व्हीएस न्यूज – जीएसटीची भरपाई म्हणून सरकारकडून महापालिकेला मिळणारे अनुदान अत्यल्प आहे. स्थानिक नेते शहराला अधिक निधी आणण्यात अपयशी ठरत असून त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. त्यासाठी विशेष सभा घेऊन शासनाकडे अधिकचा निधी मागावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी केला आहे.
परचंडराव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला जात आहे. हा निधी जीएसटीमुळे एलबीटीचे कमी झालेले उत्पन्न भरून काढण्यासाठी अनुदान म्हणून दिला जात आहे. त्यापोटी दरमहा फक्त 128 कोटी मिळत असून त्यातून पालिकेच्या नुकसानभरपाई होणार नाही.
पालिकेच्या उत्पन्न वाढीबाबत चर्चेसाठी पालिकेने विशेष सभा घ्यावी. त्यातून जास्त निधी मिळावा, असा प्रस्ताव मंजूर करुन शासनाकडे पाठविण्यात यावा. महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना निधीचा कधीच तुटवडा भासला नाही. मात्र, अधिकचा निधी आणून शहरात मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सध्याचे सत्ताधारी कमी पडत असल्याचा आरोपही परचंडराव यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज – - शिया मुस्लिम समाज मदरसा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह ३४ जणांच्या विरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी ही माहिती दिली.
मदरसा ट्रस्टच्या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या हमीदुल हसन मोहंमद सय्यद (वय ३५, रा. सय्यदवाडा, जुन्नर) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. हमीदुल यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुलांना शिया मुस्लिम समाजातून बहिष्कृत करण्यात आले असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी इस्माईल रोशनअली सय्यद (अध्यक्ष,शिया जमात २०१५), सय्यद अमीरअली रुस्तमअली, सय्यद मोहंमद अब्बास मुज्जहीद हुसैन, सय्यद मोहंमद काजिम अफजल हुसैन, सय्यद नुरे अब्बास एजाज हुसैन (अध्यक्ष, शिया जमात २०१६), मुराद अब्बास मोहंमद सादिक यांच्यासह ३४ जणांविरुद्ध रविवारी (ता. २२) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
हमीदुल यांच्या फिर्यादीनुसार, समाजाच्या मदरसा ट्रस्टमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत काम करीत असताना विविध आरोप करून २७ एप्रिल २०१६ मध्ये शिया मुस्लिम समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याची जाहीर नोटीस जामा मस्जिद समोरील नोटीस बोर्डावर लावण्यात आली होती. तसेच १२ ऑक्टोबर २०१६ मध्ये मोहरम (अशुरा) मिरवणुकीत असताना कलबेअली महंमद हुसेन सय्यद व महंमद हमीद सरफराज हुसेन सय्यद व शमीम महंमद हुसेन सय्यद यांनी फिर्यादीच्या हातातून माईक काढून घेऊन धक्काबुक्की केली व मिरवणुकीतून हाकलून दिले.
व्हीएस न्यूज – – भोसरी मधील पेठ क्रमांक दहामधील अग्निशमन केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीररीत्या सुरु केलेले कचरा विलगीकरण केंद्र तात्काळ बंद करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली होती. या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी औद्योगिक परिसराला भेट देत, विविध ठिकाणची पाहणी केली.
एमआयडीसीतील पेठ क्रमांक दहा मधील जागा अग्निशमन केंद्राकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या ही जागा मोकळी असल्याने, याठिकाणी इंद्रायणी नगर, भोसरी परिसरातील कचरा आणून वेगळा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कचऱ्याच्या बेपर्वाईबद्दल पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. याचे सविस्तर वृृत्त प्रसिद्ध होताच, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , क प्रभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे आणि संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे औद्योगिक परिसराची पाहणी केली.
