व्हीएस न्युज - स्वारगेट-पिंपरी या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम शहरात सुरू आहे. दापोडी ते पिंपरी ग्रेड सेपरेटरमधील एक्स्प्रेस लेनवरील खराळवाडी ते वल्लभनगर येथील मेट्रोचे सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूने बंद असलेली एक लेन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टळणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोच्या वतीने काम वेगाने सुरू आहे. दापोडीच्या हॅरिस पूल ते मोरवाडीतील मदर तेरेसा उड्डाण पूल या मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. खराळवाडीतून कामास सुरुवात झाली होती. वर्षापासून हे काम सुरू होते. खराळवाडी, एचए कंपनी, हाफकिन इन्स्टिट्यूट मार्गासह वल्लभनगर एसटी आगारापर्यंत सेगमेंटचे काम पूर्णत्वास येत आहे. सुमारे दीड किलोमीटर काम आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरच्या एक्स्प्रेस मार्गावरील दोन्ही बाजूने बंद केलेली प्रत्येकी एक लेन वाहतुकीस खुली केली जाणार आहे. त्यासाठी सर्व खांबावर दक्षतेच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. काँक्रिटीकरणाचेही काम सुरू आहे.
मेट्रो स्टेशनचे काम सुरू
वल्लभनगर एसटी आगारासमोर संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. स्टेशनचे खांब वगळून गर्डर लाँचर पुढील खांबांवर बसविला जाणार आहे. त्यासाठी प्रथम दोन खांबांवर क्रेनने सेगमेंटची जुळवणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी गर्डर लाँचर बसविला जाणार आहे. या लाँचरद्वारे नाशिक फाटा चौकापर्यंत सेगमेंटची जुळवणीचे काम केले जाणार आहे. शंकरवाडीतील पेट्रोल पंपाच्या येथून मेट्रो मार्गिका वळण घेऊन भारतरत्न जे. आर. डी़ टाटा उड्डाणपुलाच्या दिशेने जाणार आहे.
व्हिएस न्युज - चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून आगरी समाजाच्या भावना दुखावल्यानंतर भाऊ कदम यांनी सबंध आगरी समाजाची माफी मागितली आहे. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती.आगरी समाजाच्या शिष्टमंडळाने भाऊ कदम यांची भेट घेतली, तेव्हा भाऊ कदम यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला.तसेच कार्यक्रम यादीतून हे दोन एपिसोड वगळण्यात आल्याची माहितीही भाऊने दिली आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात आगरी समाजाच्या बांधवाच्या भावना दुखावणारे संवाद करण्यात आले होते. यावर आगरी समाजाच्यावतीने आक्षेप नोंदविण्यात आला होता. आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सात दिवसांत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा या संघटनेने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना दिला आहे.
तसेच, झी वाहिनीचे कोणतेच चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा पवित्रा आगरी समाजाने घेतला होता, यानंतर, चला हवा येऊ द्या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत असलेल्या भाऊ कदम याने माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेही भाऊने यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच, ५ व ६ नोव्हेंबर रोजीचा कार्यक्रम यादीतून वगळण्यात आला असल्याची माहिती भाऊनी यावेळी देत वादावर पडदा टाकला आहे.
व्हीएस न्युज - डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि यात लहान भावाचे लग्न अशा परिस्थितीत सापडलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना वाकड येथे घडली. पोलिसांनी चार दिवसांमध्ये दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी मुलाच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मुलाला आईकडे सोपवताच त्या मातेला रडू आवरता आले नाही.
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या शाहरुख मिराज खान (वय २६) या तरुणाचे झम झम केटरर्स आणि बिर्याणी हाऊस आहे. शाहरुखच्या दुकानाच्या बाजूला एका महिलेचे ब्यूटी पार्लरचे दुकान आहे. या महिलेला पाच वर्षांचा मुलगा असून सुफियान असे त्याचे नाव आहे. सुफियानही आईसोबत ब्यूटी पुार्लरमध्ये येत असल्याने त्याची शाहरुखशी ओळख झाली होती. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुफियान त्याच्या आईवडिलांसह राहत होता. सुफियानच्या आईने वेळोवेळी शाहरुखला आर्थिक मदत केली होती. पण आता मदत करणार नाही, असे तिने शाहरुखला सांगितले होते. शाहरुखच्या लहान भावाचे लग्न ठरले होते.
आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात लहान भावाच्या लग्नासाठी पैशांची गरज अशा संकटात शाहरुख सापडला होता. यातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने सुफियानच्या अपहरणाचा कट रचला. त्याने मुंबईतून मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२) या मित्राला बोलावून घेतले. रविवारी दुपारी सुफियान हा कुणाल सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत होता.
