व्हीएस न्यूज – काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील अठरा मीटरचा रस्ता गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकाराची तातडीने चौकशी करून अधिकारी तसेत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी मुख्य रस्ता ते राजवाडेनगरपर्यंतच्या अठरा मीटर रस्ता रुंदीकरण झाले असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. माहिती अधिकारात प्राप्त माहितीनुसार हा रस्ता जागा हस्तांतर रखडल्यामुळे विजयनगरमध्ये फक्त तीनशे ते चारशे मीटरपर्यंत विकसित झाला आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता 20 मे 2014 रोजी 52 लाख 50 हजारांना देण्यात आली. त्यानंतर एच. सी. कटारिया या ठेकेदाराची 49 लाख एक हजार961 रुपयांना निविदा मान्य केली.
सहा महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश 15 एप्रिल 2015 रोजी देण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. हे काम पंचवीस टक्के झाले असून, या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मानांकनानुसार योग्य व समाधानकारक असल्याचा दाखला ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिला आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2015 रोजी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता याच्या सह्या असलेले काम पूर्ण झाल्याचे दस्तऐवज आयुक्तांना देण्यात आले असून, त्यावर हे काम समाधानकारक व व्यवस्थित पूर्ण केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर महापालिकेच्या लेखा विभागाने ठेकेदाराला कामाचे पैसेही देऊन टाकले. महापालिकेच्या तिजोरीवर सामुहिक दरोडा घालण्याचा हा प्रकार असल्याचे युवराज दाखले यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे यंदाच्या वर्षी आतापर्यंत पुणे शहरात 930 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यातील अठरा दिवसांत डेंग्यूचे 92 रुग्ण आढळले आहेत. सध्या स्वाइन फ्लू कमी झाला असून, डेंग्यूने रुग्णाची संख्या वाढत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीमध्ये डेंग्यूचे 64 रुग्ण आढळले होते. यानंतर आठ दिवसांमध्ये पुन्हा 28 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर पुणे शहरात जानेवारी – 8, फेब्रुवारी – 2, मार्च -4, एप्रिल – 5, मे – 3 आणि जूनमध्ये 6 असे सहा महिन्यांत 28 रुग्ण आढळून आलेले आहेत. या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव फार कमी असतो. पण, जूनमध्ये पाऊस पडला आणि डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस डासांचा उपद्रव सुरू झाला. एका जुलै महिन्यातच 58 रुग्ण आढळून आले. तर त्यानंतरच्या महिन्यात यामध्ये ते सहा पटीने वाढ दिसून आली. त्यामध्ये ऑगस्ट – 234, सप्टेंबर- 251 तर ऑक्टोबरमध्ये यामध्ये प्रचंड वाढ झाली असून 18 ऑक्टोबरपर्यंत 359 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कीटक प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 1079 संशयित रुग्णांपैकी 138 जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर चिकुनगुनियाचे 14 संशयित व मलेरियाचे 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अठरा दिवसांत 92 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यावरूरुन स्वाइन फ्लूप्रमाणे डेंग्यूचा धोकाही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
व्हीएस न्यूज – प्रारब्धावर अवलंबून राहू नका. प्रारब्ध कसेही असोत, प्रारब्धापेक्षा प्रयत्नशील राहून सातत्याने कष्ट केल्यास यश हमखास मिळते, असे मत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील फॉर्च्यून ग्रुपच्या वतीने राशीचक्रचे 5088 यशस्वी प्रयोग व राशीभविष्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्योजक डॉ रमेश राऊत, अभ्युदय बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल निकम, उद्योजक विठ्ठल कारखानीस, कासारसाईचे माजी सरपंच शंकर शितोळे, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, उद्योजक मदन चिंचवडे, हिरालाल पाटील, संतोष दुबळे, फॉर्च्यूनचे संचालक नितीन धिमधिमे, मकरंद पांडे, सुरेश सातकर आदी उपस्थित होते.
