व्हीएस न्यूज – एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला तीन अज्ञातांनी मारहाण करुन त्याच्या जवळील 5 हजार रुपये लुटले. नाशिक फाटा येथे मंगळवारी (दि. 21) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. जनार्दन रमेश गावीत (वय 14, रा. नाशिक) असे जखमी मुलाचे नाव आहे.
जनार्दन हा त्याच्या मित्रांसोबत गावी निघाला होता. मात्र, मित्र चढलेल्या गाडीत त्याला जागा मिळाली नाही. त्यामुळे तो नाशिक फाटा येथे दुसऱ्या गाडीची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी तीन अज्ञातांनी येऊन त्याला मारहाण केली व त्याच्याजवळ असलेले पाच हजार रुपये त्यांनी लुबाडले. त्याला मारहाण करुन त्यांनी दापोडी येथील सीएमई जवळ टाकून दिले. या घटनेत जनार्दनच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 61 वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 20 ते 24 डिसेंबर 2017 या कालावधीत मुळशी तालुक्यातील भुगाव येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कै. पंढरीनाथ फेंगसे यांच्या स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत या कुस्ती स्पर्धा येत्या रविवारी (दि.26) होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संजोयक नगरसेवक नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उपाध्यक्ष काळूराम कवीतके संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन रविवारी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, उपमहाराष्ट्र केसरी सागर गरुड हे उपस्थित राहणार आहेत. विजेत्या मल्लांना याच दिवशी सायंकाळी आठ वाजता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा कुमार गटात 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 या वजनी गटात मॅटवर होणार आहे. तर खुल्या गटात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 86 ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गटातील सामने मातीवर होतील. विविध गटात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या कुस्तीगीरास मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेणारा मल्ल पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारा असणे आवश्यक असून, याकरिता वयाचा दाखला आवश्यक आहे. कुमार गटातील मल्लाच जन्म तारीख दि. 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर2002 या दरम्यानची असणे आवश्यक आहे.
अर्जुन काटे यांना “जीवन गौरव’
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दामुआण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाउंडेशन यांचे वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
छावा संघटनेचे सिनेमागृहांना निवेदन
व्हीएस न्यूज - शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ हा चित्रपट अद्याप सुरु केलेला नाही. काही संघटनाच्या विरोधामुळे हा चित्रपट सिनेमागृहात झळकलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने सिनेमागृह चालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यभर “दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटास सेन्सॉर बोर्ड व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही संघटनांचा विरोध न जुमानता हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करावा, तसेच “दशक्रिया’ चित्रपटास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पुर्ण संरक्षण देण्यात येईल, असे शहराध्यक्ष गणेश जाधव, अजय लखणे, सुशांत दुणगे, बलभीम जगदाळे, विशाल लेंडवे, राहूल माने यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – महापालिका विधी समितीने विषय पत्रिकेवरील डॉक्टर पदोन्नतीचा विषय तहकूब करुन ऐनवेळच्या विषयांना तत्काळ मंजुरी दिल्या आहेत. यापुढे स्थायी, विधीसह अन्य विषय समितीमध्ये नगरसदस्यांचे ऐनवेळेचे कुठलेच विषय घेण्यात येवू नयेत. जर कुठल्याही समितीत ऐनवेळेचे विषय घेवून मंजुरी दिल्यास याबाबत शिवसेनेकडून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या विधी समिती सभापतींनी समिती सभेच्या अजेंड्यावर असलेले डॉक्टर पदोन्नतीचे दोन्ही विषय तहकूब केले. मात्र, समिती नगरसदस्यांकडून ऐनवेळेचे 6 विषय विधी सभेपुढे ठेवण्यात आले होते. त्यातील सहा पैकी पाच ऐनवेळचे विषय मंजूर करण्यात आले.
वाकड येथील रस्त्याचा स्थळ बदलायचा विषय आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून विधी समितीकडे आला. त्या विषयाला डावलण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, यापुढे स्थायी, विधी व अन्य विषय समित्यांमध्ये कुठलाही ऐनवेळेचा विषय आणू नये किंवा मंजूर करु नये. जर यापुढे ऐनवेळेचे विषय मंजूर केल्यास “शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल. तसेच स्थायी, विधी समितीसह बैठकीत सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असाही इशारा कलाटे यांनी दिला आहे.
