अन्याय झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा बालाजीनगर रहिवाशांचा इशारा
व्हिएस न्यूज - भोसरी येथील बालाजीनगर परिसरातील प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्पाची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने करण्यात यावी, तसेच प्रत्येक पात्र झोपडीधारकाला किमान ५०० चौ. फूट क्षेत्रफळाचे सुसज्ज घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बालाजीनगरमधील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. दिनांक १८ रोजी सामाजिक कार्यकर्ते शंकर विठ्ठल कुऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बालाजीनगरमधील रहिवाशांच्या वतीने मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुनर्वसन प्रक्रियेत कोणत्याही नागरिकाला अन्यायकारक पद्धतीने अपात्र ठरवू नये, संपूर्ण प्रकल्पाची माहिती नागरिकांसमोर खुली ठेवावी आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आदर्श पुनर्वसन वसाहत उभारावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेस महावीर बनसोडे, प्रशांत बचुटे, बी. बी. शिंदे, दिनेश कुऱ्हाडे, लक्ष्मण शिरसाठ, जावेद शहा, मनिषा वाघमारे, राणी मांडगे आणि सुभाष बनसोडे उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एसआरए योजनेचा मूलभूत हेतू झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, काही पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पात्र नागरिकांना वंचित ठेवण्यात आल्याच्या घटना समोर येत असल्याने शासनाने याप्रकरणी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे.
बालाजीनगरमधील प्रत्येक पात्र कुटुंबाला किमान ५०० चौ. फूट क्षेत्रफळाचे घर मिळावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली असून वाढत्या कुटुंबसंख्येच्या पार्श्वभूमीवर अल्प क्षेत्रफळाची घरे अपुरी ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच तांत्रिक बाबी अथवा मनमानी निकषांच्या आधारे कोणालाही पुनर्वसनापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित प्रकल्पातील इमारती सात मजली स्वरूपात उभारण्यात याव्यात, जेणेकरून सर्व पात्र नागरिकांचे पुनर्वसन मूळ परिसरातच होऊ शकेल, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तसेच प्रकल्पात २४ तास पाणीपुरवठा, अखंड वीज सेवा, आधुनिक जलनिस्सारण व्यवस्था, सीसीटीव्ही सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, वाहनतळ, हिरवळ, बालकांसाठी खेळाचे मैदान, क्रीडा सुविधा, उद्याने, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था, सरकारी आरोग्य केंद्र, डिजिटल ग्रंथालय, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक केंद्र, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आणि सुसज्ज सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, विकासकाने प्रत्येक रहिवाशाशी मराठी भाषेत स्पष्ट आणि लेखी करार करावा, अधिकृत बैठकींद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, पात्रता यादी जाहीर करावी आणि प्रकल्पाचा आराखडा, घरांचे तपशील, तात्पुरत्या निवासासाठी देण्यात येणारे भाडे, बांधकामाची मुदत आणि ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया पारदर्शकपणे सादर करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान नागरिकांवर दबाव टाकणे, धमकावणे किंवा दिशाभूल करून संमती घेण्याच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी, पुनर्वसनाच्या काळात शासनमान्य भाडे वेळेवर देण्यात यावे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पडेस्क अथवा नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा, बालाजीनगरमधील रहिवासी व्यापक जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पुणे जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्युज - भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेअंतर्गत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे या उद्देशाने वार्ड क्र. २१ चे भाजप पदाधिकारी जयेश शिवराज चौधरी यांनी नागरिकांसाठी मोफत मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.
या उपक्रमांतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार यादीतील नावाची पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे तसेच संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी संपर्क साधून देणे यासाठी नागरिकांना विनामूल्य मदत केली जात आहे.
अनेक नागरिकांना SIR प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याने किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, कोणत्याही पात्र मतदाराला गैरसोय होऊ नये आणि मतदार म्हणून त्यांचे अधिकार अबाधित राहावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती जयेश शिवराज चौधरी यांनी दिली.