उपाध्ये पुढे म्हणाले की, पत्रिका ही भूतकाळावर अवलंबून असते तर भविष्य घडविणे हे आपल्या हाती असते. भविष्य हा अध्यायनाचा व गमतीचा विषय आहे. ग्रह किंवा पत्रिकेवर अवलंबून न राहता उपासना वाढवून स्वकर्तृत्वाच्या बळावर जीवनात वाटचाल करा. यशस्वी व्हाल. आयुष्यात काहीच कमी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन रवी पंडीत यांनी केले. तर आभार नितीन धिमधिमे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्यअधिवेशनाचे (27 ते 29 ऑक्टोबर) आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ बालशिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, म.बा.शि.प. कार्याध्यक्ष डॉ. दिनेश नेहेते, सांगवी केंद्राच्या अध्यक्ष मेघना बाक्रे, कार्याध्यक्ष नझीर जमादार, त्रिवेणी पावसे, नीता सणस आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र बालशिक्षण ही संस्था १९९४ साली स्थापन झाली. या संस्थेचे कार्य बालशिक्षणाचा शास्त्रीय विचार जनतेपुढे आणणे हे आहे. बालशिक्षण परिषद जनजागृतीचे कार्य, गेली २४ वर्षे सातत्याने करीत आहे. प्रकाशन, प्रशिक्षण, प्रदर्शन आणि व्याख्यानाद्वारे समाजातील सर्व घटकांना बालशिक्षणाची शास्त्रीय माहिती देण्याचा परिषद प्रयत्न करीत आहे, असे प्रा. पानसे यांनी सांगितले.
दरवर्षी परिषदेतर्फे बालशिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते,शिक्षक, संस्थाचालक, पालक, स्वखर्चाने उपस्थित राहतात. यावर्षीचे हे अधिवेशन 'संस्कृती हॉल' नवी सांगवी, पुणे येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी 'बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान'हा महत्वाचा विषय निवडण्यात आलेला आहे. या विषयावर अनेक शिक्षक, संस्थाचालक, कार्यकर्ते शोधनिबंध सादर करणार आहेत, अधिवेशनाचे स्वरूप पूर्णपणे बौद्धिक स्वरूपाचे असून, शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांचे प्रदर्शन हा ही एक महत्वाचा भाग असेल या अधिवेशनासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओद्वारे शुभसंदेश पाठवलेला आहे. उद्घाटनासाठी वसुधा कामत, माजी कुलगुरू एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ तसेच पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी बजरंग आवारी, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात गुणवत्तावाढ आणि कार्यसुलभतेसाठी तंत्रज्ञान - संस्थाचालकांचे अभिनव प्रयोग या विषावरील चर्चासत्र होणार असून त्यास शिवाजी माने, कोल्हापूर येथील नीतू बावडेकर, जयश्री घाटगे आदी सहभागी होणार आहेत. तसेच ग्राममंगलचे प्रसाद मणेरीकर यांचे व्याख्यान,बालशिक्षणाची वाटचाल याविषयावरील चर्चासत्रात प्रसाद जोशी, नेहा जमदग्नी, मंगला जोशी आदी सहभागी होणार आहेत.
