व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्याविरोधात बनावट कागदपत्रांद्वारे निवडणूक लढवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामठे यांनी १२ वी पास असल्याचा बनावट दाखल सादर केला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, नगरसेवक कामठे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाले आहे. कामठे यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत कामठे यांनी १२ वी पास असल्याचा बनावट दाखला दिल्याचे निष्पन्न झाले. तुषार कामठे यांनी डेक्कन येथील एका महाविद्यालयातून ११ वी नापास असताना १२ वी पास असल्याचा बनावट दाखला बनवून तो सांगवी येथील घोलप महाविद्यालयात सादर करुन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी हाच दाखला निवडणुकीच्या काळात सादर केला होता.
तुषार कामठे हे पिंपळे निलख येथील प्रभाग क्रमांक २६ (ब) येथून निवडणुकीला उभे राहिले होते. या निवडणुकीत ते काँग्रेसचे सचिन साठे यांच्याविरोधात मोठ्या फरकाने निवडून आले होते.
दरम्यान, जनतेची आणि महानगरपालिकेची दिशाभूल करून कामठे निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी साठे यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील दवाबाजार येथे प्रेमप्रकरणातून तरुणाचा दगडाने ठेचून खून केलेल्या दोघा संशयित आरोपींच्या निगडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अर्जुन जेटीथोर व सूरज निसर्गन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज खांबे या तरूणाचे एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. या तरूणीचे लग्न अन्य ठिकाणी जमले होते. परंतु, त्यानंतरही ते दोघे एकमेकांना भेटत होते. मंगळवारी (दि. 24) रात्री दहा वाजता सुरज खांबे हा तरूणीशी बोलत बसला होता. त्यावेळी पाठीमागून येऊन आरोपी अर्जुन आणि सूरज निसर्गननी सुरज खांबेला दगडाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत पोलीस अधिकाऱ्यासह हवालदाराला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी 50 हजाराची लाच स्विकारताना शुक्रवारी (दि. 27) ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस चौकीतील सहाय्यक निरीक्षक सोमनाथ नाळे (वय 42) आणि पोलीस कॉन्स्टेबल वैभव चौधरी (वय 31) यांनी एका तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. भोसरी पोलीस ठाण्यात घरगुती वादातून एक तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरील कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे अधिकारी आणि कॉन्स्टेबलच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने आज सापळा रचला.
तक्रारदार दुपारी एकच्या सुमारास 50 हजार रुपये घेऊन भोसरी पोलीस चौकीत आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना हातोहात पकडले. अवघ्या तीन दिवसातच लाचखोरीची दुसरी घटना समोर आल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.
व्हीएस न्यूज – शहरातील उघड्यावर शौचास बसणारी 52 ठिकाणे महापालिकेने निश्चित केली असून, त्या ठिकाणी सुमारे 244 “पोर्टेबल टॉयलेट’ उभारण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला.
स्वच्छ भारत अभियानतंर्गत पिंपरी-चिंचवड शहर हागणदारीमुक्त व्हावे, याकरिता महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियान विभागाकडून प्रयत्नाची पराकाष्टा सुरु आहे. परंतु, शहरातील काही ठिकाणे नागरिकांना किती प्रबोधन केले,तरीही ते लोक रस्त्यावरच्या कडेला उघड्यावरच शौचास बसत होते. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने “पोर्टेबल टॉयलेट’ उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये शहरातील आठही प्रभागात उघड्यावर शौचास बसणाऱ्या 52 ठिकाणी 244 “पोर्टेबल टॉयलेट’ बसविण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हागणदारी मुक्त शहरासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सुरू आहे. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत साडेसात हजार वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी,यासाठी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत आहे. उघडयावर नागरिक शौचास बसतात, त्या 52 ठिकाणे “गुड मॉर्निंग’ पथकाने शोधून काढली आहेत. यामध्ये रेल्वे स्थानक परिसर, रस्ते, मोकळ्या जागा,नाल्यांच्या जवळ, झोपडपट्टी आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास बसतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उघडयावर न बसता शौचालयांचा वापर करावा, यासाठी महापालिकेने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले. यासाठी शहरात”पोर्टेबल टॉयलेट’ बसविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत “अ’ क्षेत्रीय कार्यालयात 50, “ब’ मध्ये 44 , “क’मध्ये 65 , “ई’ मध्ये 45 आणि “फ’क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 40 अशी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारलेली आहेत.