यासंदर्भात जयेश चौधरी म्हणाले, “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करणे आणि मतदार यादीतील माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही मोफत मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देत आहोत.”
मतदार यादी, SIR फॉर्म, नाव पडताळणी अथवा इतर निवडणूकविषयक बाबींमध्ये अडचणी येत असलेल्या नागरिकांनी पीडब्ल्यूडी २५/११, अशोक थिएटर समोर, जयेश शिवराज चौधरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना (PCCHSS) ने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) संदर्भात आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्य असून, एसटीपी स्थापनेला विरोध करणाऱ्या कोणत्याही संघटना, महासंघ किंवा गटाच्या भूमिकेला पीसीसीएचएसएसचा ठाम विरोध आहे.
संघटनेने स्पष्ट केले की, त्यांचा विरोध एसटीपीला नसून, सोसायटीचा ताबा देण्यापूर्वी कार्यक्षम एसटीपी उभारण्याची कायदेशीर जबाबदारी टाळणाऱ्या बिल्डर्सना आहे. पात्र गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पूर्णपणे कार्यरत एसटीपी उभारणे, त्याची चाचणी घेणे आणि कार्यान्वित करूनच सोसायटीचा ताबा देणे ही बिल्डरची कायदेशीर जबाबदारी आहे. कार्यरत एसटीपीशिवाय कोणतेही पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) किंवा भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) देऊ नये, अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
यावेळी संघटनेने "पीसीएमसीच्या चांगल्या कामात सोबत, चुकीच्या कामात विरुद्ध!” हे आपले ब्रीदवाक्यही पुन्हा अधोरेखित केले संघटनेचे सचिव प्रकाश जुंकटवार म्हणाले, “पर्यावरण संरक्षणाची सुरुवात सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनापासून होते. प्रक्रिया न केलेले सांडपाणी नद्या आणि जलस्रोतांसाठी गंभीर धोका आहे. कार्यक्षम एसटीपी ही केवळ कायदेशीर अट नसून भविष्यातील पिढ्यांप्रती आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक बिल्डरने सोसायटीचा ताबा देण्यापूर्वी कार्यरत एसटीपी उभारणे बंधनकारक केले पाहिजे.”
याचबरोबर, पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन केले आहे की, बिल्डरने कार्यरत एसटीपी उभारून दिल्यानंतर तो नियमितपणे सुरू ठेवणे, त्याची योग्य देखभाल करणे आणि पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासन, महानगरपालिका किंवा बिल्डर्सचीच जबाबदारी नसून प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीचीही तितकीच नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. कार्यरत एसटीपी बंद ठेवणे किंवा त्याची योग्य देखभाल न करणे हे पर्यावरणाप्रती निष्काळजीपणाचे लक्षण आहे. सर्व सोसायट्यांनी पर्यावरणाच्या हितासाठी एसटीपी नियमितपणे कार्यरत ठेवावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने पर्यावरण संरक्षण, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि बिल्डर्सची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यावरणाच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाला संघटना पूर्ण पाठिंबा देईल, तर पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृती किंवा भूमिकेला ठाम विरोध करेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
"आम्ही निसर्गमातेच्या बाजूने आहोत. इंद्रायणी नदीची पूजा करायची आणि त्याच नदीत अशुद्ध सांडपाणी सोडायचे, ही दुटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही. एसटीपीला विरोध करणारी कोणतीही संघटना पर्यावरणाच्या विरोधात उभी राहत असेल तर अशा भूमिकेला पीसीसीएचएसएस कधीही समर्थन देणार नाही. बिल्डरांनी कार्यक्षम एसटीपी उभारल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला पूर्णत्व किंवा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये.”
-सत्यव्रत त्रिपाठी, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना
पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला.
