकाचे तंत्रज्ञान एकत्र येऊन अनेक नविन अविष्कार आगामी काळात जन्माला येतील. त्यातून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, जागतीक तापमान, शिक्षण संपत्ती, जीवांचे रक्षण, ऊर्जेचा प्रश्न, सोलर, इलेक्ट्रिक कारची निर्मिती असे अनेक जटील प्रश्न सुटण्यास मदत होईल. असा आशावाद विवेक सावंत यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनात बालकांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. तो खालील प्रमाणे
1) मानवाचा भविष्यकाळ हा बालकात साठवलेला असतो. कल्याणकारी मानवी जीवनाचे संचित बालकाच्या रुपाने मानवाच्या प्रत्येक पिढीत अस्तित्वात असते. मानवाच्या हितासाठी या पुढच्या पिढीचे जतन करणे, तिची जोपासना करणे आणि तिला नवजीवनाला तयार करणे हे प्रत्येक प्रौढ पिढीचे आद्य कर्तव्य असते.
2) संपूर्ण प्राणीविश्वात फक्त मानवाचे बालक दीर्घकाळ परावलंबी असते, ही निसर्गदत्त बाब विचारात घेऊन, या परावलंबित्वाच्या काळात प्रत्येक बालकाचे संरक्षण करणे व त्यास आवश्यक ती मदत देऊन विकासप्रवण करणे, हे प्रत्येक कुटूंबाचे आद्दय कर्तव्य असते.
3) प्रत्येक बालकाला त्याच्या बाल्यावस्थेत, बालकाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. बालकाचे बाल्य हरवणार नाही याची काळजी समाजाने घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचे आचार, विचार, श्रम, विद्या यांचे प्रौढत्व बालकावर लादून त्याचे दमन व शोषण होणार नाही हे समाजाने व सरकारने पाहिले पाहिजे.
4) जन्मल्यापासून प्रत्येक बालक हे वयाने, शक्तीने, ज्ञानाने व अनुभवाने लहान असले तरी ते म्हणजे एक संपूर्ण मनुष्य आहे, त्याला त्याचे शरीर, मन आहे, त्याला त्याच्या भावना आहेत, त्याची कल्पनाशक्ती आहे, एवढेच नव्हे तर त्याची स्वतंत्र अशी तर्कशक्ती आहे याची दखल,कुटूंबातील व समाजातील सर्वांनी घेतली पाहिजे.
5)प्रत्येक बालकाला उपजत काही लाभ मिळालेला असतो. हे लक्षात घेऊन त्याच्या उपजत बुध्दिमत्तांचा शोध घेण्यासाठी त्याला अनुभवयुक्त शैक्षणिक संधी प्राप्त झाल्या पाहिजेत, त्याच्या बुध्दिमत्तांनुसार वाढण्याचा व विकासाच्या संधी त्याला मिळाल्या पाहिजेत.
6)प्रत्येक बालक म्हणजे एक स्वतंत्र नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे त्याला स्वत:च्या क्षमतांनुसार, स्वत:चा कल लक्षात घेऊन प्रगती करण्यास वाव मिळाला पाहिजे.
7)प्रत्येक बालकाला त्याच्या कुटूंबात, समाजात व विश्वात समान स्थान व समान मान मिळण्याचा अधिकार आहे. धर्म, वंश, वर्ग, जाती, लिंग व स्थान यांवरून होणा-या भेदांपासून बालकाचे जीवन अलिप्त राहिले पाहिजे. कुटूंबातील व समाजातील सर्व सुख सोयींमध्ये बालकाचा समान वाटा मानला व राखला गेला पाहिजे.
8) समाजातील एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रत्येक बालक आदरास प्राप्त आहे. निसर्गाने त्याला बहाल केलेले स्वातंत्र्य जपण्याचा हक्क आहे आणि हेच त्याच्याप्रती इतरांचे कर्तव्य आहे.
9)बालकाच्या उपजत बुध्दिमत्ता, नैसर्गिक क्षमता व बालसुलभ इतर गरजा विचारात घेऊनच, बालकासाठी शिक्षणव्यवस्था निर्माण झाल्या पाहिजेत. तेथे स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे, त्याच्या स्वयंप्रेरणेला, स्वयंस्फूर्तीला आणि स्वयंशिस्तीला पूर्णांशाने वाव मिळाला पाहिजे.
10) बालकाच्या बौध्दिक, भावनिक आणि एकूण विकासक स्वातंत्र्यातच बालकात सुप्त असलेल्या प्रौढाचे स्वातंत्र्य अनुस्युत आहे. यातच राष्ट्राचे भवितव्य सुखरुप आहे आणि मानवी जीवनाचे विकासक स्वातंत्र्य अबाधित आहे. याची खूणगाठ प्रत्येक माणसाने आपल्या मनाशी बांधली पाहिजे. बालकाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक माणसाने झटले पाहिजे.
