व्हीएस न्यूज - दुचाकीवरील चोरट्यांनी धारदार शस्त्राने पादचारी तरूणावर वार करून 2 हजार किंमतीचा मोबाईल लांबविला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास एमआयडीसीतील बोऱ्हाडेवाडीतील स्मार्ट हार्डवेअर दुकानासमोर घडला.
गोविंद भोसले (वय 22, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) याने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद हा पायी जात होता. यावेळी दुचाकीवरील दोघांनी गोविंदचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गोविंद मोबाईल देत नसल्याने चोरट्यांनी त्याच्या डोक्यात, पायवर आणि छातीवर शस्त्राने वार करुन जखमी केले. त्यानंतर तरुणाचा मोबाईल घेऊन पळून गेले.भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कोयना एक्सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या मयत महिलेचे वय 35, तर मुलगा व मुलीचे वय अंदाजे सात वर्ष आहे. अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लोणावळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या लोकलमधून पिंपरी रेल्वे स्टेशनवर उतरली. यावेळी लोकलच्या पाठीमागून रुळ ओलांडणाऱ्या या महिलेला व मुलांना लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचा अंदाज आला नाही. एक्सप्रेसच्या धडकेत या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर तीनही मृतदेह शवविच्छेदनाकरिता वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातानंतर भाजी मंडईजवळील उड्डाणपुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुक कोंडी झाली होती.
व्हीएस न्यूज – तीर्थक्षेत्र आळंदीत मंगळवारी (दि.14) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होत आहे. राज्य परिसरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा परंपरेने जयघोषात झाली. भाविकांच्या अखंड हरिनामाने अलंकापुरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.
दरम्यान, नवमीनिमित्त रविवारी (दि.12) माउली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांचे महापूजा, महानैवेद्य, विना मंडपात बाबासाहेब देहूकर यांच्या कीर्तन सेवे नंतर धुपारती व त्यानंतर वासकर महाराज यांच्या वतीने परंपरेने कीर्तनसेवा रुजू झाली. दशमी दिनी उद्या सोमवारी (दि.13) माउली मंदिरात श्रीना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा, श्रींना महानैवेद्य, विना मंडपात ह.भ.प.गगुकाका शिरवळकर आणि ह.भ.प.धोंडोपंतदादा अत्रे यांच्या वतीने कीर्तन सेवा, धुपारती नंतर ह.भ.प.वासकर महाराज आणि ह.भ.प.वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन सेवा हरीनाम गजरात होणार आहे. भाविकांना आळंदी कार्तिकी यात्रेत कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, जागर अशा धार्मिक उपक्रमातून श्रवण सुखाची पर्वणी लाभली आहे. यात्रेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा माउली मंदिरात सुरु आहे. यास भाविक वारकरीही भक्तीभाव जोपासत हजेरी लावताना दिसत आहेत.
मंगळवारी (दि.14) सोहळ्यात कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. या निमित्त पहाटे पवमान अभिषेक, दुधारती, 11 ब्रम्हव्रुन्दाच वेदमंत्र जयघोष, श्रींना महानैवेद्य, श्रींचे पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारती, परंपरेने ह.भ.प.संतोष महाराज मोझे यांचे वतीने जागर होणार आहे.
शासकीय यंत्रणांची लगबग…
आळंदी पालिका, आळंदी देवस्थान, पुणे महसूल, पुणे शहर व ग्रामीण पोलीस, राज्य आरोग्य सेवा, महावितरण सेवा, विविध सेवाभावी संस्था यांच्या वतीने भाविक-नागरिक यांच्यासाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी अंतिम टप्प्यात लगबग दिसत आहे. आळंदी मंदिर, इंद्रायणी नदीघाट परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्षवेधी ठरली आहे. ठिकठिकाणी राहुट्यांमधून भजन, कीर्तन, प्रवचन सेवेत रंग भरला आहे. आळंदी प्रभावी स्वच्छता गृहात व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदीत यंत्र काळात मोफत सुविधा ठेवण्यात आली आहे. भाविकांच्यात नाराजी निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची स्नानास गर्दी…
प्रदक्षिणा रस्ता आणि गोपाळपुरा,जुना आणि नवीन पूल परिसरात वारकऱ्यांची गर्दी वाढली आहे. इंद्रायणीत स्नान केल्यानंतर भाविक माउलींच्या समाधी दर्शनासाठी मंदिराकडे जात होते.भक्ती सोपान पूल दर्शन बारीतून मोठी रांग लागली होती.महापूजेची लगबग सुरू होती.इंद्रायणी घाटावर, देऊळवाड्या बाहेर मठ,धर्मशाळा मध्ये वारकऱ्यांचे खेळ रंगले होते.वारकऱ्यांनी दिंड्यातून नगर प्रदक्षिणा केली.वारकऱ्यांचा आनंद भक्ती ओसंडून वाहत होती.माउलींचे मानाचे पालखी सोहळ्यातील दिंड्या चे आगमन आळंदीत झाले आहे.श्रीचे दर्शनासाठी भाविक गर्दी करीत होते.दुपारनंतर दर्शनास मंदिरात गर्दी देखील वाढली.केसं महाराज साखरे यांचे वतीने सुरु करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र नेवासा ते आळंदी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आळंदीत आगमन देखील हरिनाम गजरात झाले आहे.