व्हीएस न्यूज – श्वानप्रेमीं मंडळींसाठी येत्या रविवारी (दि.29) चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय “ऑल ब्रीड चॅम्पीयन डॉग शो’ आयोजित करण्यात आला आहे. या “डॉग शो’मध्ये शहरवासीयांना 30 ते 35 प्रजातींचे श्वान पाहण्याची संधी मिळणार आहे.
वाल्हेकरवाडी रोड येथील आहेर गार्डन येथे सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा “शो’ होणार आहे. डॉ. ओरलीनो होसाका (फिलीपीन्स) शरत शर्मा (गुडगाव), अंजली वैद (नवी दिल्ली) असे आंतरराष्ट्रीय पातळीचे परीक्षक, प्रशिक्षक, डॉक्टर्स व श्वानप्रेमी यांचा सहभाग यामध्ये असणार आहे.
मानव आणि श्वान यांच्यातील मैत्री वाढविण्यासाठी “डॉग शो’ सारखे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. याच हेतुने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी जर्मन शेफर्ड, बुलडॉग, हस्की, ब्रस्ट हौंड, बीगल अशा 30 ते 35 जातीचे300 पेक्षा जास्त श्वान या “शो’मध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती “शो’च्या समन्वयक संजीवनी पांडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – संजय लीला बन्साळी दिग्दर्शित “पद्मावती’ चित्रपटावर शुक्लकाष्ठ ओढावले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या दृश्यांमध्ये राजपूत समाजासाठी देवीसमान असलेल्या राणी पद्मिनींबाबत अश्लील दृश्य दाखविण्याचा प्रयत्न भन्साळी यांनी केल्याचा आरोप राजपूत समाज संघटनेने केला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपट राजपूत समाजातील जाणकारांना दाखवून प्रदर्शित करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजपूत समाजाने दिला आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजपूत समाज संघटनेचे शहराध्यक्ष शिवकुमार बैस, राजपूत महामोर्चाच्या पिंपरी-चिंचवड प्रमुख नीता परदेशी यांनी शुक्रवारी (दि. 27) ही माहिती दिली. यावेळी युवा राजपूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गिरासे, अनिल बैस, दीप्ती राजपूत, जगदीश सिंग भानूजा, अनिल सिंह बैस आदी उपस्थित होते. राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यात पद्मावती चित्रपटाचे एकही पोस्टर अथवा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना रविवार (दि. 29 ) निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात येत आहे. राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून सरकारी शिष्टमंडळाने राजपूत समाजाला चित्रपट दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या 16हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता. अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे.
यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित केल्यास भन्साळी यांना पुढील परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांच्या नेतृत्वाखाली राजपूत समाज संघटनेच्या वतीने राज्यस्तरावर किरण सिंह ठाकूर, नीता परदेशी, शिवकुमार बैस, श्रीराम परदेशी, अनिल सिंह बैस, किशोर सिंह गिरासे, दीप्ती राजपूत,करनी सेना जगदीश सिंह भाणुजा व इतर राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. 24 ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात रावसाहेब दानवे, जयकुमार रावल, सुजित सिंह ठाकूर, रणजीतसिंह पाटील गृह राज्य मंत्री यांचा समावेश आहे. सरकारी शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिले की, पद्मावती हा चित्रपट राजपूत समाजाला दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार नाही. सरकारी शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिल्याने बुधवार (दि. 25 ऑक्टोबर) रोजी मुंबईत भाजप कार्यालय ते मंत्रालय असा काढण्यात येणारा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
व्हीएस न्यूज – सुधारित नियामावलीमध्ये प्राधिकरण आणि महानगर विभागाचा समावेश केल्यामुळे प्राधिकरणमधील 22 हजार अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याचे पुनरावलोकन करण्याकरिता पुर्नसर्वेक्षण विकास आराखडा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या अंतिम रिअलायमेंट अहवालासाठी नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी गती द्यावी, अशी अपेक्षा घर बचाव संघर्ष समितीकडून वर्तविण्यात येत आहे.
