व्हीएस न्यूज – सांगलीतील पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरण राज्यातील पोलिसांना चांगलेच महाग पडले होते. असे असताना देशात सर्वाधिक कोठडीतील मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ‘क्राईम इन इंडिया २०१६’ च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया २०१६’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये देशातील पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोठडीत मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात झाल्याची नोंद एनसीआरबीने अहवालात केली आहे. देशात २०१६ मध्ये ९२ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. २१ प्रकरणांत पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशात सर्वाधिक कोठडीत मृत्यू महाराष्ट्र (१६) झाले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (११) आणि गुजरात (११) या राज्याचा क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोठडीत मृत्यू नोंदले गेले असून येथे घडलेल्या बारा घटनांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तर, तीन प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात किंवा कोठडीत घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून आले आहे. कोठडीत आत्महत्या केल्याच्या सर्वाधिक म्हणजे ३८ घटना झाल्या आहेत. त्यानंतर विविध आजारांमुळे २८ जणांचा कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. गुन्हेगारांसोबत कोठडीत असताना झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झाला. तर, तपासासाठी बाहेर घेऊन जाताना अपघात होऊन देखील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच कोठडीतून पळून जाताना चारजण ठार झाले आहेत.
पोलीस अधिकारी किंवा कर्मचा-यांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत मृत्यूच्या घटना आठ असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमूद केले आहे. कोठडीत असताना पळून गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशात कोठडीतून १३२० आरोपी पळून गेले आहेत. त्यापैकी ९५० जणांना अटक करण्यात आली. कोठडीतील आरोपी पळून जाण्यांमध्ये उत्तर प्रदेश मध्यप्रदेश (१३३) आघाडीवर आहे. त्यानंतर (२८२) आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला होणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असून ११ डिसेंबरला कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली आहे.
संजोग वाघेरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी फसली आहे. शेतक-यांना कर्जाचे पैसे अजून मिळाले नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यापर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेला विदर्भात शेतक-यांसह सर्वच घटकातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देखील काही पदाधिकारी हल्लाबोल पदयात्रेत सहभागी झाले आहेत. शेतक-यासह सर्वंच घटकातील नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत. आपल्या व्यथा पक्षाच्या नेत्यांना सांगत आहेत. त्यांचे प्रश्न समाजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे नेते करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये माजी आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका सहभागी होणार आहेत अशी माहिती संजोग वाघेरे यांनी दिली.
बैठकीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष पवक्ते फजल शेख, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, प्रदिप गायकवाड, शुक्रुल्ला पठाण, यतिन पारेख, आनंदा यादव,सी.आर. कांबळे, गंगा धेंडे, विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, कविता खराडे, सविता खराडे, शहजादी सय्यद, मनिषा गटकळ, शकुंतला भाट, सचिन माने, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
व्हीएस न्यूज - एका रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.९) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास दिघी येथील दत्तमंदीरा जवळ घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश अंताराम गंगणे (वय-40 रा. दत्तनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अरविंद वंजारी (रा. दिघी), तुषार (पूर्ण नाव माहित नाही), प्रमोद शेलार (रा. दिघी), निलेश कुदळे (रा. वडमुखवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश यांचा भाऊ सुरेश अंताराम गंगणे (वय-४५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गंगणे हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. काल रात्री आरोपी आणि मयत हे सर्वजण न्यु मोहर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वाएकच्या सुमारास आरोपी अरविंद आणि त्याचे भाचे तुषार, प्रमोद आणि निलेश या चौघांनी गणेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन गणेश यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - ताथवडे येथील पंडीत ऑटोमोटिव्ह कंपनीला औद्योगिक न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत कंपनीच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा तात्पुर्ता मनाई आदेश दिला आहे. हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, अँड. गौरव पोळ, शांताराम कदम, गजानन जोध, हमिद ईनामदार आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना कैलास कदम म्हणाले की, मे. पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. या कंपनी विरूध्द त्यांच्या काही कामगारांनी दि.३० नोव्हेंबर रोजी त्यांचे थकीत असलेले ५ महिन्यांचे वेतन, दिवाळी बोनस व इतर अनुषंगिक फायदे मिळावेत यासाठी औद्योगिक न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आदेश देताना न्यायालयाने कामगारांच्या नोकर्यांना संरक्षण दिले होते. तसेच ४ डिसेंबर रोजी कंपनीच्यावतीने त्यांच्या अधिकार्यांनी कामगारांची बदली करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी मनाई आदेश वाढवून देऊन कामगारांच्या नोकरीस संरक्षण दिले. तरीही दि.५ डिसेंबर रोजी पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. व्यवस्थापनाने सायंकाळी उशिराने तडकाफडकी टाळे ठोकल्याने ३०० कामगार रस्त्यावर आले आहेत.