शनिवारी (28 ऑक्टोबर) शोधनिबंध वाचन यामध्ये तंत्रज्ञान पर्यायी नव्हे, पूरक साधन याविषयावर चित्ररेखा जाधव, सुरेखा सोनार, रोहिणी घोंगडे आदी सहभागी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज मीठभाकरे असतील. त्यानंतरच्या सत्रामध्ये मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सूर्यवंशी, यांच्या शोधनिबंधाचे वाचन तर लोणावळा येथील मनःशक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांचे व्याख्यान, दुपारच्या सत्रात नीलेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रज्ञान वापर-इतरांचे प्रयोग-आपले शिक्षण याविषयावरील शोधनिबंध सादर होतील रेखा पाटील,नितीन माळी, रुपाली पाटील हे यामध्ये सहभागी होतील. अधिवेशनाचा समारोप रविवारी होईल. या कार्यक्रमास राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे व्यवस्थापक श्री. विवेक सावंत उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनातील उपस्थित सदस्यांसाठी निवास, भोजन व्यवस्था तसेच संपूर्ण जागा व कार्यक्रमव्यवस्था यासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या सांगवीतील शिक्षणसंस्थेने प्रायोजकत्व घेतेलेले आहे. सर्व शिक्षणप्रेमींनी तीनही दिवस अधिवेशनास उपस्थित राहून या विषयातील शिक्षणविषयक नवीन माहिती घ्यावी आणि बालशिक्षणाचे स्वरूप शास्त्रीयपद्धतीचे होण्यासाठी जमेल ते कार्य करून या चळवळीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रशांत शितोळे, प्रा. रमेश पानसे तसेच कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपुजेनिमित्त मंगळवार (दि.24 ऑक्टोबर) ते शुक्रवार (दि. 27 ऑक्टोबर) पर्यंत मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य छटपुजा आणि इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या महोत्सवात नदी संवर्धनाचा संकल्प करीत ‘इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरतीचा’ मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. वाराणशी (काशी) येथील गंगेच्या घाटावर ज्याप्रमाणे गंगेची आरती करण्यात येते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, उपमहापौर शैलेजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि स्थानिक नगरसेवक आदी प्रमुख मान्यवरांसह शहरातील उत्तर भारतीय समाज बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे.
या महोत्सवानिमित्त रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोशीतील इंद्रायणी घाटावर उर्त्स्फुतपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये शामबाबू गुप्ता, अक्रम शेख, प्रमोद गुप्ता, सुनिल सिंह, संजय विश्वकर्मा, देवेंद्र पासवान, रामेश्वर गौड, फुलचंद राम, उमेश सिंह, राजकुमार गुप्ता, रोहित प्रसाद आदींनी सहभाग घेतला.
मंगळवारी (दि. 24) सायंकाळी स्नान ध्यान, बुधवारी (दि. 25) खरना, छोटकी छट (रसियाव रोटी), गुरुवारी (दि. 26) डाला छट व्रत (संध्या अर्ध्य) भव्य मातेची गंगा आरती, शुक्रवारी (दि. 27) पहाटे 5.30 वाजता सुर्योदय अर्ध्य, 6.32 वाजता सुर्यदर्शन गंगा आरतीने महोत्सवाची सांगता होणार आहे.
छटपुजेचे महत्व सांगतांना गुप्ता यांनी माहिती दिली की, छट पुजा हे संपुर्ण उत्तर भारतीय समाजात लोकआस्थेचे महापर्व समजले जाते. कार्तिक शुक्ल षष्टीला सर्व उत्तर भारतीय कुटूंब जल, जमिन आणि जगंलाचे रक्षण संवर्धन व्हावे यासाठी नदी किनारी येऊन वसुधंरे प्रति प्रेम भावनेने समर्पित होऊन सुर्य नारायणाची उपासना, पुजा करुन त्याचे गुणगाण गातात. मानवाच्या जीवनातील निर्सगाचे व नदीचे महत्व लक्षात घेऊन नदी घाटावर श्रध्दापुर्वक पुजा विधी करतात. महिला आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी या दिवशी निर्जला व्रत,उपवास धरतात. या काळात उपलब्ध असणारी फळे, फुले आणि घरात बनविलेल्या प्रसादाचा नैवेद्य दिव्यांसह गंगेला समर्पित करुन कुटूंबाचे, समाजाचे क्षेमकुशल उत्तम रहावे यासाठी प्रार्थना करुन उपवास सोडतात. देशभर उत्तर भारतीय समाज उद्योग व्यवसायामुळे जगभर विखुलला आहे. त्या त्या भागातील हे नागरीक जवळच्या नदीकिनारी हा उत्सव साजरा करतात. हिंदू धर्मियांबरोबरच मुस्लिम धर्मिय देखिल या उत्सवात सहभागी होत असल्यामुळे महोत्सवाला आता देशभर राष्ट्रीय एकात्मकतेची प्रतिक मानले जाते. अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
व्हीएस न्यूज – राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या नेतृत्वाखाली कासारवाडी येथील सिमंडस् मार्शल कंपनीतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी संघटना स्थापन केली आहे. नुकत्याच झालेल्या वेतनवाढ करारात या कर्मचाऱ्यांना 14 हजार 200 रुपयांची घसघशीत वेनवाढ मिळाली आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची ही राज्यातील पहिलीच संघटना आहे, असा दावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी सोमवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत केला.
यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तीन वर्षांपूर्वी सिमंडस् मार्शल कंपनीतील सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सदस्यत्व स्विकारले होते. यामध्ये सहाय्यक व्यवस्थापकापासून पदवीधर अभियंता अशा उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी या कर्मचाऱ्यांना दरवर्षी हजार-पाचशे रुपयांची वेतनवाढ मिळत असे. या संघटनेचे सदस्यत्व स्विकारल्यानंतर संघटनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला नउ हजार रुपये वेतनवाढीचे मागणी पत्रक देण्यात आले. त्यानुसार तन वर्षांचा करार मंजूर झाला. या कराराची मुदत संपताच एप्रिल 2017 पासून 14 हजार 200 रुपयांची घसघशीत वेतनवाढ करार लागू करण्यात आली. कंपनीतील 100 कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. या वेतनवाढीपैकी 50 टक्के हिस्सा मूळ वेतनात तर उर्वरित 50 टक्के भाग चार हप्त्यांमध्ये विभागून दिला जाणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एच. जी. पाटील, पी. आर. राजाज्ञ, एन. एस. मेठकर, पी. व्ही. थंपी, ए. आर. अनिखिंडी, पी. पी. काळे, तर कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने यशवंत भोसले, एस. एम. गवस, ए. बी. सोनोणे, एम. एच. बापट, एस. बी.वाळके, आर. ए. साळवी, एम. डी. जोशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. याकरिता प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीला सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब केले. त्यानुसार विविध 54 जणांची पद भरती महापालिकेला करणार असून त्यानंतर वायसीएममध्ये प्रत्यक्ष वैद्यकीय अध्यापन सुरू होणार आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर बऱ्याच प्रतिक्षेनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परवानगीने हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय वायसीएम रुग्णालयात सुरू होत आहे. त्यासाठी पदनाम,पदसंख्या, शैक्षणिक अर्हताधारकांना भरण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजुरी दिली. 3 वर्षांसाठी शासकीय वेतन श्रेणीनुसार हंगामी स्वरुपात 30 पदांसाठी 54 जणांची पदभरती केली जाणार आहे.
खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये औषध वैद्यक, स्त्री रोग व प्रसृतीशास्त्र, कान, नाक, घसा, अस्थिरोग, बालरोग,जनरल सर्जरी, रेडीओलॉजी, मानसोपचार, भुलशास्त्र, पॅथोलॉजी, उरोरोग शास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एक प्राध्यापक असणार आहे. तसेच, विविध विषयांचे 26 सहयोगी प्राध्यापक देखील नेमले जातील. तसेच, कोडींग क्लर्क, ऍक्युपेशनल थेरपिस्ट, डॉक्युमेंटलिस्ट, स्टॅंस्टिशियन कम असिस्टट प्रोफेसर, प्रोथेस्टिक ऍण्ड आर्थोटीक टेक्रीशियन,कॅंटालॉगर या पदावरही प्रत्येक एक जण भरती केली जाणार आहे. या प्रस्तावावर नगरसेविका मंगला कदम यांनी नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याच्या प्रस्तावाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत त्याला गती देण्याची मागणी केली. तर, कॉलेजसाठी आवश्यक असणारी पुर्वतयारी प्रशासनाने करावी, अशीही सूचना विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली.
