व्हीएस न्यूज - दिव्यांग व्यक्तींना सर्व सामान्य व्यक्तींसारखे जीवन जगता आले पाहिजे. यासाठी कामायनी आणि श्री विश्व श्रीराम सेना सारख्या संस्था कार्य करतात. अशा संस्थांना शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आणखी मदत मिळाली पाहिजे. म्हणून आमदार या नात्याने मी प्रयत्न करील असे आश्वासन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी दिले. श्री विश्व श्रीराम सेना आणि निगडी प्राधिकरण येथील कामायनी प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिव्यांग सप्ताहाचे आणि आरोग्य, तपासणी शिबीराचे उद्घाटन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या शनिवारी (दि. 02 डिसेंबर 17) हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित गावडे, श्री विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, विनोद गुप्ता, अभय भंडारे, स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद कुबडे, प्राचार्या हेमा डेरे, रमेश वाघेरे, सुनिल कांबळे, शबनम सैय्यद, डॉ. सौरभ चावरे, डॉ. सायली सावंत, श्रेया चावरे, भाऊसाहेब कांबळे, सुनिता फुलसुंदर, संगिता कुमटेकर, संध्या कवाष्टे आदी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक करताना श्री विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, दिव्यांग मुला, मुलींना या ठिकाणी असणा-या कार्यशाळेतून व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हि मुले भविष्यात स्व:ताचा उदर निर्वाह सक्षमपणे करु शकतात. त्यांच्यातील आत्मविश्वास आणखी वाढला पाहिजे. यासाठी त्यांना समाजातील सर्व थरातून मदत आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या सीएस्आर फंडातून मदत करावी. त्यासाठी आपण प्रयत्न करु असे लालबाबू गुप्ता म्हणाले. या आरोग्य तपासणी शिबारीत कामायनी शाळेतील शंभर दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग यांची नेत्र तपासणी, रक्तदाब व मधूमेह तपासणी, दंत रोग चिकित्सा आणि मौखिक तपासणी करण्यात आली. व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्राचार्या हेमा डेरे, आभार भाऊसाहेब कांबळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - देहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध्ये तीन महिला, तीन मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे आणि बनसोडे कुटुंबीयांमध्ये रविवार लग्नकार्य होते. समारंभातील जेवणानंतर काही पाहुणे मंडळींना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. यात १० जणांचा समावेश होता. ही विषबाधा बासुंदीमधून झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. इतरांची प्रकृती स्थिर आहे. ही विषबाधा केवळ शेवटच्या पंगतीत जेवणाऱ्या मंडळींना झाल्याचे समोर आले आहे.
व्हीएस न्यूज - मौखिक आरोग्य हि काळाची गरज बनली आहे. व्यसनाधिनता ही तोंडाच्या विविध आजारांना निमंत्रण देत असते. नागरिकांनी शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेऊन वेळीच मौखिक आरोग्य तपासणी करुन घ्यावी, तसेच मोफत मुख आरोग्य तपासणी मोहिमे बरोबरच तंबाखू, गुटखा, सिगारेट आदी आमली पदार्थांच्या व्यसन मुक्तीबाबत मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्वारे शहरात जनजागृती करण्यात यावी. असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने दि.०१ डिसेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर शहरात राबविण्यात येणा-या मुख आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संततुकारामनगर, पिंपरी येथील यंशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसदस्या भारती फरांदे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, ज्येष्ठ दंततज्ञ तथा दंतशैल्य चिकित्सक डॉ. यशवंत इगळे, ज्येष्ठ सर्जन डॉ. संजय पाडाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय दादेवार, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. राजेश गोरे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. तृप्ती सागळे, समाजसेवक एम.ए. हुसेन, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, मेट्रन मोनिका चव्हाण, फरांदे डेंन्टल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ दंततज्ञ डॉ. माऊली फरांदे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, डॉ. अनु गायकवाड, डॉ. मनिषा गरुड, डॉ. अभिजित फरांदे, डॉ. मदन साळवे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते. महापौर नितीन काळजे म्हणाले, नागरिक मौखिक आरोग्याला फारसे गांभीर्याने घेत नाहित. त्यामुळे मोठ्या आजाराला बळी पडण्याचा धोका निर्माण होतो. कर्करोगावरील उपचार पध्दती आता आधुनिक झाल्या असल्यातरी आजाराचे वेळीच निदान होणे महत्वाचे असते. आधुनिक जिवन शैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतिचा अनावश्यक रित्या अवलंब होत असल्याने आजचे काही युवक आमली पदार्थांच्या व्यसनाधिन होत असताना दिसत आहेत. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी प्रबोधनपर जनजागृती करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरात राबविण्यात येणा-या मोफत मुख आरोग्य तपासणी मोहिमेमध्ये तपासनी करुन घेण्यासाठी वयाची अट न ठेवता सर्वासाठी हि मोहिम राबविण्यात यावी. महापालिकेच्या आठ प्रभागामध्ये तसेच मनपा रुग्णालये व दवाखाण्यात हि मोहिम घेण्यात येणार आहे. सर्व मनपा कर्मचारी, अधिकारी व नागरिक यांची या मोहिमे अंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे.शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कुटुंब प्रमुखा पासून ख-या अर्थाने व्यसन मुक्ती झाली पाहिजे. कॅन्सरची भिती न बाळगता लवकर उपचार करुन घेतल्यास आयुष्य नक्कीच वाढेल. या मोफत मुख आरोग्य तथा दंत चिकित्सा तपासणी मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी त्यांनी केले. दंतशैल्य चिकित्सक डॉ. यशवंत इंगळे म्हणाले, मनुष्य किती हि तंदुरुस्त असला तरी मुख आरोग्य तपासणी केल्यावर तो कोणत्या तरी कारणास्तव मुख रोगाने ग्रस्त झालेला आढळतो. मुख तपासणीअंती मुखाच्या इतर आजाराचे आकलन होते. तंबाखू, गुटखा, सिगारेट, आदी तत्सम आमली पदार्थ सेवन केल्याने तसेच काही व्हायरस मुळे मुखकर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. १०-१५ वयोगटापासून मुले तंबाखू खाताना दिसतात. पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादी खाणा-यांना यापासून परावृत्त करण्यासाठी सर्वांनी कार्य केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी मुख रोगाचे स्वरुप, व्याप्ती, प्रकार व मुख रोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व मुख रोग झाल्यास त्यावरील इलाज याबाबतचे सादरीकरणही केले. ज्येष्ठ दंततज्ञ डॉ. माऊली फरांदे म्हणाले, मौखिक आजार हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतात. त्यामुळे या मोहिमेचा फायदा सर्वांना होणे गरजेचे असून डॉक्टरांनी तपासणी करताना रुग्णाच्या वयाची अट शिथिल करावी. डॉ. मदन साळवे म्हणाले, आजार बळावला की त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. मौखिक आजाराचे वेळीच निदान झाले आणि उपचार केले तर रुग्ण बरा होऊ शकतो. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क असायला पाहिजे. डॉ. संजय पाडाळे, व अनु गायकवाड डॉ. यशवंत इंगळे यांनी मौखिक तपासणी, शोध, निदान व उपचार करण्यासंदर्भात सर्व डॉक्टर्स आरोग्य़ कर्मचारी व नागरिक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.लक्ष्मण गोफणे, डॉ. अभयचंद्र दादेवार, सलिम इनामदार व मेट्रन मोनिका चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यशवंत इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी मानले.
व्हीएस न्यूज – उपचारासाठीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रमोद व्यंकटेश तेलगु, वय-१९, रा-शीतळा नगर देहुरोड, उमेश आदीनारायण बोया, वय-१९, योगेश धनराज द्रविद, वय- २२ असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ७३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ९० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर २२० क्रमांक एम.एच.१४/ एफ.डब्लू.४४६० निळ्या रंगाची गाडी जप्त केली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी उमेश शिवाजी कदम वय- ३०, रा.संत सावता माळी मंदिराजवळ भुमकर चौक, वाकड, हा तरुण शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांच्या स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.१२/ जे.डब्लु. ७१८७ वरुन सुर्या हॉस्पीटलची ३ लाख २३ हजार १०७ रुपयांची रोख व एक चेक बँगेत घेवून भरण्यासाठी एसबीआय व एचडीएससी बँक बाणेर रोड, पुणे येथे जात असताना सकाळी १०.३० वाजता आयकॉन टॉवर बिल्डींगमधील एसबीआय बँक शाखेसमोर पायऱ्यांवर आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कमेसह बॅग पळवून नेली होती. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेचा तपास सुरु असताना पोलिसांनी आरोपींना चतुःश्रृंगी, हिंजवडी, वाकड या परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपींकडून २ लाख ७३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर गाडी जप्त केली. दरोडे प्रतिबंधक पथकातील पोलिस हवालदार पाटील, सय्यद, काटम, पोलिस नाईक कदम, गायकवाड, सुर्वे, गाणते, जाधव यांनी ही कारवाई केली. घटनेचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.