व्हीएस न्यूज - वाढत्या वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथील नवी दिल्लीतील इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेच्या पुढाकाराने इथेनॉल निर्मितीला गती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) भोसरी येथे परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेत इथेनॉल निर्मितीवर चर्चा केली जाणार आहे. याबाबतची माहिती माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एनके पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 20) दिली. यावेळी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अतुल मुळे, सीआयआरटीचे राजेंद्र सगर पाटील, वसंतदादा शुगर फॅक्टरिज व संशोधन केंद्राचे महानिदेशक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकार मेक इनच्या माध्यमातून भर देत आहे. आज देशात सर्व प्रकारची वाहने व कंपन्यांसाठी 82 टक्के इंधन आयात केले जाते. त्यातील केवळ 18 टक्के इथेनॉलचा साठा भारताकडे शिल्लक आहे. दहा वर्षापूर्वी दिवसाला 75 हजार दुचाकी तयार होत होत्या. आज रोजी एक कंपनी 3 लाख दुचाक्या दिवसाला विक्री करते. या वाढत्या वाहनांची संख्या विचारात घेता 18 टक्के इथेनॉलचा स्टॉक पुढील दहा वर्षात संपणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मित वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या परिषदेत कारखानदार, वाहन कंपन्या, इथेनॉल निर्मिती संस्था त्याचबरोबर शेतकरी वर्गाची मदत घेऊन इंधन निर्मिती वाढविण्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, विद्युत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
व्हीएस न्यूज – यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधेतील अनियमितता आणि प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी डॉक्टरांना बढत्या दिल्यानंतर “वायसीएम’ रुग्णालयाची परिस्थिती सुधारणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तर, विरोधक काही चेंडू सोडून द्यायचे म्हणून टीका करतात, त्यात काहीही तथ्य नसते. त्यामुळे सर्वच चेंडू खेळायचे नसतात, असा टोलाही सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी लगावला.
डॉक्टरांच्या पदोन्नतीचे विषय समोर आल्यानंतर विधी समितीने महिनाभरापासून हे विषय रोखले आहेत. “लक्ष्मी’दर्शनासाठी हे विषय रोखून धरल्याचे आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर झाले. यावरून विधी समितीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आला. प्रशासकीय सेवा कार्यकाळ मर्यादेनुसार पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात मांडवली होत नसल्यामुळेच प्रस्ताव तहकूब ठेवल्याचे आरोप विधी समितीवर विरोधकांनी केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली असून, या टिकेला काय प्रत्युत्तर द्यावे? या संभ्रमात पदाधिकारी अडकले आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी पत्रकारांशी बोलताना “वायसीएम’ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली असून, त्यावरून सत्ताधाऱ्यांना “टार्गेट’ केले होते. रुग्णालयाची पाहणी करून प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुधारणा करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप बहल यांनी एकनाथ पवार यांचे नाव न घेता केला होता.
बहल यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ पवार म्हणाले की, वैद्यकीय उपअधीक्षकपदी डॉ. शंकर जाधव यांची पदोन्नती करण्यास काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, डॉक्टरांना बढत्या दिल्यावर लगेच “वायसीएम’ची परिस्थिती सुधारणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. टप्प्याटप्प्याने सुधारणा घडवून आणण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मार्गी लागत आहे. त्यामुळे पुढील काळात गैरसोय कमी होऊन अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर दिला आहे, असेही पवार म्हणाले.
व्हीएस न्यूज - महापालिका निवडणुकीमुळे पदाधिकारी, समित्यांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे चालू वर्षाची दैनंदिनी छापण्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, 2018 मध्ये आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पुढील वर्षात नागरिकांना पालिकेची माहिती संग्रहित ठेवण्यासाठी छापील दैनंदिनी उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी दैनंदिनी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकांचा समावेश असतो. त्यामुळे कोणता विभाग कोणत्या अधिकाऱ्यांकडे हे लगेच समजते. त्याचबरोबर शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, वृत्तपत्र आणि खासगी न्यूज चॅनेलच्या कार्यालयांचे पत्ते व संपर्क क्रमांक नमूद केलेले असतात. तसेच, पुणे जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार तसेच, मंत्र्यांचे संपर्क क्रमांक असतात. पिंपरी-चिंचवड शहरासंदर्भातील सविस्तर माहिती दिलेले असते.
