व्हीएस न्यूज – संजय लीला बन्साळी दिग्दर्शित “पद्मावती’ चित्रपटावर शुक्लकाष्ठ ओढावले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या दृश्यांमध्ये राजपूत समाजासाठी देवीसमान असलेल्या राणी पद्मिनींबाबत अश्लील दृश्य दाखविण्याचा प्रयत्न भन्साळी यांनी केल्याचा आरोप राजपूत समाज संघटनेने केला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपट राजपूत समाजातील जाणकारांना दाखवून प्रदर्शित करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजपूत समाजाने दिला आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजपूत समाज संघटनेचे शहराध्यक्ष शिवकुमार बैस, राजपूत महामोर्चाच्या पिंपरी-चिंचवड प्रमुख नीता परदेशी यांनी शुक्रवारी (दि. 27) ही माहिती दिली. यावेळी युवा राजपूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गिरासे, अनिल बैस, दीप्ती राजपूत, जगदीश सिंग भानूजा, अनिल सिंह बैस आदी उपस्थित होते. राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यात पद्मावती चित्रपटाचे एकही पोस्टर अथवा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना रविवार (दि. 29 ) निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात येत आहे. राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून सरकारी शिष्टमंडळाने राजपूत समाजाला चित्रपट दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या 16हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता. अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे.
यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित केल्यास भन्साळी यांना पुढील परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांच्या नेतृत्वाखाली राजपूत समाज संघटनेच्या वतीने राज्यस्तरावर किरण सिंह ठाकूर, नीता परदेशी, शिवकुमार बैस, श्रीराम परदेशी, अनिल सिंह बैस, किशोर सिंह गिरासे, दीप्ती राजपूत,करनी सेना जगदीश सिंह भाणुजा व इतर राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. 24 ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात रावसाहेब दानवे, जयकुमार रावल, सुजित सिंह ठाकूर, रणजीतसिंह पाटील गृह राज्य मंत्री यांचा समावेश आहे. सरकारी शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिले की, पद्मावती हा चित्रपट राजपूत समाजाला दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार नाही. सरकारी शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिल्याने बुधवार (दि. 25 ऑक्टोबर) रोजी मुंबईत भाजप कार्यालय ते मंत्रालय असा काढण्यात येणारा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002