व्हीएस न्यूज – पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्न पर्पलशी असलेला करार संपुष्टात आणल्याने संतप्त झालेले कर्मचारी बुधवारी सकाळी (दि. 22) नेहरुनगर डेपोबाहेर एकत्र जमले. या कर्मचाऱ्यांनी मार्गावर जाणाऱ्या अनेक बस रोखून धरल्या. अखेर पोलीस बंदोबस्त मागवत सुरक्षेत पीएमपीच्या सर्व बस मार्गांवर रवाना करण्यात आल्या.
दोन महिन्यांचे वेतन थकल्याने पीएमपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.21) अचानक संप पुकारला. याचा फटका प्रवाशांना बसला. अनेक गाड्या मार्गांवर धावू न शकल्याने पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाला. तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्ना पर्पलशी असलेला करार रद्द केल्याने, कंत्राटी कामगार रोजंदारीपासून वंचित राहिले. दुसऱ्या दिवशी देखील या घटनेचे प्रतिसाद उमटले. सकाळी शेकडो कंत्राटी कर्मचारी नेहरुनगर बस आगारासमोर एकत्र जमा झाले. त्यांना प्रशासनाने कामावर रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने ते आणखी संतप्त झाले.
दोन महिन्यांचे वेतन थकीत असतानाच कामावार रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने कामगारांनी आगाराबाहेर येणाऱ्या बस काढण्यास विरोध दर्शविला. यामुळे पीएमपी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता त्यांनी पोलीस बंदोबस्त मागविला. त्यानंतर हळुहळू सर्व बस मार्गावर रवाना झाल्या. या बहुतांशी सर्व बस पीएमपीच्या कायम कर्मचाऱ्यांनी मार्गावर नेल्या. मात्र, ठेकेदाराच्या बस मार्गावर धावू न शकल्याने दुसऱ्या दिवशी देखील अनेक मार्गांवर बस फेऱ्यांची कमतरता जाणवत होती. याबाबत नेहरुनगर आगार व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
तीन दिवसांत थकीत वेतन देणार…
संतप्त जमाव झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत पोलीस बंदोबस्तात बस बाहेर सोडण्यात आल्या. त्यानंतर प्रसन्न पर्पल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच यावर मार्ग काढला जाईल. आणि सर्व चालकांचा पगार येत्या तीन दिवसात मिळेल, असे आश्वासन प्रसन्न पर्पलच्या व्यवस्थापकांकडून मिळाले आहे, अशी माहिती या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002