न्यायालयात तक्रार अर्ज प्रलंबित असूनही कंपनीच्या अशा टोकाच्या भूमिकेमुळे कामगारांना त्यांच्या नोकरीबाबत आणि कंपनीने देय असलेल्या पगार, आणि इतर आर्थिक लाभ मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे व्यवस्थापना विरोधात हिंद कामगार संघटनेने ७ डिसेंबर रोजी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. कामगारांचे सर्व आर्थिक लाभ आणि देयके देईपर्यंत कंपनीच्या सर्व चल आणि अचल मालमत्तांची विक्री करण्यास मनाई करण्याबाबत व कंपनीची सर्व कागदपत्रे जप्त करण्याबाबत तात्पुर्ता मनाई करावी अशी विनंती करणारा अर्ज केला. त्या अर्जावर प्रथम औद्योगिक न्यायालय श्री.एस.व्ही.सुर्यवंशी यांनी कंपनीच्या वकिलांना जाब विचारला. परंतू कंपनीने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता अर्जावर जबाब देण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने त्यावर कंपनीने जर कामगारांना त्यांचे आर्थिक देय रक्कम दिली नाही तर कामगारांकडे काय पर्याय आहे असा सवाल करून पुढिल तारखेपर्यंत कंपनीने त्यांच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला. हिंद कामगार संघटने तर्फे अँड. गौरव पोळ यांनी कामकाज पाहिले. पुढील सुनावणी येत्या दि. ५ जानेवारी रोजी होणार असल्याचे अँड.पोळ यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय असेही, त्या म्हणाल्या. यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.
व्हीएस न्यूज - राज्यातील शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत केलेली कपात रद्द झाली पाहिजे, शेतक-यांना वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे, प्रस्तावित कामगार कायद्यातील जाचक तरतुदी मागे घ्याव्यात या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे हल्लाबोल मोर्चा होणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून 380 कार्यकर्ते नागपूरला रविवारी सायंकाळी रवाना झाले. यामध्ये सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, सरचिटणीस दिलीप पांढारकर, अशोक पांढारकर, अक्षय शिंदे, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तानाजी काटे, मनोज बिशप, गौतम आरकडे, भाऊसाहेब मुकुटमल, राजेंद्रसिंह वालिया, डॉ. नंदकुमार दुगड, जयप्रकाश बोराटे, सतिश भोसले, सुनिल राऊत, संकेत बो-हाडे, विश्वनाथ खंडाळे, परशूराम गुंजाळ, दत्तात्रय दातीर पाटील, बाबा बनसोडे, हिरा जाधव, शशीकिरण कांबळे, विरेंद्र गायकवाड, गौरव चौधरी, संदेश नवले, आबा खराडे, उबेंद्र मेनन, वासूदेव तैमल, राजन नायर, मल्लिका मेनन, मनिषा थॉमस, वत्सला नायर, एंजल नायर, मकर यादव आदींसह शहर कॉंग्रेस पदाधिकारी व महिला, युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
व्हीएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस व मावळ लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस ॲड. क्षितीज गायकवाड, महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल कसबे, विनीता तिवारी, हिरा जाधव, गौरव चौधरी, विरेंद्र गायकवाड, अभय तिवारी, नितेश जाधव, विराज साठे आदी उपस्थित होते. सचिन साठे व अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सचिन साठे यांच्या हस्ते कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे यांना पाच हजारांचा धनादेष देण्यात आला. पांडूरंग खरसडे, आकाश शिंदे व नितीन भोईटे या अंध बांधवांनी सुश्राव्य गीताव्दारे सोनिया गांधींना उदंड आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या. समाजप्रबोधनकार शारदा मुंडे यांनी आई व बाप या विषयी प्रबोधन केले. स्वागत नरेंद्र बनसोडे, सुत्रसंचालन मयुर जयस्वाल, आभार विरेंद्र जाधव यांनी मानले.
महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या राज्य परिषदेचे चिंचवडमध्ये शानदार उद्घाटन
व्हीएस न्यूज - - विद्वत्ता आणि विव्दानाची कधी तुलना होऊ शकत नाही. सर्वांनी नेहमी आपले कौशल्य एकमेकांशी संवाद साधत अद्ययावत ठेवावे. डॉक्टर आणि समाजातील सर्व घटकांचा संवाद असला पाहिजे. या संवादातून निर्माण होणारी ऊर्जा समाज हितासाठी खर्च झाली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. यातूनच निरामय, सुदृढ समाजनिर्मिती निर्माण होईल. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता हे खूप महत्वाचे आहे. वैद्यकीय व्यवसायात काम करणे म्हणजे समाजसेवेची चांगली संधी आहे. वैद्यकीय पेशा हे 'नोबेल प्रोफेशन' आहे, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.
इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या 56 व्या राज्य परिषदेचे उद्घाटन नांगरे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुजित विंचेकर, इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, वायसीएम रुग्णालायाचे दंतविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जुई तुपे, डॉ. दिपाली पटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. अमित पाटणकर, डॉ. सचिन कोचेकर आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नांगरे पाटील म्हणाले की, वैज्ञानिक प्रगतीमुळे मोठ्याप्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करीत आहे. त्याचा प्रभाव वाढला आहे. मात्र या माध्यमांचा चुकीच्या पध्दतीने वापर होता कामा नये. तुम्ही स्विकारलेल्या वैद्यकीय पेशातून समाजाला काही तरी चांगले देऊ शकता. चांगल्या समाजनिर्मितीस तो एक हातभार लागेल.
दिवस-रात्र काम करावे लागत असल्याने पोलीसांवर कामाचा फार ताण आहे. पोलीस आणि डॉक्टर यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. परंतु, आपण संघटीतपणे काम केल्यास अशा घटनांना लगाम घालू शकतो. स्वतःच्या शक्तीबद्दल माहिती, विश्वास नसेल तर विजय आणि पराभव यांचा सामना करावा लागेल. परंतु, शांततेच्या काळातच अधिक घाम गाळला तर युध्दाच्या काळात कमी रक्त सांडते. कधी मोठे व्हावे, कधी छोटे व्हावे तसेच कधी मृदू तर कधी कठोर व्हावे हे आपल्याला कळले पाहिजे. आपल्या स्वभावात व्देष, तिरस्कार, असुया नसावी. गुण व अवगुणांसह एखाद्याला स्वीकारणे म्हणजेच प्रेम होय, असेही नांगरे पाटील म्हणाले.
दरम्यान उद्घाटनप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नांगरे पाटील तसेच अन्य उपस्थितांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. राकेश प्रसाद यांनी तीन दिवसांच्या परिषदेमध्ये होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. देशभरातून 4300 दंत वैद्य आणि विद्यार्थी या परिषदेत सहभाग नोंदवला आहे. ॲटोक्लस्टर, सायन्स पार्क येथील सहा हॉलमध्ये एकुण 118 चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो विद्यार्थी आपले पीएचडीचे प्रबंध सादर करणार आहेत. याबरोबरच दंत वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे देश-विदेशातील कंपन्यांचे स्टॉल कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले आहेत.
डॉ. अशोक ढोबळे आपल्या भाषणात म्हणाले की आयडीएची प्रगती फार जोमाने होत आहे. 56 व्या राज्यस्तरीय परिषदेसाठी पिंपरी चिंचवड शाखेने खूप कष्ट घेतले असून त्याचे फलस्वरूप म्हणजेच डॉक्टर, विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात मौखिक कर्करोगामुळे मृत्यू पावणा-यांची संख्या अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी इंडियन डेन्टल असोसिएशनने मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. तसेच फॉरेन्सिक ओरोलॉजीवर आयडीए काम करत आहे. यामध्ये पोलीस दलाची मदत घेण्यात येईल, असे डॉ. ढोबळे यांनी सांगितले.
डॉ. विश्वास पुराणिक यांनी पिंपरी चिंचवड शाखा ज्येष्ठ दंत वैद्य डॉ. माऊली फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करत असल्याबद्दल कौतुक केले. गेल्या काही काळापासून डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी संघटन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संघटन झाल्यास अशा घटनांना लगाम बसेल, असेही डॉ. पुराणिक म्हणाले.
डेन्टिस्टला आता सुवर्णकाळ आला आहे. पूर्वी दाताचे डॉक्टर असतात, अशी माहितीच लोकांना फारशी नव्हती. परंतु, आता काळ बदला असून चांगला डेन्टिस्ट कोण आहे, याचा शोध रुग्ण घेतात. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे. सकारात्मक दृष्टीने काम केल्यास त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळते. मला राजकारणाची आवड असल्यामुळेच मी दोन वेळा आमदार होऊ शकलो, असे आमदार डॉ. सुजित विंचेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्ही.व्ही.एस. वर्गीस, मनिषा यांनी केले. तर आभार डॉ. अभिजीत फरांदे यांनी मानले.
26/11 हल्ल्याची होती पूर्व कल्पना...