व्हिएस न्यूज- जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. तसेच मार्च महिन्यात वेगवगेळ्या तारखांना देखील साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क येथे दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पत्रकार संचाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याच्या भावना यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी व्यक्त केल्या.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या या सोहळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार - डॉ. किशोरी आपटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार - सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार - सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार - स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार - डॉ. पूजा बोंबले, पिंपरी चिंचवड संस्कारत्न पुरस्कार - भारतीय न्यायाधीश, पिंपरी चिंचवड कलारत्न - ज्योती भीमाशंकर सेतसंदी, पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार - कृत्तिका तुळसकर, आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पद्मजा, मैत्री अपंग, समृद्धी, आई, श्रीकृष्ण, साई चरण, सुनिधी, आनंदी, साई, जीवन ज्योती, जास्वंदी, विघ्नहर्ता, रोहिणी आणि यशोदा महिला बचत गटांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमिला सुनील आढाव (महिंद्र स्पेअर बिझनेस युनीट, कान्हे हेड ऑफ दी डिपार्टमेंट - डेटा एन्ट्री विभाग) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आभार मानून - वाचन, अभ्यास, संशोधन ज्ञान, विज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्टर उभे केले जाणार असून या नवनिर्मितीत पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी उपलब्ध करून देणार असल्याच्या भावना महापौर रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केल्या. तर कार्यक्रमात उपस्थित राहून कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान करता आला आणि महिलांसोबत विचारांची देवाणघेवाण करता आल्याचे, उप महापौर शर्मिलाताई बाबर यांनी समाधान व्यक्त केले. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद समाज हितासाठी, पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असताना परिषेदेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत महिला भगिनींचा केलेला सन्मान इतरांना प्रेरणादायी ठरत असल्याची भावना पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, शाल व झाडाचे रोप देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित महिलांनीही आपल्या यशामागील संघर्ष व अनुभव शेअर करत इतर महिलांना प्रेरणा दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, मार्गदर्शक उपस्थिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे, परिषेद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर मंचावर उपस्थित होते. तर परिषद जिल्हा पदाधिकारी चिराग फुलसुंदर, अनिल वडघुले, श्रीमती रेखा भेगडे, मारुती बानेवार, श्रीमती प्रज्ञा आबनावे, याच बरोबर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे व डिजिटल मिडियाचे शिलेदार डिजिटल मिडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, महावीर जाधव, अशोक कोकणे, रमेश साठे, अनंता इंगळे, अविनाश कांबीकर, डॉ. देवीदास शेलार, पराग डिंगणकर, संजीव सूर्यवंशी, माऊली भोसले, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, राकेश पगारे, जेष्ठ परिषेद सदस्य प्रकाश जमाले, किशोर लष्करे, नरेश जीनवाला, श्रीमती अनुष्काताई, विजय न्यायाधीश, राहुल जाधव, इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच सन्मानार्थी निवड समितीमध्ये लिटिल सायंटिस्ट चे दत्तात्रय गिरमकर, निलेश बोराडे, आणि काव्य मित्रचे राजेंद्र सगर उपस्थित होते.
दरम्यान या सन्मान सोहळ्यामध्ये काव्य मैफिल संपन्न झाली. कवी प्रकाश गायकवाड, कवी देवेंद्र गावंडे, प्राध्यापिका कवयित्री सुषमा भालेराव यांनी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य संचालन राजेंद्र सगर यांनी केले. तर विजय चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी मान्यवरांना कला कुसर दाखवत वैविध्यपूर्ण फेटे परिधान केले. जागतिक महिला दिनानिमित्त योजित कर्तृत्ववान रणरागिणींच्या या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ होऊन महिलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी केले तर आभार परिषेद सदस्य अनिल वडघुले यांनी मानले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
व्हिएस न्यूज— छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने मोरवाडी, पिंपरी येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट, शेजारी पिंपरी येथे १९ फेब्रुवारी रोजी पार पडला.
युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष नरेश भाऊ जीनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि आदर्श राज्यकारभारावर प्रभावी व्याख्यान दिले. तसेच पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांचा कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. यावेळी पत्रकार संघाचे सागर सूर्यवंशी, संतोष गोतावळे महावीर जाधव यांच्या सह उपस्थित मार्गदर्शकांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक बुद्धन, अयफज कुरेशी, संदीप शिंदे, विशाल चंपावत, राजकुमार किरवले, गौरव यादव, अनुपम गायकवाड, रोमिओ लोबो, वसीम शेख, प्रवीण पोटभरे, खाजा कुरेशी, फिरोज कुरेशी, अर्जुन कुमार, किरण वावरे, देवा खुशावा, इकबाल शेख, प्रणव जीनवाल, सुमित साळुंखे, दिलीप कुमार आणि निश्चय जीनवाल यांच्या सह नरेशभाऊ जीनवाला मित्र मंडळाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती साजरी केली.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक तारखा जाहीर होण्याआधीच विरोधकांना धाकधुक! नागरिकांनी लावलेले सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स प्रशासनाने काढले की विरोधकांनी?
व्हिएस न्यूज : महानगरपालिकेच्या गांधीनगर–खराळवाडी –अजमेरा–नेहरूनगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रभावशाली इच्छुक उमेदवार सागर गोपाळ सुर्यवंशी यांना प्रभागातून विविध संस्था संघटना, मित्र परिवार, मित्र मंडळे आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील स्थानिक मित्र आणि कार्यकर्त्यांकडून पत्रकार सागर सूर्यवंशी यांच्या नावाची शिफारस प्रभावीपणे उमेदवार म्हणून केली जात असून परिणामी विरोधकांमध्ये धाकधुक वाढत चालली असून प्रभागातील सागर सूर्यवंशी यांना पाठिंबा असल्याचे फ्लेक्झ बॅनर विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून काढण्याचे कृत्य केल्याची चर्चा प्रभागामध्ये सुरू आहे.
भाजपचे प्रभावशाली दावेदार उमेदवार म्हणून स्थानिक नागरिकांनी पत्रकार सागर सूर्यवंशी यांचे नाव पुढे केल्यामुळे आणि नागरिकांनीच स्वयंस्पूर्तीने सागर सूर्यवशी यांचे फ्लेक्स लावल्यामुळे विरोधकांमध्ये धाक धुक वाढली असल्याने असे कृत्य प्रशासनाला तक्रारी करून केले असल्याचा दावा खराळवाडी येथील मित्र मंडळे करीत आहेत. आत्तापासूनच सागर सूर्यवंशी यांना जनतेचे वाढता पाठिंबा मिळत असल्याचा हा परिणाम असून लावलेले फ्लेक्स काढल्याने सागर सूर्यवंशी यांचा प्रभाव कमी होणार नाही असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. सागर सूर्यवंशी यांचे हिंदुत्वाचे कार्य आणि भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या विंग चे कार्य पाहता प्रभाग क्रमांक ९ मधून सागर सूर्यवंशी हेच योग्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या प्रभागात सुरू आहे.
व्हिएस न्युज – प्रभाग क्रमांक २२ मधील महिलांसाठी जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा, गप्पा गोष्टी, रंजकखेळ, सोबतच कॉमेडीचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी वेळ सायं. ५ वाजता विष्णुराज मंगल कार्यालय ज्योतिबा नगर काळेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक “ई बाईक” व “मानाची पैठणी”, द्वितीय क्रमांक ”फ्रिज”, तृतीय क्रमांक ”४३ इंची टीव्ही”, चतुर्थ क्रमांक ”वाशिंग मशीन”, पाचवा क्रमांक ”मिक्सर”, प्रश्नमंजुषा अंतर्गत आकर्षक बक्षिसे आणि लकी ड्रॉ विजेत्यास “सोन्याची नथ” व सहभागी प्रत्येक स्पर्धक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे सादरीकरण पूजाताई काळभोर सिने अभिनेत्री हे करणार आहेत.
