व्हीएस न्यूज – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. याकरिता प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीला सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब केले. त्यानुसार विविध 54 जणांची पद भरती महापालिकेला करणार असून त्यानंतर वायसीएममध्ये प्रत्यक्ष वैद्यकीय अध्यापन सुरू होणार आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर बऱ्याच प्रतिक्षेनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परवानगीने हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय वायसीएम रुग्णालयात सुरू होत आहे. त्यासाठी पदनाम,पदसंख्या, शैक्षणिक अर्हताधारकांना भरण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजुरी दिली. 3 वर्षांसाठी शासकीय वेतन श्रेणीनुसार हंगामी स्वरुपात 30 पदांसाठी 54 जणांची पदभरती केली जाणार आहे.
खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये औषध वैद्यक, स्त्री रोग व प्रसृतीशास्त्र, कान, नाक, घसा, अस्थिरोग, बालरोग,जनरल सर्जरी, रेडीओलॉजी, मानसोपचार, भुलशास्त्र, पॅथोलॉजी, उरोरोग शास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एक प्राध्यापक असणार आहे. तसेच, विविध विषयांचे 26 सहयोगी प्राध्यापक देखील नेमले जातील. तसेच, कोडींग क्लर्क, ऍक्युपेशनल थेरपिस्ट, डॉक्युमेंटलिस्ट, स्टॅंस्टिशियन कम असिस्टट प्रोफेसर, प्रोथेस्टिक ऍण्ड आर्थोटीक टेक्रीशियन,कॅंटालॉगर या पदावरही प्रत्येक एक जण भरती केली जाणार आहे. या प्रस्तावावर नगरसेविका मंगला कदम यांनी नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याच्या प्रस्तावाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत त्याला गती देण्याची मागणी केली. तर, कॉलेजसाठी आवश्यक असणारी पुर्वतयारी प्रशासनाने करावी, अशीही सूचना विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली.
दरम्यान, पीजी महाविद्यालयात एकूण 103 विविध पदाची भरती होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात वर्गातील शिकवणीपेक्षा प्रत्यक्ष रित्या विद्यार्थी पेशंट हाताळतात. त्यातून वैद्यकीय पदवी घेतलेले अनेक डॉक्टर उपलब्ध होतील. तसेच, जे प्राध्यापक नेमले जातील त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा रुग्णालयात उपयोग होईल. यातून वायसीएम रुग्णालयासाठी आपल्याकडे एक तज्ज्ञ डॉक्टरांची फौज उभी राहील. त्यामुळे वायसीएमची सेवा-सुुविधा सुधारण्यास निश्चित मदत होईल, डॉक्टरची कमतरता कायम मिटेल,पुढील वर्षांपासून महाविद्यालय सुरु होईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.
आरोग्य समिती स्थापन करा…
शहरातील आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य समितीची स्थापना करावी, अशी सूचना नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी केली. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सुसज्ज आहे. या रुग्णालयात अनेक गोरगरिब नागरिकांना अल्प दरात उपचार मिळतात. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. तसेच साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर आरोग्य विभागाचे नियंत्रण आवश्यक आहे. हे सर्व प्रश्न आरोग्य विभागाशी निगडीत असल्याने प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य समितीची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002