व्हीएस न्युज - विश्रांतवाडी येथील एका शाळेत भर वर्गात विद्यार्थ्याचे केस कापल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षिका यांच्यावर बाल न्याय अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील एका शाळेत पिडीत मुलगा हा सहावीच्या वर्गात शिकतो. त्याचे केस वाढल्यामुळे त्याला अनेक वेळा केस कापून येण्यास सांगितले होते. पण, तो केस कापून येत नव्हता. तसेच, त्याच्या पालकांना देखील नोटीस पाठविण्यात आली होती. पण, ते देखील शाळेत आले नाहीत. त्यामुळे १७ जुलै रोजी भर वर्गात शिक्षिकेने विद्यार्थ्याचे केस कापले होते. त्याचा राग मुलाला आला होता.
घडलेला हा सर्व प्रकार विद्यार्थ्यानं पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे त्या दिवशी तक्रार दिली. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी चौकशी करून मुख्याध्यापिका, शिक्षिका यांच्यावर गुन्हा दाखल केला असून केस कापणाऱ्या शिक्षिकेला शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - सावित्री बाई फुले सभागृह पिंपरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी "नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स एन्ड डेव्हलपमेंट कॅर्पोरेशन" , 'स्किल कौन्सिल ऑफ ग्रीन जॉब ' , व " कॅमशाला (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पिंपरी चिंचवड म. न. पाच्या आरोग्य विभागामध्ये जे सफाई कर्मचारी काम करतात त्यांना काम करताना स्वतःच्या आरोग्याची व सुरक्षतेची काळजी कशी घ्यावी यासाठी दि. ९ जुलै ते १३ जुलै असे ५ दिवस प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये कॅमशालाचे प्रमुख मनोहर क्रिष्णा , कॅमशालाचे जनरल मॅनेजर ओपेशन्सस आणि स्किल कौन्सिल ऑफ ग्रीन जॉब चे प्रमाणित ट्रेनर स्मिता सिंग , शिवराज जाधव यांनी मार्गदर्शन केले. १३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड मनपा चे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्तिथीत १०० हुन अधिक कर्मचाऱ्यांची "अजय हेलथ केअर" यांच्या ४ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. व सर्व कर्मचाऱ्यांना कॅप , रिफ्लेक्टिव्ह जॅकेट , मास्क,हँडग्लोव्हस च्या किट चे वाटप करण्यात आले . या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे , आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर , आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना आणि सुशील मलये आदी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या मागोमाग मुंबई-पुणे हायवे निगडी ते दापोडी पर्यंत विशेष स्वच्छता मोहिम डी.एम.एंटरप्रायझेस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ३ वर्षे राबवत असून यावर्षी देखील विशेष स्वच्छता मोहिम संस्थेमार्फत दि. ०७/०७/२०१८ रोजी सकाळी ६:०० ते दुपारी ३:०० पर्यंत राबविण्यात आली.
सदर मोहिमे अंतर्गत डी.एम. एंटरप्रायझेस मार्फत २ ट्रक, १ टेम्पो, १ रोड स्विपर मशीन तसेच ८० पेक्षा जास्त सफाई कामगार, ड्रायव्हर, ७ सुपरवायझर, संस्थेचे पदाधिकारी तसेच म.न.पा चे अधिकारी व सफाई कामगार यांच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यासाठी सदर कंपनीला वाहतुक शाखेचे विशेष सहकार्य लाभले. तसेच म.न.पा चे अतिरिक्त आयुक्त मा. दिलिप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मा. मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी सौ. आशा राऊत व म.न.पा. अधिकारी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याअनुषंगाने आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने निगडी ते दापोडी हा पालखी मार्ग स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छते मोहिमेत म.न.पा. चे सहा. आरोग्याधिकारी मा. महादेव शिंदे, मा. ज्ञानेश्वर सासवडकर व म.न.पा. कर्मचारी तसेच संस्थेचे संचालक संतोष पाटील, संजय पवार, संभाजी गायकवाड, महेश पाटील, धनंजय पाटील, उदय कलगुटकर व पदाधिकारी यांच्या मार्फत स्वच्छता मोहिम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
पिंपरी ः शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल 279 गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेत परिमंडळ तीनमधील 50 अधिकारी आणि 400 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम गुरुवारी रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व पोलीस ठाण्यात ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये 31 तडीपार गुंडांना चेक केले. त्यापैकी एकजण आढळून आला असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. 44 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील 15 आरोपी पोलिसांच्या हाती लागले. माहितगार 152 गुन्हेगारांना तपासण्यात आले, त्यातील 50 जण सापडले. रेकॉर्डवरील व इतर 57 गुन्हेगार तपासले असता 20 गुन्हेगार आढळून आले. वॉरंट बजावण्यात आलेल्या 29 आरोपींपैकी 02 आरोपी मिळाले. तसेच 22 संशयितांवर कारवाई करण्यात आली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणाऱ्या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालवणाऱ्यांना तपासण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागांमध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहीम राबविली. मिळालेल्या 279 गुन्हेगारांपैकी 77 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 68, 69 प्रमाणे कारवाई करण्यात आली. 113 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 आरडब्ल्यू अंतर्गत कारवाई करण्यात आली. 76 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 110,112, 117 अंतर्गत कारवाई करण्यात आली. 102 प्रमाणे 10 तर मुंबई प्रोव्हिजन ऍक्ट कलम 85 (1) प्रमाणे 03 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. या अचानक राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा काही प्रमाणात दरारा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
- दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खडकी पोलिसांनी शिताफीने सापळा रचुन अटक केली तर तिघे मात्र फरार झाले. गुरुवारी रात्री त्रिकोणी गार्डन येथे या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. अटक आरोपींकडुन पोलिसांनी धारदार शस्त्रे व दरोड्यास लागणारे साहित्य जप्त केले.