प्रभाग क्रमांक २२ मधील सर्व महिलांनी न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षीस जिंकून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व सदर कार्यक्रमाचे फॉर्म जमा करण्याचे ठिकाण मोनिका नवनाथदादा नढे पाटील जनसंपर्क कार्यालय काळेवाडी, विष्णूराज मंगल कार्यालय शेजारी, मनपा शाळेसमोर, ज्योतिबानगर काळेवाडी येथे जमा करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
व्हिएस न्यूज – अल्फा लवाल लिमिटेड कंपनीतील तब्बल ४०२ कामगारांना बेकायदेशीर रित्या अकरा वर्षांपूर्वी कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्यासंदर्भात कामगारांना कामावर घेणे व संघटनेचा नाम फलक लावण्या संदर्भात लाक्षणिक उपोषणाची दिशा ठरवण्यासाठीची बैठक राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे (दि.९) रोजी संपन्न झाली.दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी म्हटल्या नुसार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले व अल्फा लवल लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक पाच दिवसानंतर पोलिसा समवेत होणार असून आज होणारे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. बाबा आढाव यांना बैठकीमध्ये दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली साठी मौन बाळगण्यात आले. यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नंदू आप्पा कदम, दिनेश पाटील, दिपक पाटील यासहित महाराष्ट्रातून आलेले ३०० कामगार उपस्थित होते.
यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, तेरा वर्ष न्यायालयात तारखावर तारखा चालू असून त्यामुळे किती कामगार मरतात याची वाट कंपनी बघतेय का? असा संशय निर्माण झाला आहे. कामगारांचे सर्व पुरावे संघटनेच्या वतीने सादर करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. कामगारांचा तेरा वर्षाचा संघर्ष चालू असून श्री रामाप्रमाणे १४ वर्षाचा वनवास लवकरच संपून आपल्याला न्याय मिळेल. न्यायालयात "तारीख पे तारीख" चालू राहणार असेल तर कंपनीने कामगारांना कामावर घेऊन कायमस्वरूपी कामगाराप्रमाणे वेतन देण्यात यावे. संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते त्या विरोधात कंपनीकडून पोलिसांना पत्र जातेच कसे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलन रोखण्यासाठी कंपनीने पोलिसांना चुकीची माहिती दिली. न्याय मिळवायचा असेल तर कामगारांची एकजूट महत्वाची आहे.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कसाही लागो तो आम्हाला मान्य असेल. परंतु कामगारांना कामावर घेऊन त्यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे ८० ते ९० हजार वेतन देण्यात यावे व निकाल लागल्यानंतर मृत्यू झालेल्यांच्या वारसांना कामावर घ्यावे. निकाल लवकर लागून कामगारांना वेतनाचा फरक मिळायला हवा. पाच दिवसांनी होणाऱ्या बैठकीमध्ये कंपनीने कामगारांना कामावर घेतले नाही तर कामगार आंदोलन करू शकता अशी हमी पोलिसांनी दिली आहे. जेवढे कामगार आज बैठकीला उपस्थित आहेत त्यांना कामावर घेण्यासाठी विनंती करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीच्या कामगारांचा प्रश्ना सहित अनेक कामगारांचे प्रश्न उपस्थित करून मार्गी लावण्याचे साकडे घालणार असल्याचे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.
नंदू आप्पा कदम म्हणाले की, कामगारांनो काळजी करण्याची गरज नसून कामगार क्षेत्रातील निस्वार्थी नेतृत्व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आपल्या सोबत उभे आहेत. संत तुकाराम नगर हॉल या ठिकाणी अनेक बैठका व सभा झाल्या त्या यशस्वी ही झाल्या त्याचप्रमाणे तुम्हालाही ते न्याय मिळवून देतील हा विश्वास आहे. तीन वर्ष कामावरून काढून टाकलेल्या सेवा विकास बँकेतील कामगारांना त्यांनी नुकतेच एक ते तीन लाख रुपये मिळवून दिले आहेत हा त्यांचा विजय वाखाण्याजोगा आहे. कामगारांसाठी लढणारे यशवंतभाऊ हे वादळ आहेत त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता भाऊंसोबत तटस्थपणे कामगारांनी उभे राहावे तरच न्याय मिळेल.