दरम्यान, पीजी महाविद्यालयात एकूण 103 विविध पदाची भरती होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात वर्गातील शिकवणीपेक्षा प्रत्यक्ष रित्या विद्यार्थी पेशंट हाताळतात. त्यातून वैद्यकीय पदवी घेतलेले अनेक डॉक्टर उपलब्ध होतील. तसेच, जे प्राध्यापक नेमले जातील त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा रुग्णालयात उपयोग होईल. यातून वायसीएम रुग्णालयासाठी आपल्याकडे एक तज्ज्ञ डॉक्टरांची फौज उभी राहील. त्यामुळे वायसीएमची सेवा-सुुविधा सुधारण्यास निश्चित मदत होईल, डॉक्टरची कमतरता कायम मिटेल,पुढील वर्षांपासून महाविद्यालय सुरु होईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.
आरोग्य समिती स्थापन करा…
शहरातील आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य समितीची स्थापना करावी, अशी सूचना नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी केली. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सुसज्ज आहे. या रुग्णालयात अनेक गोरगरिब नागरिकांना अल्प दरात उपचार मिळतात. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. तसेच साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर आरोग्य विभागाचे नियंत्रण आवश्यक आहे. हे सर्व प्रश्न आरोग्य विभागाशी निगडीत असल्याने प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य समितीची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
व्हीएस न्यूज – दिवाळीच्या तोंडावर शहरात रस्त्यांवर, चौका-चौकात अनधिकृतपणे फटाके स्टॉल लागले आहेत. त्या फटाके स्टॉल महापालिका, अग्निशामक विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत शहरातील अनधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी महापालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांच्या माध्यमातून लाखो, करोडो रुपयांची उलाढाल होते. मोठ्या होलसेल व्यापाऱ्यांपासून लहान, लहान विक्रेतेही कुठेही फटाके स्टॉल लावतात. त्यातून अनेक ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडतात. त्यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी चर्चा केली. नगरसेवक दत्ता साने यांनी हा विषय मांडून शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फटाका स्टॉल थाटल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्या स्टॉल कोणतीही महापालिकेने, अग्निशामक विभागाने परवानगी दिलेली नाही. अनेकांनी रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या स्टॉलमुळे धोका पोहोचू शकतो. मात्र,महापालिका कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने अशा स्टॉलवर कारवाई करावी, अशी मागणी साने यांनी यावेळी केली. त्यानंतर अजित गव्हाणे यांनीही अनधिकृत फटाके स्टॉल चुकीच्या पध्दतीने लावले जातात. पुढील वर्षी पालिकेने धोरण तयार करून ठराविक आरक्षणांच्या मोकळ्या जागेत फटाके विक्रीला परवानगी द्यावी. त्यामुळे फटाके खरेदी, विक्रीची सोय होईल आणि कोणताही धोका उद्भविणार नाही, अशी सूचना मांडली. त्यानुसार महापौर काळजे यांनी प्रशासनाला शहरातील अनधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
व्हीएस न्यूज – “पिंपरी-चिंचवड महापालिकेने नटसम्राट निळू फुले यांच्या नावाने नाटयगृह उभारुन कलाकारांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. निळू भाऊ श्रेष्ठ दर्जाचे व्यक्ती होते. त्यांनी अनेक कलाकारांना स्फूर्ती दिली तसेच दिशादर्शनही केले. कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा व समाजाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न येथे झाला तर ती खऱ्या अर्थाने निळू भाऊंना आदरांजली ठरेल, असे मत सिनेदिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “नटसम्राट निळू फुले कला महोत्सवा’च्या समारोप प्रसंगी राजदत्त बोलत होते. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाटयगृहात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना महापालिकेच्या वतीने गौरवण्यात आले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या माधवी राजपुरे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सिनेदिग्दर्शक राजदत्त, सिनेअभिनेत्री सुषमा शिरोमणी, ज्योती चांदेकर, भारती गोसावी, सिने अभिनेते राहूल सोलापूरकर, सोमनाथ शेलार, यश सिंगलवार,नरेंद्र डोंगरे, श्रीराम रानडे, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
भारती गोसावी म्हणाल्या, “निळूभाऊ यांच्या बरोबर “राजकारण गेलं चुलीत” तसेच “कथा अकलेच्या कांद्याची” या वगनाटयाचे हजारोंच्यावर प्रयोग केले आहेत. निळूभाऊ खुप छान माणूस होते. तसेच ते सामाजिक कार्यकर्ते व श्रेष्ठ कलावंतही होते. तसेच सुषमा शिरोमणी म्हणाल्या, “फटाकडी’, “मोसंबी नारंगी’ असे अनेक चित्रपट मी डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्याबरोबर केले. यामुळे मी मोठी झाले आहे. आजच्या युवा पिढीला निळूभाऊंच्या अभिनयाचे आकर्षण आहे.’