येत्या पंधरा दिवसांत औद्योगिक परिसरातील कचरा उचलण्याचे व आवश्यक त्याठिकाणी कचरा पेटी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कचरा उचलण्यासाठी चार गाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पेठ नंबर दहा मधील कचरा विघटन केंद्र बंद करून दुसरीकडे हलवण्यासाठी आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन बोदडे यांनी यावेळी दिले. येत्या पंधरा दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
व्हीएस न्यूज – – रिंगरोडसाठी नागरिकांची घरे पाडू देणार नाही आणि याबाबत कायम बचनबद्ध राहण्याचा निर्धार घर बचाव संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. प्रत्येक घर वाचविण्याकरिता समिती वचनबद्ध राहणार असल्याचे सांगत संयोजकांनी या आंदोलनास बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवड येथे आयोजित एका बैठकीत घर बचाव संघर्ष समितीने याबाबतचा ‘वचननामा’ जाहीर केला आहे.
यावेळी बोलताना विजय पाटील म्हणाले, ”अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने समिती स्थापन करण्याचे योजिले आहे. परंतु, समितीचे स्वरूप, उद्देश, आणि लोकसमावेश याबाबत स्पष्टता नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. सात ऑक्टोबर 2017अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी कायदा संमत झाला आहे. बाधित नागरिकांना संबधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असून त्यावेळेत सर्व कागदपत्रे स्वायत्त संस्थांकडे जमा करणे आवश्यक आहे. प्राधिकरण समितीमुळे वेळेचा अपव्यय होणार आहे. रिंगरोड बाधित घरे नियमितीकरणासाठी प्राधिकरणाने वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे. घरे अधिकृत करण्याच्या अध्यादेशामध्ये अनेक जटिल अटी- शर्थी आहेत. त्या शिथिल केल्या किंवा रद्द केल्या तरच घरे नियमित होऊ शकतात, असे पाटील म्हणाले.
चिंचवड येथे झालेल्या बैठकीत ‘रिंगरोड’ आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. चिंचवड, गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळेगुरव, कासारवाडी परिसरातील 40 समन्वयक बैठकीला उपस्थित होते. मुख्य समन्वयक विजय पाटील, राजेंद्र चिंचवडे, बाळासाहेब उबाळे, नरेंद्र माने, निलचंद्र निकम, सचिन काळभोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रेखा भोळे, नारायण चिघळीकर, रजनी पाटील, शिवाजी इबितदार, गोपाळ बिरारी, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर, योगेश विरोळे, बाळासाहेब उबाळे, विशाल पवार, रवी पवार, नरेंद्र माने, मयुर पवार, नितीन पचपिंड, प्रदीप गणगे, निलचंद्र निकम, सुनीता गायकवाड, वैशाली कदम, वैशाली भांगीरे, चंदा निवडुंगे, आबा राजपूत, मोतीलाल पाटील, प्रदीप पटेल, माउली जगताप, सागर बाविस्कर, उमाकांत सोनवणे, किरण पाटील, भाऊसाहेब पाटील, अमोल हेळवर, बजरंग पवार, माणिक सुरसे बैठकीला उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – – बॅंकेतून बोलत असून आपले क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे असे खोटे सांगून एका महिलेची तब्बल 65 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13ऑक्टोबरला निगडी प्राधिकरणातील प्रतिक्षा बंगला येथे घडली. याप्रकरणी अनुराधा सूद (वय 52, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराधा यांना अनोळखी मोबाईल धारकाने फोन केला. मी बॅंकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगून फिर्यादीच्या कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या कार्डवरून ऑनलाईन माध्यमातून परस्पर खरेदी करून सूद यांची 65 हजार 496 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू झाल्यानंतर हांगे यांची अवघ्या साडे चार महिन्यात बदली करण्यात आली. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे अच्युत हांगे आपल्या कार्यशैलीमुळे नेहमी चर्चेत राहिले. त्यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने अच्युत हांगे यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी (दि. 24) जारी केला आहे. मुख्याधिकारी संवर्गाच्या अ श्रेणीतील हांगे हे एक जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वी नागपूर, अहमदनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून तर भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर या ड दर्जाच्या महापालिकेत आयुक्त म्हणून कामकाज पाहिले.