बैठकी मध्ये उपस्थित कामगारांच्या होकारानंतरच कंपनी व्यवस्थापनाला पाच दिवसाची मुदत देण्यात आल्याचे ठरले. तसेच संघटनेचा फलक लावण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. पोलिसांनी घेतलेल्या जबाबदारी नुसार त्यांच्या सूचनेमुळे होणारे आंदोलन तुरदास स्थगित करण्यात आले असून भविष्यात होणाऱ्या आंदोलनास कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.
व्हिएस न्यूज – पिंपरी महानगरपालिका सेवकांची सहकरी पतसंस्था मर्यादित संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकरी पतसंस्था फेडरेशन पुरस्कृत राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था म्हणून गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक येथे कर्नाटक राज्याचे खासदार मा. श्री प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोले व आमदार मा. शशिकला जोले यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य सहकरी पतसंस्था फेडरशनचे अध्यक्ष मा. ओमप्रकश तथा काका कोयटे यांच्या हस्ते संस्थेला सन २०२४-२०२५ या सालात पुणे विभागातून प्रथम क्रमांक म्हणून निवड करुन दिपस्तंभ पुरस्कर देऊन गौरविण्यात आले.
सदरचा पुरस्कार संस्थेचे मागदर्शक / तज्ञ संचालक मा. श्री शशिकंत उर्फ बबनराव झिंजुर्डे (अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ) व चेअरमन मा. श्री शिवाजी येळवंडे, व्हा. चेअरमन श्री ज्ञानेश्वर शिंदे, सेक्रेटरी श्री विश्वनाथ लांडगे व खजिनदार श्री अभिषेक फुगे यांनी स्विकरला तसेच सस्थेचे संचालक चारुशिला जोशी, सनी कदम, नथा मातेरे, विजया कांबळे, योगेश रानवडे, विजय मुंडे, वैभव देवकर, युनुस पगडीवाले उपस्थित होते. मा. शशिकंत उर्फ बबनराव ठळसी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व सभासदांच्या सहकर्यामुळे संस्थेला सलग पाचव्यांदा पुरस्कर मिळला आहे. सर्व संचालक मंडळ, सल्लागार व सभासद यांचे मनापासून अभिनंदन व पुढील कर्यास शुभेच्छा.
व्हिएस न्यूज – काळेवाडी पोलीस ठाणे येथील तपास पथकाने वाहन चोरीचे एकूण १० गुन्ह्यांचा छडा लावला त्यातून ८,४०,०००/- रु एकूण २० दुचाकी वाहने हस्तगत करून दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते त्यानंतर सोनारानेच कान टोचले असावेत म्हणून कार्यक्षमता दाखवून "लेट पण थेट" अशी दमदार कामगिरी काळेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
शुभम चंद्रकांत शिंदे (वय-२६ वर्षे रा. पाचपीर चौक, नढे नगर काळेवाडी पुणे मुळ रा.फौजी आंबवडे, ता. महाड, जि. रायगड). सोमनाथ शांताराम कासरुंग (वय-३२ वर्षे, रा.नेऱ्हे, दत्तवाडी, मारुंजी रोड घाणेकरवस्ती, ता.मुळशी, जि.पुणे मुळ रा. करंजमाळ, ता. महाड, जि. रायगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यवंशी, उपनि. राजेंद्र काळे, पोहवा स्वप्निल खेतले. पोहवा प्रमोद कदम, पोहवा अतिक शेख, पोशि अजय अरुण फल्ले, पोशि रमेश खेडकर, पोशि गणेश जाधव असे काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोहवा प्रमोद कदम यांना पाचपीर चौक काळेवाडी येथे राहणारा एक इसम हा एक पल्सर मोटार सायकल वापरत असुन तो संशयीत वाटत आहे अशी माहिती पोहवा प्रमोद कदम प्राप्त झाली. पोलिसांनी पाचपीर चौक येथे सापळा रचून शिताफीने आरोपीला पकडले.