व्हीएस न्यूज - पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 58 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसका मारून तोडून नेली. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता स्पाईन रोड चिखली येथे घडला.
हेमंतकुमार नारायणन (वय-39, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या पत्नीसोबत गुरूवारी सायंकाळी स्पाईन रोडवरून जॅग्वार कंपनीसमोरून जात होते. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 58 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवरील उघड्या हौदात पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे 26 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी ठेकेदारास दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष शंकर पवार (वय-3) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ठेकेदार संग्राम होकर्णे (रा. भोसरी), महेश पवार (रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज धोत्रे (वय-47, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची रहाटणी येथे बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवरील पाण्याच्या उघड्या हौदामध्ये पडून आयुषचा 26 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्याचे पोलीस तपास निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांनी ठेकेदारासह दोघांवर मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - जून्या भांडणाच्या रागातून दोन जणांनी एका तरुणाच्या डोळ्यावर सिमेंटच्या 'पेव्हिंग' ब्लॉकने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री मधुबन कॉलनी भोसरी येथे घडली.
राजेंद्र सुरेश ननावरे (वय 28), किरण कुंडलिक शितोळे (वय 30 , दोघे रा. मधुबन कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. याबाबत गोविंद वामन गुत्तापल्ले (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आणि आरोपींची जुनी भांडणे आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य आहे. जून्या भांडणाचा राग मनात धरुन शुक्रवारी आरोपींनी गोविंद याच्या डोळ्याच्या उजव्या बाजूस सिमेंटच्या 'पेव्हिंग' ब्लॉकने बेदम मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक एन. जे. जगदाळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी बिजलीनगर येथील बसस्टॉप जवळ घडली होती.
प्रदीप जावनलाल चौधरी (वय 19 रा. कुंजीर वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी वर्तुल शर्मा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे 18 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या बहिणीला बसमध्ये बसवून बिजलीनगर रस्त्यावरून पायी येत होते. दुचाकीवर साथीदारासह आलेल्या चौधरीने त्यांना अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून नेला.
पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र तयार करून तपास सुरु केला. या प्रकरणातील आरोपी हा काकडे पार्क येथील डोके उद्यान परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रक्कम व मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - भर दुपारी चोरट्याने महिलेला घरात कोंडून चोरी केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी पिंपरी, संत तुकारामनगर येथील नंदनवन कॉलनीत घडला होता. या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
योगेश प्रकाश देवकर ( वय-20 रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर ढुमणे (वय 47 रा. पिंपरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी फिर्यादी ढुमणे यांच्या आई या एकट्याच घरात असताना दुपारी बाराच्या सुमारास एक अनोळखी इसम त्यांच्या घरात घुसला. त्याने फिर्यादीच्या आईला चाकुचा धाक दाखवला व घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर चोरट्याने घरातील घड्याळ,सोन्याची पोतसह 14 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्याने घराला बाहेरुन कडीही लावली.
भोसरी पोलिसांनी मिळालेल्या वर्णनावरुन चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून 5 ग्रॅमचे सोन्याचे मणी, मनगटी घड्याळ एक चाकु एसा एकूण 14 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, काळुराम लांडगे, पोलीस हवालदार महादेव धनगर, पोलीस नाईक विनायक म्हसकर, जाधव, गणेश हिंगे, पोलीस शिपाई आव्हाळे, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, समीर रासकर, नितीन खेसे, सागर भोसले यांनी केली.
व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवर बिगारी काम करणाऱ्या महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षितेची साधने न पुरविल्याबद्दल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ताथवडे येथे घडला.
