- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातील वर्गीकरणाच्या सुमारे २५८ कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या वर्गीकरणास राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने विरोध नोंदविला. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घातला. दरम्यान, वर्गीकरणाचे विषय मागे घेण्यात यावेत, असे पत्र आयुक्तांनी शुक्रवारी (दि.२२) दिले होते.
जून महिन्याच्या तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत आयत्यावेळी तब्बल २६४ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. त्या विषयाची सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली होती. बुधवारी (दि.२०) झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘वन-के’ खाली वर्गीकरणाचे ५ विषय आयत्यावेळी दाखल करून घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारीच्या (दि.२२) सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र महापौरांना दिले होते. या ५ पैकी क्रमांक १९ चा इंद्रायणीनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाचा विषय मागील सभेने तहकूब केल्याने त्यावर निर्णय घेता येणार नसल्याचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी स्पष्ट केले. विषय क्रमांक २० ला सीमा सावळे यांनी उपसूचना देऊन इंद्रायणीनगरातील ३ रस्त्यांचे कामांची वर्गीकरण शून्य करण्याचा उपसूचना दिली. त्यास आशा शेंडगे यांनी अनुमोदन दिले. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले.
दरम्यान, विषय क्रमांक २० वर मतदान घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. त्यानुसार झालेल्या मतदानात उपसूचनेसह मंजूरीच्या बाजूने ६६ तर विरोधात ३७ मते मिळाले.
महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच २१ क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. या गोंधळातच महापौरांनी विषय क्रमांक २२ व २३ मंजूर करून टाकले आणि सभा संपल्याचे घोषित केले. त्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002