संशयित आरोपीकडे असलेल्या गाडीचा नंबर पाहिला असता तो यु.पी.७०/डी.एन./८१६३ असा होता त्याला पोलिसांनी त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव-शुभम चंद्रकांत शिंदे असे सांगितले, तो वापरत असलेली पल्सर मोटार सायकल व मोटार सायकलबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने ती मोटरसायकल त्याच्या मित्राकडून विकत घेतल्याचे सांगितले. सदर आरोपीला गाडीसह पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने ही मोटरसायकल त्याचा सोमनाथ शांताराम कासरुंग याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले.
आरोपी याचे बोलण्यामध्ये व त्याचेकडे तपासामध्ये तो खोटे बोलत असल्याबाबत संशय आल्याने जप्त पल्सर मोटार सायकलचे चेसी नंबर, इंजिन नंबर वरुन मोटार सायकल मालकाची माहिती प्राप्त केली व काळेवाडी पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे दाखल गुन्हयाचे माहिती घेतली त्यानुसार सदर गाडी गाडी ही काळेवाडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं.२८२/२०२५ बी.एन.एस.३०३(२) मधील चोरीस गेलेली असल्याचे निष्पण्ण झाले. पोलिसांनी आरोपी यांचेकडे अधिक तपास केला असता आरोपी यांचेकडुन पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या ८,४०,०००/- रु च्या एकुण २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. इतर १० गाड्यांचा तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, परिमंडळ २ चे पोलीस उपयुक्त विशाल गायकवाड, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली काळेवाडी पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळ, सह पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी, राजेंद्र काळे ,पोलीस अंमलदार पोहवा स्वप्निल खेतले, पोहवा प्रमोद कदम, पोहवा अशोक जायभाये, पोहवा अतिक शेख, पोहवा भारत पारधी, पोशि अजय अरुण फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि रमेश खेडकर, पोशि गणेश जाधव यांनी केली.
जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते – तहसीलदार अजित गायकवाड
व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक २८ जुलै २०२५ –'आम्ही मुळशीकर' प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा "शाब्बास" गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कोथरूड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी २५० हून अधिक १० वी, १२ वीतील यशवंत विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अजित गायकवाड, उल्हे कोचिंग क्लासचे संचालक मनोज उल्हे, महेश महाले, कार्यक्रमाचे संयोजक ॲड. गणेश सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, की अशा कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळते आणि यातूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते. ग्रामीण भागातून येवून स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करून पुढे येणे खूप कठीण आहे. मात्र जिद्दीने पुढे आले पाहिजे. १० वी १२ नंतर जीवनातील सर्वात महत्त्वाचे वळण आहे. येथून आपण विविध शाखेत प्रवेश घेऊ स्वतःचे भवितव्य घडवू शकता. ते पुढे म्हणाले की अशा वेळी पालकांनी मुलांचा कल कुठे आहे हे ओळखून मुलांच्या पाठीशी खंबीर उभे रहावे.