अहवाल वाचन आणि अधिवेशनाचा आढावा संस्थेच्या माजी सचिव आदिती नातू, स्वागत प्रशांत शितोळे, सुत्रसंचालन मेघना बाक्रे आणि आभार नजीर जमादार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - निगडी येथिल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयटी क्षेत्रातील अग्रगण्य प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीचा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अभियांत्रिकी पदवी मिळविणा-या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत असे वार्षिक 26 लाख रुपयांचे भरघोस पॅकेज देणा-या डायरेक्टी कंपनीच्या या रोजगार मेळाव्यात विद्यापीठाअंतर्गत शंभर महाविद्यालयातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. उत्तम प्रोगॅमिंग कौशल्य असणाऱ्या अभियंत्यांची हि कंपनीची निवड करणार आहे. ऑनलाईन मुलाखतीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष मुलाखतीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.
या रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर प्रा. हरिष तिवारी, पद्माकर विसपुते यांनी सहकार्य केले. आयोजनात ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विजय टोपे, श्रेणीक ललवाणी, सायली पुजारी,मंगेश काळभोर, श्रीधर, सौम्या आदींनी सहभाग घेतला होता.
व्हीएस न्यूज - मुलांमध्ये निरीक्षण शक्ती वाढविणे, सर्जनशीलता जागृत करणे यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षकांनी पालकांसह एकत्रीत प्रयोग करावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ग्रहण शक्ती वाढते. मुलांना नुसती साधनं उपलब्ध करुन देऊन काही साध्य होणार नाही. त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी वेळ देणेही महत्वाचे आहे. व्हॉट्सअप, फेसबुक अशा नवतंत्रज्ञानाबाबत शिक्षकांनी भिती बाळगू नये. या तंत्रज्ञानातून अनेक चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवता येतील. बहुवर्ग अध्यापन पध्दती शक्य तेथे वापरावी. यातून वेळ वाचेल व अनुभवांची देवाणघेवाण करता येईल. तंत्रज्ञान हा पर्याय नसून एक जोड आहे. असे मार्गदर्शन जेष्ठ बाल शिक्षण तज्ञ सुचेता फडके यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्याच्या दुर-या दिवशीच्या ‘तंत्रज्ञान वापराचे माझे प्रयोग’ या चर्चासत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुचेता फडके बोलत होत्या. यावेळी अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष प्रशांत शितोळे, मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सुर्यवंशी, प्रमोद शिंदे आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
मृदुला धोंगडे म्हणाल्या की, मोबाईल नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन पालकांशी दुहेरी संवाद वाढवावा. याबाबत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करुन पाल्याच्या शिक्षणासाठी याचा फायदा होतो का? हे तपासावे. पालकांकडून पाल्याला मिळालेले अनुभव विचारात घेऊन त्याचा संकल्पनांचे दृढीकरण करावे. मुलांना शाळेत शिकवताना आलेले अनुभव पालकांनी गप्पांच्या माध्यमातून समजून घ्यावेत आणि ते पालक सभेत किंवा व्हॉट्सअपव्दारे इतर पालकांना कळवावे. व्हॉट्सअप, फेसबुक, ऑडीओ, व्हिडीओ चित्रफितीचा वापर करुन विद्यार्थ्यांची आकरण शक्ती वाढविण्यासाठी अनेक छोटे मोठे प्रयोग करणे सहज शक्य आहे. यातून मुल शिकण्यासाठी वा अनुभव संपन्न होण्यासाठी फक्त शाळेवर अंबलबूंन न राहता पालकांना आपल्या पाल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण विस्तारीत होईल. पालक, शिक्षक संवादाला तंत्रज्ञानाची जोड देऊन वैचारिक संवाद वाढविता येईल. असे धोंगडे म्हणाल्या.
संजय अष्टेकर म्हणाले की, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार बालकेंद्री शिक्षणासाठी ज्ञानरचनावादी संकल्पना मुळ धरु लागली आहे. यामध्ये बहुवर्ग अध्यापन पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे. यात ज्ञानरचनावादी उपक्रमाचा वापर केल्यास मर्यादित वेळेत कृतीयुक्त, आनंददायी व तणावमुक्त शिक्षण देता येणे शक्य आहे. यातून विद्यार्थ्यांना स्वअनुभवातून शिकण्याची संधी मिळते. असे अष्टेकर यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002