अनधिकृत घरे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाने 21 जुलै 2017 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2017 रोजी सुधारित बाबी समाविष्ट करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्यामुळे रिंगरोड बाधितांना घरे अधिकृत होण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. मागील 30 वर्षांपासून रिंगरोड बाधित तीन हजार रहिवासी हक्काच्या घरासाठी वाट पहात आहेत. त्याचप्रमाणे 100 फुटावरच 45 मीटरचा स्पाइन रोड असताना व 50मीटरचा रावेत-पुनवळे रोड काही मीटर अंतरावर अस्तित्वात असताना सदरचा एचसीएमटीआर 30 मीटरचा रस्ता दाट लोकवस्तीतून बनवणे घटनाबाह्य असल्याचेही समितीने म्हटले आहे.
घर बचाव संघर्ष समितीचा विकासाला आणि रिंगरोड प्रकल्पाला विरोध नाही. परंतु नागरिक व प्रशासनाचा सुवर्णमध्य काढून प्रकल्प जरूर राबवावा. रिंगरोडसाठी 20 टक्के जागेचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्या जागेकरिता अध्यक्षांनी पर्यायी मार्गाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व नवीन कायद्यान्वये घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु करावी, अशी अपेक्षा घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेतील वाहन दुरूस्तीच्या ठेक्यात गोलमाल झाला असून तब्बल पाच कोटी रूपये वाढीव खर्चास स्थायी समितीने मान्यता दिल्याची तक्रार माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केली आहे. टक्केवारीच्या या उद्योगात सर्वपक्षीय नेते, अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदारांमध्ये संगनमत असून सर्वानी मिळून जनतेच्या पैशांवर दरोडा टाकला असून स्थायी समितीच्या कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत वाहन दुरूस्तीच्या कामातील वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. तत्पूर्वी, कार्यशाळा विभागाचे प्रमुख प्रवीण तुपे यांची सदस्यांनी झाडाझडती घेतली आणि याप्रकरणी लेखी खुलासा सादर करण्याचे आदेशही तुपे यांना देण्यात आले. यासंदर्भात, भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पिंपरी पालिकेची स्वतंत्र कार्यशाळा असतानाही कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभाल व दुरूस्तीचे काम ठेकेदारी पद्धतीने करण्यात येते. तीन वर्षांकरिता असलेल्या या कामासाठी श्यामराव गॅरेज यांना दोन, तर बालाजी गॅरेज यांना एका कामाचा ठेका देण्यात आला आहे. श्यामराव गॅरेज यांना दोन कामांसाठी 73 लाख 63 हजार रूपये प्रतिवर्षांसाठी आणि बालाजी गॅरेज यांना 33 लाख 94 हजार रूपये प्रतिवर्षी या दराने कामाचे आदेश देण्यात आले. ही तीनही कामे मिळून वाहन दुरूस्तीच्या कामाचा ठेका प्रतिवर्षी एक कोटी सात लाख रूपये देण्यात आला. प्रभागरचनेत बदल झाल्याने महापालिकेची खासगी कंपनीकडे असणारी वाहनेही परत पालिकेकडे आली आहेत.