ज्योती चांदेकर म्हणाल्या, “निळू फुले आयकॉनिक अभिनेते होते. त्यांनी सुमारे 140 मराठी चित्रपटात काम केले. त्यांनी “सखाराम बाईंडर” नाटक तसेच “सामना”, “कुली”अशा सुप्रसिध्द चित्रपटातून काम केले आहे. त्यांची “डायलॉग डिलेव्हरी’ सुरेख होती. रसिकांनी दिलेली मनमुराद दाद त्यांना आवडत असे. अशा मोठ्या माणासाच्या नावाने पिंपरी-चिंचवड परिसरात नाटयगृह उभारले आहे. नाटक ही संस्कृती आहे तिचे जतन करावे. हे नाटयगृह नाटय प्रयोगांसाठीच राखीव असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सोमनाथ शेलार, मेघराज राजे भोसले, नरेंद्र डोंगरे, श्रीराम रानडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक रेघे यांनी केले. तर आभार सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी मानले. नटसम्राट निळू फुले कला महोत्सवाची सांगता नितीन मोरे व सहकारी प्रस्तुत “महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने झाली.
व्हीएस न्यूज – शहरात महापालिकेने राज्य व केंद्र सरकारच्या अभियान विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे, याकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस हे नवीन लेखाशिर्ष निर्माण केला असून 3 वर्षांत 14कोटी 31 लाख रूपये खर्च होणार आहेत. या विषयाला उपसूचनेसह मान्यता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीमार्फत महापालिका सभेपुढे सादर केला. त्यास महापालिका सभेने मान्यताही दिली आहे. तथापि, या अर्थसंकल्पात महापालिकेच्या विविध विभागामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अभियानांचाही समावेश आहे. महापालिकेमार्फत स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनि:सारण आदी विभागांच्या प्रकल्पांचे कामकाज हाती घेण्यात येते.
या व्यतिरिक्त जेएनएनयुआरएम, अमृत अभियान, स्वच्छ हिंदुस्थान अभियान, स्मार्ट सिटी अभियान, पंतप्रधान अवास योजना अशा विविध योजना महापालिका हद्दीत राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प कालमर्यादेत व वेळेत पूर्ण करण्यासाठी या कामांकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. त्यामुळे सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात मसिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीसफ हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात महसुली जमा खर्चात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करून त्यावर तीन वर्षे कालावधीसाठी 14 कोटी 31लाख रूपये खर्चास सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेकडून घरमालक-भाडेकरू “ट्रॅकिंग सिस्टीम’ विकसित करण्यात येणार आहे. हा डेटा महापालिका “सर्व्हर’मध्ये ठेवण्यात येणार आहे. संगणक प्रणाली मे. प्रोबिटी सॉफ्ट यांच्याकडून विकसित करण्यात आली आहे. या विषयाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून शहरातील घरमालकांना भाडेकरूंची नोंद घरबसल्या करता येणार आहे.