दैनंदिनीमुळे नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना महापालिकेशी संबंधित माहिती घेणे सुलभ होते. त्यामुळे दरवर्षी या डायरीची नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरीक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र,फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपचे कारभारी महापालिकेत आले. महापौर, उपमहापौर या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि स्थायी समितीसह विविध विषय समित्या, क्षेत्रीय कार्यालय समितींच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास अधिक काळ गेला. त्यामुळे सत्ताधारी भाजपने 2017 ची महापालिकेची दैनंदिनी न छापण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिकेच्या पुढील 2018 या आर्थिक वर्षासाठी डायरी छापण्यात येणार आहेत. एका डायरीसाठी 103 रूपये 50 पैसे खर्च अपेक्षित आहे. एकूण 8 हजार डायऱ्या छापण्याचे तयारी केली आहे. त्यासाठी 8 लाख 28 हजार रूपये खर्च येणार आहे. डायऱ्या चिंचवड येथील आशिष एंटरप्रायेजसकडून छापून घेण्यात येणार आहेत. त्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यावर पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्यात चर्चा होऊन मंजुरीबाबतचा निर्णय स्थायी समिती घेणार आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या वतीने रविवार 26 नोव्हेंबर रोजी माजी महापौर कै. सादबा उर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चऱ्होली गाव, मोशी फाटा देहू - आळंदी रोड डुडुळगाव मार्गे चिखली - कुदळवाडी स्पाईन रोड, वैष्णव माता चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर अशी ही स्पर्धा होईल.
पुरूष गटातील 21 किमीमध्ये चऱ्होली गाव ते संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे तर महिला गट 10 किलोमीटरमधील चऱ्होली गाव ते संत प्रियदर्शनी स्कूल मोशी चिखली रोडपर्यंत स्पर्धा आहे. 18 वर्षे मुले शालेय गट सहा किमीमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलापर्यंत आहे. 16 वर्षे मुले व मुली शालेय गट चार किलोमीटर मधील व 18 वर्षे मुली शालेय गट सहा किलोमीटर मधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आहे. तसेच 14 वर्षे मुले व मुली शालेय गटातील 3 किमी ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) इमारतीवर आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. याकरिता 50 कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाचा विषयासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यास 20 कोटी, तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यास 30 कोटी असे एकूण 100 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी हे प्रस्ताव तातडीची बाब म्हणून महासभेत दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पाच कोटी रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतु, वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नुतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2016-17 च्या अर्थसंकल्पात पाच कोटी रूपयांची तरतूद करुन त्यास 20 जून 2017 रोजीच्या महासभेत या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
वायसीएम रुग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव 0.50 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किटेक्ट शशी प्रभू ऍण्ड असोसिएशन यांना सुधारीत नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर, इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 50 कोटी रुपये सुधारीत अर्थसंकल्पीय रकमेची आवश्यकता आहे. यासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरअंतर्गत सुदर्शननगर चौकात सद्यस्थितीत सिग्नल व्यवस्था आहे. प्रवासी वाहतूक वेळेत बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत व्हावी, याकरिता चौक सिग्नल मुक्त करण्याकरिता ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे.
या कामासाठी पालिकेच्या सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी 20 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच भूसंपादन होणार आहे. जागेचे संपादन झाल्यानंतर रस्ता विकसित करण्यास यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी हे कामही पालिकेच्या सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट केले आहे. या कामासाठी 30 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे 100 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता द्यावी, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - पुणे महापालिकेत पदोन्नती मिळालेल्या 11 कनिष्ठ अभियंत्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची वारजे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरु आहे. या कार्यकर्त्याने पैशांची मागणी करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप या अभियंत्यांनी केला असून यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैसे न दिल्यास नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचाही आरोप या अभियंत्यांनी केला आहे. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते ( वय 31, रा. भवानी पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रमेश विष्णु खामकर ( वय 61) यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गिते यांच्यासह नऊ कनिष्ठ अभियंत्यांनी वारजे पोलिस ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी प्रथम एक तक्रार अर्ज दाखल केला होता. यामध्ये शासनाने 12 डिसेंबर 2005 मध्ये काढलेल्या परिपत्रकानूसार महापालिकेतील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत) या पदावरील महाराष्ट्राबाहेरील पदवी/ पदवीका प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदवी/पदवीकांस एआयसीटीई किंवा यूजीसीची मान्यता प्राप्त असल्याने पदोन्नती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी शैक्षणीक अर्हतेबाबत दाखल केलेली कागदपत्रे योग्य असल्याचा अहवाल संबंधीत विद्यापीठांनी महापालिकेला दिला आहे.