या वाहनांची देखभाल दुरूस्तीही पालिकेला करावी लागली. त्यासाठी पहिल्या वर्षांकरिता एक कोटी 72 लाख रूपये तर दुसऱ्या वर्षांसाठी तीन कोटी 12 लाख रूपये वाढीव खर्च आला आहे. या दोन्ही खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सत्ताधारी नेते, पालिकेचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आदींचे यामध्ये संगनमत असून करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. या संपूर्ण प्रकरणासह गेल्या सात महिन्यात स्थायी समितीच्या कारभाराची चौकशी करावी आणि त्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
व्हीएस न्यूज - बालशिक्षणाचे तंत्र समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्यास बाल शिक्षण सर्वदूर पोहचेल. यासाठी शिक्षकांचे व्यावसायिक प्रबोधन व विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरु वसुधा कामत यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान या विषयावर नवी सांगवी येथे तीन दिवसीय राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 27) उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात कामत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ बालशिक्षण तज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका बियाणी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, डॉ. दिनेश नेहेते, मेघना बाक्रे, नझीर जमादार, विशाखा देशपांडे, नीता सणस आदी उपस्थित होते.
वसुधा कामत म्हणाल्या की, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या भारतीय शिक्षण धोरणानुसार मुलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे. यासाठी अध्ययन योग्य वातावरण शाळेत तयार केले पाहिजे. मुलं ही सर्वांगाणे शिकत असतात. स्पर्श करणे, वास घेणे, हालचाली करुन, खेळून समजून घेणे यातून 6 वर्षांपर्यंत मुलांच्या 75 टक्के मेंदूचा विकास होतो. मोबाईल तंत्रज्ञान वाईट नाही त्याचा योग्य वापर अपेक्षित आहे. या वयोगटातील मुलांना “इको फ्रेन्डली’ आणि“युजर फ्रेन्डली’ विकसित केले पाहिजे. त्याचे प्रशिक्षण पालकांना व शिक्षकांना देणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन कामत यांनी केले.
अलका बियाणी म्हणाल्या की, विज्ञानाच्या संकल्पना तंत्रज्ञानातून समजून घेता येतील. चित्रातून, रंगातून आणि कृतीतून नवीन तंत्रज्ञानाने रचनावादी शिक्षण पध्दती अवलंबिली पाहिजे. शेणखत कसं तयार होतं. हे संगणकातून समजून घेता येईल. परंतु, ते बनविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. येणाऱ्या काळात मानवी बुद्धिमत्तेच्या पलिकडील कामे संगणक करु लागेल. याचा उपयोग करुन घेता आला पाहिजे. शिक्षकांचे प्रयत्न, पालकांची मानसिकता, शिक्षण संस्था संचालकांची इच्छा शक्ती, शासनाचे पूरक धोरण यांची एकत्रित सांगड घालून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून धोरण आखले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांची शारीरीक, मानसिक जडणघडण उत्तमरित्या होईल. फक्त नोकरी देणारे शिक्षण न राहता मुल्याधिष्ठित शिक्षण व आर्थिक स्वावलंबन यातून साध्य करता येईल, असे मतही बियाणी यांनी व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान ही अधिवेशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. स्वागत प्रशांत शितोळे, सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. आभार मेघना बाक्रे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पुणे जिल्हा क्रीडा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एस.एम. जोशी महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने मुलांच्या गटात अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेते पद पटकाविले.
मुलांच्या गटात अंतीम सामन्यात निगडीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) संघाने भोसरीतील आरजेएसपीएम संघावर सरळ सेट 3/0 गुण मिळवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. वैयक्तिक श्रेणित पीसीसीओईचे खेळाडू दिपांशु नागपाल व रोहन चिंचकर यांनी अनुक्रमे 6 व 7 वे स्थान प्राप्त केले व त्यांची आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या संघात निवड झाली. या स्पर्धेत सांघिक श्रेणीमध्ये पुणे जिल्ह्यातील तीस महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला. विजयी संघातील खेळाडू दिपांशु नागपाल, रोहन चिंचकर, कपिल मोरे, मोहित दळवी, यश पैठणकर, अमेय जोशी व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर यांनी अभिनंदन केले.