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पोलीस आयुक्त परिमंडळ-3 आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून आलेल्या पत्रानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या घरमालक भाडेकरू “ट्रॅकिंग सिस्टीम’अंतर्गत ही सुविधा नागरिकांना “ऑनलाईन’ उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध राहणार असून महापालिकेला उत्पन्न मिळण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची असणार आहे.
महापालिकेने “ऑनलाईन’ सेवेसाठी 10 रूपये शुल्क आकारणी, तर त्यापैकी पाच रूपये सिस्टीम विकसित केलेल्या संस्थेला देण्यात येणार आहेत. घर मालकांना घरबसल्या भाडेकरूंची नोंद करणे शक्य व्हावे, याकरिता महापालिकेने घरमालक – भाडेकरू “ट्रॅकिंग सिस्टीम’ विकसित करावी, अशी मागणी तत्कालीन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी 2013 मध्ये महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. “सिस्टीम’ महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध करावी, असेही सुचविले होते. या पत्राची दखल घेऊन महापालिकेने घरमालक – भाडेकरू ट्रॅकिंग सिस्टीम विकसित केली आहे. याबाबतचा “डेटा’ महापालिका “सर्व्हर’वर ठेवण्यात आला आहे. ही संगणक प्रणाली मे. प्रोबिटी सॉफ्ट यांच्यामार्फत विकसित करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - पिडीत व्यक्तींची मनोभावे सेवा करुन मानवता जोपासावी. ही साईबाबांची शिकवण आणि त्यांचा श्रध्दा, सबुरी हा मुलमंत्र आजही सर्व भारतीयांना मार्गदर्शक आहे. जाती, धर्म भेदभाव न मानता मानवासह सर्व प्राणीमात्रावर दया करावी. मानवाला माणुस बनण्याची शिकवण साईबाबांनी त्यांच्या आचरणातून दिली. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने श्री शिर्डी साई ग्लोबल फाऊंडेशन सामाजिक कार्य करीत आहे. हे अभिमानास्पद आहे असे मत उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी व्यक्त केले.
श्री साईबाबा ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष निमित्त रविवारी (15 ऑक्टोबर 17) दिल्लीमधील श्री फोर्ट सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेंकैया नायडू मार्गदर्शन करत होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रभानु सत्पती, डॉ. महेश शर्मा, केंद्रीय दक्षता आयुक्त के.बी. चौधरी, केंद्रीय मुख्य सुचना आयुक्त श्री दास आदींसह शिकागो, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, जर्मनी, मलेशिया, नेपाळ, मॅारीशस, कॅनडा, इंग्लड, फिनलंड, श्रीलंका येथील ट्रस्टचे प्रतिनिधी व विविध देशातील साईभक्त उपस्थित होते. यावेळी वेंकैया नायडू यांच्या हस्ते साईबाबांच्या जीवनावर आधारीत स्मरणिकेचे प्रकाशन आणि चंद्रभानु सत्पती यांचा करण्यात आला.
श्री साईबाबा ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रभानु सत्पती म्हणाले की, 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डी येथे समाधी घेतली. भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी आणि साईबाबांचा मानवतेचा संदेश जगभर प्रसारित करण्यासाठी श्री साईबाबा ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये बंगाल सारख्या पूरग्रस्त भागात मदत कार्य करणे, देशभरातील उपेक्षित बालकांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, जाती, धर्म भेदभाव न मानता मानवतेच्या दुष्टीकोनातून पिडीत व्यक्तींची सेवा करणे, मानवी जीवनस्तर उंचावण्यासाठी ही संस्था जगातील विविध देशात कार्यरत आहे. अशीही माहिती चंद्रभानु सत्पती यांनी दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002