व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी खेळ खेळले पाहिजेत, खेळातून शरीर सुदृढ राहते, खेळ विद्यार्थ्यांना घडविते. खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळ खेळला पाहिजे. कोणत्याही खेळाडूला कमी समजू नये. समोरच्या खेळाडूला कमी समजाल तर तुमचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील अनेक शाळांमध्ये मैदाने नाहीत. मैदाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळावेत, असे मत स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित चौथ्या स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडाज्योत पेटवून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरीगावात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका कोमल मेवाणी, स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशनचे राज्य सचिव सुनील शिंदे, पिंपरी चिंचवड व्यापारी आघाडीचे जयदेव डेंबरा, भाजप पुणे जिल्हा कार्यकारणीचे सदस्य कमल कलकाणी, डॉक्टर आघाडीचे डॉ. महेश पेशवानी, असोसिएशनच्या योगा विभागाच्या प्रमुख मनाली देव, नेहुल कुदळे, शिक्षण विभागप्रमुख दीपाली शिंदे, अमर कापसे आदी उपस्थित होते.
संदीप वाघेरे म्हणाले, ”मुलांनी खेळले पाहिजे. खेळल्यावर मुले अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढते. मुलांना खेळण्यासाठी पिंपरीगावात आता एकच मैदान आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी लवकरच पिंपरीगावात पाच मैदाने विकसित करणार आहे. अॅथलेटिक्स, खो-खो हे खेळ खेळण्यासाठी त्या मैदानाचा उपयोग केला जाणार आहे.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन गेल्या चार वर्षांपासून कार्य करत असून ही संस्था स्वदेशी आहे. त्याची निर्मिती भारतीय आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहे. परंतु, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत. मुलींकडून स्पर्धा प्रवेश शुल्क घेतले जात नाही. मतिमंद मुलांचा असोसिएशन संपूर्ण खर्च करते, असे राज्य सचिव सुनील शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी नगरसेविका कोमल मेवाणी यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, योग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
रविवारी (दि.३) पिंपरीगावातील बी.जी.आडवाणी धर्मशाळेत दुपारी १२ ते १ यावेळेत स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी दौंडकर यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002