व्हीएस न्यूज - शालेय विभागीय बॉक्सींग स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील १३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ३ ते ५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पुण्यातील सर्व्हे नं.१९१ ग्यानबा मोझे हायस्कूल समोरील विभागीय क्रीडा संकुल, येरावडा येथे होणार आहे. १४, १७, १९ वर्षाखालील मुले-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सींग स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथे पार पडल्या. या स्पर्धेतून १३ खेळाडूंची निवड झाली असून खेळाडूंनी पदके मिळविली आहे.
सुवर्णपदक विजेते खेळाडू - चेतन जाधव –श्रीमती एस.एस.अजमेरा स्कूल, कुणाल मोरे – एच.ए.स्कूल, पिंपरी. नितीन रणखांबे – इंदिरा हायस्कूल, पिंपरी. प्रतिक गोडगे, अभिषेक यादव, रझा घोषी, आकाश हाडके –डी.वाय.पाटील कॉलेज, पिंपरी. कृष्णा चितळे – जयहिंद स्कूल, पिंपरी.
मुलींचा गट – मिनाश्री राजपूत – जयहिंद स्कूल, पिंपरी. स्नेहल तावरे – नोवेल एंटर नॅशनल ज्यू कॉलेज. नेहा काकडे – नव महाराष्ट्र कॉलेज, पिंपरी. शितल पोळ – बी.जे.एस.संतु नगर, पिंपरी. श्वेता पवार – जयहिंद स्कूल, पिंपरी. संस्कृती सुर्वे – डी.वाय.पाटील, कॉलेज पिंपरी.
रौप्य पदक विजेता – घ्रहित चितळे – जयहिंद कॉलेज, पिंपरी. कास्य पदक विजेते खेळाडू – संतोष जमादार, ओमकार जाधव, तन्मय जाधव – एच.ए.स्कूल,पिंपरी. अनिकेत तनपूरे – राजमाता कॉलेज, भोसरी.
या सर्व मुष्टीयुद्ध खेळाडूंना मार्गदर्शन श्री. बळवंत सुर्वे यांचे लाभले .
व्हीएस न्यूज - बालशिक्षणासाठी अंगणवाडी, बालवाडी ऐवजी खेळवाडी, शिशुवाडी विकसीत केली पाहिजे. वाढत्या वयाबरोबरच परावलंबीत्वाकडून स्वावलंबीत्वाकडे वाटचाल होत असते. मुलांना सामाजिक स्वावलंबनाचे धडे समजदार प्रौढांकडून पालकांकडून मिळणे आवश्यक आहे. आकलन करुन घेण्याचा मार्ग हा नेहमीच कृतिशील स्वयंशिक्षणातून पुढे जातो. योग्य वेळी, योग्य वयाशी सुसंगत अशा कृतिशील अनुभवातून मुले ज्ञान आत्मसात करतात. तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही असा मधला मार्ग शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ बाल शिक्षण तंज्ञ व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक प्रा. रमेश पानसे यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्य अधिवेशन आयोजित केले आहे. त्याच्या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात शुक्रवारी (दि. 27)बीजभाषण करताना पानसे बोलत होते. यावेळी उद्घाटक एसएनडीटी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु वसूधा कामत, अध्यक्षा अलका बियाणी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, डॉ. दिनेश नेहेते, मेघना बाक्रे, नझीर जमादार, विशाखा देशपांडे, नीता सणस आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