मात्र विष्णू खामकर यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली असून ती प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे बोगस असल्याचे सांगून त्यांना धमकी देत आहे. या अभियंत्यांना पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास नोकरी घालवितो अशा आशयाची धमकीही देत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेत नव्याने तसेच यापूर्वी नियुक्त असणाऱ्या लेखनिक व अभियांत्रिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणीक अर्हतेबाबत खामकर यांनी आजवर कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र संवर्ग 3 मधील एक व 4 मधील 10 अशा 11 कर्मचाऱ्यांना खामकर सातत्याने ब्लॅकमेल करीत असल्याचे या अभियंत्यांचे म्हणणे आहे. खामकर हे महापालिकेतील निवृत्त सेवक असून त्यांना महापालिकेच्या कामकाजाची पुर्ण माहिती असल्याने ते माहिती अधिकार कायद्यानुसार विविध खात्यांमध्ये अर्ज करुन महापालिकेतील अधिकारी व अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्रास देऊन प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत असल्याचाही तक्रार अर्जात उल्लेख आहे.दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते खामकर यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलिसांना तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जाची सध्या चौकशी करण्यात येत आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज – वृक्ष तोडीतील गैरव्यवहार थांबविण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज, कार्यप्रणाली सदस्यांचे अधिकार यामध्ये सुस्पष्टता येण्यासाठी लवकरच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे स्वतंत्र धोरण अंमलात येणार आहे. याबाबतचा सोमवारी वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीच्या सदस्य शिल्पा भोसले यांनी याबाबत माहिती दिली.
सध्या शहरात विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. बांधकामांना अडसर ठरत असलेली वृक्ष रात्रीच्या वेळी उन्मळून पडण्याचेही प्रमाण वाढत आहे. वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याआधीच तोडल्याचा प्रकारही उघडकीला आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर शहरात कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्याला बंदी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र असे असतानाही शहरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये यामध्ये वृक्ष प्राधिकरणाचे सर्वसमावेशक स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग यांचे कामकाज, अंदाजपत्रक, कार्यप्रणाली पूर्णपणे वेगळी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे उद्यान विभागाचा हस्तक्षेप वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजात होणार नाही. वृक्ष प्राधिकरणाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी सहा डिसेंबर रोजी खास बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे स्पेन दौऱ्यावर, आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन दौऱ्यावर गेले असतानाच आता पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दोघांचा फिलिपाईन्स दौरा खासगी संस्थेने स्पॉन्सर केल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. मात्र, करदात्या नागरिकांच्या खर्चाने पालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या परदेश दौऱ्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या दौऱ्यासाठी करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सिंगापूर दौरा करुन आले. पाठोपाठ बीआरटी विषयक माहिती जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक अधिकारी अहमदाबादला जाऊन आले.
महापौर नितीन काळजे सोमवारी (दि.13) युरोपमधील स्पेनच्या दौऱ्यावर गेले आहेत. बार्सिलोना शहरात आयोजित “स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस 2017′ या परिषदेत ते सहभागी झाले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी ते दौऱ्यावरुन परतणार आहेत. महापौर शहरात येतील तोपर्यंत श्रावण हर्डीकर शनिवारी स्वीडनकडे रवाना झाले आहेत ते पुढील शनिवारी (दि. 25) शहरात परतणार आहेत. पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. फिलिपिन्स येथे विकास परिषदेच्या वार्षिक सभेत सहभागी होण्यासाठी पोमण आणि लांडे रवाना झाले आहेत. ते पाच दिवसांनी दौऱ्यावरुन परतणार आहेत. या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दौऱ्याचा खर्च एका खासगी संस्थेने केला आहे. त्यामुळे दौऱ्याचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसुल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पाडुरंग परचंडराव यांनी केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002