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची पूर्व कल्पना दीड-दोन महिने आधिच मिळाली होती. त्यावेळी मी आधिच हॉटेल ताजची रेकी केलेली असल्याने अतिरेक्यांच्या पाठोपाठ म्हणजे 11 मिनिटात घटनास्थळी पोचलो होतो. 23 व्या मिनिटाला अतिरेक्याला टिपले. अतिरेकी कोठे जाऊ शकतात, कोणत्या ठिकाणी आपण त्यांची कोंडी करू शकतो याची कल्पना मला असल्यानेच अतिरेक्यांच्या गोळीबाराला प्रतित्तोर देवून सुखरूप बचावलो. पुणेकर नागरिकांनी रेव्ह पार्टी कारवाईबाबत मला खूप सहकार्य केले. अमंली पदार्थांच्या व्यापारातून युवकांना टार्गेट केले जात आहे. सोशल मीडियाचे ॲडिक्शन आणि युवकांना पडलेला अमंली पदार्थांचा विळखा ही चिंतेची बाब असल्याचे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
व्हीएस न्यूज - रिक्षा थांबा सुरू ठेवण्यास काही संघटनांनी विरोध केल्यामुळे रूपीनगर येथील रिक्षा चालक व संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद पोलीसांनी मध्यस्थी करून रिक्षा थांबा सुरू केला आहे. तसेच इतर संघटनांनी रिक्षा चालकांना त्रास न देण्याची तंबीही पोलीसांनी दिली आहे. रूपीनगर येथिल रिक्षा चालकांना रिक्षा थांब्यावर व्यवसाय करण्यास काही संघटनांनी विरोध केला होता. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्या भेट घेत. रिक्षा चालकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. निगडी पोलीसांनी तात्काळ लक्ष घालत रूपीनगर येथील रिक्षा थांबा सुरू केला आहे. यावेळी धर्मराज जगताप, जॅकब मॅंथिव, नारायण लोखंडे, पंडित अँथनी, हाफिज मुल्ला, हुजूर शेख, ज्ञानेश्वर जगताप, इम्रान शेख, फिरोज शेख, आकाश काळभोर, सिकंदर शेख, विक्की जाधव, कलेश्वर सरवदे, सहरफुद्दीन सय्यद, सोहेल अत्तर आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पुर्ववैमन्यसातुन तरुणावर प्राणघातक हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी बुधवारी आणखी पाच जणांना अटक केली. यापुर्वी पोलिसांनी या घटनेसंदर्भात चार जणांना अटक केली होती.
मयुर कालिदास चव्हाण (वय25), आशिस संजय लोखंडे (वय20), गुड्ड्या उर्फ महेश दिलीप मोरे (वय19) निखिल दिपक एडलेल्लु (वय19) व विशाल प्रकाश वाघमारे (वय 18सर्व रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापुर्वी पोलिसांनी या घटनेसंदर्भात रविवारी आशिष उर्फ मट्टा मुकेश मायकल (वय23), अभिजित प्रकाश कांबळे (वय28), सनी संतोष ओव्हाळ (वय19) व प्रसाद प्रकाश डंबाळे(वय19)यांना अटक केली होती. आतापर्यत एकुण नऊ आरोपींना अटक केली आहे. चार आरोपींना खडकी न्यायालयाने गुरूवारपर्यत पोलिस कोठडी सुनावली होती. या चार आरोपीसह बुधवारी अटक केलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी गुरूवारी न्यायालयात हजर केले असता चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावित त्यांची येरवडा काराग्रुहात रवानगी करण्यात आली. तर पाच आरोपींना दि. 10 पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी मनोज शेळके व सर्व आरोपी हे बोपोडी सर्व्हे नंबर 25 व 26 येथे रहायला आहेत. शेळके व आरोपींमध्ये पुर्वीची भांडणे होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. रविवारी रात्री 9 वाजता शेळके सांगवी येथिल एका मित्राला भेटुन घरी जात असताना बोपोडी येथिल जय मात्रुभुमि चौकात अडवुन प्रथम शिवीगाळ केली. आरोपी चव्हाण व डंबाळे यांनी शेळके यांना सिंमेटच्या गटुटुने मारहाण केली. नंतर मायकलने जख्मी शेळकेस दुचाकीवर बसवुन पिंपरी येथिल स्मशानभुमित नेले तेथे चव्हाण याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. तर लोखंडे याने बिअरच्या बाटलीने मारहाण केली. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये शेळके गंभीर जख्मी झाला. शेळकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस उपनिरिक्षक मदन कांबळे अधिक तपास करित आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुधवारी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित करणार असलेल्या पवनाथडी जत्रेत स्टॉल मिळण्यासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीस वाढ मिळावी अशी सूचना उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली आहे. शुक्रवारी उपमहापौरांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले असून त्यात ही सूचना केली आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे पवनाथडी जत्रा दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षी ही जत्रा 4 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये स्टॉल मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 8 डिसेंबर पर्यंत होती. परंतु शहरातील बऱ्याच बचतगटांचे अर्ज भरणे राहून गेल्यामुळे ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी अशी सूचना उपमहापौरांनी केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002