व्हीएस न्यूज – रेल्वेच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन येथे 177/28 किलोमीटर येथे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. मृताची ओळख पटलेली नाही.मयत व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्षे असून, उंची पाच फूट चार इंच, किरकोळ शरीरयष्टी, रंग काळासावळा, सरळ नाक, डोक्यावर पांढरे केस, अंगात पांढरा शर्ट, राखाडी निळी बरमुडा व लाल बनियन घातले आहे. या वर्णनाच्या व्यक्तिची माहिती असलेल्या नागरिकांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील 21 डॉक्टरांच्या शहरांतर्गत अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या काही डॉक्टरांच्या शहरातंर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची भोसरी रुग्णालयातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. गोविंद तळपाडे यांची प्राधिकरणातून पिंपरीगाव दवाखान्यात, डॉ. वर्षा डांगे यांची कुटुंब नियोजन विभागातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. विकल्प भोई यांची आकुर्डी रुग्णालयातून बोपखेल दवाखान्यात, डॉ. सुनीता साळवे यांची यमुनानगर रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. गितांजली कोल्हे यांची यमुनानगर रुग्णालयातून वाल्हेकरवाडी दवाखान्यात, डॉ. सध्या भोईर यांची वाल्हेकरवाडी दवाखान्यातून म्हेत्रेवस्ती येथील दवाखान्यात बदली केली आहे.
डॉ. स्मिता नागरगोजे यांची नेहरुनगर येथील दवाखान्यातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. रामनाथ बच्छाव यांची भोसरी रुग्णालयातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. किशोरी नलवडे यांची थेरगाव रुग्णालयातून तालेरा रुग्णालयात, डॉ. आसावरी ढवळे यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालयात, डॉ. छाया शिंदे यांची यमुनानगर रुग्णालयातून नेहरुनगर दवाखान्यात, डॉ. राजीव शहारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. अंजली ढोणे यांची तालेरा रुग्णालयातून पुनावळे येथील दवाखान्यात बदली करण्यात आली आहे.
डॉ. श्रीराम भंडारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून सांगवी रुग्णालयात, डॉ. संजय पोटे यांची पिंपरीगावातील दवाखान्यातून प्राधिकरणातील दवाखान्यात, डॉ. राहुल साळुंखे यांची पोस्ट मार्टेम विभागातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. तृप्ती सांगळे यांची वायसीएम मधून वैद्यकीय मुख्य विभागात, डॉ. मेधा खरात यांची वायसीएमएच् मधून भोसरी रुग्णालयात, डॉ. प्रकाश ताडे यांची भोसरी रुग्णालयातून सांगवी रुग्णालयात तर, डॉ. स्नेहा जगदाळे यांची सांगवी रुग्णालयातून भाटनगर येथील दवाखान्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बदली झालेल्या डॉक्टरांनी त्वरीत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
व्हीएस न्यूज – पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्न पर्पलशी असलेला करार संपुष्टात आणल्याने संतप्त झालेले कर्मचारी बुधवारी सकाळी (दि. 22) नेहरुनगर डेपोबाहेर एकत्र जमले. या कर्मचाऱ्यांनी मार्गावर जाणाऱ्या अनेक बस रोखून धरल्या. अखेर पोलीस बंदोबस्त मागवत सुरक्षेत पीएमपीच्या सर्व बस मार्गांवर रवाना करण्यात आल्या.
दोन महिन्यांचे वेतन थकल्याने पीएमपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.21) अचानक संप पुकारला. याचा फटका प्रवाशांना बसला. अनेक गाड्या मार्गांवर धावू न शकल्याने पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाला. तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्ना पर्पलशी असलेला करार रद्द केल्याने, कंत्राटी कामगार रोजंदारीपासून वंचित राहिले. दुसऱ्या दिवशी देखील या घटनेचे प्रतिसाद उमटले. सकाळी शेकडो कंत्राटी कर्मचारी नेहरुनगर बस आगारासमोर एकत्र जमा झाले. त्यांना प्रशासनाने कामावर रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने ते आणखी संतप्त झाले.