यादरम्यान शाहरुख दुचाकीवरुन तिथे पोहोचला. त्याने सुफियानला सोबत यायला सांगितले. शाहरुख ओळखीचा असल्याने सुफियान त्याच्यासोबत फिरायला गेला. तर मोहम्मद हा दुकानात थांबला होता. सुफियानचे आई- वडील काय करतात यावर लक्ष ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. दोन दिवसांनी शाहरुखने सुफियानच्या आईला फोन करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. ७ नोव्हेंबर रोजी पैसे घेऊन चिंचवडमधील बस स्थानकात या, असे त्याने सुफियानच्या आईला सांगितले होते. यानुसार पोलिसांनी सापळा रचून शाहरुखला अटक केली.
वाकडमधील नऊ पोलीस अधिकारी आणि जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी सुफियानची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी अथक मेहनत घेतली. या कामगिरीसाठी खान कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
व्हीएस न्युज - वाकड येथील चौधरी पार्क येथे स्वराज्य रक्षक छञपती संभाजी राजे प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या नामफलकाचे रिबीन कापून आणि श्रीफळ फोडून नगरसेवक मयुर कलाटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बुधवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या उद्घाटन प्रसंगी बश्वराज रेडडी ,संदिप माने, शेळके, भरगुडे,रामभाऊ , सैंदाणे ,शेडगे , आदि मान्यवर उपस्थित होते. यायावे मोठ्याप्रमाणात महिला, पुरूष आणि तरुण मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजीक कार्यक्रते बि. जी. सुर्यवंशी व प्रेरणा शाळेचे शिक्षक पुरूषोतम पाटील ,प्रकाश कांबळे यांनी केले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचा मुळ उद्धेश बि.जी.सुर्यवंशी यांनी सांगितला ते म्हणाले कि,"छत्रपती शिवाजी राजे , छत्रपती संभाजी राजे, लोकराजे शाहुमहाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले ,भारतीय राज्यघटनेचे निर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा खरा इतिहास भारतीय जनतेसोर मांडणे आणि येणा-या पिढीमध्ये महामानवांचे देशभक्तीपर विचार रुजावेत आणि जाती धर्माच्या पलिकडे जावुन राष्ट्रभक्ती वाढावी, ज्यामुळे भारतीय जनतेत प्रेम व एकोपा राहील व देश प्रगतीपथावर जाईल या उद्धेशाने या प्रतिषठानची स्थापना करण्यात आली आहे."
कार्यक्रमाच्या आयोजकांना शुभेच्छा देत व आभार व्यक्त करत मयुर कलाटे म्हणाले कि" डाँ आबेडकरांनी जगातील सर्वोत्क्रुष्ट लोकशाही लिहुन देशावर फार मोठे उपकार केले आहेत.तेव्हा मुलानी महापुरूषांचे विचार आत्मसात करावे." "जगावे शिवबांसारखे आणि मरावे तर संभाजीराज्यांन सारखे" असेही यावेळी ते म्हणाले.
व्हीएस न्युज - बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपाजवळील एका लाकडाच्या वखारीला पहाटे ५ वाजता भीषण आग लागली असून त्यात संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. वखारीत लाकडाच्या फळ्या एकावर एक रचून ठेवल्या असल्याने त्यावर पाणी मारुन आग विझवली तरी काही वेळाने खालच्या फळ्यामध्ये आग धुमसत असल्याने ती पुन्हा पेट घेत आहे. त्यामुळे आता संपूर्ण वखारीतील लाकडे जे सीबीच्या सहाय्याने बाजूला करुन आग विझविण्याचे काम सुरु असून ते आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे.
भाऊ महाराज रोडवर ही वखार असून तिला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. लाकडे असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला व आग वेगाने भडकत गेली. आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाचे ४ बंब व २ टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शटर बंद होते. तेव्हा शटरला दोरी बांधून गाडीच्या सहाय्याने त्यांनी ते शटर तोडली व चारही बाजूने पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.
वखारीच्या स्लॅबवर लाकडाच्या फळ्या ठेवल्या आहेत. त्यांचे वजन व त्यावर पाणी मारल्याने त्याचे वजन वाढल्याने स्लॅब वाकला आहे. वखारीमध्ये सर्वत्र फळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे बांबु असल्याने आग चांगलीच भडकली होती. सतत पाणी मारुन अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.
बांबु बाहेर काढून आग विझविली. मात्र, फळ्या एकावर एक रचून ठेवल्याने त्याची आग पूर्णपणे विझली जात नव्हती. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडली व त्यामुळे जागा मिळल्यावर या फळ्या बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे. जवळपास तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली असून आता तेथील जागा थंड करण्याचे काम सुरु आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी पुणे शहरात १७ किरकोळ आगी लागल्या होत्या.
