व्हीएस न्यूज - पुणे महापालिकेत पदोन्नती मिळालेल्या 11 कनिष्ठ अभियंत्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची वारजे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरु आहे. या कार्यकर्त्याने पैशांची मागणी करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप या अभियंत्यांनी केला असून यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैसे न दिल्यास नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचाही आरोप या अभियंत्यांनी केला आहे. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते ( वय 31, रा. भवानी पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रमेश विष्णु खामकर ( वय 61) यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गिते यांच्यासह नऊ कनिष्ठ अभियंत्यांनी वारजे पोलिस ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी प्रथम एक तक्रार अर्ज दाखल केला होता. यामध्ये शासनाने 12 डिसेंबर 2005 मध्ये काढलेल्या परिपत्रकानूसार महापालिकेतील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत) या पदावरील महाराष्ट्राबाहेरील पदवी/ पदवीका प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदवी/पदवीकांस एआयसीटीई किंवा यूजीसीची मान्यता प्राप्त असल्याने पदोन्नती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी शैक्षणीक अर्हतेबाबत दाखल केलेली कागदपत्रे योग्य असल्याचा अहवाल संबंधीत विद्यापीठांनी महापालिकेला दिला आहे.
मात्र विष्णू खामकर यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली असून ती प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे बोगस असल्याचे सांगून त्यांना धमकी देत आहे. या अभियंत्यांना पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास नोकरी घालवितो अशा आशयाची धमकीही देत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेत नव्याने तसेच यापूर्वी नियुक्त असणाऱ्या लेखनिक व अभियांत्रिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणीक अर्हतेबाबत खामकर यांनी आजवर कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र संवर्ग 3 मधील एक व 4 मधील 10 अशा 11 कर्मचाऱ्यांना खामकर सातत्याने ब्लॅकमेल करीत असल्याचे या अभियंत्यांचे म्हणणे आहे. खामकर हे महापालिकेतील निवृत्त सेवक असून त्यांना महापालिकेच्या कामकाजाची पुर्ण माहिती असल्याने ते माहिती अधिकार कायद्यानुसार विविध खात्यांमध्ये अर्ज करुन महापालिकेतील अधिकारी व अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्रास देऊन प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत असल्याचाही तक्रार अर्जात उल्लेख आहे.दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते खामकर यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलिसांना तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जाची सध्या चौकशी करण्यात येत आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002