लक्ष्मी शिवराय पुजारी (वय-45, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार जितेंद्र वाधवाणी, सय्यद नबिलाल नायकवाडी, शब्बीर बागवाण यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ताथवडे येथील जिंजर हॉटेलच्या पाठीमागे बांधकाम साईट सुरू आहे. हा साईटवर पुजारी या बिगारी काम करतात. त्यांचा सहाव्या मजल्यावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार संगिता गोडे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी खेळ खेळले पाहिजेत, खेळातून शरीर सुदृढ राहते, खेळ विद्यार्थ्यांना घडविते. खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळ खेळला पाहिजे. कोणत्याही खेळाडूला कमी समजू नये. समोरच्या खेळाडूला कमी समजाल तर तुमचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील अनेक शाळांमध्ये मैदाने नाहीत. मैदाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळावेत, असे मत स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित चौथ्या स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडाज्योत पेटवून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरीगावात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका कोमल मेवाणी, स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशनचे राज्य सचिव सुनील शिंदे, पिंपरी चिंचवड व्यापारी आघाडीचे जयदेव डेंबरा, भाजप पुणे जिल्हा कार्यकारणीचे सदस्य कमल कलकाणी, डॉक्टर आघाडीचे डॉ. महेश पेशवानी, असोसिएशनच्या योगा विभागाच्या प्रमुख मनाली देव, नेहुल कुदळे, शिक्षण विभागप्रमुख दीपाली शिंदे, अमर कापसे आदी उपस्थित होते.
संदीप वाघेरे म्हणाले, ”मुलांनी खेळले पाहिजे. खेळल्यावर मुले अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढते. मुलांना खेळण्यासाठी पिंपरीगावात आता एकच मैदान आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी लवकरच पिंपरीगावात पाच मैदाने विकसित करणार आहे. अॅथलेटिक्स, खो-खो हे खेळ खेळण्यासाठी त्या मैदानाचा उपयोग केला जाणार आहे.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन गेल्या चार वर्षांपासून कार्य करत असून ही संस्था स्वदेशी आहे. त्याची निर्मिती भारतीय आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहे. परंतु, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत. मुलींकडून स्पर्धा प्रवेश शुल्क घेतले जात नाही. मतिमंद मुलांचा असोसिएशन संपूर्ण खर्च करते, असे राज्य सचिव सुनील शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी नगरसेविका कोमल मेवाणी यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, योग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
रविवारी (दि.३) पिंपरीगावातील बी.जी.आडवाणी धर्मशाळेत दुपारी १२ ते १ यावेळेत स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी दौंडकर यांनी केले.
व्हीएस न्यूज - शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजपा सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांच्यामधील राजकीय ‘आखाडा’ आता रंगात आला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ‘शिरुरचा खासदार’ असे फ्लेक्स उभारुन आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी खासदार गटाला खुले आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस भोसरीसह शिरुर लोकसभा मतदार संघात विविध उपक्रमांनी मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. वास्तविक, आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र, फ्लेक्स आणि विविध प्रसारमाध्यमांतील जाहिरांतींमध्ये आमदार लांडगे यांच्या नावाचा उल्लेख ‘भावी खासदार’, मंत्रीसाहेब, शिरुरचा खासदार…असा करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडूक डोळ्यांसमोर ठेवून आमदार लांडगे यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांच्यासह शिवसेना, काँग्रेस तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार लांडगे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पाठींबा दिला आहे. त्यामुळे सहाजिकच आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार लांडगे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक महामार्ग, रिंगरोड, रेड झोन, बैलगाडा शर्यत, कचऱ्यापासून विजनिर्मिती प्रकल्प, औद्योगिक प्रश्न आदी विकासकामांवरुन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्या अनेकदा मतभेद झाले आहेत. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेवून आमदार लांडगे यांनी नवखे असतानासुद्धा खासदारांना चांगलेच आव्हान दिले आहे. वास्तविक, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेच आमदार लांडगे यांना ताकद दिली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचा वाटा मोलाचा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार लांडगेंना ताकद…
शिरुर लोकसभा मतदार संघासाठी सध्यातरी भारतीय जनता पक्षासह सर्वपक्षीय आढळराव पाटील यांच्या विरोधकांसमोर एकही प्रभावी चेहरा नाही. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील हे स्वत: लोकसभा निवडणुकीसाठी जोखीम घेणार नसल्याचे सांगितले जाते. आढळराव यांना खुले आव्हान देण्याची तयारी आमदार लांडगे यांनी ठेवली आहे. त्यामुळे भविष्यातील तजवीज म्हणून भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी आमदार लांडगे यांना ‘प्रमोट’ केले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, बैलगाडा शर्यतीवरील आंदोलनाचा रोख राज्य सरकारवर येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत आमदार लांडगे यांनी ‘पेटा’ विरोधात एल्गार पुकारला होता. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही आमदार लांडगे यांना कायम झुकते माप दिले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002