अरबाज समीर खान (वय20), शहादाब रहमत खान (वय-23दोघे रा. जुना बाजार खडकी) तसेच दाऊद दिलावर शेख (वय-21, रा. इंदिरानगर वसाहत खडकी) यांना अटक केली असुन त्यांचे सहकारी अल्तमेश उर्फ पापा शब्बीर कुरेशी (रा. कासारवाडी ) इसाक हकीम शहा (रा. शादलबाबा दर्गा शेजारी येरवडा) व एक अल्पवयीन हे पोलिसांच्या हातुन पसार झाले. त्यांचा पोलिस कसुन शोध घेत आहेत. घटनेची माहिती याप्रमाणे बिट मार्शलचे पोलिस कर्मचारी माटे व साळवी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत अशी खबर मिळाली की काही लोक हत्यारांसह त्रिकोणी गार्डन नेहरुरोड येथिल पाण्याच्या टाकी खाली जमले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक ठाकुर पोलिस उप निरिक्षक महाडीक हे पोलिस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी पोहचल. सापळा रचुन अरबाज शहादाब व दाऊदला जेरबंद केले तर रेकॉंर्डवरील अट्टल गुन्हेगार कुरेशी शहा व एक अल्पवयीन हे पोलिसांच्या हातुन निसटले. पोलिसांनी त्यांच्या कडील तलवार, रॅंम्बो चाकु, तिन मोबाईल, स्क्रुड्रायवर, बनावट नंबरप्लेट व गुंगीचे औषध असे 6 हजार 650 रुपये किंमतीचे ऐवज साहित्य जप्त केले. फौजदार शिवाजी भोसले अधिक तपास करत आहेत.
- आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे स्व. नगरसेवक बालाजी कांबळे कुटुंबियांचे पालक मंत्री गिरीश बापट, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार सुरेश गोरे यांनी कांबळे कुटुंबियांचे सांत्वन करीत सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
नगरसेवक कांबळे यांचे कुटुंबियांचे संरक्षण व मदतीची ग्वाही देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कांबळे यांचे कुटुंबियांचे शोकाकुल वातावरणात सांत्वन केले. यावेळी नगरसेवक कांबळे यांचे सात वर्षीय मुलीने तसेच परिवाराने दुखांकित वातावरणात पालकमंत्री बापट यांना आपल्या मनातील भावना व यापूर्वीचे घटना व्यक्त करीत न्यायासाठी दाद मागितली.
यावेळी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे, भाजपच्या महिला शहराध्यक्षा शैलजा मोळक, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, खेड भाजपचे अध्यक्ष अतुल देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी पालकमंत्री बापट यांना कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाने व भाजपने देण्याची मागणीचे निवेदन दिले. देहू फाटा चौकात पोलीस चौकीची मागणी करीत निवेदन देण्यात आले.
कुंदन हुंडाईच्या ‘वेलफेयर’ मधून पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कुंदन हुंडाईचे मॅनेजिंग डायरेक्टर हितेश चड्डा, काळूशेठ चड्डा, पोलिस उपनिरीक्षक हरीष माने, प्रविण स्वामी, वरिष्ठ पत्रकार संतोष मिश्रा यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेली दहा वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. या सोबत इतरही सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
- मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्समध्ये त्यास बंदी आहे. त्यांच्या निषेधार्थ चिंचवडमधील बिग सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिगसिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉलमधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बिग सिनेमाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले.
या आंदोलनात राजू साळवे, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, दत्ता घुले, रूपेश पटेकर, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संजय यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मल्टीप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच मल्टीप्लेक्सच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही, असा सवाल करत खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला सुनावले होता. एवढेच नव्हे तर अवाचे सवा दराने विकले जाणारे हे पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे.
मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्स प्रशासनाकडून सुरक्षेचे कारण देत टाळाटाळ करण्यात येते. त्याच्याच निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात मनसेने आंदोलन केले. आंदोलनानंतर सचिन चिखले म्हणाले की, आज आम्ही शहरातील सर्वच चित्रपटगृहात जाऊन खाद्यपदार्थांची जादा दरातील विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे. जर या मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कामे करु लागल्या आहेत. कायद्याने त्यांना समान अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळे महिलांच्या सणात पुरुषांनी सहभागी होणे हा देखील समान हक्क आहे, असे मानत मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. संस्थेच्या पुरुषांनी जन्मोजन्मी हीच बायको मिळण्यासाठी वडाच्या झाडाला फे-या मारत त्याची मनोभावे पूजा केली.
नवी सांगवी येथे मागील तीन वर्षांपासून ही अनोखी वटपौर्णिमा मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने साजरी करण्यात येते. पत्नीला वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे आणि हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला फे-या मारत त्याची पूजा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अॅड. सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार, अरविंद मांगले, वसंतराव चकटे, पी. पी. पिल्ले, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, दीपक शहाणे, गजानन धाराशिवकर, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शिवानंद तालकोटी, आप्पाजी चव्हाण, जीवन धवन, सतीश धावडे आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सर्व महिला आपल्या पतीसाठी वटवृक्षाला सात फे-या मारतात. त्याला सूत गुंडाळले जाते. पुराणातील कथेप्रमाणे सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले होते. या कथेचे समरण करून वटवृक्षाची पूजा करून सौभाग्य मागण्याचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे असे म्हटले जाते. परंतु ही संस्कृती अपवाद वगळता देशातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे पुरुषांनी देखील आपल्या पत्नीसाठी अशा प्रकारचे सण साजरे केले तर त्यात वावगे काहीही नाही, असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने सहभागी सर्वांना प्लास्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची शपथ देण्यात आली.
- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात तीस सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी एकवीस सभा तहकूब करण्याचा ‘राष्ट्रीय विक्रम’ करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा अशीही मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
संजोग वाघेरे पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड पालिकेत भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकाळात सव्वा वर्षात तीस सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी एकवीस सभा तहकूब करण्याचा ‘राष्ट्रीय विक्रम’ करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. सर्वसाधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिका-यांना ‘टक्केवारीच्या’ राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे.
स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणा-या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षात केंद्र व राज्य सरकारकडून शहरात अत्यावश्यक विकासप्रकल्प राबविण्यासाठी हजारों कोटींचा निधी देण्यात आला. त्यानिधीतूनच मागील काळात झालेल्या पुणे – मुंबई महामार्गावर व औंध – रावेत रस्त्यावरील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरची कामे करण्यात आली. यापैकी काही प्रकल्प राष्ट्रवादीच्या काळात नव्वद टक्के पूर्ण करण्यात आली होती. उर्वरित दहा टक्के काम करुन त्यांची उद्घाटने श्रेयवादावरुन थांबवून नागरिकांना वेठीस धरण्याचे व पाणी प्रश्नाचे गलिच्छ राजकारण या शहरातील नागरीकांनी कधी पाहिले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात त्रेचाळीसाव्या क्रमांकावर गच्छंती झाली आहे. अशीही टिका वाघेरे पाटील यांनी केली आहे.
- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातील वर्गीकरणाच्या सुमारे २५८ कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या वर्गीकरणास राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने विरोध नोंदविला. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घातला. दरम्यान, वर्गीकरणाचे विषय मागे घेण्यात यावेत, असे पत्र आयुक्तांनी शुक्रवारी (दि.२२) दिले होते.
जून महिन्याच्या तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत आयत्यावेळी तब्बल २६४ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. त्या विषयाची सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली होती. बुधवारी (दि.२०) झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘वन-के’ खाली वर्गीकरणाचे ५ विषय आयत्यावेळी दाखल करून घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारीच्या (दि.२२) सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र महापौरांना दिले होते. या ५ पैकी क्रमांक १९ चा इंद्रायणीनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाचा विषय मागील सभेने तहकूब केल्याने त्यावर निर्णय घेता येणार नसल्याचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी स्पष्ट केले. विषय क्रमांक २० ला सीमा सावळे यांनी उपसूचना देऊन इंद्रायणीनगरातील ३ रस्त्यांचे कामांची वर्गीकरण शून्य करण्याचा उपसूचना दिली. त्यास आशा शेंडगे यांनी अनुमोदन दिले. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले.
दरम्यान, विषय क्रमांक २० वर मतदान घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. त्यानुसार झालेल्या मतदानात उपसूचनेसह मंजूरीच्या बाजूने ६६ तर विरोधात ३७ मते मिळाले.
महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच २१ क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. या गोंधळातच महापौरांनी विषय क्रमांक २२ व २३ मंजूर करून टाकले आणि सभा संपल्याचे घोषित केले. त्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002