व्हीएस न्युज - आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘लालपरी’ने यंदाही लाखो वारकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत सुमारे ५,५०० विशेष बसेसद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांना सुरक्षित आणि सुखरूप प्रवास घडवून आणला. या विशेष वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले असून, गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रेसाठी राज्यातील विविध भागांतून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत २१ हजार ५२७ फेऱ्या पूर्ण करत लाखो भाविकांना सुरक्षितपणे पंढरपूरपर्यंत पोहोचवण्यात आले.
यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा असून, विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे हे एसटी परिवारासाठी भाग्याची बाब आहे. भाविकांना सुरक्षितपणे दर्शनासाठी नेणे आणि पुन्हा सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवणे ही केवळ वाहतूक सेवा नसून ती विठ्ठलसेवाच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यात्रेदरम्यान चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले. विविध सवलती, वाढीव फेऱ्या आणि प्रभावी नियोजनामुळे मोठ्या गर्दीतही वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले.
'प्रवासी देवो भव'
या भावनेतून राज्यातील प्रत्येक प्रवाशाची सेवा करण्याचे आवाहन करत सरनाईक यांनी एसटीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. घरातील सण-उत्सव बाजूला ठेवून भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे त्यांनी अभिनंदन केले.
एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतूक करणारी संस्था नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाशी घट्ट जोडलेली लोकवाहिनी आहे. पंढरीच्या वारीत लाखो भाविकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि सुरक्षित प्रवासानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद हीच एसटीच्या सेवेची खरी कमाई असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002