दोन महिन्यांचे वेतन थकीत असतानाच कामावार रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने कामगारांनी आगाराबाहेर येणाऱ्या बस काढण्यास विरोध दर्शविला. यामुळे पीएमपी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता त्यांनी पोलीस बंदोबस्त मागविला. त्यानंतर हळुहळू सर्व बस मार्गावर रवाना झाल्या. या बहुतांशी सर्व बस पीएमपीच्या कायम कर्मचाऱ्यांनी मार्गावर नेल्या. मात्र, ठेकेदाराच्या बस मार्गावर धावू न शकल्याने दुसऱ्या दिवशी देखील अनेक मार्गांवर बस फेऱ्यांची कमतरता जाणवत होती. याबाबत नेहरुनगर आगार व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
तीन दिवसांत थकीत वेतन देणार…
संतप्त जमाव झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत पोलीस बंदोबस्तात बस बाहेर सोडण्यात आल्या. त्यानंतर प्रसन्न पर्पल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच यावर मार्ग काढला जाईल. आणि सर्व चालकांचा पगार येत्या तीन दिवसात मिळेल, असे आश्वासन प्रसन्न पर्पलच्या व्यवस्थापकांकडून मिळाले आहे, अशी माहिती या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग ऍन्ड प्लेसमेंट ऑफीसर्सच्या (टीपीओ) अध्यक्षपदी निवड झाली.
मुंबईतील खालापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने प्रा. रवंदळे यांची निवड करण्यात आली. राज्यातील 250 अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट ऑफीसर्स आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमता वृद्धिंगत करून त्यांना सुयोग्य ठिकाणी कॅम्पस मधून नोकरी मिळावी या उद्देशाने असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
पुढील काळात राज्यातील सर्वंच विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे असोसिएशन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. असोसिएशनच्या कार्यकारी संचालकपदी सांगलीतील वालचंद महाविद्यालयाचे प्रा. संजय धायगुडे, सचिवपदी मुंबईच्या एससीओईचे प्रा. संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – कॉलेजमधून जाऊन येतो, असे घरातून सांगून घराबाहेर पडलेला महाविद्यालयीन युवक बेपत्ता झाल्याची घटना कृष्णानगर चिंचवड येथे सोमवारी (दि.20) सकाळी सातच्या सुमारास घडली.
वैभव पांडुरंग बिराजदार (वय 17, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील पांडुरंग बिराजदार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वैभव हा निगडी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काल सकाळी सात वाजता कॉलेजला जात असल्याचे घरच्यांना सांगून तो निघाला. परंतु रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. वैभवच्या घरच्यांनी त्याच्या मित्र, वर्ग शिक्षक आणि इतरत्र त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज – एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला तीन अज्ञातांनी मारहाण करुन त्याच्या जवळील 5 हजार रुपये लुटले. नाशिक फाटा येथे मंगळवारी (दि. 21) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. जनार्दन रमेश गावीत (वय 14, रा. नाशिक) असे जखमी मुलाचे नाव आहे.
जनार्दन हा त्याच्या मित्रांसोबत गावी निघाला होता. मात्र, मित्र चढलेल्या गाडीत त्याला जागा मिळाली नाही. त्यामुळे तो नाशिक फाटा येथे दुसऱ्या गाडीची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी तीन अज्ञातांनी येऊन त्याला मारहाण केली व त्याच्याजवळ असलेले पाच हजार रुपये त्यांनी लुबाडले. त्याला मारहाण करुन त्यांनी दापोडी येथील सीएमई जवळ टाकून दिले. या घटनेत जनार्दनच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 61 वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 20 ते 24 डिसेंबर 2017 या कालावधीत मुळशी तालुक्यातील भुगाव येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कै. पंढरीनाथ फेंगसे यांच्या स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत या कुस्ती स्पर्धा येत्या रविवारी (दि.26) होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संजोयक नगरसेवक नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उपाध्यक्ष काळूराम कवीतके संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन रविवारी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, उपमहाराष्ट्र केसरी सागर गरुड हे उपस्थित राहणार आहेत. विजेत्या मल्लांना याच दिवशी सायंकाळी आठ वाजता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा कुमार गटात 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 या वजनी गटात मॅटवर होणार आहे. तर खुल्या गटात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 86 ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गटातील सामने मातीवर होतील. विविध गटात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या कुस्तीगीरास मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेणारा मल्ल पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारा असणे आवश्यक असून, याकरिता वयाचा दाखला आवश्यक आहे. कुमार गटातील मल्लाच जन्म तारीख दि. 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर2002 या दरम्यानची असणे आवश्यक आहे.