व्हिएस न्युज - मीत्र-मैत्रीणीमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती केल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर धारदार कोयत्याने वार केले तर इतर दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.३१) सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटीजवळ घडली.
मुवाज शफीक मुजावर (वय १८, रा. बिल्डींग नं.२, रुम नं.५१५, विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) असे डोक्यात कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचे मित्र अयान सय्यद (वय १८) आणि प्रकाश गाडवे (वय २०) या दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विरेंद्र (वय २०, अजमेरा, पिंपरी), सोहेल इनामदार (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी), फैज इनामदार (वय २०, रा. नेहरुनगर, पिंपरी), नॉडी (वय २०, अजमेरा, पिंपरी) आणि इतर तीन-चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुवाज आणि आरोपी विरेंद्र हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटीजवळ विरेंद्र आणि त्याच्या मैत्रीणीमध्ये वाद सुरु होता. यावेळी मुवाज, अयान आणि प्रकाश तेथे उपस्थित होता. त्यांनी मध्यस्ती करुन विरेंद्र आणि त्याच्या मैत्रीणीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटवण्यास मध्यस्ती केल्याचा राग विरेंद्र याला आला आणि त्याने आणि त्याचे साथीदार सोहेल, फैज, नॉडी आणि इतर तीन ते चार अनोळखी इसमांनी मिळून मुवाज याच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याचे मित्र अयान आणि प्रकाश यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - येथील लंडन ब्रिजजवळील वॉशिंग सेंटरच्या मोकळ्या आवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांना अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (दि. 31) रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई केली.
अरविंद रामनरेश कुस्वाहा (वय 29, रा. उत्तमनगर, रावेत), जालिंदर मच्छिन्द्र शिवशरने (वय 34) राजेश धनसार दाहिरे (वय 25, दोघे रा. कोयतेवस्ती, पुनावळे), राकेश राजू पल्ले (वय 23, रा. भोईरनगर, चिंचवड ), बीमलेश रामनरेश कुस्वाह (वय 19, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. तर जुगारअड्डा चालवणारा शंकर मिसाळ (रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड ) हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील लंडन ब्रिजजवळील वॉशिंग सेंटरच्या मोकळ्या आवारात जुगार अड्डा सुरु असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता आरोपी मटका खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य आणि चार हजार 500 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरीच्या मिलिंद नगर परिसरात ६ दुचाकी गाड्या जळल्याची घटना घडली आहे.पहाटे चार च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.परंतु अद्याप गाड्या जाळल्या गेल्या की,शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली हे अस्पष्ट आहे.या घटने दुचाकीसह कपडे आणि घरातील साहित्य जळाले आहे.या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी च्या मिलिंद नगर परिसरातील कपिला हाऊसिंग सोसायटी येथील इमारतीच्या घरासमोर पार्क केलेल्या गाड्यांना पहाटे अचानक आग लागली.यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली.या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी दिली.त्यानुसार तातडीने घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.या घटनेत ऐकून ६ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान इमारतीच्या तळ मजल्याला घर आहेत.गाड्या लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही.त्यामुळे येथील नागरिक आपापल्या घरासमोर दुचाकी पार्क करतात.पहाटे अचानक दुचाकी गाड्यांना आग लागली यात दुचाकीसह शेजारील घरातील कपडे आणि साहित्य जळाले आहे.यात ऐकून चार लाख रुपयांच नुकसान झालं आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भगवान यमगर यांनी दिली आहे.दुचाकी गाड्या शॉर्ट सर्किटमुळे जळाल्या आहेत की काही समाज कंटकांनी पेटवून दिल्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.परंतु गाड्या पेटवून दिल्या असाव्यात असा संशय अग्निशमन दलाचे अधिकारी यमगर यांनी व्यक्त केला आहे.याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीसाठी अभिनेत्री व राज्यसभा खासदार रेखा यांनी खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी दोन कोटी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेकडे वर्ग झाला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.
कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 420 येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. यामध्ये 41 खोल्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर मुली, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छातागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय देखील आहे. या शाळेच्या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च आहे.
