व्हीएस न्यूज - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना देशातील बहुचर्चित चारा घोटाळय़ातील देवघर कोषागार भ्रष्टाचार प्रकरणी साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंना या कारावासात माळीचे काम करावे लागणार असून त्यातून दररोज ९३ रुपये पगार मिळणार आहे.
हजारीबागच्या खुल्या कारागृहात लालूंना ठेवण्यात आले असून ‘राजद’ने त्यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ३ वर्षाहून कमी शिक्षा लालूंना मिळाली असली तर विशेष न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला असता पण ३ वर्षाहून अधिक शिक्षा झाल्याने त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत. लालूंनी शिक्षा सुनावल्यानंतर मोदी सरकारविरोधात ट्विटरद्वारे एक पत्र लिहीले असून, मोदी हुकूमशाह असल्याचा आरोप यातून केला आहे.
ज्यांना जनतेने निवडले ते कारागृहात तर ज्यांना निवडले नाही ते सरकारमध्ये आहे, असा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला. तसेच लालूप्रसादांना टार्गेट करत बदनामीचे षड्यंत्र असल्याचेही म्हटले आहे. लालूंना कारावास झाला असला तरी काँग्रेस व राजदची युती कायम राहणार असल्याची बिहार काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष कादरी यांनी सांगितले.