आळंदी पालिकेच्या भाविकांना सेवा-सुविधा…
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांचे साठी चेंजिंग रूमची व्यवस्था दुतर्फा करण्यात आली आहे.आळंदी पालिकेने शहरातील विविध ठिकाणची रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे पथारी व्यवसायीची दुकाने हटविल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाचे नियंत्रणात अतिक्रमणे हटाव महिमा सुरु आहे.यात्रा काळात देखील रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनादेश देण्यात आले आहे.अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवक पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.प्रशासनाने पदाधिका-यांनी या कारवाईस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अलंकापुरीत पोलीस बंदोबस्त तैनात…
तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांच्या सुरक्षेसाठी सी.सी.टि व्ही.कॅमेरे तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भाविक-नागरिकांच्या सुरक्षेस तसेच सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे.यासाठी माउली मंदिरात घातपात विरोधी पथकाकडून पाहणी देखील नियमित पणे करण्यात येणार आहे.शहरात रस्त्यावरील पाण्याचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी नळजोड वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.माउली मंदिर परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था कायम आहे.परिसरात रहदारी वाहन प्रवासात धुळीचे साम्राज्याने धुराळा भाविकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.यातून भाविकांची नाराजी वाढत आहे.राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देण्याची गरज भाविकांतून व्यक्त होते.
व्हीएस न्यूज - महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे, असे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भोंडवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे बंधाजयातून होणारी पाणी गळतीबाबत प्रशासनास वारंवार कल्पना देऊनसुद्धा दररोज होणाजया या पाणी गळतीकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही भोंडवे म्हणाले, रावेत प्रभागात असणा-या पाणी, वीज, रस्ते व इतर असुविधांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर याना भेटून समस्या मांडल्या आहेत परंतु प्रशासन वेळकाढूपणा करीत वेळ मारून नेत आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णांना केसपेपर देताना काऊंटर क्रमांक 4 मध्ये आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागासाठी वेगवेगळे 10 रुपये आकारले जात असून, त्यामध्ये तेथील कर्मचारी गोलमाल करत आहेत. त्याची चौकशी करावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.
यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष माजीद शेख यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना केसपेपर देण्यासाठी चार काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यातील 4क्रमांकाच्या काऊंटरवरील कर्मचारी बाह्यरुग्ण विभागाच्या केसपेपरसाठी 10 रुपये आकारल्यानंतर पुन्हा आंतररुग्ण विभागासाठीही 10 रुपये आकारत आहेत. त्यामध्ये कर्मचारी गोलमाल करत आहेत. त्याचप्रमाणे ओळखीच्या रुग्णांना प्राधान्य देऊन त्यांना आतमध्ये बोलावून घेत केसपेपर दिले जाते. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी.
तसेच, अपघात विभागात उपचार केलेल्या जुन्या रुग्णांना पुन्हा उपचारासाठी येताना केसपेपरवर शिक्का घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी कोणतेही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने या रुग्णांना शिक्का मारून घेण्यासाठी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वायसीएममधील कर्मचारी शिक्का मागण्यासाठी गेलेल्या रुग्णांना चांगली वागणूक देत नाहीत. त्यामुळे जुन्या केसपेपरवर शिक्का मारण्यासाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
व्हीएस न्यूज - फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार शेलारमामा नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.शेलारमामा पुरस्कार 2006 पासून दिले जाते. या पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांच्या कुटुंबियांनी घातलेली आहे. विद्यापीठाने नाही. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.तोपर्यंत शेलारमामा पुरस्कार तूर्त मागे घेण्यात आल्याची माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे.शेलारमामा हे हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु आहे. त्यांनी शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवण्यात येईल. अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरुंनी यावेळी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - महापालिका सार्वत्रिक निवडणुक निकालानंतर 30 दिवसात 88 उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्या उमेदवारांना तीन वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिला आहे. याबाबत अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी पालिका निवडणूक विभागास पाठविली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. 23 फेब्रुवारी 2017 रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब निवडणूक विभागास सादर करणे बंधनकारक आहे. त्यानूसार 25 मार्च 2017 पर्यंत विहित मुदत देण्यात आली होती. परंतू, निवडणूक लढविलेल्या 88 उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब सादर केलेला नव्हता. त्यानूसार 88 उमेदवारांची विहित कार्यपध्दतीनूसार नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीस अनेक उमेदवार गैरहजर राहिले.