या शाळेच्या बांधकामासाठी खासदार निधीतून मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे यांनी खासदार व अभिनेत्री रेखा यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी खासदार निधीतून तीन कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. त्याचा 2 कोटी 25 लाखांचा पहिला हप्ता 31 ऑक्टोबर रोजी महापालिकेकडे वर्ग केली आहे. उर्वरित 75 लाख रूपये शाळेचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेवक लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
व्हीएस न्युज - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन कांदा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने निघालेला हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन थेट खाली कोसळला. यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक आणि क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, द्रुतगतीमार्गावरून जात असताना वलवन एक्झिट येथे हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन थेट खाली जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळला. यात चालक आणि क्लिनर हे गंभीर जखमी झाले मात्र, त्यांना मदत करायची सोडून परिसरातील नागरिकांनी पुलाखाली अस्ताव्यस्त पडलेला कांदा गोळा करायला गर्दी केली. लोकांना कांदा घेऊन जाणारा ट्रक कोसळल्याचे कळताच ते घरातून पिशव्या, मोठ्या गोण्या घेऊन घटनास्थळी आले. तसेच हा फुकटात मिळणारा कांदा आपल्या पिशव्यांमध्ये भरण्यातच मग्न होते, अशी माहिती लोणावळा पोलीसांनी दिली. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघाताची माहिती कळताच लोणावळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमी असलेल्या चालक आणि क्लीनरला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर अर्ध्या तासाने वाहून सुरळीत झाली.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणले. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे. पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणले. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बाराच्या सुमारास पंचशील फिल्टर्स या कंपनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. या घटनेची माहिती राजू गर्जे नावाच्या व्यक्तीने अग्निशमन दलाच्या विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. परंतु आग मोठी असल्याने पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, पुणे मनपा या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र पाणी कमी पडत असल्याने अखेर बजाज कंपनी, टाटा मोटर्स, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी या ठिकाणच्या पाण्याचे टँकर पाणी पुरवठा करत होते. असे एकूण १५ ते २० टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर पहाटे साडेचार वाजता नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीत प्लास्टिक आणि कागदाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. ते आगीत जळून खाक झाले आहे.
या भीषण आगीमुळे कुदळवाडी चिखली परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर याचा परिणाम झाला होता. या कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. तसेच कंपनीमध्ये केवळ एकच सुरक्षा रक्षक होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील संत तुकाराम नगर परिसरात असलेली गोल भाजी मंडई ही भाजी मंडई राहिली नसून वसाहत झाली असल्याचे निदर्शनास येते. या इमारतीचे नाव गोल भाजी मंडई हे फक्त नाम मात्र राहिले आहे.या ठिकाणी भाजी विकण्याचा व्यावसाय कमी तर केशकर्तनाचा व्यावसाय जास्त प्रमाणात केला जातो. या ठिकाणी प्रत्येक शलून मध्ये किमान 12 ते 15 कामगार काम करतात, आश्चर्य म्हणजे हा सर्व कामगार वर्ग गोल भाजी मंडईतच राहतो,म्हणुन या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.
प्रातविधी साठी, स्नानासाठी, भांडी व कपडे धुण्यासाठी प्रतेक कामासाठी पाण्याची नासाडी होते. इमारतीच्या आतील बाजूस कपडे वाळत घातलेले असतात. दुकानातील कचरा, शांपूचे पाकीट, टिश्यू पेपर इमारतीच्या चेंबर मध्ये टाकले जातात म्हणुन सांड पाणी साचून मंडईत दुर्गंधी पसरत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मालमत्ता कर विभागाचे कार्यालय आहे. कटींग केलेले केस गोल मंडईच्या परिसरात फेकले जातात. अनेकवेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत आहे असे स्थानिक नागरिक मत आहे.
भाजीत केस आढळून येत असल्याने ग्राहक सुद्धा गोल भाजी मंडईतून भाजी घेण्यास काचकूच करतात, याचाच परिणाम म्हणजे भाजी व फळ विक्रेते हातगाडी रस्त्यावर लावतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
पिंपरी चिंचवड मध्ये खुनाचे, चोरीचे, बलात्काराचे प्रमाण जास्त असतानाही पोलीस प्रशासन अश्या ठिकाणच्या सलून, हॉटेल्स, दुकानान मध्ये काम करणार्या परप्रांतीय कामगारांची पोलिस पडताळणी करण्याची सक्ती का करत नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांना मनात उद्भवत आहे. सलून मालकांनी ग्राहकाच्या सोई साठी बर्याच ठीकाणी अतिक्रमण करुन आलिशान वातानुकूलित सलून थाटले पण कामगारांची राहण्याची व्यवस्था करायला विसरलेच असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या इमारतीच्या हद्दीत प्रतेक मजल्यावर अतिक्रमण केलेले आहे.
गोल भाजी मंडई मध्ये आणि जवळपासच्या परिसरात अगदी हाकेच्या अंतरावर शासकीय रुग्णालय, शाळा,महाविद्यालय, बुद्धविहार दाट लोकवस्ती असतानाही बीअर शॉपी आणि बीअर बारचा व्यवसाय सर्रासपणे करण्यात येत आहे.
गोल भाजी मंडई म्हणजे रात्री उशिरा पर्यंत दारू आणि गांजा पिण्याचे ठिकाण झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांन कडून मिळाली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002