व्हीएस न्यूज - लवकरच संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता असून पर्यावरणावर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी,प्लास्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली असल्यामुळे प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास,बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवर बंदी येऊ शकते.
दुकाने, मॉल्स, तसेच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी या निर्णयानंतर प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. यासोबत प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणावेळी घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.
नैसगिक आणि जैविकदृष्ट्या प्लास्टिक विघटनशील नसतो. पर्यावरणाचा समतोल प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे बिघडतो. पाण्याचा पावसाळ्यात निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होतात.प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.