सातपुते म्हणाले, की "गेल्या १९ वर्षांपासून "आम्ही मूळशीकर प्रतिष्ठान"च्या माध्यमातून सातत्याने काम करत आहेत. यामध्ये उद्योजकांचा सन्मान, नोकरी महोत्सव, वधुवर मेळावा, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, आम्ही मूळशीकर भूषण पुरस्कार असे अनेक उपक्रम गेल्या दोन दशकांपासून आम्ही राबवत आहेत. मुळशी तालुक्यातील नाणेगावचे सुपुत्र गायकवाड हे सध्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. तेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थिती लावली. मुळशी तालुक्यासाठी नेहमी चांगले कार्य करण्याची माझी तळमळ आहे. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही. नेहमी विद्यार्थ्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी. उल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास डोक यांनी केले. तर सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी केले आणि आभार राजेंद्र उभे यांनी मानले. तर निवृत्ती येवळे, अनंतराव दहीभाते, सीताराम तोंडे पाटील, माऊली डफळ, सुरेश साळुंखे, लक्ष्मण कंधारे, विकास डोख, सदाशिव तापकीर, रमेश उभे, सुरेश शिंदे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विशेष सन्मानाने यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
यावेळी विशेष सन्मान करून यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यामध्ये डॉ. देविका माझीरे, सी.ए. प्रज्वल वाईकर, उम्री नांगरे, संस्कृती तापकीर, प्रथमेश टमगिरे अर्जुन मारणे, आयुष्य दहीभाते, अर्जुन खैरे आदींचा सन्मान करण्यात आला.
व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ०४ जुलै २०२५ : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या संयोजनाखाली व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
रविवार दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचा पवित्र दीन हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने पावन झालेल्या संत तुकाराम नगर मध्ये विविध कार्यक्रमाने यंदा आपल्या सर्वांच्या सहभागाने जल्लोषात साजरा होत आहे, शुभकार्यात परिवारासह सहभागी व्हावे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली.
या शुभ मुहूर्तावर दोन कार्यक्रम आयोजित केले असून ते खालील प्रमाणे आहेत .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकारने यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केले त्याबद्दल आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर येथे रविवार रोजी दुपारी ३.०० वाजता संकल्प सिद्धी ११ वर्षे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये अकरा वर्षात झालेल्या विविध विकासातील कार्यबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेच्या ९४१ सदनिकाधारक व २२ दुकानदार सभासदांना शेअर सर्टिफिकेट वाटण्यात येणार आहेत. सर्व संत तुकाराम नगर हे साक्षात पंढरपूर होणार असून विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या जिवंत प्रतिकृतीचे मिरवणूक तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पवित्र गाथा व ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी या ग्रंथांसह भगवान विठ्ठलाच्या पादुकांची पालखी संत तुकाराम नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर,(एच.ए. मैदानातील पेट्रोल पंप समोरील, संत रोहिदास महाराज यांचे मंदिर शेजारी ) येथून शेकडे वारकऱ्यांसह,भजनी मंडळासह दुपारी १.०० वाजता दिंडी निघणार आहे, महेश नगर, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर मधील दत्त मंदिर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर, गणेश मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर, तुळजाभवानीमाता मंदिर, खंडोबा मंदिर, शनी मंदिर येथून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ही दिंडी पोहोचणार आहे, या भव्य दिंडीचे, पालखीचे तेथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे, दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांचे यतोचित स्वागत झालेंनंतर त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली.
आषाढी एकादशी दिवशी दुपारी ३.०० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे तरी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वच भाविकांना निमंत्रण देण्यात येत आहे आपण आपल्या परिवारासह आषाढी कार्तिकी निमित्त होणाऱ्या प्रथम पवित्र सोहळ्यास सहभागी होऊन हरी भजनाचा लाभ घ्यावा व देशाप्रती देखील आपले प्रेम व्यक्त व्हावे याकरता या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे,कार्यक्रम संपल्यानंतर आचार्य अत्रे रंगमंदिर बेसमेंट मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद सर्वांनी एकत्र गृहन करावयाचा आहे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले आणि केली.
यावेळी माधुरी मिसाळ नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य उपस्थित असतील.
आमदार महेश लांडगे,आमदार शंकर जगताप,आमदार अमित गोरखे,आमदार उमा खापरे यांचे मार्गदर्शन असेल. प्रमुख वक्ते अमरजी साबळे आदी मान्यवर उपस्थित असतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे आहेत, त्यांच्या सोबत सदाशिव खाडे,सुजाता पलांडे,विजय उर्फ शीतल शिंदे, विलास मडगिरी ,ॲड मोरेश्वर शेडगे,संजय मांगोडेकर,माऊली थोरात,मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002