अर्जुन काटे यांना “जीवन गौरव’
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दामुआण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाउंडेशन यांचे वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
छावा संघटनेचे सिनेमागृहांना निवेदन
व्हीएस न्यूज - शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ हा चित्रपट अद्याप सुरु केलेला नाही. काही संघटनाच्या विरोधामुळे हा चित्रपट सिनेमागृहात झळकलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने सिनेमागृह चालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यभर “दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटास सेन्सॉर बोर्ड व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही संघटनांचा विरोध न जुमानता हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करावा, तसेच “दशक्रिया’ चित्रपटास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पुर्ण संरक्षण देण्यात येईल, असे शहराध्यक्ष गणेश जाधव, अजय लखणे, सुशांत दुणगे, बलभीम जगदाळे, विशाल लेंडवे, राहूल माने यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – महापालिका विधी समितीने विषय पत्रिकेवरील डॉक्टर पदोन्नतीचा विषय तहकूब करुन ऐनवेळच्या विषयांना तत्काळ मंजुरी दिल्या आहेत. यापुढे स्थायी, विधीसह अन्य विषय समितीमध्ये नगरसदस्यांचे ऐनवेळेचे कुठलेच विषय घेण्यात येवू नयेत. जर कुठल्याही समितीत ऐनवेळेचे विषय घेवून मंजुरी दिल्यास याबाबत शिवसेनेकडून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या विधी समिती सभापतींनी समिती सभेच्या अजेंड्यावर असलेले डॉक्टर पदोन्नतीचे दोन्ही विषय तहकूब केले. मात्र, समिती नगरसदस्यांकडून ऐनवेळेचे 6 विषय विधी सभेपुढे ठेवण्यात आले होते. त्यातील सहा पैकी पाच ऐनवेळचे विषय मंजूर करण्यात आले.
वाकड येथील रस्त्याचा स्थळ बदलायचा विषय आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून विधी समितीकडे आला. त्या विषयाला डावलण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, यापुढे स्थायी, विधी व अन्य विषय समित्यांमध्ये कुठलाही ऐनवेळेचा विषय आणू नये किंवा मंजूर करु नये. जर यापुढे ऐनवेळेचे विषय मंजूर केल्यास “शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल. तसेच स्थायी, विधी समितीसह बैठकीत सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असाही इशारा कलाटे यांनी दिला आहे.
व्हीएस न्यूज - वाढत्या वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथील नवी दिल्लीतील इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेच्या पुढाकाराने इथेनॉल निर्मितीला गती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) भोसरी येथे परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेत इथेनॉल निर्मितीवर चर्चा केली जाणार आहे. याबाबतची माहिती माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एनके पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 20) दिली. यावेळी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अतुल मुळे, सीआयआरटीचे राजेंद्र सगर पाटील, वसंतदादा शुगर फॅक्टरिज व संशोधन केंद्राचे महानिदेशक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकार मेक इनच्या माध्यमातून भर देत आहे. आज देशात सर्व प्रकारची वाहने व कंपन्यांसाठी 82 टक्के इंधन आयात केले जाते. त्यातील केवळ 18 टक्के इथेनॉलचा साठा भारताकडे शिल्लक आहे. दहा वर्षापूर्वी दिवसाला 75 हजार दुचाकी तयार होत होत्या. आज रोजी एक कंपनी 3 लाख दुचाक्या दिवसाला विक्री करते. या वाढत्या वाहनांची संख्या विचारात घेता 18 टक्के इथेनॉलचा स्टॉक पुढील दहा वर्षात संपणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मित वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या परिषदेत कारखानदार, वाहन कंपन्या, इथेनॉल निर्मिती संस्था त्याचबरोबर शेतकरी वर्गाची मदत घेऊन इंधन निर्मिती वाढविण्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, विद्युत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
व्हीएस न्यूज – यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधेतील अनियमितता आणि प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी डॉक्टरांना बढत्या दिल्यानंतर “वायसीएम’ रुग्णालयाची परिस्थिती सुधारणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तर, विरोधक काही चेंडू सोडून द्यायचे म्हणून टीका करतात, त्यात काहीही तथ्य नसते. त्यामुळे सर्वच चेंडू खेळायचे नसतात, असा टोलाही सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी लगावला.