पानसे म्हणाले की, टीव्ही, मोबाईल, संगणक या नविन आकर्षक तंत्रज्ञानाविषयी समाजातील सर्वच थरात खूप मोठे आकर्षण आहे. बालशिक्षणाचे शास्त्र आणि या नव्या तंत्रज्ञानाची उपयुक्ततता याची सांगड कशी घालायची हा मोठा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. बालशिक्षण म्हणजे शालेयपुर्व वय तीन ते सहा या वयोगटातील मुले. त्यांच्यासाठी अंगणवाडी, बालवाडी ऐवजी खेळवाडी, शिशुवाडी विकसीत केली पाहिजे. तसा अभ्यासक्रम बालशिक्षण परिषदेने तयार केला आहे. सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे शारीरिक व भावनिक विकास, सुक्ष्म व मोठ्या स्नायुंचा विकास, भावनिक व भाषेचा विकास अशा विविध क्षमतांच्या विकासाचे वय असते. या काळात वेगाने मेंदूमध्ये जडणघडण होत असते. त्यासाठी नैसर्गिक प्रक्रियांना साजेसे अनुभव त्यांना सातत्याने मिळावे लागतात. वाढत्या वयाबरोबरच परावलंबीत्वाकडून स्वावलंबीत्वाकडे वाटचाल होत असते. त्यासाठी त्याला सामाजिक स्वावलंबनाचे धडे समजदार प्रौढांकडून पालकांकडून मिळणे आवश्यक आहे. मावळत्या शतकाने शास्त्रज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा विकास आणि यामुळे बदललेली जीवनशैली आपल्याला बहाल केली आहे. त्यामुळे साहजिकच या तिन्हींची सांगड घालून बालशिक्षणाची नवी शास्त्रीय मांडणी करणे गरजेचे आहे. यामध्ये बालकस्नेही दृष्टीकोण, बालविकासयोग्य दृष्टीकोण, भाविकाल दृष्टीकोण आणि युक्त तंत्रज्ञान दृष्टीकोण ठेवून ‘बालशिक्षण तंत्र व तंत्रज्ञान’ मध्यवर्ती ठेवून काम केले पाहिजे. बालशिक्षणात मेंदूविकासाला पूरक शिक्षण, अनुभव प्राप्ती आणि कृतिशील स्वयंम शिक्षणाचे अनुभव वयाला साजेसे असले पाहिजे. मानवी मेंदू हा उत्क्रांतिक्षम आहेत. भाषा एक त्याचे उदाहरण आहे. भाषा ही एक सामाजिक गोष्ट मानवी मेंदूत जाऊन बसली आहे. तंत्रज्ञानाच्या वर्षांनुवर्ष सरावनंतर तंत्रज्ञानही मेंदूमध्ये जागा पटकावून बसेल, आणि मग तंत्रज्ञानाचा वापरही मेंदू नैसर्गिक म्हणून स्विकारेल. त्याला शेंकडो वर्ष लागतील. मेंदू हा पंचेद्रियांच्या सहाय्याने शिकत असतानाही ‘पाहून शिकणे’ म्हणजे ‘दृष्टीने शिकणे’ मेंदूला अधिक प्रभावी वाटते. त्यामुळे टीव्ही, मोबाईल, संगणक या साधनांचा बालशिक्षणासाठी प्रभावी उपयोग होऊ शकतो मात्र याची मोठी मर्यादा आहे. आकलन करुन घेण्याचा मार्ग हा नेहमीच कृतिशील स्वयंशिक्षणातून पुढे जातो. योग्य वेळी, योग्य वयाशी सुसंगत अशा कृतिशील अनुभवातून मुले ज्ञान आत्मसात करतात. तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही असा मधला मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञान हे लहान मुलांच्या बाबतीत मेंदू घातक ठरु नये. मुलांना मिळणा-या वास्तव अनुभवाची जागा तंत्रज्ञानाने घेऊ नये. तसेच तंत्रज्ञानाचे स्वरुप शक्य तेवढे कृतिशील आणि विशिष्ट वयाला साजेसे असावे. असेही पानसे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान’ ही अधिवेशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. स्वागत प्रशांत शितोळे, सुत्रसंचालन सुप्रिया अत्रे आणि आभार मेघना बाक्रे यांनी मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002