अतिवृष्टीच्या काळात मीरा-भाईंदरच्या महापौरांनी पाच वेळा मोबाईलवर संपर्क साधला असतानाही हांगे यांनी महापौरांचा फोन घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी हांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली होती. त्यामुळे त्यांची दीड वर्षांपूर्वी हांगे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. गेले वर्षभर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. अखेर, एक जुलै रोजी त्यांची पिंपरी महापालिकेत वर्णी लागली. पिंपरी महापालिकेतही विवादांनी त्यांचा पीछा सोडला नाही. साडेचार महिन्यांच्या काळात हांगे नेहमीच वादात राहिले. स्थायी समितीत नगरसेवकांना प्रत्युत्तर देणे, कनिष्ठांना शिवराळ भाषा वापरणे, गणेश विसर्जनासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे, अशा घटनांनी त्यांना कायमच वादात अडकवून ठेवले. तसेच, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनाही त्यांनी उद्धट भाषेत प्रत्युत्तरे दिली होती. त्यामुळे हांगे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांची बदली झाली असली तरी त्यांच्याजागी कोणाची नियुक्ती करायची याबाबत राज्याच्या नगर विकास विभागाने अद्याप आदेश काढलेले नाहीत, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना काल (दि. 22) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेल जवळ घडली.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय 30, रा. पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुरय्या वजीर शेख (वय 26, रा, वाशी, ठाणे) या तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुरय्याचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तसेच सुरय्या हिची मैत्रिण गंगा मण्डल हिच्याशी देखील प्रेमसंबंध होते. दरम्यान गंगा सोबत बबलू सुत जुळाले असल्याची कुणकुण सुरय्या हिला लागली होती. त्यामुळे तीने गंगाला मुंबईला घेऊन जायचे ठरविले होते. याचा राग बबलूच्या मनात होता.
दरम्यान सुरय्या बबलूला भेटायला पिंपरी येथे आली असताना त्या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या वादातून बबलूने सुरय्याच्या गळ्यावर व अंगावर चाकुने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) उपचार सुरु आहेत. सुरय्या ठाणे येथे मजुरीची कामे करते. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाने प्रवाशाकडील पाच हजार रुपये लुटले. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री एक वाजता जगताप डेअरी चौकाजवळ साई चौकात घडली.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात प्रमोद बोर्डे (वय 26 रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी रिक्षा चालक व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे. प्रमोद बोर्डे हे कामानिमीत्त मुंबईला गेले होते. मुंबईहून रात्री एकच्या सुमारास परतल्यानंतर त्यांना रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे ते पायी जात असताना एका अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना लिफ्ट देऊ केली. मात्र रिक्षात बसल्यानंतर रिक्षा चालक व रिक्षात बसलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी प्रमोद यांच्याकडील पाच हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – दिघी येथील ज्ञानदीप बालकाश्रमातून 12 वर्षाचा मुलगा काल, रविवारी (दि 22) सकाळपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गणेश विठ्ठल जाधव (वय 12 मूळ रा. कनकुरी, ता. गंगापूर, औरंगाबाद) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून गणेश हा काल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.
याप्रकरणी ज्ञानदीप बालकाश्रम येथील आर्यन नामदेव डोलारे (वय 19 ) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश हा काल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. त्याची उंची चार फूट, रंग सावळा, चेहरा गोल, नाक दबलेले, अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट, निळी जीन्स असे असा पेहराव असून त्याला मराठी भाषा बोलता येते. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज – काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील अठरा मीटरचा रस्ता गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकाराची तातडीने चौकशी करून अधिकारी तसेत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी मुख्य रस्ता ते राजवाडेनगरपर्यंतच्या अठरा मीटर रस्ता रुंदीकरण झाले असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. माहिती अधिकारात प्राप्त माहितीनुसार हा रस्ता जागा हस्तांतर रखडल्यामुळे विजयनगरमध्ये फक्त तीनशे ते चारशे मीटरपर्यंत विकसित झाला आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता 20 मे 2014 रोजी 52 लाख 50 हजारांना देण्यात आली. त्यानंतर एच. सी. कटारिया या ठेकेदाराची 49 लाख एक हजार961 रुपयांना निविदा मान्य केली.