डॉक्टरांच्या पदोन्नतीचे विषय समोर आल्यानंतर विधी समितीने महिनाभरापासून हे विषय रोखले आहेत. “लक्ष्मी’दर्शनासाठी हे विषय रोखून धरल्याचे आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर झाले. यावरून विधी समितीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आला. प्रशासकीय सेवा कार्यकाळ मर्यादेनुसार पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात मांडवली होत नसल्यामुळेच प्रस्ताव तहकूब ठेवल्याचे आरोप विधी समितीवर विरोधकांनी केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली असून, या टिकेला काय प्रत्युत्तर द्यावे? या संभ्रमात पदाधिकारी अडकले आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी पत्रकारांशी बोलताना “वायसीएम’ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली असून, त्यावरून सत्ताधाऱ्यांना “टार्गेट’ केले होते. रुग्णालयाची पाहणी करून प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुधारणा करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप बहल यांनी एकनाथ पवार यांचे नाव न घेता केला होता.
बहल यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ पवार म्हणाले की, वैद्यकीय उपअधीक्षकपदी डॉ. शंकर जाधव यांची पदोन्नती करण्यास काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, डॉक्टरांना बढत्या दिल्यावर लगेच “वायसीएम’ची परिस्थिती सुधारणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. टप्प्याटप्प्याने सुधारणा घडवून आणण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मार्गी लागत आहे. त्यामुळे पुढील काळात गैरसोय कमी होऊन अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर दिला आहे, असेही पवार म्हणाले.
व्हीएस न्यूज - महापालिका निवडणुकीमुळे पदाधिकारी, समित्यांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे चालू वर्षाची दैनंदिनी छापण्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, 2018 मध्ये आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पुढील वर्षात नागरिकांना पालिकेची माहिती संग्रहित ठेवण्यासाठी छापील दैनंदिनी उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी दैनंदिनी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकांचा समावेश असतो. त्यामुळे कोणता विभाग कोणत्या अधिकाऱ्यांकडे हे लगेच समजते. त्याचबरोबर शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, वृत्तपत्र आणि खासगी न्यूज चॅनेलच्या कार्यालयांचे पत्ते व संपर्क क्रमांक नमूद केलेले असतात. तसेच, पुणे जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार तसेच, मंत्र्यांचे संपर्क क्रमांक असतात. पिंपरी-चिंचवड शहरासंदर्भातील सविस्तर माहिती दिलेले असते.
दैनंदिनीमुळे नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना महापालिकेशी संबंधित माहिती घेणे सुलभ होते. त्यामुळे दरवर्षी या डायरीची नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरीक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र,फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपचे कारभारी महापालिकेत आले. महापौर, उपमहापौर या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि स्थायी समितीसह विविध विषय समित्या, क्षेत्रीय कार्यालय समितींच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास अधिक काळ गेला. त्यामुळे सत्ताधारी भाजपने 2017 ची महापालिकेची दैनंदिनी न छापण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिकेच्या पुढील 2018 या आर्थिक वर्षासाठी डायरी छापण्यात येणार आहेत. एका डायरीसाठी 103 रूपये 50 पैसे खर्च अपेक्षित आहे. एकूण 8 हजार डायऱ्या छापण्याचे तयारी केली आहे. त्यासाठी 8 लाख 28 हजार रूपये खर्च येणार आहे. डायऱ्या चिंचवड येथील आशिष एंटरप्रायेजसकडून छापून घेण्यात येणार आहेत. त्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यावर पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्यात चर्चा होऊन मंजुरीबाबतचा निर्णय स्थायी समिती घेणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002