राज्य निवडणूक आयोगाने 5 जून 2010 आणि 10 ऑगस्ट 2015 आदेशान्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10(1ई) नूसार अनर्ह करण्यात आलेल्या उमेदवारांचे आदेश राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी 88 उमेदवारांना रकाना क्रमांक 6 मध्ये नमूद आदेशानूसार तीन वर्षे कालावधीकरिता पालिका सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये गेल्या महिन्याभरापासून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबाबत फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन दखल घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे शुक्रवारी (दि.10) हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास फ-प्रभाग कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा गंगा धेंडे, कविता खराडे, पुष्पा शेळके, रेश्मा पठाण, पल्लवी साखळे, शिला भोंडवे, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, दिपाली देशमुख, रेश्मा पठाण, संजय धेंडे, नवनाथ कांबळे, शिरीष आवाळे, दत्ता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चो काढून फ क्षेत्रीय कार्यालय कामकाजाचा निषेध करण्यात आला. यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये पाणी पुरवठा अनेक महिन्यांपासून सुरळीत होत नाही, तेथील रहिवासी कुंटूंबाची पाण्यावाचून वणवण सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही वारंवार होणारे दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चो काढून निषेध केला आहे. तसेच दोन दिवसात पाणी पुरवठा सुरु न केल्यास प्रभागाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
व्हीएस न्यूज – सांगवी येथील मुळा व पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी थेट सोडण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असून चेंबर दुरुस्त करुन नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. तेथील मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. या मैला पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र दूषित होवून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय त्या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीपात्रातील बहुतांश चेंबर तळाला फुटलेले असून संपुर्ण मैला मिश्रीत पाणी नदीपात्रात मिसळून पाणी दुषित होत आहे. दरम्यान, मैलायुक्त पाणी नदीपात्रात येऊनही स्थानिक नगरसेवक गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली असून त्यांचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे मैलापाणी थांबवावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - दुचाकीवरील चोरट्याने पादचारी नागरिकचा 5 हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना मंगळवार दि. 7 ला रात्री दहाच्या सुमारास हिंजवडीतील मेझा नाईक चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान घडली.
या प्रकरणी मोहम्मद अन्सारी (वय 38, रा. मारुंजी रोज, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोहम्मद हे मंगळवारी रात्री मेझा चौकाकडून लक्ष्मी चौकाकडे जात होते. यावेळी दुचाकीवरून येऊन चोरट्याने 5 हजार किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के स्वहिश्यापोटी एकूण 157 कोटी रुपये अदा करणार आहे. त्यापैकी मागील सहा महिन्यात महापालिकेने 78कोटी अदा केले आहेत. संचलन तूट, पासेस आणि बसखरेदीसाठी ही रक्कम पालिकेने दिली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा चालविण्यासाठी दोन्ही महापालिका निधी पुरवितात. त्यात पुण्याचा 60 टक्के, तर पिंपरीचा 40 टक्के हिस्सा आहे. चालू आर्थिक वर्षात संचलन तुट, बसपासेस आणि बसखरेदी या गोष्टींसाठी एकूण 156 कोटी रुपये इतका पिंपरी पालिकेचा हिस्सा दिला जाणार आहेत. त्यापैकी मागील सहा महिन्यात पिंपरी महापालिकेने एकूण 78 कोटी रुपये पीएमपीएमएलला अदा केले आहेत.
पालिकेने संचलन तुटीपोटी 42 कोटी, पासेस पोटी 16 कोटी लाख आणि बस खरेदीसाठी 20 कोटी रुपये असे एकूण 78 कोटी रुपये दिले आहेत. तर, उर्वरित सहा महिन्यात आणखी 78 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, दरवर्षी पालिका तिजोरीतून कोट्यवधी रुपये देऊनही शहरातील बससेवेमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. शहरातील पीएमपीएमएलच्या तक्रारी सोडविल्या जात नसून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जात नाही. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत सातत्याने नाराजीचा सूर आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी घेत असताना शहरामध्ये चांगली बससेवा पुरविली जावी, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002