सहा महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश 15 एप्रिल 2015 रोजी देण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. हे काम पंचवीस टक्के झाले असून, या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मानांकनानुसार योग्य व समाधानकारक असल्याचा दाखला ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिला आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2015 रोजी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता याच्या सह्या असलेले काम पूर्ण झाल्याचे दस्तऐवज आयुक्तांना देण्यात आले असून, त्यावर हे काम समाधानकारक व व्यवस्थित पूर्ण केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर महापालिकेच्या लेखा विभागाने ठेकेदाराला कामाचे पैसेही देऊन टाकले. महापालिकेच्या तिजोरीवर सामुहिक दरोडा घालण्याचा हा प्रकार असल्याचे युवराज दाखले यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे यंदाच्या वर्षी आतापर्यंत पुणे शहरात 930 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यातील अठरा दिवसांत डेंग्यूचे 92 रुग्ण आढळले आहेत. सध्या स्वाइन फ्लू कमी झाला असून, डेंग्यूने रुग्णाची संख्या वाढत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीमध्ये डेंग्यूचे 64 रुग्ण आढळले होते. यानंतर आठ दिवसांमध्ये पुन्हा 28 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर पुणे शहरात जानेवारी – 8, फेब्रुवारी – 2, मार्च -4, एप्रिल – 5, मे – 3 आणि जूनमध्ये 6 असे सहा महिन्यांत 28 रुग्ण आढळून आलेले आहेत. या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव फार कमी असतो. पण, जूनमध्ये पाऊस पडला आणि डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस डासांचा उपद्रव सुरू झाला. एका जुलै महिन्यातच 58 रुग्ण आढळून आले. तर त्यानंतरच्या महिन्यात यामध्ये ते सहा पटीने वाढ दिसून आली. त्यामध्ये ऑगस्ट – 234, सप्टेंबर- 251 तर ऑक्टोबरमध्ये यामध्ये प्रचंड वाढ झाली असून 18 ऑक्टोबरपर्यंत 359 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कीटक प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 1079 संशयित रुग्णांपैकी 138 जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर चिकुनगुनियाचे 14 संशयित व मलेरियाचे 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अठरा दिवसांत 92 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यावरूरुन स्वाइन फ्लूप्रमाणे डेंग्यूचा धोकाही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
व्हीएस न्यूज – प्रारब्धावर अवलंबून राहू नका. प्रारब्ध कसेही असोत, प्रारब्धापेक्षा प्रयत्नशील राहून सातत्याने कष्ट केल्यास यश हमखास मिळते, असे मत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील फॉर्च्यून ग्रुपच्या वतीने राशीचक्रचे 5088 यशस्वी प्रयोग व राशीभविष्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्योजक डॉ रमेश राऊत, अभ्युदय बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल निकम, उद्योजक विठ्ठल कारखानीस, कासारसाईचे माजी सरपंच शंकर शितोळे, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, उद्योजक मदन चिंचवडे, हिरालाल पाटील, संतोष दुबळे, फॉर्च्यूनचे संचालक नितीन धिमधिमे, मकरंद पांडे, सुरेश सातकर आदी उपस्थित होते.
उपाध्ये पुढे म्हणाले की, पत्रिका ही भूतकाळावर अवलंबून असते तर भविष्य घडविणे हे आपल्या हाती असते. भविष्य हा अध्यायनाचा व गमतीचा विषय आहे. ग्रह किंवा पत्रिकेवर अवलंबून न राहता उपासना वाढवून स्वकर्तृत्वाच्या बळावर जीवनात वाटचाल करा. यशस्वी व्हाल. आयुष्यात काहीच कमी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन रवी पंडीत यांनी केले. तर आभार नितीन धिमधिमे यांनी मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002